इतिहास-पुराणकथांत वर्णन केलेली माणसे असतात तशी माणसे सभोवताली दिसली, की प्रत्येक वेळी अचंबित व्हायला होते. कुडाळच्या संदीप परबची गोष्ट तशीच आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याचा गुणसमुच्चय वाढवतच गेलेली आहे. तो शालेय वयात असताना त्याने शेजारच्या बालविधवेची पीडा जाणली. ती माहेरी आलेली होती. तेथेही तिला काबाडकष्ट करावे लागत. आठवी-नववीत असलेल्या संदीपने गुरे रानातून चारून त्यांना घरी घेऊन येत असताना पाहिले, की शेजारीण रस्त्याकडेला पडली आहे. सोबत जळणाच्या लाकडांची मोळी आहे. त्या मुलीला आजारी अवस्थेत सर्व कामे करावी लागत होती. संदीपने तिला उचलली, सावरली आणि तिला घरी घेऊन आला. संदीपच्या मनाला अशी अनेक दृश्ये जाचत, दुर्बल वृद्धांची व मुलांची अवस्था फार बिकट असते असे त्याला जाणवे.
संदीप परब
तो कुडाळच्या कॉलेजमध्ये पदवी घेऊन
पुढील शिक्षणासाठी मुंबईत आला. त्याला शिक्षण स्वतःच्या हिमतीवर घ्यायचे होते.
त्याने पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याच्या स्वभाववृत्तीला साजेसा समाजसेवा
शास्त्रातील अभ्यासक्रम निवडला. तो वांद्रे पूर्व येथे राही. त्याने साहित्य सहवासमधील
साहित्यिकांच्या गाड्या धुतल्या, हॉटेलमध्ये कामे केली. शिक्षण पूर्ण झाले. मग जवळजवळ
सात-आठ वर्षे महिला संस्था, एचआयव्ही मुलांच्या संस्था यांच्याबरोबर काम केले.
काही वेळा, सामाजिक संस्थांबरोबर मोर्चे-आंदोलने यांत सहभागी झाला. ती सर्व माणसे
त्याला मोठी वाटत. "श्रीनिवास सावंत, राम अडसुळे यांनी तर त्या काळात
माझ्यातील कार्यकर्ता घडवला" असे तो म्हणतो. पण त्याला ओढ होती मदर टेरेसा,
बाबा आमटे यांच्याप्रमाणे मोठे करुणाकार्य करण्याची आणि त्याने ते केले; अतोनात
कष्ट घेऊन केले!
त्याची वृत्ती विनम्र आहे -वाणी मृदू
आहे; पण त्या पलीकडे त्याच्या स्वभावाला एक ओढ आहे. तो माणसांना खेचून घेऊ शकतो ते
त्याच्या आर्जवाने आणि सेवाभावाने. त्याला रस्त्याकडेला घाणीत, गटारात पडलेली
वृद्ध माणसे आणि निराधार, बेसहारा मुले समाजात असतात या गोष्टीचा फार त्रास होतो.
तो त्यांच्यासाठी काम करतो. तो म्हणतो, त्यांतील काही माणसे मनोरुग्ण असतात.
अत्यंत घाण अवस्थेत राहतात. केसांच्या जटा झालेल्या -त्यात किडे! त्यांना शोधणे-स्वच्छ
करणे-त्यांचा आजार बरा करणे आणि त्यांना त्यांच्या घरी पोचवणे हे पहिले काम. त्या
कामाचे वर्णन त्याच्याकडून आपल्याला ऐकवत नाही. तो सांगतो, केसांच्या जटा झालेल्या,
केसांत-अंगावरच्या जखमांत किडे असतात. एकेका व्यक्तीच्या अंगावर दीडशे-दोनशे किडे
मिळतात! त्याची वर्णने ऐकताना अंगावर काटा येतो. मुले सहसा रेल्वेस्टेशनांवर
मिळतात. काही कारणाने
घरून निघालेली असतात-हरवलेली असतात. साऱ्या भारतातून आलेली असतात. त्यांची घरे शोधून त्यांना घरी पोचवणे हे मोठे व काही महिन्यांचे काम असते. संदीप ते काम गेली बारा वर्षे निष्ठेने अथकपणे करत आहे.
घरून निघालेली असतात-हरवलेली असतात. साऱ्या भारतातून आलेली असतात. त्यांची घरे शोधून त्यांना घरी पोचवणे हे मोठे व काही महिन्यांचे काम असते. संदीप ते काम गेली बारा वर्षे निष्ठेने अथकपणे करत आहे.
त्याने त्याच्या कार्यासाठी 'जीवन आनंद संस्था' निर्माण केली आहे. संस्थेचे खार, सांताक्रूझ, विरार असे मुंबई परिसरात तीन
आणि कुडाळजवळ एक असे चार आश्रम आहेत. मुंबईत तीन ठिकाणी मिळून पन्नास वृद्ध-मुले
आहेत. तर कुडाळजवळच्या मुख्य आश्रमात एकशेवीस निवासी वृद्ध व बालके आहेत.
