नाशिकचे डॉ. संजय दामू जाधव यांच्या ‘धडपड सालदाराच्या पोराची’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. शिक्षण सर्वच घेतात, पण सालदार माता-पित्यांच्या पोटी जन्म घेतल्यानंतर परिस्थितीवर मात करून,
हालअपेष्टा सहन करून, आत्मविश्वासाने शिक्षण घेऊन डॉक्टर
होणे ही गोष्ट साधी नाही. लेखकाच्या आयुष्यात संकटे अनेक आली, दुःखद प्रसंगही आले, पण त्याने त्याचा मार्ग
बदलला नाही. पुस्तक गरीब, हुशार विद्यार्थ्यांना
मार्गदर्शक ठरेल असेच आहे. लेखकाचे वडील दामू जाधव
सालाने राहत आणि आई मोळ्या विकण्याचे काम करत असे. मोळी विकल्यानंतर कधीकधी
पैशांच्या बदल्यात ताक मिळत असे. तेच ताक पिऊन दोन दोन दिवस गुजराण करायची !
सालदारांना ताजी भाकर देत नसत. शिळी भाकर उन्हात वाळवून, त्याचे
खळगुट करून खायचे. पडलेला दुष्काळ, घरात चार मुले आणि काम
करण्यास दोनच माणसे असा सालदाराचा संसार.
खेडेगावात एकशिक्षकी शाळा असे. एकच शिक्षक पहिली ते चौथीपर्यंत शिकवत.
लेखक तशा परिस्थितीत चौथीपर्यंत शिकले. त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण शिरूर या गावी
झाले. शिक्षणासाठी पत्र्याची किंवा खापराची पाटी असायची. खापराची पाटी महाग
असल्यामुळे त्यांना पत्र्याची पाटी घेऊन दिली. पण ती काही दिवसांनी खराब झाली,
म्हणून खापराची घेऊन दिली. पण शाळेतील एका खोडकर मुलाने ती पाटी
दगडाने फोडून टाकली ! लेखकाने ती भरून मागितली तर
खोडकर मुलगा म्हणतो, "मी तुझी पाटी चिखलाने भरून देईन
!" लेखक त्यामुळे चिडला. त्याने दुसऱ्या दिवशी पिशवीत दगड घेतले आणि ते दगड
त्या मुलाच्या डोक्यात मारले. मग काय शाळेत आणि घरीही भांडण ! लेखकाने खरे कारण सांगितल्यावर त्यांना त्या मुलाच्या वडिलांनी नवीन पाटी
आणून दिली. ती नवी कोरी पाटी पाहून लेखक खूष झाले.
मुलांना कष्टाची कामे शिक्षण घेता घेताच शिकवली जात. सूर्याच्या सावलीच्या
उंचीवरून घड्याळ ठरवले जाई. किती वाजले ते सावलीवरून सांगत. लेखकाच्या वर्गात
शिंदेसरांचा मुलगा कमलाकर शिक्षण घेत होता. एकदा, त्या मुलाने लेखकाची पेन्सील घेतली. गुरुजींचा मुलगा म्हटल्यावर काय बोलणार? त्यातच त्याने लेखकाला मारलेसुद्धा. त्यामुळे लेखक रडू लागले. ते पाहून
वर्गातील मुलांनी सरांना ‘संजय रडत आहे’ असे
सांगितले. मग सरांनी स्वतःच्या मुलाला बेदम मारले आणि त्याच अवस्थेत तीन फूट
ओट्यावरून खाली फेकून दिले. जी मुले शाळेत यायची नाही, दांड्या
मारायची, गुरुजी त्यांच्या घरी त्यांना बोलावण्यासाठी
मुले पाठवत असत. ती मुले गैरहजर मुलगा जर गोडीने शाळेत आला नाही तर त्याला
उचलबांगडी करून आणत. पालक त्यास विरोध करत नसत.
शिरूर येथे फकीरबाबाची यात्रा भरायची. गावात एकही मुसलमान नसूनदेखील
मुसलमान फकिराची यात्रा भरवणारे ते एकमेव गाव असावे. गावातील बहुसंख्य हिंदू संदल, चादर चढवणे असे काम करत. जत्रा म्हणजे गावचा उत्सव. पहिल्या दिवशी नैवेद्य, मिरवणूक, रात्री तमाशा, सकाळी हजेरी, नंतर टांग्याच्या शर्यती आणि
सायंकाळी कुस्त्या ... अशी ती जत्रा असायची.
