शेतमालक त्याच्या शेतात कामावर गावातील गरीब स्त्री-पुरूषांना ठेवतात. शेतात काम करणाऱ्या मजुरांचे साधारणपणे तीन प्रकार असत- 1. रोजंदार, 2. महिनादार, 3. सालंदार.
1. रोजंदार पद्धतीमध्ये शेतात सात दिवस काम केले, की त्या
कामाचे पैसे मजुरी म्हणून दिले जातात. कारण गावाचा आठवडी बाजार असतो. ते मजूर
भाजीपाला, दळण, धान्य, कांदे-बटाटे असा किराणा माल बाजारातून एकाच वेळी आठवडाभरासाठी घेऊन
ठेवतात. ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी अर्ध्या दिवसाची मजुरी दिली जाते.
रोजंदारी कामात शेतीची मशागत करणे, निंदणे, खुरपणे, वखरणे, नांगरणे,
पेरणे, शेतमालावर कीड पडू नये म्हणून औषध
फवारणी करणे, पिकामध्ये आलेले तण काढणे अशी कामे येतात. तण
हे गवतासारखे वारंवार पिकात येत राहते. ते वरच्यावर काढावे लागते, नाहीतर पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. पिकाला युरिया, शेणखत टाकावे लागते. ते सर्व काम रोजंदारीवर जे मजूर असतात, ते करतात.
शेतातील पिकाची राखण करण्यासाठी रोजंदाराची निवड केली जाते. तो शेतीची
राखण करतो. शेतामध्ये उंच झाडावर माची बांधतो. माची म्हणजे छोटेसे घरच असते. तेथे
तो गोफण घेऊन पिकाचे रक्षण जनावरे, पशू-पक्षी आणि चोर
यांपासून करतो. त्या बदल्यात त्याला मजुरीच्या रूपाने दर आठवड्याला पैसे मिळतात.
रोजंदारीवर असलेले मजूर लोक पिकात वरच्यावर येणारे गवत निंदून-खुरपून
काढतात. त्यांनी कापलेल्या गवतावर त्या त्या मजुराची मालकी असते. तो त्याचा भारा
बांधून, व्यवस्थित रचून संध्याकाळी गुजरीत विकण्यास नेतो.
गुजरी असे गवताच्या भाऱ्यांच्या बाजाराला म्हणतात. ते गवताचे भारे गावातील
शेतमालकच जनावरांसाठी विकत घेतात. शेतातील तण काढून केलेला भारा रोजंदार
शेतमालकाला विकतात आणि तो भारा परत मालकाच्याच गोठ्यात नेऊन देतात. ह्या पैशांतून
त्यांचे चहापाणी भागते.
2. दुसरा प्रकार आहे महिनादार मजुरांचा. तिसऱ्या
प्रकारचे सालंदार व महिनादार या दोघांचेही काम सारखे आहे. महिनादार हा महिन्याने
बांधलेला असतो तर सालंदार सालाने म्हणजे वर्षाने. महिनादार हा त्याच्या कामाचा
महिना भरल्याबरोबर त्याचा हिशोब करून मोकळा केला जातो. सालंदार मालकांकडे काम
पूर्ण वर्षभर करतो.
3. तिसरा प्रकार आहे सालंदाराचा. सालंदारी
म्हणजे वर्षभर एकाच जमीनदाराकडे काम करणे. सालंदार ठेवताना मालक विश्वासातील मजूर
ठेवतात. मजुरांची त्यांच्या मालकावर श्रद्धा असते. सालंदाराला रोज सकाळी लवकर
कामाला सुरूवात करून सर्व कामे आटोपल्याशिवाय घरी जाता येत नाही. ती एक प्रकारची
वेठबिगारीच !
वर्षाच्या सुरूवातीला जमीनदार व सालंदार यांची चर्चा होते. त्यात
साधारणपणे वर्षभराचे पाच हजार रुपये, पन्नास किलो ज्वारी,
पाच किलो तुरडाळ, धोतर-शर्ट-टॉवेल-टोपी असे
कपडे अशा वस्तू सालंदाराला देण्याचे ठरवले जाते. गुढीपाडव्यापासून वर्ष पकडण्यात
येते. ज्वारी सुरुवातीला पंचवीस किलो व वर्षाच्या शेवटी पंचवीस किलो अशी देण्यात
येते. शेतमालकाशी चर्चा करून त्यांचे साल ठरलेले असते. मजुरी रोखीच्या स्वरूपात
देण्यात येते.
