मराठी भाषक ख्रिस्ती समाजात चरित्र आणि आत्मचरित्र यांचे प्रमाण अगदी कमी होते. कॅथॉलिक पंथीय ख्रिस्ती समाजात तर संत चरित्र आणि अनुवादित (इंग्रजीतून) अशी धर्मगुरुंची आत्मचरित्रे लिहिण्यावरच भर अधिक होता. मी या गोष्टीचा उच्चार मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात 2000 साली केला होता. त्यानंतरच्या वीस वर्षांत वसईतील मराठी भाषक ख्रिस्ती समाजातून काही चरित्रे-आत्मचरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांत नैमित्तिक अशा गौरवग्रंथांचे प्रमाण विपुल आहे. गौरवपर ग्रंथांत अनेक व्यक्तींनी एका व्यक्तीविषयी लिहिलेले असल्यामुळे एखाद्या व्यक्तिमत्त्वाची विविध बाजू प्रकाशात येते. मात्र तो त्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र धांडोळा नसतो. त्यामुळे गौरवग्रंथाचा समावेश ‘चरित्रा’त केला जात नाही.
वसईतील मराठी भाषक कॅथॉलिक पंथियांची चरित्रे व आत्मचरित्रे यांचा शोध घेताना असे दिसून आले, की काही धर्मगुरू व धर्माधिकारी यांचे ‘गौरवग्रंथ’ प्रापंचिकांनी संपादित वा संकलित केलेले आहेत. मात्र धर्माधिकाऱ्यांनी प्रापंचिकांचे गौरवग्रंथ संपादित वा संकलित केलेले नाहीत. त्यावरून ख्रिस्ती समाजातील चर्चच्या वर्चस्वाची कल्पना येऊ शकते. प्रापंचिकांनी प्रापंचिकांचेच केलेले गौरवग्रंथ अथवा परिचयात्मक संकलित केलेले असेही ग्रंथ काही सापडले. परंतु त्या त्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र शोध त्यात दिसत नाही. असे ग्रंथ कितीही परिश्रमपूर्वक साकार झालेले असले तरीही त्याला चरित्रग्रंथाचे मोल येत नाही.
वसईतील मराठी भाषक कॅथॉलिक पंथीय प्रापंचिकांच्या चरित्र-आत्मचरित्राचा अभ्यास मांडावा असे वाटल्यावरून मी ज्या प्रापंचिकांनी आत्मचरित्रे लिहिलेली आहेत आणि ज्या व्यक्तींची चरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत, अशा ग्रंथांचा शोध घेतला, तेव्हा मला हाताच्या बोटांवर मोजता येतील असे ग्रंथ सापडले. त्यातही काही ग्रंथ खाजगी वितरणासाठी होते आणि ते लिहिलेलेही स्वान्तसुखाय आहेत. त्यामुळे त्यावरील निरीक्षणे मांङणे मला अगत्याचे वाटले. त्या पुस्तकांचा परिचय ख्रिस्ती समाजापलीकडे कोणाला झालेला नसेल, तरीही आत्मचरित्राची काही मूल्ये त्यांत सापडतात. तो धागा मला महत्त्वाचा वाटला.
चरित्रग्रंथ
1. म्हशीपासून मर्सिडिजपर्यंत - अँन्थोनी तुस्कानो, शब्दांकन- जोसेफ तुस्कानो, दौलत प्रकाशन, घोसाळी, नंदाखाल, विरार, 25 ऑगस्ट 2015 (प्रथम आवृती) मूल्य-200/- रुपये, पृष्ठे - 144
2. रॉबी डिसिल्वा - एका मनस्वी कलाकाराचा प्रवास - वीणा गवाणकर, राजहंस प्रकाशन, एप्रिल 2016, किंमत - 200/- रूपये, पृष्ठे - 160
3. समाजधुरीण (डेव्हिड डिकुन्हा) शब्दांकन - जोसेफ तुस्कानो, अॅनाव्हिला प्रकाशन - वसई (पश्चिम), 28 मार्च 2017, मूल्य - 150/- रूपये, पृष्ठे -140
4. अविश्रांत (सहकार महर्षी व्हिक्टर डाबरे) - अचला मच्याडो, ग्रंथाली प्रकाशन - मुंबई16, 11 मे 2019, किंमत - 250/- रूपये, पृष्ठे -196
1. वळणावळणाच्या वाटा - नेपोलियन डिसिल्वा, रिव्ज प्रकाशन, पालमार, वसई (खाजगी वितरण), 2 ऑक्टोबर 2009, पृष्ठे - 96
2. हरवलेले दिवस - विवियन बरबोज, स्मित प्रकाशन, वसई, 27 एप्रिल 2014, मूल्य - 200/-रुपये, पृष्ठे - 192
3. कामगार आहे मी - मार्कुस डाबरे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई16, 26 नोर्व्हबर 2014. किंमत 250/- रुपये, पृष्ठे - 241
4. बाबांची सावली - नातालिया पास्कोल मिनेझीस, संपादन - जोसेफ तुस्कानो, (खाजगी वितरण) स्मित प्रकाशन- माणिकपूर, वसई, 15 नोव्हेंबर 2017 पृष्ठे -100
5. टिपंवणी - डॉ. सिसिलिया कार्व्हालो, ग्रंथाली प्रकाशन मुंबई 16, 25 डिसेंबर 2019 (पहिली आवृत्ती) किंमत 400 रुपये, 26 जानेवारी 2020 (दुसरी आवृत्ती) पृष्ठे - 332
चरित्रग्रंथ कसा असावा याचा वस्तुपाठ वसईतीलच वीणा गवाणकर यांनी साऱ्या मराठी जगतासमोर ठेवलेला आहे. त्यांनी वसईतील रॉबी डिसिल्वा यांचे चरित्र यथार्थ स्वरूपात उभे केलेले आहे. मी अभ्यासलेल्या चरित्रग्रंथांपैकी फक्त रॉबी डिसिल्वा यांचे व्यक्तिमत्त्व सांस्कृतिक मूल्यांसह मूर्तिमंत रूपात उभे राहते. ‘वळणावळणाच्या वाटा’ हे नेपोलियन डिसिल्वा यांचे आत्मचरित्रही सांस्कृतिक मूल्यांनी समृद्ध असे आहे. छोटेखानी असले तरीही! त्यात बालपणाचे संदर्भ अधिक येतात आणि कौटुंबिक संघर्ष, सांसारिक संघर्ष यांची प्रतिबिंबे फारशी येत नाहीत.
