शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा यांच्या नात्यामध्ये, अध्यापन करताना घडणाऱ्या क्रिया-आंतरक्रिया महत्त्वाच्या असतात. शिक्षकांची प्रत्येक हालचाल मुलांचे कौतुक करताना, त्यांना समजावून सांगताना, प्रसंगी चुकल्यास त्यांना दटावताना, बोलत असते. शिक्षकाने शिकवलेले विद्यार्थ्यांना कितपत कळले, हे त्यांचे लुकलुकणारे इवलेसे डोळे पाहून शिक्षकाला लगेच कळते. ऑनलाइन शिक्षणातील आभासी अंतर मात्र ह्या सर्व आंतरक्रियात अडथळा ठरले. प्रयोग म्हणजे एक प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलेले प्रयत्न ! ते प्रयत्न यशस्वी झाले तर तसे प्रयोग यशस्वी ठरतात. जेथे विद्यार्थी-पालक घनता जास्त आहे, तेथे शिक्षणाचे प्रयोग करण्यास जास्त वाव असतो. कोणी ट्रेनचे डब्बे शाळेत आणून, तर कोणी झाडाखाली शाळा भरवून, तर कोणी काचेच्या वर्गात शाळा भरवून शिक्षणाचे प्रयोग करत आहेत. तशा प्रयोगांमुळे शिक्षण ही “एक जिवंत प्रक्रिया आहे. कोणताही विषय आवडण्यासाठी शिक्षक आवडणे गरजेचे आहे हे जाणून असतो. आपण मुलांना आवडावे म्हणून प्रत्येक शिक्षक काही ना काही प्रयोग करत असतो. सध्याच्या घडीला प्रयोग करणाऱ्या, त्याचा प्रसार करणाऱ्या आणि या सगळ्याचा चांगला परिणाम घडवून आणणाऱ्या प्रयोगशील शाळा बदलत्या शिक्षणव्यवस्थेत घट्ट पाय रोवून टिकून आहेत”.
माझ्या वर्गातील सर्व मुलांनी ऑनलाइन तासांना शंभर टक्के उपस्थिती लावली, म्हणून अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाने माझा 23 ऑक्टोबर 2020 रोजी सत्कार केला. मी सत्कार व्हावा म्हणून हे काही केले नव्हते, तर आत्मसमाधानासाठी केले होते. माझ्या कॅटलॉगमधील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेला माझ्या मनाला पटणार नव्हते, म्हणून माझा निश्चय होता, शंभर टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रवाहात आणण्याचे. खरे तर, ऑनलाइन शिक्षण गरीब मुलांपर्यंत किती पोचेल हे माहीत नव्हते, पण मी जून महिन्यातच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास लावणार, ही खूणगाठ बांधली होती.
सर्वच शिक्षक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन लॉकडाउनच्या काळात काम करत होते. कोणी व्हिडिओ बनवत होते, तर कोणी व्हिडिओ शोधत होते, कोणी यूट्युब, झूम, गूगल मीट, गूगल ड्युओ, गुगल फॉर्म या तंत्रज्ञानाधारे काम करत होते. माझी ऑनलाइन क्लासवेळेस व्हिडिओ शूट करत असताना, कपडे सुकत घालण्याचा चिमटा वापरण्याची कल्पना सहकारी शिक्षकांना फार आवडली होती. माझ्यातील दुर्दम्य सकारात्मक इच्छाशक्ती, चौकटीबाहेरील विचार करून दररोज नावीन्यपूर्ण, आगळेवेगळे प्रयोग करण्याचा छंद; तसेच, खडतर आव्हान स्वीकारण्याचा माझा अभिजात गुण यांमुळे ऑनलाइन शिक्षणाच्या वेळेस वेगळे आव्हान स्वीकारण्याचे माझ्या मनात आले. मी वर्गातील शंभर टक्के मुले अभ्यासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांशी संवाद साधून, त्यांना भावनिक साद घालण्याचे ठरवले.
