जयंत धर्माधिकारी यांना आदरांजली (Tribute to Jayant Dharmadhikari)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

जयंत धर्माधिकारी यांना आदरांजली (Tribute to Jayant Dharmadhikari)

 


मुंबई जयंत (धर्माधिकारी) हे मूलत: गांधीवादी होते; त्यांच्यावर त्यांचे काका दत्ता धर्माधिकारी यांच्या चित्रपटांचे संस्कार झाले. पण दत्ता यांच्यासहित सारे धर्माधिकारी कुटुंब गांधीवादी होते. जयंत यांनी आयुष्यभर खादी वापरली असे जयंत यांची पत्नी सुहिता यांनी सांगितले.

जयंत धर्माधिकारी यांना सिनेकलावंत आणि मराठी सांस्कृतिक जगाचा प्रतिनिधी म्हणून आदरांजली वाहण्यासाठी गप्पांचा एक कार्यक्रम परळच्या राजकमल स्टुडिओमध्ये झाला. त्यावेळी मुख्यत: प्रभात चित्र मंडळ व एशियन फिल्म फाउंडेशन या संस्थांचे सदस्य उपस्थित होते. जयंत यांचा दोन्ही संस्थांच्या स्थापनेत सहभाग होता व ते दोन्ही संस्थांचे गेली काही वर्षे विश्वस्त होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण शांताराम होते. या वेळी जयंत व सुहिता यांची कन्या मिस्किल, जावई कबीर ग्रोवर आणि पुतण्या मनोज धर्माधिकारी हे कुटुंबीय उपस्थित होते.

दिनकर गांगल यांनी गप्पांच्या कार्यक्रमास सुरुवात करून देताना सांगितले, की सुधीर नांदगावकर यांचा मृत्यू दीड महिन्यापूर्वी झाला. तेव्हापासून जयंत, कमलाकर नाडकर्णी, वि.वि. करमरकर अशा, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती या जगातून नाहीशा झाल्या आहेत. या मंडळींनी महाराष्ट्राच्या गेल्या पन्नास वर्षांच्या सांस्कृतिक जीवनावर प्रभाव पडेल अशी कामगिरी केली. ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आले तेव्हा भारत व महाराष्ट्र घडत होते आणि त्या चौघांचा मावळण्याचा काळ हा सर्वत्र पडझडीचा आणि नवीन जग कसे असणार आहे याबाबतच्या कुतूहलाचा आहे.

सुहिता यांनी जयंत यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. सुहिता यांनी सांगितलेल्या धर्माधिकारी कुटुंबातील गांधीवादाचा धागा पकडून विनय नेवाळकर म्हणाले, की जयंत यांचा समाजवाद लोहिया- जॉर्ज फर्नांडिस यांच्या पठडीतील, या मातीतील होता. त्यामुळेच काँग्रेसला प्रभावी विरोध या एका कारणासाठी जयंत यांनी मोदी व भाजप यांची पाठराखण केली असावी.

रघुवीर कुल यांनी जयंत यांचे सिनेमासृष्टीतील स्थान व त्यांची एकूण कामगिरी यांचे वर्णन केले. रघुवीर म्हणाले, की जयंत यांनी मुख्यत: पटकथा लेखन केले. ते खुबीदार असे, परंतु त्यांनी कलावंत विकणे आहे !’ नावाचा चित्रपट दिग्दर्शितही केला होता. तो चालला मात्र नाही. अशोक राणे यांनी रघुवीर यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला, पण त्याचबरोबर जयंत यांचे अनेक किस्से सांगितले. ते कलावंतांच्या हक्कांबद्दल आग्रही असत आणि त्यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून कलावंतांचे हक्क सतत जपले; त्यांना योग्य मानधन मिळेल असे पाहिले ! सुहिता यांनी सांगितले, की कलावंत विकणे आहे हा चित्रपट साफ पडला हे खरेच. मी त्या वेळी जयंत यांच्या जीवनात नव्हते, परंतु नंतर एकदा ज्ञानेश्वर नाडकर्णी मला म्हणाले, की गुरुदत्तच्या प्यासा या चित्रपटाची ती उपहासिका (पॅरडी) होती आणि तो चित्रपट काळाच्या पुढे होता असे म्हणता येईल. जयंत यांचे गुरुदत्त यांच्यावर कलावंत म्हणून अपार प्रेम होते.   

रेखा देशपांडे यांनी जयंत यांच्याबरोबर पटकथा लेखन व दूरदर्शन मालिकांसाठी लेखन केले. त्या म्हणाल्या, की जयंत हे बोलत असत फार कमी, परंतु छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रसंग जिवंत करण्याची त्यांची हातोटी शिकण्यासारखी होती. मला त्यांनीच पत्रकारितेतून सिनेमा व दूरदर्शन यांच्या क्षेत्रात आणले. रथचक्र, आनंदी-गोपाळ’, भोकरवाडीची चावडीया त्यांच्या मालिका गाजल्या. सावल्या या त्यांच्या मालिकेला तर खूपच प्रशंसा लाभली. दूरदर्शन निर्मात्या किरण चित्रे यांनीही जयंत व कमलाकर सारंग यांनी त्या काळात स्पॉन्सर्ड प्रोग्राममधून प्रेक्षकांवर छाप कशी टाकली हे सांगितले. गणेश मतकरी हे चित्रपट अभ्यासक उपस्थित होते. त्यांनी जयंत यांच्या प्रभातएशियनयांमधील सहवासाचा उल्लेख केला.   

चित्रपट इतिहासाचे अभ्यासक संजित नार्वेकर यांनी जयंत यांच्या चित्रपट क्षेत्रातील कामगिरीचा आलेखच उभा केला. ते म्हणाले, की जयंत यांची कारकीर्द राज खोसला फिल्म्सच्या कथा विभागात सुरू झाली. तेथे ग.रा. कामथ हे मुख्य लेखक होते. जयंत यांनी लिहिलेल्या पटकथांवर बोलू खोसला, लेखराज खोसला, नरेंद्र बेदी यांनी चित्रपट निर्माण केले. त्यांना राज खोसला, टी. रामाराव व नरेंद्र बेदी या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांपैकी रास्ते का पत्थर’, ‘बेनाम’, ‘रफू चक्कर’, ‘प्रेम कहानी’, ‘कबिला’, ‘मैं इन्तकाम लूंगा हे चित्रपट गाजले. मराठी माणसाची हिंदी सिनेमातील ही मोठीच कामगिरी होय. नार्वेकर म्हणाले, की जयंत यांच्या कामावर ग.रा. कामथ स्कूलची छाप होती. मीदेखील त्यांच्याबरोबर एक डॉक्युमेण्टरी केली होती. त्याच्या रम्य आठवणी आहेत. जयंत व अमोल पालेकर यांनी मिळून अनकही नावाचा आव्हानात्मक चित्रपट निर्माण व दिग्दर्शित केला होता. जयंत यांच्या चित्रपटांची बिनचूक फिल्मोग्राफी वेळीच संकलित करणे गरजेचे आहे असे संजित आवर्जून पुन:पुन्हा सांगत होते.

किरण शांताराम यांनी जयंत यांनी विशेषत: एशियन फिल्म फाउंडेशनमध्ये कसे सहाय्य केले त्याच्या हकिगती नमूद केल्या व तेथेच जयंत यांना आदरांजली वाहून कार्यक्रम संपला.

- प्रतिनिधी

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या