चरित्र आणि आत्मचरित्र या दोन्ही प्रकारच्या ग्रंथांतील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे जी व्यक्तिमत्त्वे चर्चच्या प्रांगणांतून बाहेर पडली, त्यांना मोठा व व्यापक अवकाश प्राप्त झालेला आहे. त्यांचा संघर्ष चर्चच्या व्यवस्थापनाशी आणि एकूणच व्यवस्थेशी झालेला असला, तरी त्या त्या व्यक्तिमत्त्वांनी त्यांच्या ख्रिस्ती नावांशी मात्र फारकत घेतलेली नाही. तसेच, त्यांनी चर्चची जी कामे विनामूल्य केली, त्या सेवाभावी कार्यामुळे त्यांना समोरचा माणूस ओळखण्याची शक्ती प्राप्त झाली. सेवाभावी कार्यामुळे त्यांना अनुभवसंपन्नता प्राप्त झाली. त्यांच्यावर झालेले मूल्यसंस्कार अधिक उजळून निघाले. काही चरित्रग्रंथात धर्माधिकाऱ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. ते चर्चचा चरित्रनायक आणि चरित्रलेखक यांच्यावरील चर्चचा प्रभाव सूचित करतात. त्यामुळे चरित्रलेखक धर्मगुरू वा धर्माधिकारी यांचे संदर्भ सांभाळून लिहितात व आम्ही चर्चपासून दुरावलेलो नाही हे अधोरेखित करतात.
वसईतील मराठी भाषक कॅथॉलिक पंथीय स्थानिक बोलीत त्यांचा संवाद साधत असतात. त्यांचे शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. परंतु ती व्यक्तिमत्त्वे प्रमाण मराठी आणि इंग्रजीही उत्तम रीतीने लिहू-बोलू शकतात.
उपलब्ध चरित्रे आणि आत्मचरित्रे यांचा एकत्रितपणे अभ्यास करताना असे दिसून आले, की ती ‘व्यक्तिमत्त्वे’ एकमेकांशी आणि समाजातील घटनाप्रसंगांशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, ‘कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटल’ची उभारणी वाचताना डेव्हिड डिकुन्हा, व्हिक्टर डाबरे, अँन्थनी तुस्कानो यांचे संदर्भ येतात, तर कार्डिनल ग्रेशस हाँस्पिटलमधील संपाविषयी विवियन बरबोज आणि मार्कुस डाबरे यांचे संदर्भ एकत्रितपणे येतात. त्यामुळे त्या समाजातील एकी आणि एकाच विचारांनी झपाटलेलीं व्यक्तिमत्त्वे दिसून येतात.
- सिसिलिया कार्व्हालो 9422385050 drceciliacar@gmail.com
सिसिलिया कार्व्हालो या मराठी कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ललितगद्य कथा, आस्वादनपर, संशोधनात्मक, चरित्रपर, अनुवाद अशा सर्व प्रकारच्या लेखनावर त्यांच्या ललितरम्य लेखनशैलीची मुद्रा उमटवली आहे. त्यांच्या ललितगद्य लेखनास अनंत काणेकर, पु.ल.देशपांडे आणि मधुकर केचे यांच्या नावांचे राज्यशासनाचे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर साहित्याचे अध्यापन केले आहे. त्या पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी बालभारती, उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष म्हणून शैक्षणिक कार्यात योगदान दिले. त्यांनी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून केलेले कार्य संस्मरणीय आहे. त्यांनी मराठी भाषक ख्रिस्ती समाजीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच, गुजरात, गोवा, कर्नाटक येथील विभागीय साहित्य संमेलनांचेही अध्यक्षपद भूषवले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
तुमचा लेख फारच छान झाला आहे. एखादे साहित्य वाचताना ते कसे वाचले जावे याचा हा उत्तम नमुना आहे.
उत्तर द्याहटवा