मला ‘पाचवी-अ’चे वर्गशिक्षकपद जून महिन्यात देण्यात आले. मी थोडा आनंदातच होतो, कारण मला ‘ब’ किंवा ‘क’ वर्गाचे वर्गशिक्षकपद माझी आवड म्हणून व शाळेची सोय म्हणून मागील पंचवीस वर्षांत मिळत असे. माझा मात्र “पाचवी-अ’चा वर्ग मिळाल्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. मला मिळालेला इयत्ता ‘पाचवी-अ’चा वर्ग कधी न पाहिलेल्या प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये येणारा, बिनचेहर््यांचा होता. इतर शिक्षकांना गेल्या वर्षीच्या वर्गांचे वर्गशिक्षकपद मिळाले होते. खरे तर, मला असे दुसर्याच्या कामाशी तुलना करून, दुःख करून नीट शिकवता येणार नाही हे माहीत होते; म्हणून मी कोणतीही कुरबूर केली नाही. मुख्याध्यापकांनी इयत्ता ‘पाचवी-अ’च्या वर्गातील सदतीस मुलांचा व्हॉट्सअॅप ग्रूप बनवण्यास सांगितले. मीच प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सअॅप ग्रूप बनवण्याची कल्पना पूर्वीच्या मुख्याध्यापकांना दोन वर्षांपूर्वी दिली होती. त्यांनी ती कल्पना उचलून धरली व लगेच अंमलातही आणली होती. पण त्या कल्पनेचा उपयोग लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी होईल, हे तेव्हा स्वप्नातही वाटले नव्हते. शाळा जरी 16 जूनपासून ऑनलाइन सुरू होणार होती, तरी माझ्या कामाला 5 जूनपासूनच सुरुवात झाली. एखादे काम यशस्वी करायचे असेल तर ऐंशी टक्के पेपरवर्क व वीस टक्के नियोजनबद्ध मेहनत घेणे गरजेचे आहे, हे मी जाणून होतो. कोणतेही काम यशस्वी करण्याचे असेल तर नेतृत्वगुण अंगी असले पाहिजेत व त्यासाठी आवश्यक निर्णयस्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे आहे. मी वर्गशिक्षक म्हणून येथे माझ्या वर्गाचा राजा होतो. ऑनलाइन काम घरातूनच करण्याचे असल्यामुळे कोणी माझ्या कामात ढवळाढवळ करणार नव्हते. काम यशस्वी करण्याचे असेल तर त्या कामावर शंभर टक्के फोकस करणे गरजेचे होते; म्हणून मी बालवैज्ञानिक, गणित-प्राविण्य, नवनिर्मिती व बिल्डिंगच्या सोसायटी यांच्या कामांकडे थोडा कानाडोळा तीन महिने केला. ऑनलाइन शिक्षण 16 जूनला सुरू होणार होते, तरी मी वर्गातील सदतीस मुलांचा कच्चा कॅटलॉग 9 जूनला बनवून तयार होतो ! त्यात मुलांचे पूर्ण नाव, मोबाइल नंबरसाठी दोन-तीन रकाने, पत्ते व जन्मतारीख अशा स्वरूपात कॅटलॉग तयार केला. मी पूर्व गोरेगावचे विविध विभाग दर्शवणारा नकाशा तयार केला. वर्गातील सदतीस मुलांना फोन केले आणि माझ्या भ्रमाचा भोपळा ‘प्रथमग्रासे मक्षिकापातः’ या उक्तीप्रमाणे फुटला. सदतीसपैकी केवळ वीस विद्यार्थ्यांना फोन लागले. माझ्या वर्गातील मुलांपैकी कोणी आरेतील आदिवासी पाड्यात, तर कोणी रेल्वे फाटकाजवळच्या - झोपडपट्टीत, कोणी कामा इस्टेटच्या मिनी धारावीत, तर कोणी जिल्ह्याबाहेर-राज्याबाहेरपण गेलेले होते. त्यांतील दोन मुली तर रायगडमधील निसर्ग चक्रीवादळातील संपर्क तुटलेल्या जिल्ह्यात गेल्या होत्या. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या त्या सुरुवातीच्या भयाण काळात कोणी कोणाला कोठे जातो हे सांगून गेले नव्हते. मला सर्व सदतीस विद्यार्थ्यांचे मोबाइल नंबर मिळवून, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी एक महिना तारेवरची कसरत करावी लागली. सुरतला राहण्यास गेलेल्या मुलाचा नंबर शोधण्याची हकिकत लिहिली तर आणखी एक पान भरेल. मी मागील दोन वर्षे आमच्या शाळेत मुले वाढावी म्हणून गल्ली-गल्लीमध्ये फिरलो होतो. मला त्या माझ्या पायपिटीचा फायदा त्या वेळी भरपूर झाला. मी कोणता मुलगा कोणत्या नगरात राहतो हे फोनवरून अंदाज बांधू लागलो; व काढलेल्या नकाशात हायलाइट करू लागलो. एक-एक करून सर्व मुलांशी फोनवरून संवाद जुलै अखेरपर्यंत, साधल्याने हायसे वाटले. मी फोनवर संवाद साधत असताना, ‘कसे आहात? काळजी घ्या’ अशी घरातील सर्वांची विचारपूस करून, शेवटी मुलांच्या अभ्यासाबाबत विचारत असे. त्यामुळे पालक व मी, आमच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. कोरोनाने वर्गातील दोन मुलांच्या कुटुंबांत शिरकाव केला होता. मी त्यांना फोनवरून आधार देत होतो. मानसिक तणावाने विस्कटू पाहणाऱ्या दोन कुटुंबातील पती-पत्नींना समजावून एकत्र आणले. एका पालकाला एफवायबीएनंतरच्या पुढील शिक्षणासाठी स्फूर्ती दिली. माझ्या सततच्या फोनमुळे एक कुटुंब गावावरून मुंबईला परत आले. सुरुवातीला ते शाळा सुरू झाली नाही म्हणून माझ्यावर रागावले, पण मुंबईला आल्याने नोकरी वाचली म्हणून माझे आभारही मानू लागले. मी फोनवर गप्पा मारत-मारत घरातील व शेजार्यांचे दोन-चार मोबाइल नंबर मिळवू शकलो. मी माझ्या घरातील कॅलेंडरवर वर्गातील मुलांचे जन्मदिवस साजरे करण्यासाठी त्या-त्या तारखांना हायलाइट करून ठेवले आहे. मुलांना त्यांच्या वाढदिवशी त्या-त्या मुलांना बालचित्रकार, बालकवी, बालइंजिनीयर अशा उपाधी देऊन, ते दिवस व्हॉट्सअॅपवर साजरे केल्याने कोण आनंद होत असे ! मी रविवारी सुट्टयांच्या दिवशीही विद्यार्थी-पालकांच्या संपर्कात राहिलो. माझ्या ‘कोणतीही अडचण असेल तर मला फोन करा’ या व्हॉट्सअॅपवरील वाक्याने विद्यार्थी-पालक व मी, आमच्यातील विश्वास आणखी दृढ होत गेला.
मी मुलांसोबत पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून स्मार्टफोन घेण्याची विनंती केली.
