22 मार्च, गुढीपाडवा. चैत्र महिना हा मराठी वर्षाची सुरुवात. पहिलाच सण हा गुढीपाडव्याचा. चैत्र महिना हा राम-लक्ष्मण-सीता यांचा चौदा वर्षांचा वनवास भोगून ‘अयोध्ये’मध्ये परत घरी येण्याचा शुभ दिवस. गुढ्या अन् तोरणे उभारून राम-सीता-लक्ष्मण यांचे स्वागत सर्वांनी खूप उत्साहाने केले.
चैत्र महिना हा शांततेचे, शीतलतेचे प्रतिकच. या महिन्यात चैत्रगौरीचे ‘हळदीकुंकू’ केले जाते. अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे दारातच ‘चैत्रांगण’ काढून चैत्रगौरीला सांगितले जाते, की पुढे येणाऱ्या रणरणत्या, रखरखत्या ‘वैशाख-जेष्ठ’ महिन्यातील कडकडीत उन्हाच्या झळांमुळे येणारे होणारे रोग तू आमच्या घरात येऊ देऊ नकोस’ आमच्या घराचे अन् घरातील सर्व माणसांचे, मुला-बाळांचे रोगराईपासून रक्षण कर. घरात शांतचित्त, समाधानी वृत्ती, आनंदी वातावरण नांदू देत. तू अशीच सतत आमच्या आठवणीत अन् घरामध्ये रहा अन् आम्हा सर्वांचे रक्षण कर.
या वर्षीच्या पहिल्या सणाच्या दिवसाचे हे बोलके चित्र या चैत्रांगणात आणि चैत्रगौरीच्या हळदीकुंकूवात दडलेले आहे. ‘गौराई चैत्रातली’ हा माझा लेख 4 एप्रिल 2010 रोजी ‘सकाळ’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. तो सोबत जोडला आहे.
- सौ. अनुराधा गांगल 7738298517
---------------------------------------------------------------------------------------------------------
गौराई चैत्रातली
कालच आमच्या घरी शेजारचा मिलिंद आला होता. तो अतिशय पोटतिडकीने सांगत होता, आपण सर्वजण कोशात राहत असतो. एक दिवस ठरवून आपण सर्वांनी गप्पागोष्टी करायला, चर्चा करायला, एकमेकांचे विचार ऐकायला एकत्रित यायलाच हवे. घरात सतत बसून, सारखा टी.व्ही. बघून मनाला खरंच मरगळ येत असते, असे म्हणत थेट पूर्वीचे सगळे सणवार, येणे-जाणे, जेवणीखाणी, व्रत-वैकल्ये इथपर्यंत आमची गाडी येऊन पोचली. आमच्या गप्पा संपल्या, पण मी मात्र आईचा हात धरून तुळशीबागेतील देवळात जाऊन विसावले होते !
खरंच आहे. पूर्वीच्या अनेक गोष्टी आधुनिक काळात गरजेच्या नसल्या, तरी काही गोष्टींत खूपच विचार करावा अशा नक्की आहेत. माझे सासरे नेहमी म्हणत, ‘पूर्वीच्या सगळ्या गोष्टींत शास्त्र दडले आहे. त्या दृष्टीने सगळ्यांकडे बघत चला.’ तरुण वयात अनेक गोष्टींकडे विचाराने बघितले जात नाही, पण जसजसे ‘वय’ होईल तसतसा ‘विचारांचा’ धागा लांब होत जातो, त्यातील ‘तथ्य’ समजत जाते.
पूर्वीचे ते अंगण, तुळशीवृंदावन नसले, तरी कुंडीत लावलेले किंवा डालडाच्या डब्यात लावलेले तुळशीचे रोप आपल्या घरात आरोग्य आणत असे. वटपौर्णिमाही तशीच... चैत्रगौर अन् चैत्रांगण काढणे यात तर किती गुणग्राहकता आहे ते बघाच !
