'पागडी' हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा शब्द. तो पुनर्विकास आणि त्यातून मिळणारी ओनरशिप घरे या काळात विस्मृतीत गेला आहे. एकेकाळी मुंबईत घर पागडीनेच मिळायचे. 'पागडी'ची घरे म्हणजे भाड्याने घेतलेली घरे. घरमालक किंवा चाळमालक त्याच्या मालकीच्या जागेवरील किंवा चाळीतील घरे गरजूंना भाड्याने देई. तेव्हा मालकीची घरे ही संकल्पना नव्हती. कारण मुंबईत माणसे त्या काळात येत, ती फक्त रोजगारापुरती. तीही बहुतेक एकटी. कुटुंबे गावाकडे असत. कुटुंब प्रमुख कामातून रिटायर झाले, की स्वत:च्या गावी परत जात. ते काही मुंबईचे कायमचे रहिवासी नव्हते. सरकारी अर्जावरही त्या उद्देशाने 'सध्याचा पत्ता' आणि 'कायमचा पत्ता' असे दोन स्वतंत्र रकाने असत, अजूनही ते रकाने तसेच राहून गेलेले दिसतात. त्या नोकरदारांना चाकरमानी म्हणत. पण मुंबई हा विकासक्रमात असा एक पिंजरा बनून गेला, की त्यात एकदा शिरलेला माणूस बाहेर पडू शकत नाही. त्याला त्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यास जमत नाही हे लक्षात आल्यावर, जमेल तसे तो त्याचे कुटुंबही मुंबईत आणू लागला. आणि मुंबईत पागडीच्या घरात राहून कायमचा मुंबईकर होत गेला. गावाकडे असेल ते घर आणि मुंबईत आहे ते बिऱ्हाड असे शब्दप्रयोगही रूढ होऊन गेले.
'पागडी' हा शब्द कोठून आला असेल त्याचा धागा मला सापडला. तो धागा सोळाव्या शतकात मुंबईत अस्तित्वात असलेल्या पोर्तुगीज सत्तेच्या व नंतरच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या चलनापर्यंत पोचतो. पोर्तुगीजांचा अंमल मुंबईवर 1530 पासून सुरू झाला. पोर्तुगीजांचे मुख्य ठाणे होते वसई. मुंबई हा भाग त्यांच्या दृष्टीने दुय्यम होता. मुंबईची बेटे होतीही ओसाड. म्हणून पोर्तुगीज शासनकर्त्यांनी त्यांच्या देशातील बड्या लोकांना मुंबईतील जमिनी भाडेपट्ट्याने दिल्या. तशा लोकांतच एक होते मेस्टी डायगो (Meste Diago). ते नाव Mestre Diago असेही काही ठिकाणी नोंदवल्याचे दिसते. त्यातील Mestre किंवा Meste हे इंग्रजी Mister सारखे संबोधन आणि डायगो हे नाव असावे. त्या डायगो यांना दिलेल्या जमिनीचे भाडे होते वर्षाला 1432.5 पारडो (Pardaos). पोर्तुगीज़ अंमलाखाली असलेल्या पश्चिम किनार्याच्या भागात सोळाव्या शतकात Fedea-Fuddea, Tanga, Pardao इत्यादी नावांची नाणी वापरात होती.
Fedea हे सर्वात लहान चलन. त्याचा मराठी अपभ्रंश पुढे 'फद्या' असा झाला. 'फद्या' हे दुय्यम चलन असल्याने, तो शब्द मराठीत एखाद्याच्या कमकुवतपणाची टिंगल करण्यासाठीदेखील वापरला जातो. 'Fedea'च्या थोडे वरच्या दर्ज्याचे चलन म्हणजे 'Tanga' किंवा 'Tanka'. त्याचा मराठीतील उच्चार साधारण 'टांगा' किंवा 'टॅंगा' किंवा 'टंका' असा होतो. तोच शब्द पुढे अपभ्रंशित होऊन 'टका' किंवा 'तक्ता' म्हणून रुढ झाला (संजय पवार यांचे नाटक होते 'कोण म्हणतो टका दिला' या नावाचे. त्यातील 'टका' बहुतेक हा असावा). मराठीतील 'टक्का' किंवा 'टक्के' हा प्रतिशत या अर्थाचा शब्दही बहुतेक त्याच्याच पोटातून जन्मला असावा, कारण ते चलन पोर्तुगीजांच्या काही काळ अगोदर गुजरातेत प्रचलीत होते व त्याची किंमत साधारणत: नंतरच्या काळातील रुपयाचा एक भाग, म्हणजे 1/100 एवढी होती. चार fedea म्हणजे एक tanka आणि पाच 'टका' म्हणजे पोर्तुगीज चलनातील एक 'पारडो (Pardao)' किंवा वीस fedea म्हणजे एक पारडो असेही म्हणता येईल.