मी माझा विषय गणित असल्याने व्हॉट्सअॅपवर अभ्यास देताना, कृतींवर जास्त भर दिला होता. मी मुलांना टिकल्या वापरून, माचिसच्या काड्या वापरून, रांगोळीचा आधार घेऊन गणिताच्या कृतिमय अभ्यासात मुलांना गुंतवून ठेवले. आमच्या मुख्याध्यापकांना माझा ‘पिठातून गणित’ हा व्हॉट्सअॅप अभ्यास फार आवडला. इतर विषय शिक्षकही नावीन्यपूर्ण अभ्यास देत होते, त्याचीही मदत उपस्थिती वाढवण्यासाठी होत होती. व्हॉट्सअॅपवरील अभ्यास करणाऱ्या मुलांची उपस्थिती ग्रूपवर टाकत राहिलो, त्यामुळे स्वतःची उपस्थिती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली. विभागवार पालक-प्रतिनिधी व विद्यार्थी-प्रतिनिधीसुद्धा नेमले. इयत्ता ‘पाचवी-ब’च्या आजुबाजूला राहणाऱ्या मुलांचा अभ्यास करून घेण्याची जबाबदारी माझ्या वर्गातील मुलांवर टाकल्याने, त्यांच्यामध्ये अभ्यास करण्यात चेव निर्माण झाला. जी मुले अजूनही व्हॉट्सअॅपवर अभ्यास पाठवत नव्हती, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी गृहभेटी देण्याचे ठरवले. ते काम कोरोनाच्या काळात तितकेसे सोपे नव्हते. मी एखाद्या मुलाच्या वाढदिवसाचा प्रसंग शोधत असे. विभागप्रमुख, विद्यार्थी-पालक यांना फोन करून पूर्वकल्पना देत असे. त्या-त्या विभागातील समाजसेवकाची मदत घेत असे आणि सोबत पंधरा-वीस चॉकलेट्स घेत असे. ज्या चिमुरड्यांना अभ्यासाचा फोटो काढून ग्रूपवर टाकणे जमत नव्हते, त्यांना मार्गदर्शन करत असे. ते लहान मुलांना पटकन आत्मसात होत असे. रेल्वे फाटकाजवळ राहणाऱ्या एका मुलीच्या झोपडीत तिसऱ्या वेळेला गेलो, तेव्हा ती तिच्या बापाला बघून आनंदाने धावत यावी, तशी माझ्याकडे आली आणि मोबाइल कसा ऑपरेट करायचा ते समजून घेऊ लागली. माझ्या गृहभेटींनी व्हॉट्सअॅपवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली. शाळेने ऑनलाइन लेक्चरची व्हाट्सअॅप अभ्यासाबरोबर सुरुवात सप्टेंबर महिन्यात केली. त्यामुळे फोर-जी व नेट पॅक ही वेगळीच समस्या उभी राहिली. परी नवाची हुशार मुलगी स्मार्ट फोन तिच्याकडे नसल्यामुळे अभ्यासाच्या प्रवाहातून दूर जात होती. मी तिच्या आईशी संपर्क करून स्मार्ट फोनसाठी पाच हजार रूपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र शाळेनेच परीला मोबाइल दिल्यामुळे ती ऑनलाइन लेक्चरला नियमित उपस्थित राहू लागली. आमच्या शाळेतील शिक्षकांनी उभारलेल्या निधीतून मुलांना वह्या, पुस्तके व स्टेशनरी, साधना दिवाळी अंक असे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच ‘शालेय पोषण आहार’योजनेअंतर्गत तांदूळ, हरभरा व मूगडाळ या धान्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर स्मार्ट फोन गरजू व होतकरू मुलांना देणगीदारांनी दिलेल्या निधीतून वितरीत केले. मी या प्रत्येक वाटपाच्या कार्यक्रमाला पालक-विद्यार्थी प्रत्यक्ष दृष्टीस पडावेत व त्यांच्याशी संवाद साधता यावा म्हणून शाळेत आवर्जून उपस्थित राहत होतो. त्यामुळे ऑनलाइन उपस्थिती वाढण्यास एक प्रकारे मदतच झाली. मी काही वेळेला त्रास देणाऱ्या दोन-चार मुलासाठी कठोरही बनलो. एका मातेला शाळेकडून स्मार्टफोन मिळाला होता तरीसुद्धा तिची मुलगी ऑनलाइन लेक्चरला उपस्थित राहत नव्हती. संबंधित पालकाकडे त्यासंबधी विचारणा केली असता त्या आठ दिवसांनी पगार झाल्यावर नेट पॅक टाकते असे म्हणाल्या. आठ दिवसांचा ऑनलाइन अभ्यास बुडणर होता; म्हणून ‘मी नेट पॅक टाकतो’ असे त्यांना म्हणालो, पण त्या गरीब माऊलीने मला खर्च करू दिला नाही. तिने शेजारणीकडून उसने घेऊ नेट पॅक भरला व लेकीचा ऑनलाइन अभ्यास सुरू केला. एकाच घरातील दोन मुली ऑनलाइन लेक्चरला दहा-बारा दिवस अनुपस्थित राहत होत्या. त्यामुळे माझ्या वर्गाची उपस्थिती ब्याण्णव टक्क्यांवर अडकून राहिली होती. तीन मुली लागोपाठ जन्मलेल्या व मुलगा नाही म्हणून त्या कुटुंबात वेगळीच निरसता आली होती. त्या जुळ्या असलेल्या दोन मुली अभ्यासात हुशार होत्या. मी त्या मातेला ‘मुली असल्याचे दुःख मानू नका’, असे वेगळ्या पद्धतीने समजावले. यामुळे प्रगती व संस्कृती ऑनलाइन लेक्चरला नियमित उपस्थित राहू लागल्या आणि अखेर माझ्या वर्गाने शंभर टक्के उपस्थितीचे शिखर गाठले.