संदीपच्या कामाचा असा मोठा पसारा झाला आहे. तो त्यात हरवलेला असतो, कारण त्याच्या
संस्थेचे पंचावन्न कार्यकर्ते पूर्णवेळ आहेत, तर दीडशे स्वयंसेवक हौसेने येऊन कामे
करणारे आहेत. त्या सर्वांना कामात गुंतवणे व व्यग्र ठेवणे हा मोठा व्याप असतो.
संदीपचे वय आहे पंचेचाळीस, पण त्याला
जगाचा अनुभव प्रचंड आहे. त्याची माणसे जोडण्याची हातोटी विलक्षण आहे. त्याचा
मोठेपणा त्याच्या तोंडून कधीच व्यक्त होत नाही. तो बोलतो आर्जवाने. तो
त्याच्या गप्पागोष्टी
तोंडातून आपोआप प्रकट होत आहेत असे वाटावे इतक्या हळुवारपणे बोलतो. त्यामुळे
त्याचे बोलणे कान देऊन ऐकावे लागते. संदीप सतत मुंबई-कुडाळ आणि अन्य प्रदेशात फिरत
असतो. त्याचे घर वसईला आहे. त्याच्या घरी पत्नी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे.
कार्व्हर डे-नाईट निवारा केंद्र |
त्याने गेल्या बारा वर्षांत एकशेएक्याण्णव
बेवारस गृहस्थांना, त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या परवानगीने अग्नी दिला आहे, सहाशेपंचेचाळीस
जणांना त्यांच्या घरी भारतात जेथे कोठे घर असेल तेथे नेऊन सोडले आहे. संदीपच्या
तोंडावर त्यांतील प्रत्येकाची कहाणी आहे. संदीपला व त्याच्या संस्थेला या कार्याकरता
पंचेचाळीस पुरस्कार भारतातून मिळाले आहेत. त्याच्या संस्थेचा वार्षिक ताळेबंद
सव्वा कोटी रुपयांचा आहे. त्याच्या आश्रमात असलेल्या मनोरुग्णांकडून शेती करून
घेता येईल का? असा प्रयोग करून तो पाहणार आहे.
तो त्याच्याकडील वृद्धांच्या, बालकांच्या, मनोरुग्णांच्या कहाण्या उत्कटपणे सांगतो -परत परत सांगू शकतो. मी त्याला एकदा म्हटले, की निराधार भटक्या अवस्थेत फिरणाऱ्या माणसांना आसरा देण्याचे प्रकल्प ठिकठिकाणी आहेत. दादरची समतोल संस्था प्रसिद्ध आहे. कर्जतचे डॉ. भारत वाटवानी यांना तर गेल्या वर्षी त्या कामासाठी मॅगसेसे अॅवॉर्ड मिळाले. पुणे-कोल्हापूर-नगर येथेही अशाच कामासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रकल्प आहेत. त्यांच्यात काही प्रमाणात नेटवर्क असतेही, पण दैनंदिन बाबी इतक्या गुंतागुंतीच्या असतात की ती माणसे, त्या संस्था एकांडेपणाने काम करत राहतात. त्यामधून मुख्य प्रश्न सुटण्याच्या दिशेने काही हालचाल सोडाच, विचारदेखील होत नाही. पंचवीस-तीस टक्के सुखवस्तू समाज आणि निराधार व्यक्तींसारखे सामाजिक प्रश्न यांच्यामध्ये सततचे नाते निर्माण करण्याच्या दृष्टीने काही व्यवस्था करणे शक्य आहे का?
वीणा गव्हाणकर आणि संदीप परब |
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या
वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
----------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------
4 टिप्पण्या
संदीपसारखी ध्येयाने काम करणारी माणसे पाहिली की ह्या माणसांचा अभिमान वाटतो .असे आदर्श पुढच्या पिढीला समजण्यात ह्या लिखाणाचा खूप फायदा होईल . सौ .अंजली आपटे दादर.
उत्तर द्याहटवाअशा लोकांची माहिती समाजापुढे आणण्याच्या या उपक्रमाबद्दल थिंक महाराष्ट्रचे कौतुक!
उत्तर द्याहटवाबापरे. काय माणूस आहे. काय काम आहे. साष्टांग नमस्कार.अश्या माणसाबद्दलची माहिती आमच्या पर्यंत पोहोचविली त्या बद्दल think महाराष्ट्र धन्यवाद.
उत्तर द्याहटवाओहो,काय ग्रेट माणूस आहे.फारसा गाजावाजा न करता केवळ सेवावृत्तीने काम करणा-या अशा महत्म्यांमुळेच समाजाचा गाडा चालूआहे. माहिती दिल्याबद्दल थींक महाराष्ट्राला धन्यवाद.
उत्तर द्याहटवासौ.अनुराधा म्हात्रे. पुणे.