चैत्र महिना तसा शीतलच. पुढे येणारे वैशाख, ज्येष्ठ महिने हे कमालीचे ‘उष्ण’. चैत्र महिन्यात कैऱ्या बाजारात ‘पाटीमध्ये’ दिसू लागतात. पुढे येणाऱ्या कडक, गरमागरम, भरपूर तापवणाऱ्या उन्हाच्या कडक झळीने आग आग होणाऱ्या उन्हामुळे, कडकीमुळे होणाऱ्या रोगांना आळा घालण्यासाठी या चैत्र महिन्याचे, या चैत्रगौरीचे, या चैत्रांगणाचे स्वागत दमदार करायचे असते. त्याचसाठी केवळ हे चैत्रगौरीचे स्वागत करून हळदीकुंकू करायचे अन् चैत्रांगण काढायचे असते. या उन्हाच्या तगमगीने गोवर, कांजिण्या, फ्ल्यू, डोळे येणे, डोके दुखणे, डोळ्यांची आग होणे असे नाना प्रकार प्रत्येकाला होत असतात अन् त्याचसाठी चैत्रगौरीचे आगमन शांतचित्ताने अन् उत्साहाने केले जाते.
चैत्रगौर ही शांततेची, शीतलतेची गौरी आहे, देवी आहे. तिला छानशा झोपाळ्यात बसवून तिला मोगऱ्याचा गजरा घातला जातो. झोपाळ्याने ‘वारे’ लागून थंडावा निर्माण होतो अन् मोगऱ्याचे फूलही सुवासिक, गारवा देणारे, प्रफुल्लित करणारे, उत्तेजित करणारे असते. त्याचा गजरा या गौरीला घालणे, यातही शांततेचे प्रतीक दिसून येते. कलिंगड, खरबूज, थंडगार कैरीचे पन्हे, कैरीचा कीस घालून केलेली अंबाडाळ अन् अशा थाटात बसलेल्या गौरीभोवती आपण घुटमळणे... त्या सर्वांचा स्वाद घेणे, तिचे पूजन करून रोगराईपासून दूर ठेव हे सांगणे, या सर्वच गोष्टींत किती अर्थ भरलेला आहे ! घरात हळदीकुंकू आहे म्हटल्यावर घरातील मुलींना छुमछुम घालून नाचत नाचत, आलेल्या बायकांना मोगऱ्याचे गजरे, बत्तासे, काकडी देणे फार मजेचे वाटत असे अन् मोठ्या स्त्रियांना त्यांच्या मैत्रिणींशी हितगुज करून, तिची विचारपूस करता येत असे. मुख्य म्हणजे या शांत देवीची पूजाअर्चा करून घरात शांती, शीतलता निर्माण करता येते हे महत्त्वाचे. पूर्वी घराघरातून माणसे पुष्कळ; सणवार, व्रतवैकल्ये जास्त, घरातील स्त्रीला बाहेर जाता येणे हे मुश्किलीचे काम. त्यातही हळदीकुंकवाची गोष्ट तिला उत्साहित करे. आनंदित करे. मनाचा दिलखुलासपणा, मैत्रिणी आल्याने वाढत असे. तिच्या घरातील रोम रोम तजेलदार होऊन नक्कीच ती टवटवीत बनत असे. आपल्या शरीराला, मनाला निरोगी बनवायला याच गोष्टी तिला सामर्थ्य देत असणार.
चैत्रगौरीची ती आंबाडाळ, कैरीचे थंडगार पन्हे, कधी ‘गट्टम’ करू असे आम्हाला होत असे. आईबरोबर असल्याने ती आंबाडाळ घरी आणावी लागे, पण घरात शिरताच त्या द्रोणात चमचा जात असे. आई सांगे, अगं दहा वर्षांपूर्वी तर आम्ही ‘डबा’च घेऊन जात होतो. चार घरी गेलो तरी अंबाडाळीने तो डबा भरून जाई त्यावेळी देण्या घेण्याचा हातही खूप मोठा असे. अन् मोकळ्या मनाने, मोकळ्या हाताने भरलेल्या हरभऱ्याच्या दाण्यांची ओटी, चार घरचे हरभऱ्याचे दाणे, मग त्यांची उसळ अन् परतलेले हरभरे अशा दोन्ही गोष्टी होत.
