मराठी भाषेत ‘पोळी’ व ‘चपाती’ हे पर्यायशब्द म्हणून जवळजवळ वापरले जातात. उच्चभ्रू समाजात ‘पोळी’ व तदितर समाजात ‘चपाती’ हा शब्द वापरला जातो असे ढोबळपणे म्हणता येते. ‘पोळी’ व ‘चपाती’ आणि ‘कालवण’ व ‘कोरड्यास’ या दोन शब्दजोड्यांत सामाजिक भेद तर आहेच; पण त्याचबरोबर भाषाकुळांचा भेदही आहे.
‘चपाती’ हा संस्कृत ‘चर्पट’चा तद्भव आहे; तर ‘पोळी’ हा खास द्राविड कुळातील शब्द आहे. तमीळमध्ये मराठीप्रमाणेच ‘पुरणपोळीगे’ असा शब्द आहे. तमीळ व हळेगन्नडमधील (प्राचीन कन्नडमधील) प वर्णाचा ‘व्हसागन्नड’ मध्ये (नूतन-कन्नड) ‘ह’ वर्ण होतो. पुरण>हुरण, पोळी-होळी, ‘पू’ (फूल) ‘हू’ इत्यादी. ‘पुराणपुष्पवल्ली’ म्हणजे ‘हळे-हुकबळी’ (जुनी हुबळी). त्यामुळेच मराठीत ‘होळी’ रे ‘होळी’ पुरणाची ‘पोळी’ असे शब्दांकन झाले आहे. ‘प’, ‘क’ व ‘य’ हे वर्णही एकमेकांची जागा घेतात. विशेषण भीषण: >विभीषण>बिभीषण:, कवि>कपि (विद्वत्कवय: कवय:, केवलकवयस्तु केवलं कपय: - सुभाषित), वंग>बंग इत्यादी.
संस्कृत ‘चर्पट’ याचा मराठी पर्याय चप्पट - चापट - चपाती. कणकेची लाटी पोळपाटावर (पोळी+पाट) ठेवून लाटण्याने लाटली (म्हणजे चपटी केली) की ‘चपाती’ तयार होते. आद्य श्रीमद्शंकराचार्यांचे ‘भज गोविन्दम्’ हे स्तोत्र ‘चर्पटपञ्जरी’ (चर्पटपञ्चरी) म्हणूनही ओळखले जाते. ‘चपातीची चवडी’ असा त्याचा अर्थ आहे. खरे पाहता, मराठीतील ‘धम्मकलाडू’ (धम्म - धम्मिल्ल - गोलाकार केसांचा ‘अंबाडा’) सोडला तर ‘चापटपोळी’ची कूळकथा ही आहे.
आंग्ल भाषेतील Lady या शब्दाची ‘मूळ कथा’ अभ्यासली तर त्याचा अर्थ ‘पोळी लाटणारी’ असाच आहे. प्राचीन आंग्ल भाषेत hiaefdige असा शब्द आहे. त्याचा अर्थ, ‘गृहस्वामिनी’. Hiaf याचा मूळ अर्थ ‘loaf.’ जर्मन भाषेत मूळ अर्थ knead (कणिक तिंबणे). तो शब्दही dough आणि dairy या शब्दांशी नाते सुचवतो. ‘रांधा, वाढा’ यातून आंग्ल Lady ही सुटली नाही म्हणायची ! ती ‘loaf kneader’ पोळीसाठी कणिक तिंबणारी, पोळ्या करणारी बाईच राहिली. प्राचीन आंग्ल भाषेत Lady म्हणजे ‘bread-keeper’.
(मो.गो. धडफळे यांच्या ‘भाषा आणि जीवन’मधील मूळ लेखाधारे)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
कहाणी शब्दांची..
उत्तर द्याहटवाहेही आवर्जून वाचा...
लेखक : सदानंद कदम, सांगली
संपर्क 9420791680