अजिंठा लेणी – ऱ्हासाच्या दिशेने! (Fading Art of Ajintha Caves)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

अजिंठा लेणी – ऱ्हासाच्या दिशेने! (Fading Art of Ajintha Caves)


अजिंठा लेणी जगाला 1819 मध्ये माहीत झाली. ती खोदली गेली इसवी सनपूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक अशा सहाशे वर्षांत. म्हणजे त्यांचा शोध जवळ जवळ तेराशे वर्षांनी लागला! शोध लागूनही दोनशे वर्षें होऊन गेली आहेत. लेण्यांमधील स्तूप, विहार आणि त्यांना उभे ठेवणारे मोठमोठे स्तंभ पाहिल्यानंतर भारावून जाणार नाही असा प्रेक्षकच असू शकत नाही; लेणी पाहणे हा प्रेक्षकांसाठी एक विलक्षण अनुभव असतो! पण तरीही त्या प्रत्येकाच्या मनात लेणी त्यापलीकडे दीर्घकाळ शिल्लक राहतात... तीसुद्धा अनेक प्रश्नांसह. लेण्यांतील बारकावे, त्या काळचा इतिहास आणि त्या कलाकारांनी दिलेला संदेश या साऱ्यांचा अर्थ कसा लावावा याबाबतचे कुतूहल प्रेक्षकाच्या मनातून दूर काही होत नाही. अजिंठ्यातील स्तूप, चैत्यगृहे, विहार यांमधील असंख्य शिल्पे व चित्रे एवढे काही सांगत असतात, की त्यांतून प्रेक्षकांच्या मनात नवनवा गुंता सतत तयार होत असतो; लेण्यांचा नवनवीन अर्थ त्यांच्याकडून सतत लावला जातो. लेण्यांच्या मध्यभागी बुद्धाची मूर्ती ध्यानस्थ असते, पण त्याचा भोवताल वेगळेच काहीतरी सांगत असतो. बऱ्याचदा, बऱ्याच नर्तिका गौतम बुद्ध यांच्या मुख्य लेण्याच्या भोवताली दिसतात. त्यांच्या अवयवांची ठेवण विलोभनीय भासते. शिल्पांमध्ये स्त्रिया कमी वस्त्रांतील किंवा वस्त्रप्रावरणांशिवायच्या असतात. मात्र खुद्द ध्यानस्थ गौतम बुद्धाला तो भोवताल विचलित करू शकत नाही. त्या मूर्ती व चित्रे प्रेक्षकांच्या मनीदेखील अश्लीलतेला पार पाठीमागे सोडून देतात! हे सारे गूढ काय घडून गेले आहे असेच प्रेक्षकांच्या मनात राहते.
अजिंठ्यातील शिल्पे व चित्रे यांत कोणाला धार्मिकता दिसते, कोणाच्या मनात त्या काळच्या सामाजिक-आर्थिक रचनांबाबतचे प्रश्न निर्माण होतात. तेथील शिल्पे आणि चित्रे यांमधील केशरचना, दागदागिने, वस्त्रप्रावरणे यांतील लोकप्रिय पद्धतीचा धांडोळा घेता येतो. तर एखादा कलाकार नृत्यकलेतील शास्त्र त्यातून मांडून दाखवतो. अनेकांनी वेरुळ आणि अजिंठा लेण्यांवर नाना पद्धतींनी आतापर्यंत काम केले आहे व नवनवीन कलाकार ते सतत करत असतात.अजिंठा लेणी जपण्याचा पहिला सल्ला ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी निजामाला दिला होता. कारण ती हैदराबाद संस्थानच्या हद्दीत होती. निजाम सरकारने पुराणवस्तू संशोधन खात्याची स्थापना त्यासाठी 1815 मध्ये केली. त्यांच्यामार्फत अजिंठा लेण्यांचा वारसा जपण्याचे विविध प्रयोग झाले. शिल्पांची झीज होण्याची प्रक्रिया वर्षानुवर्षांची आहे. अजिंठा लेण्यांमध्ये काढलेली चित्रे ही मात्र झपाट्याने धूसर होत गेली आहेत.
