संकेत ओक |
मी संकेत आणि मधुरा ओक यांना
भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि मला, माझ्या गेली पंधरा-वीस
वर्षें छळणाऱ्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यासारखे वाटले. ती दोघे डोंबिवली-ठाणे-कल्याण
येथे वेध अॅक्टिंग अकॅडमी चालवतात. अभिनय व इतर कलाविष्कार शिकवणारे अनेक भुरटे
अभ्यासक्रम, कार्यशाळा, शिबिरे
यांच्याबाबत लोकांनी ऐकलेले असते. पण ‘वेध’ने दहा वर्षे पूर्ण करत आणली असे कळले, तेव्हा मला
त्यांच्या सततच्या निष्ठापूर्ण प्रयत्नांचे कौतुक वाटू लागले. त्या प्रयत्नांना
माझ्या मनी मोठे छत्र प्राप्त झाले ते सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात असलेल्या
पोकळीमुळे. मराठी रंगभूमी-चित्रपट व एकूण कलाक्षेत्रात प्रयोग सुरू झाले ते 1970-80 च्या दशकांत. रंगायन, आविष्कार, थिएटर अॅकॅडमी, तिकडे नागपूरला महेश एलकुंचवार यांची
एकव्यक्ती नाट्यलेखनाची झटापट असे प्रयोग सुरू होते. मृणाल सेन यांनी सुरू करून
दिलेल्या नवचित्रपटांच्या लाटेत बिनीचे अनेक शिलेदार होते. तो सारा इतिहास विजया
मेहता, अरुण काकडे, सतीश आळेकर,
सई परांजपे यांची आत्मकथने आल्यानंतर किंवा डॉ.श्रीराम लागू यांचे
विचारधन पॉप्युलर प्रकाशनाने प्रकट केल्यानंतर जागा झाला आणि त्याचबरोबर त्याला
नॉस्टॅल्जियाचे रूप आले. कारण दरम्यान टेलिव्हिजन, इंटरनेट,
वेब या तंत्रांनी कलेचा ताबा घेतला आणि कलेच्या जागी करमणुकीची प्रतिष्ठापना
केली आहे!
त्या
काळात वाढलेल्या माझ्यासारख्या उत्सुक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न तयार होई, की त्या
प्रायोगिकतेचे - त्यातून कलेला लाभत जाणाऱ्या परिपूर्णतेचे – त्यासाठी सतत चाललेल्या धडपडीचे व शोधबुद्धीचे होणार काय? कलेचा ध्यास बाळगणार कोण? ‘डेली सोप’च्या नादात तालमींतून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचे होणार काय? आणि आमच्यासारख्या रसिक भावबुद्धीच्या प्रेक्षकांना खाद्य मिळणार कोठून?
बाळ कोल्हटकर आणि विजय तेंडुलकर यांच्या नाटकांत फरक असतो, हे कळले तर पाहिजे ना?पुणे विद्यापीठाची ललित कला
अकादमी किंवा मुंबई विद्यापीठाची अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स हे आशेचे किरण होते,
पण सांस्कृतिक क्षेत्रांतील प्रयत्नांची उत्स्फूर्तता त्यांत
नव्हती. अशा तऱ्हेने काहीतरी हरवत आहे असे वाटत असताना मला संकेत व मधुरा काही
वर्षांपूर्वी भेटले. त्यांच्या प्रयत्नांत मला नवे सूत्र सापडत आहे असे वाटले.