रोजंदारीपेक्षा सालंदाराचे व महिनादाराच्या कामाचे तास जास्त असतात.
रोजंदारीमध्ये मजूर लोक त्यांच्या त्यांच्या घरी शेतातील काम संपले, संध्याकाळ झाली की जातात. सालंदाराला मात्र बरीचशी कामे संपल्याशिवाय घरी
जाता येत नाही. जमीनदार सालंदाराला दर आठवड्याला थोडे-थोडे पैसे, धान्य देतात. वर्षाच्या शेवटी, हिशेब करून राहिलेले
पैसे वर्ष अखेरीस देण्यात येतात. यासाठी जमीनदाराकडे एक वहीखाते असते, त्यामध्ये सर्व हिशेब लिहून ठेवतात.
संबंधित
लेख - संजय जाधव - धडपड, सालदाराच्या पोराची (Dr Sanjay Jadhav and his painstaking efforts
to get education as contract labour's child)
सालंदाराची कामाला सुरुवात सकाळी सहा वाजता होते. सकाळीच शेण काढणे,
गाई-म्हशींना गोठ्यातून काढून बाहेर बांधणे व गोठा स्वच्छ करणे,
शेण शेणखतावर नेऊन टाकणे (ते शेणखत नंतर पीकासाठी कामी येते).
शेतमालकाच्या जनावरांचा व सालंदाराचा बऱ्यापैकी परिचय झालेला असतो. ते त्या
जनावरांना गवत किंवा कडबा टाकतात. सालंदाराला नंतर घरी जाऊन आवरणे, जेवण करून मग दुपारचा डबा म्हणजे भाजी-भाकरी घेऊन जनावरे शेतात चरण्यासाठी
नेणे. दिवसभर जनावरे धुऱ्या धुऱ्याने चारणे. संध्याकाळी त्यांना गोठ्यात आणून खुंट्यांना बांधणे, पाणी पाजणे इत्यादी कामे करावी लागतात.
दूध-दुभत्याची कामे मात्र ‘सवर्णा’कडूनच केली जात. ती दलित-अस्पृश्य लोकांकडून
केली जात नव्हती.
पावसाळ्याच्या दिवसांत त्यांच्याकडून दोर ओढण्याचे म्हणजे अंबाडीच्या
दांड्यापासून ताग काढण्याचे काम करवून घेण्यात येते. शेण काढणे, गोठा स्वच्छ करणे हे काम असतेच. सालंदारांना घरी जाण्यासाठी लवकर सोडत
नाहीत. काम भरपूर करवून घेऊन त्याचा मोबदला फारच कमी देतात. सालंदाराला सुट्टी
मिळत नाही. सालंदार जर आजारी पडला तर त्या दिवसाचे त्याचे पैसे कापले जातात किंवा
बदली मनुष्य दिला जातो. ते दोघे एकमेकांचे काम करतात.
घरातील इतर कामे घरी राहणाऱ्या इतर व्यक्ती करतात. उदाहरणार्थ बाजारहाट
करणे, दळण आणणे, कपडेलत्ते घेणे,
येणाऱ्या-जाणाऱ्यांचे करणे ही सर्व कामे घरातील व्यक्तीच करतात.
सालाने राहण्याची गरज का भासली? आर्थिक
परिस्थती, अवकाळी पाऊसपाणी, त्यामुळे
गावातील कामधंद्यांची अनिश्चित स्थिती, घरातील खाणाऱ्यांची
संख्या, घरातील मुलींची संख्या (त्यांच्या लग्नकार्याला पैसे
लागतात, त्यासाठी), घरातील आजारी
लोकांची संख्या आणि पैशापाण्याचा अभाव अशी... सालंदाराची मानसिकता सालाने राहिले
की एक-दोन हजार रुपये ताबडतोब मिळतात, थोडेफार धान्य मिळते.
काम तर भागतेच, पुढचे पुढे पाहिले जाईल अशी असते. त्याला
पैसे कोठून उसनवारीने मिळण्याची शक्यता नसतेच. सालंदार स्वतःला गहाणच एका अर्थाने
ठेवत होते.
त्यांना पोळ्याच्या दिवशी बैलाला स्वच्छ धुणे, त्यांची
शिंगे रंगवणे, पाठीवर रंगीबेरंगी कपड्यांची झूल टाकणे,
शिंगे सजवणे आणि संध्याकाळी बैल घरोघरी पूजेला घेऊन जाणे ही
कामेसुद्धा करावी लागतात.