बौद्ध जातककथा अजिंठा लेण्यांमधील चित्रांतून मांडलेल्या आहेत. त्यात साधारणत: पाचशेसत्तेचाळीस जातककथा आहेत. त्यांतील पंधरा-वीस चित्रे अजूनही ठळकपणे दिसतात. त्या चित्रांमध्ये कितीतरी गोष्टी दडल्या आहेत! जातककथा म्हणजे धर्मतत्त्वे समजावून सांगण्यासाठी सोप्या भाषेत सांगितलेल्या कथा. नीतिनियमांची नैतिक चौकट कशी असावी याची मांडणी सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेत कळावी यासाठी रचलेल्या त्या कथा! शिबी जातक, संकपाल जातक, महाजनक जातक, चांपये जातक यांच्या कथा मोठ्या रंजक आहेत. त्यांतून धर्मतत्त्वांची चौकट ठळकपणे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आजी जशी गोष्ट रंगवून सांगते तशीच प्रत्येक जातककथा 'रंगवून' सांगण्याचे कसब कलाकुसरीने साध्य करण्यात आले आहे. त्यांचे वर्णन भित्तिचित्रांच्या दुनियेत अजिंठा लेण्यांतील चित्रे म्हणजे नीलमणीअसे केले जाते. ती चुनखडीचा गिलावा ओला असताना नैसर्गिक रंगांतून रंगवली गेली आहेत. ज्वालामुखीतून निर्माण झालेल्या खडकांचे रंगही त्यात वापरले गेले असल्याचे सांगितले जाते. ती चित्रे एवढी शतके टिकून कशी राहिली? शिल्प घडवता येईल असा पाषाण असतानाही तेथे चित्रे का काढली गेली असतील याचीही उत्सुकता अनेक वर्षांपासून आहे. पुरातत्त्व विभागातील मॅनेजर सिंग यांनी केलेल्या संशोधनात मिळालेली माहिती त्या काळातील प्रगत तंत्रज्ञानावर प्रकाश टाकणारी आहे. रंगांचे ते मिश्रण वेगवेगळ्या भाज्या, साळीचा भुस्सा, गिलाव्यासाठी वापरली जाणारी वेगवेगळ्या प्रकारचे गवतमिश्रित माती आणि गांजाची काही पाने असे होते. गांजा पाणी शोषून घेतो. त्यामुळे लेण्यांवर कितीही पाऊस पडला तरी भिंतींमधून पाझर होत नाही. परिणामी, चित्रे अनेक वर्षें टिकून राहिली. सर्वाना आवडणारी आणि जगन्मान्य असणारी दोन चित्रे म्हणजे- पद्मपाणी आणि वज्रपाणी. त्यांचे वर्णन कमळांच्या पाकळ्यांसारखे डोळे, धनुष्याकृती भुवया, मजबूत देहयष्टी, अजानुबाहू, रुंद छाती अशा विविध शब्दांत केले जाते, तरी ते अपुरेच वाटते. पद्मपाणी कोण होता? तो होता राजकुमार. बौद्ध तत्त्वज्ञानातील पारिमिता पाळणारा. पारिमिता म्हणजे जगण्याची नैतिक वा मूल्याधिष्ठित चौकट! दान, शांती, शील, सत्त्व, अधिष्ठान, प्रज्ञा, मैत्री अशा त्या पारिमिता. त्यांचे पालन जो करतो आणि इतरांच्या सुखासाठी जो झटतो असा बोधिसत्त्व म्हणजे पद्मपाणी. पद्मपाणी आणि वज्रपाणी ही दोन्ही चित्रे शब्दांत उतरवता येत नाहीत, पण त्यांचाही काही भाग दिसेनासा झाला आहे आणि एका राखाडी लेपाच्या खाली चित्र बुजून गेले आहे. काय काय दडले आहे त्या चित्रांमध्ये? कोठे सुबत्तेचा पांढरा हत्ती दिसतो, तर बऱ्याच ठिकाणी हंसही दिसतो. विविध प्राणी-पक्षीही चित्रांमध्ये दिसतात. बोधिसत्त्वाच्या विविध जातककथांची चित्रे जगातील कलाकारांना व प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत राहिली आहेत. कारण त्यातून बौद्ध तत्त्वज्ञान तन्मयतेने पोचवले गेले आहे.