मधुरा ओक |
संकेत स्वत: मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशाळेत शिकलेला नाट्यविषयाचा पदवीधर आहे. त्याने सारा इतिहास, कॅलिग्युला, बॅलन्सशीट, ब्रेकिंग न्यूजसारखी प्रायोगिक नाटके दिग्दर्शित केली आहेत. त्याने ऑपरेशन जटायू, 26/11-अ हाय अलर्ट, जागतिक विक्रम केलेले नाटक प्रिया बावरी अशा व्यावसायिक नाटकांतून भूमिकाही केल्या आहेत. त्याचे शालेय दिवसांपासून नाटक हेच वेड राहिलेले आहे. त्याचे रंगमंचावरील प्रयोग एकांकिका, अभिवाचन यांपासून सुरू झाले. स्मिता आणि सुलेखा तळवलकर यांनी अस्मिता चित्रच्या नाट्यप्रशिक्षण शिबिरात एकदा संकेतला ‘लेक्चर’साठी बोलावले. तो सांगतो, ‘तेव्हा माझ्या ध्यानी आले, की अभिनय प्रशिक्षण देणे ही माझी खरी ‘पॅशन’ आहे!’ तेथून मग संकेतच्या धडपडीला ‘प्रशिक्षणदाना’चे विधायक वळण लागले. पुरुषोत्तम बेर्डे ह्यांची अॅक्ट अॅकॅडमी, सुहास जोशी ह्यांची सुभाष अॅकॅडमी येथेही त्याने प्रशिक्षक म्हणून काम केले.
कल्पना
करा, संकेत आहे तेहतीस वर्षांचा आणि त्याची वेध अॅक्टिंग अॅकॅडमी दहा वर्षांची.
म्हणजे अस्सल कलाप्रेमी माणसाच्या आयुष्यात मार्गदर्शन, मेहनत
या गोष्टी असतील तर त्याच्या कमी वयातही मोठ्या गोष्टी घडू शकतात, हेच खरे. संकेत
मूळ डोंबिवलीचा. त्याची आई प्राजक्ता संगीत विशारद; तसेच, कीर्तनकार आहे. त्याचे वडील
प्रकाश सरकारी नोकरीत होते. धाकटा भाऊ अद्वैत कलापूर्ण फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध
आहे. तोही सध्या संकेतबरोबर ‘वेध’मध्ये
आहे. संकेतला कल्याणची मधुरा आपटे योग्य वयात भेटली. ती पण अशीच कलेच्या वातावरणात
रमणारी. ती मराठी घेऊन एमए झाली. तिनेही निवेदन, सूत्रसंचालन
असे प्रयोग केले आहेत. तिचा रंगमंच आणि रेडिओ या माध्यमांशी जवळचा संबंध आहे. तिने
पत्रकारितादेखील केली आहे. संकेत-मधुरा विवाहबद्ध झाले. त्या दोघांच्या आणि वेध
टीमच्या प्रयत्नांनी ‘वेध’ने ठाणे ते कल्याण
पट्टयात चांगला जम बसवला आहे. दरम्यान, संकेत-मधुरा यांना
समा नावाची गोड मुलगीही झाली.
संकेत
म्हणतो, की ‘वेध’चा त्याचा परिवार मोठा
आहे. त्याच्या बरोबरीने धडपडणारे तीस-पस्तीस तरुण त्याच्याबरोबर आहेत. दहा वर्षात
शिकून तयार झालेल्या साडेपाचशे ते सहाशे मुलांची पुंजी त्याच्याजवळ आहे. त्या
मुलांना मटा सन्मानापासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कारापर्यंत
विविध सत्कार लाभले आहेत. ते आदराने सांगतात, की 'आम्ही
संकेतसरांकडे शिकलो!'
दरम्यान, संकेतला
बालरंगभूमीचा मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी, व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी
एक थेरपी म्हणून उपयोग होतो असा प्रत्यय आला आणि कलेचे ते एक नवीन परिमाण सापडले.
तो म्हणतो, की मूल ‘मोकळे’ व्हावे, त्याला नीट व्यक्त होता यावे यासाठी थिएटर
हे उत्तम माध्यम आहे. मोठमोठ्या कलावंतांचे सहकार्य त्याला लाभत असते. त्याने
पुरुषोत्तम बेर्डे, वामन केंद्रे, विजय
केंकरे, विक्रम गोखले, जब्बार पटेल...
अशी नावेही सांगितली.
लॉकडाऊन
काळात 'वेध'कडून ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यांना महाराष्ट्रातून आणि
महाराष्ट्राबाहेरूनही प्रतिसाद मिळाला. त्यापासून स्फुरण घेऊन 'वेध'ने मुलांसाठी (2020)
ऑनलाइन कार्यशाळेची बॅच सुरू केली आहे. 'वेध'ने लॉकडाऊन काळात काही ऑनलाइन प्रयोगही
केले. त्यामध्ये गोष्टी सांगणे, अभिवाचन, कवितावाचन, चित्रकला अशा स्पर्धा घेतल्या गेल्या. पुस्तक वाचनाचा व्हिडिओ बनवला.