ईस्ट इंडिया कंपनीने दक्षिण भारतात व्यापारासाठी 'गोल्ड पॅगोडा' जारी केला (1705–1780).
मुंबई बेटांवरील पोर्तगीजांची सत्ता 1661 साली संपुष्टात येऊन, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता मुंबई बेटांवर 1665 पासून आली. तत्पूर्वी, ईस्ट इंडिया कंपनीचे अस्तित्व दक्षिणेतील राज्यांमध्ये होते आणि दक्षिणेत असलेल्या भारतीय राजसत्तांचे काही चलन ब्रिटिशही वापरत असत. ईस्ट इंडिया कंपनीची मुंबईवर सत्ता आली तरी काही पोर्तुगीज मुंबईत वास्तव्याला होते. त्यांच्या ताब्यात त्यांना पोर्तुगीज राज्यकर्त्यांकडून लिजवर मिळालेल्या जमिनीही होत्या. फक्त बदललेल्या परिस्थितीत त्यांना भाडे ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्या चलनात द्यावे लागत असे आणि त्यांपैकी एक चलन होते Pagoda. ते चलन दक्षिणेतील मद्रास प्रांतातील. ते मुंबईतही अस्तित्वात सतराव्या शतकाच्या मध्यावर होते, असे अनुमान 'मुंबईचा वृत्तांत' ह्या पुस्तकातील माहितीवरून काढता येते. पोर्तुगीज चलनातील साधारणत: साडेतीन पारडो म्हणजे ब्रिटिश काळातील एक पॅगोडा (Pagoda). ज्या पोर्तुगीजांना जमिनीचे भाडे, पोर्तुगीज मुंबईत 'पारडो'मध्ये भरावे लागत होते, त्या पोर्तुगीजांना ब्रिटिश मुंबईत जमिनीचे भाडे 'पॅगोडा'मध्ये भरावे लागू लागले. जमीन अमुक अमुक 'पॅगोडा' भाड्याने घेतली किंवा दिली असे तेव्हा बोली भाषेत बोलले जात असणे शक्य आहे. कालौघात, 'भाड्याने' हा शब्द लयाला जाऊन, जमीन 'पॅगोडा'ने घेतली असे त्याचे वर्णन झाले असावे. 'भाडे' या शब्दाला 'पॅगोडा' हा समानार्थी शब्द आला असावा. कारण 'पागडी' या शब्दाची यापेक्षा समाधानकारक व्युत्पत्ती मला अद्याप कोठे मिळालेली नाही. पुढे पोर्तुगीज गेले, ब्रिटिश गेले, त्यांची जुनी चलनेही गेली, पण त्या काळातील 'पॅगोडा' या चलनाचे अवशेष 'पागडी' या शब्दाच्या रूपात मागे उरले ! पागडी या शब्दाचा अर्थ पुढे बदलत गेला. प्रथम पागडी ‘आगाऊ भाडे’ रूपात एकरकमी घेतली जाऊ लागली. मग तिला अनामत रकमेचे स्वरूप आले. आता भाड्यांची घरे हस्तांतरित होतात तेव्हा पागडी द्यावीच लागते. बिऱ्हाड मालक ती नव्या बिऱ्हाडकरूंकडून संचित रूपात वसूल करतो. त्यात घरमालकाचाही वाटा असतो.
मुंबईत जागांची टंचाई झाली, सहकारी गृहनिर्माण संस्था विकसित होऊ लागल्या, तेव्हा गेल्या शतकात पागडी या शब्दाला वेगळा अर्थ प्राप्त झाला. पागडी ही निवासासाठी देण्याची भाड्यापलीकडील जादा संचित रक्कम असा तो अर्थ बनला. स्वाभाविकच पागडीची रक्कम बेकायदा आहे. ती कोठे कोठे ‘सलामी’ या नावानेदेखील ओळखली जाते.
(मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवावरून उद्धृत)
- नितीन अनंत साळुंखे 9321811091 salunkesnitin@gmail.com
नितीन अनंत साळुंखे हे बँकेत नोकरी करत होते. परंतु त्यांना मुंबईच्या इतिहासाच्या अभ्यासाचा छंद लागला आणि त्यांनी नोकरी सोडून तोच ध्यास गेली पाच-सात वर्षे धरला आहे. त्यांचे मुंबईसंबंधातील लेखन नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते. त्याखेरीज त्यांचा स्वत:चा nitinsalunkheblog.wordpress.com हा ब्लॉग आहे. मुंबईच्या अभ्यासाखेरीज ते राजकीय लेखन, आत्मकथनांचे शब्दांकन अशीही कामे करत असतात. साळुंखे मुंबईमध्ये दहिसरला राहतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
3 टिप्पण्या
Very interesting information. Thanks !! All the best to Mr. Nitin 🙏
उत्तर द्याहटवाGood informative article. All the best to Mr.Nitin 🙏
उत्तर द्याहटवाछान आणि उपयुक्त माहिती , धन्यवाद.
उत्तर द्याहटवा