सरकारने किमान वेतन कायदा 1975-76 मध्ये
केला. साल, महिने हे कायद्याने रद्द ठरवले आहे. त्यात
महाराष्ट्र सरकारने कोणत्या विभागात किती पगार असावा यासाठी चार झोन पाडलेले आहेत. 1. बारमाही पाणीपुरवठा जेथे
आहे तो विभाग. त्यामध्ये बागायती शेती येते, 2. निम बागायती शेती, 3. पूर्णपणे नैसर्गिक पावसावर अवलंबून असलेला
भाग, 4. सुखटणकर समितीने जाहीर केलेले शहाऐंशी
तालुके. ते तालुके दुष्काळी भाग म्हणून जाहीर केले. ते चौथ्या भागात येतात.
या प्रत्येक भागाची महिना, साल मजुरी वेगवेगळी आहे.
त्यांना पगार किती द्यावा, धान्य किती द्यावे हे ठरलेले आहे.
त्या-त्या भागानुसार ठरलेले आहे. एवढेच काय, त्यांना
राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवसांची सुट्टीसुद्धा
जाहीर केली आहे. प्रत्यक्षात मात्र या सर्वांची अंमलबजावणी कोठेच होताना दिसत
नाही. त्याचे मुख्य कारण अज्ञान व दुसरे दारिद्र्य. त्यामुळे धाडस-आत्मविश्वास
यांचा त्यांच्यात अभाव. या सवलतींची, तरतुदींची माहिती
सालंदार व महिनादार यांना नसते. ते अडाणी, अशिक्षित, असंघटित असतात. त्याचा गैरफायदा जमीनदार घेत असतात.
पश्चिम महाराष्ट्रात सालंदाराला जमीनदार त्यांच्या शेतातच झोपडे बांधून
देतात. त्या ठिकाणी सालंदार त्याच्या कुटुंबासह राहतो. जनावराचा गोठाही शेतातच
बांधतात. तेथेच राहून रात्रंदिवस शेताचे, जनावरांचे काम करणे
अशी कामे असतात. त्याने व त्याच्या पत्नीनेदेखील राबावे अशी अपेक्षा असते. त्यांना
लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू
जमीनदारच आणून देतो. अशा प्रकारे त्याने शेत सोडून कोठेच जाऊ नये अशी व्यवस्था
केलेली असते. तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकत नाही, कारण त्याच्या सोबत त्याचे कुटुंब असते. अशी
पद्धत फक्त पश्चिम महाराष्ट्रात आहे. ती मराठवाड्यात आणि विदर्भात नाही.
महिनादारी, सालंदारी ही प्रथा अस्तंगत होत आहे.
लोकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी व स्वातंत्र्याविषयी जागृती झाली आहे. खेडी
शहरांशी जोडली गेल्याने तेथील नवीन पिढी शिक्षण घेऊन हुशार होत आहे. टी.व्ही.,
मोबाईल, संगणक यांसारखी आधुनिक साधने सर्वत्र
पोचली आहेत. या सर्व कारणांमुळे सालंदारसुद्धा स्वतंत्र व स्वाभिमानी झालेले आहेत.
- रत्नकला बनसोड 9503877175 / 9404000202
रत्नकला भिमराव बनसोडे यांचा जन्म 1961 साली लोणी (तालुका दारव्हा,
जिल्हा यवतमाळ) येथे झाला. त्यांनी डी एड आणि समाजशास्त्र विषयातील पदवी पर्यंतचे
शिक्षण घेतले आहे. त्यांनी औरंगाबादच्या खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिक
शाळेत सदतीस वर्षे नोकरी केली. त्या ‘रमाई’ मासिकासाठी नियमित लेखन
करतात. त्यांना वाचन, बागकाम आणि जुनी गाणी ऐकण्याचा छंद आहे.
1 टिप्पण्या
रोज महिना साल .शेतमजूर.लेख. कोकणात अशी पद्धत नाही. अपुरी शेत जमीन हे कारण असणार. पण कुलाबा- रायगडला भाताचे कोठार समजले जायचे. तुलनेने शेतजमीन जास्त व सिंचन ही. तिथे अशी काही व्यवस्था असण्याची शक्यता आहे. तपशील बघायला हवा.
उत्तर द्याहटवा