आईवडील आणि मूल यांना काही आव्हाने दिली, जेणेकरून लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांचे
मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.
'वेध'ला सामाजिक भानही आहे. 'वेध'ने
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाबरोबर ऑडिशन कशी द्यावी ही कार्यशाळा विनामूल्य
आयोजित केली होती. वेध अॅक्टिंग अॅकॅडमीत दरवर्षी कर्णबधिर, अंध अशा एक किंवा
दोन स्पेशल विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. 'वेध'कडून मूकबधिर शाळेतील मुलांचे
नाटक विनामूल्य बसवले गेले. त्याला अनेक राज्यस्तरीय स्पर्धांतून पारितोषिके
मिळाली. पूरपरिस्थितीत वेध अॅकॅडमीच्या माध्यमातून तीन ट्रक भरून, मदत गोळा करून
ती नाट्यपरिषद शाखेकडे दिली गेली.
माझ्या
मनात आले, की नाटक, चित्रपट, चित्रकाम असे एकांडे ध्यास एकेकाळी घेतले गेले, त्यातून
मोठ्या कलाकृती घडल्या. तंत्रविज्ञानाने निर्माण केलेल्या गुंतागुंतीच्या काळात
संकेत-मधुरा जपत असलेली कलारसिकतेची बहुविधता मुलामाणसांना सघनसंपन्न बनवू शकेल
का? करमणुकीकडे ढळणाऱ्या सांस्कृतिक जगातील कलात्मकता अशा प्रयत्नांतून जपली जाईल
का?
- दिनकर
गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य
संपादक आहेत.)
-------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------
7 टिप्पण्या
खूप छान लेखन.,मधुरा,संकेतजी खूप छान काम करीत आहेत. शुभेच्छा त्यांना👌
उत्तर द्याहटवासुंदर लेख. एका वेगळ्या विषयावर माहिती मिळाली.
उत्तर द्याहटवासुंदर लेख.तरुण पिढी खूप आशास्पद आहे. माझा 18 ते 22 ,या वयाच्या मुलांशी गेली अनेक वर्षे संबंध येतोय. आनंद मिळतो. लेखा बद्दल आभार
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लेख. संकेत मधुरा खूप मोलाचे काम करत आहेत. खरोखरच संकेतसर सगळ्या मुलांचे लाडके सर आहेत. लहानपणापासून संकेत वर त्याच्या आईने खूप छान संस्कार केले आहेत. संकेत मधुरा ला खूप खूप शुभेच्छा 🌹
उत्तर द्याहटवाखूप छान संकेत!! नेहमीच तुझे कौतुक वाटते! असाच यशस्वी हो!
उत्तर द्याहटवासंकेत चे ऑपरेशन जटायू मधील तर काम फारच अप्रतिम आहे. अजय पुरकर यांच्या बरोबर काम करणे हे एक मोठे आव्हान होते ते संकेत ने सहज पेलले. त्याच्या वेध ऍक्टिन संस्थेमध्ये आतापर्यंत पुष्कळ बालकलाकार अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन आपली कला सादर करीत आहेत. त्यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा.संकेत आणि मधुरा तुम्हाला आणि तुमच्या संस्थेला असेच भरभरून यश सदैव लाभो ही आम्हां सर्वांतर्फे प्रार्थना.
उत्तर द्याहटवाआपले शाळकरी चिमुरड्यांना सोबतीला घेऊन रंगभूमीची सेवा करण्याचे कार्य खूपच स्तुत्य आहे. माझी कन्या कुमारी धनश्री कुलकर्णी आपल्या या उपक्रमाची यशस्वी लाभार्थी असल्याचा आणि आपण तिच्यातील कला गुण खुलविण्याचा अभिमान वाटतो. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवा... जयवंत कुलकर्णी