अजिंठा लेण्यांमधील कला व इतिहास यांचा शोध घेण्याचा प्रयत्न गेल्या साठ-सत्तर वर्षांत विशेष जोमाने झाला आहे. वॉल्टर स्पिंक्स नावाचा अमेरिकन माणूस त्या लेण्यांचा अभ्यास 1952 सालापासून करत आहे. ते वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षीदेखील अभ्यासकांना मार्गदर्शन करत असतात. नाशिकच्या प्रसाद पवार यांनी त्या लेण्यांची काढलेली छायाचित्रेदेखील अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकतात. ते एका नव्या माध्यमातून अजिंठ्याची छायाचित्रे लोकांसमोर मांडत असतात. त्यांचे काम अफाट आहे. प्रकाश पेठे नावाचे बडोद्याचे आर्किटेक्ट विद्यार्थी असताना, म्हणजे 1950 च्या दशकात अजिंठा लेण्यांत चार दिवस राहिले होते. त्यावेळी बंधने कोणतीच नव्हती. पेठे यांनी तेव्हा अनेक रेखाटने केली. ते त्यानंतर दोन वेळा अजिंठ्याला गेले, त्यांनी फोटो काढले, नोंदी केल्या. मुंबई आयआयटीच्या आर्ट हिस्टॉरिक इण्टरप्रिटेशनच्या माध्यमातून काही नवीन अभ्यासही मांडले जात आहेत. विजय कुळकर्णीएम आर पिंपरे हे दोन कलाकार त्यांच्या 'कॉपी' चित्रांतून अजिंठा राखून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे येथील सायली पाळंदेही त्यात अग्रेसर आहेत.
अजिंठा लेण्यांतील चित्रांमधून त्या काळातील सामाजिकता, तेव्हाचे अर्थशास्त्र यांचाही अभ्यास स्वतंत्रपणे केला जात आहे. सध्या सुरू असलेले प्रयत्न व्यक्तिगत पातळीवरील आहेत. काही व्यक्तींनी कामाला संघटनात्मक रूप देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला मोठे संस्थात्मक बळ आवश्यक आहे. पण अजिंठा लेण्यांची व्याप्तीच एवढी प्रचंड आहे, की त्यासाठी प्रयत्न सातत्याने करावे लागतील!

- सुहास सरदेशमुख 94220 73033
suhas.sardeshmukh@expressindia.com

सुहास सरदेशमुख हे दैनिक लोकसत्ताचे औरंगाबाद येथे विशेष प्रतिनिधी म्हणून गेल्या आठ वर्षापासून काम करतात. त्यांनी विविध वर्तमानपत्रांत काम केले आहे. त्यांनी मराठवाड्यातील सामाजिक
, राजकीय आणि आर्थिक विषयावर वार्तापत्रे व लेख लिहिले आहेत. त्यांनी विशेषत: पाणीटंचाई,  दुष्काळ या विषयावर वैशिष्टयपूर्ण लेखन केले, त्याची दखल विविधस्तरावर घेण्यात आली. त्यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कार आणि अन्यही पुरस्कार मिळाले आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. अजिंठा लेण्यांच्या विषयी खूप छान माहिती .. ख
    मी एकदाच धावत्या प्रवासात एक दिड तास थांबलो
    आता मला आणखी उत्सुकता लागली आहे .. अख्खा एक दिवस थांबून ही लेणी पाहणार आहे

    उत्तर द्याहटवा