आपले घर, घरासमोरील अंगण, त्या अंगणातून आपल्या घरात रोगराई शिरू नये म्हणून दाराजवळच अंगणामध्ये चैत्र महिनाभर ‘चैत्रांगण’ काढले जाई. रोज सकाळी आईचे अंगण झाडून झाले, की ‘सडा’ घातला जाई. मग दाराजवळची छानशी ‘जागा’ शोधून त्यावर चैत्रांगण रांगोळीने काढले जाई. या चैत्रांगणातसुद्धा देवीचा सगळा ‘थाट’ काढला जातो. हे चैत्रांगण काढले जाते यातही तथ्य आहे; घरापुढील दारातच चैत्रगौर असल्याने ती आपल्या घरात कोठल्याही रोगाला जाण्याची परवानगी देणार नाही ही भावना दडलेली आहे. आपल्या घरातील माणसे, लेकीसुना, मुलेबाळे अगदी गडीमाणसेसुद्धा सुखात असावीत असा मोठा भाव त्यात दडलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी बाद झाल्या आहेत. सर्वत्र विज्ञानाचे वारे वाहत आहे. लहानपणी झालेले संस्कार किती घट्ट असतात. माझ्या मोठ्या दोघी बहिणी आता आतापर्यंत हे ‘चैत्रांगण’ देवापुढे काढत असत. आजच्या या काळातही आजच्या पिढीला सुखसमाधानच हवे असते. दुखण्या-खुपण्यांना कोण बरे सामोरे जाणार? मग या आधुनिकतेतही सगळेच जमले नाही तरी शांत चित्ताच्या, रोगराईला आळा घालणाऱ्या शीतल गौरीचे स्मरण करायलाच हवे, होय ना?
चैत्रांगण कसे असते पहा... दारातून चैत्रगौर येते, ती थोडा वेळ झोपाळ्यावर बसते. गार गार पाणी पिते. नवीन झकपक परकर-पोलके घालते. हत्तीवरून, अंबारीत बसून ‘रपेट’ मारून येते. मग वरती तिच्या घरात, देव्हाऱ्यात जाऊन बसते. ‘वारा’ घेण्यासाठी पंखा असतोच. प्रकाशासाठी समई लावलेली असते. चंद्र-सूर्य, स्वस्तिक-कमळ ही प्रतीके शेजारी अन् शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधे तिच्या साथीला, असे चैत्रांगण काढून झाले, की आम्ही मुली त्या चैत्रगौरीला, तिच्या सखीला कुंकू वाहत असू.
किती बहारदार आहे हे सगळे आणि किती मोठे शास्त्रही दडलेले आहे ! आता या काळातही सर्वांना वाटत आहे, की आपण एकत्रित आले पाहिजे. पूर्वीच्या या महानतेचा अन् आत्ताच्या रंजक वृत्तीचा मिलाफ झाला तर ! बहार येईल ना?
- अनुराधा गांगल 7738298517
-----------------------------------------------------------------------------------------------------
4 टिप्पण्या
चैत्रगौर आणि चित्रांगण हा लेख आजच्या काळात सुद्धा निसर्गाकडे नेण्यास पूर्ण आहे.
उत्तर द्याहटवाखूपच छान माहिती आहे. सारं पटतंय।उद्या ती आई ला वाचून दाखवीन वय ८८ ती सारखी चैत्री हळदी कुंकू व तीज आठवण काढत आहे.आदरपूर्वक नमस्कार आणि खूप आभार आणि नववर्षं शुभेच्छा.असंच लिहित रहा.
हटवाखूपच छान माहिती आहे. सारं पटतंय।उद्या ती आई ला वाचून दाखवीन वय ८८ ती सारखी चैत्री हळदी कुंकू व तीज आठवण काढत आहे.आदरपूर्वक नमस्कार आणि खूप आभार आणि नववर्षं शुभेच्छा.असंच लिहित रहा.हटवा
हटवाअतिशय महत्वाची आणि सटीक माहीती, मी हिमाचल प्रदेश मधल्या नवोदय विद्यालयात नोटीस बोर्ड वर लावली आहे. कारण तिथे मराठी तीसरी अक्षेत्रीय भाषा आहे.
उत्तर द्याहटवाचैत्री नवरात्रा साठी हार्दिक शुभेच्छा.