लेखक तिसरीची वार्षिक परीक्षा देण्यासाठी सोनाआत्या अडांगळे यांच्याकडे
सात दिवस राहण्यास जाणार होते. आईने कुळदाच्या दोन भाकरी बांधून दिल्या व सोबत दोन
ड्रेस दिले. लेखक गावात मुक्कामाच्या तयारीने निघाले, पण
तेथे जाऊन पाहतात तर काय? त्या घरचे सर्वजण त्यांचे
नातेवाईक वारल्यामुळे घराला कुलूप लावून गावाकडे निघाले होते. पेपर तर द्यायचे
होते, मग लेखकाने परत घरी न जाता मारुतीच्या मंदिरात
मुक्काम केला. ते दुपारी आंघोळ हापशावर करत, रात्री मंदिरात अभ्यास आणि तेथेच
झोप... सकाळी पाच वाजता प्रभात फेरीत सामील होत. आईने दिलेली भाकर सोमवार ते
शनिवारपर्यंत थोडी थोडी खात पुरवली. ते आईला घरी जेव्हा कळले तेव्हा त्यांचे वडील
त्यांना शोधण्यास आले. त्यांना एका मंदिरात लेखक दिसले. वडिलांनी त्यांना ‘घरी चल’ असे म्हटले. पण लेखकानी त्यास नकार दिला. ते म्हणाले, ‘मी पूर्ण पेपर दिल्याशिवाय घरी येणार नाही.’ सोमवारी
पहिला पेपर व शनिवारी शेवटचा पेपर. लेखक शेवटचा पेपर दिल्यानंतरच घरी आले. त्यांचा
त्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आला. त्यातून त्यांची जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास हे गुण दिसून येतात.
त्यांनी नववी पास झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीतच दहावीचे पुस्तक वाचून
काढले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिकवणी लावली होती. लेखकाची इच्छा शिकवणी न लावताच
गणित या अवघड विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळवावे अशी होती. लेखकाकडे दहावी
बोर्डाची परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नव्हते. घरची परिस्थिती चांगली नव्हती. लेखक
वसतिगृह बंद पडल्यामुळे एस.टी. स्टँडवर राहत होते. त्यांची शाळा दिवसभर असे. ते
संध्याकाळी आठ वाजेपर्यंत गोळ्या विकत. त्यानंतर एस.टी. स्टँडवर लाईटखाली बसून
अभ्यास ! जे पैसे मिळत ते जेवणासाठी खर्च होत. फक्त एक रूपया शिल्लक राही. फी
भरण्यासाठी पैसेच उरायचे नाहीत. त्यांनी शेवटचा दिवस आला तरी फी भरली नव्हती.
शेवटी वर्गातील मुला-मुलींनी पैसे जमा केले व लेखकाची फी भरली ! लेखक दहावीच्या
परीक्षेत पंच्याऐंशी टक्के असे चांगले मार्क मिळवून पास झाले. त्यांना शाळेत पहिले
येण्याचा मान मिळाला.
लेखकानी दहावी पास झाल्यानंतर मुंबईला हॉस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तेथे अकरावीला अॅडमिशन घेतली, पण नंतर काही कारणाने कागदपत्र व फीचे पैसे परत मागितले. तेव्हा सर म्हणाले, ‘यालाच म्हणतात, दात आहेत तर चणे नाहीत’. चांगले मार्क असूनही केवळ सोयीअभावी खेड्यातील मुले मागे पडतात हेच दुर्दैव ! दुसरे काय?
लेखकांचा सत्कार चांदवडला दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले म्हणून
ठेवण्यात आला होता. जवळ एक पैसाही नाही. भूक लागलेली. ते तिकिट न काढताच रात्री
दादरला भुसावळ पॅसेंजरमध्ये जाऊन बसले. पैसे नसल्यामुळे विनातिकिट प्रवास.
त्याशिवाय पर्यायही नव्हता. चेकर आल्यामुळे काही विनातिकिटवाले लोक संडासमध्ये
लपले. पण लेखक तेथे त्याच जागी उभे राहिले. तिकिट नाही म्हटल्यावर चेकरने कानफटात
मारली. तेव्हा त्यांच्या काखेतली पिशवी खाली पडली. त्यातील कागदपत्रे-सर्टिफिकेट
अस्ताव्यस्त झाली. काही प्रवाशांनी व लेखकानी ते कागद जमा केले. टीसीच्या पायावरच
मार्कशीट पडले होते. त्यांनी ते उचलले. टीसीला मार्क बघताच आश्चर्य वाटले. त्यानी ‘हे सर्टिफिकेट तुझेच आहे का?’ असे
विचारले. लेखकानी ‘हो’ म्हणताच
टीसीने त्यांच्या खिशात वीस रुपयांची नोट घातली. नंतर लेखक ऊसाच्या ट्रकने घरी
पोचले.
अशा तऱ्हेने, लेखकाने त्याच्या शिक्षणाचा खडतर
प्रवास हलाखीच्या परिस्थितीत, अतिशय आत्मविश्वासाने
पूर्ण केला. लेखक नाशिकमध्ये अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत.
पुस्तकाचे नाव - धडपड, सालदाराच्या पोराची
लेखक - डॉ. संजय जाधव 9689167222
shantiparv@gmail.com
प्रकाशक
- सुमेध प्रकाशन, पुणे
मूल्य
- साठ रुपये, पृष्ठसंख्या - एकशेअकरा
- रत्नकला बनसोड 9404000202
रत्नकला भिमराव बनसोडे यांचा जन्म 1961 साली लोणी (तालुका दारव्हा,
जिल्हा यवतमाळ) येथे झाला. त्यांनी डी एड आणि समाजशास्त्र विषयातील पदवी पर्यंतचे
शिक्षण घेतले आहे. त्यांनी औरंगाबादच्या खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिक
शाळेत सदतीस वर्षे नोकरी केली. त्या ‘रमाई’ मासिकासाठी नियमित लेखन
करतात. त्यांना वाचन, बागकाम आणि जुनी गाणी ऐकण्याचा छंद आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या