मोराचा पाडा येथील या चार विद्यार्थ्यांना शाखाप्रमुखांच्या मदतीने शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
माझ्या वर्गातील मुले शंभर टक्के अभ्यासाच्या प्रवाहात नुसतीच आली नाहीत, तर निसर्ग मंडळ, शिष्यवृत्ती वर्ग व इतर कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ लागली. मुले धाडसी बनत गेली. एक प्रसंग येथे नमूद करावासा वाटतो. माझ्या वर्गातील काही विद्यार्थी बीएनएचएसच्या वेबसंवादामध्ये सहभागी झाले होते. ‘पाणी व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळा चालू होती. एका मुलाने ‘वाफ होणारे पाणी अडवले पाहिजे’ हे मत व्यक्त केले, तेव्हा मला कौतुकमिश्रित नवल वाटून गेले. मुख्याध्यापकांचा वर्ग शिक्षकांना आदेश असायचा, की ‘दररोज चार-पाच विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्या संपर्कात राहा’. पण, माझ्या वर्गात उलटेच होते. माझ्या वर्गातील विद्यार्थीच मला फोन करत होते. आता, ते केवळ माझे विद्यार्थी नव्हते, तर ती माझी मुले झाली होती ! ही जवळीकता-आत्मीयता सर्व शिक्षकांमध्ये रुजेल, तेव्हा सर्वच शाळा नक्कीच बहरलेल्या असतील. माझ्या विभागवार गृहभेटी आता थांबल्या आहेत, कारण प्रत्येक विभागातील माजी विद्यार्थ्यांनी माझी ही जबाबदारी आता हलकी केली आहे. मुले शिकती होण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांची पुढील फळीसुद्धा या बिकट काळात नकळत निर्माण झाली आहे. मी या सुंदर सामाजिक बदलाचा साक्षीदार आहे !
(मराठी अभ्यास केंद्र दरवर्षी डिसेंबर महिन्यात ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ आयोजित करत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020चे संमेलन ऑनलाइन झाले. त्या संमेलनानिमित्त शिक्षकांसाठी ‘ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणातील माझे प्रयोग’ ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्रातील विविध शाळांतील शिक्षकांनी निबंधातून ‘कोरोनाकाळात केलेले प्रयोग’ मांडले. त्या स्पर्धत प्रथम पारितोषिक मिळालेला निबंध.)
- संजय कानसे 98191 76904
संजय कानसे हे गोरेगाव (मुंबई) येथील नंदादीप विद्यालयात गणित विषयाचे शिक्षक आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी लॉकडाऊन काळात अशा ठिकाणीही गृहभेटी दिल्या. |
1 टिप्पण्या
आजच्या परिस्थितीत हे सर्व प्रयोग छान आहेत मुळात चित्रकला,रंगकाला,शाळा,आणि कलामहाविद्यालयात शिकवणे ऑनलाइन कठीण वाटते..
उत्तर द्याहटवा