रणजित डिसले यांनी क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवली! त्यांचे नाव महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात काही वर्षांपासून गाजत आहे. त्यांना युनेस्को आणि वार्की फाऊंडेशन यांच्यातर्फे जागतिक दर्ज्याचा सात कोटी रुपयांचा ग्लोबल पुरस्कार (2020) मिळाला. त्यामुळे अर्थातच भारताचे नाव अभिमानाने जगभरात उंचावले. दहा शिक्षक जगभराच्या एकशेचाळीस देशांतील बारा हजार शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम फेरीत निवडण्यात आले. रणजित डिसले यांची निवड त्या दहा शिक्षकांमधून अंतिम विजेता म्हणून करण्यात आली. ज्या भारत देशामधे गुरु परंपरेचा सन्मान केला जातो तेथे एका भारतीय मराठी शिक्षकाला जागतिक दर्ज्याचा सन्मान मिळाला ही अभिमानास्पद गोष्ट आहेच, पण त्याहूनही अधिक अभिमानाची व आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिसले यांनी त्यांच्या पुरस्काराची अर्धी रक्कम त्यांच्याबरोबर स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत आलेले जे इतर नऊ शिक्षक होते त्यांना वाटून दिली. त्यांच्याकडे उरलेली रक्कमही ते ‘टिचर इनोव्हेशन फंड’करता वापरणार आहेत. त्यांनी त्यांच्या या महान कृतीने भारतीय परंपरागत मूल्यांना किती मोठ्या प्रमाणात प्रकाशात आणले आहे! त्यांनी भारताची ही जी प्रतिमा जगासमोर निर्माण केली त्या त्यांच्या कृत्याला न्याय्य प्रतिसाद देणे हे देशातील प्रत्येक जबाबदार व्यक्तीचे कर्तव्य आहे.
डिसले यांच्यात हे काम करताना कोठल्याही मोठेपणाचा आव नव्हता. ते म्हणाले, “मी माझ्या पुरस्काराची रक्कम इतरांमध्ये वाटली यात विशेष काही नाही. प्रत्येक शिक्षक त्याचे ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन, विचार हे सर्व काही त्याच्या विद्यार्थ्यांना सदैव देत असतो आणि त्यांचे जीवन आकाराला आणत असतो. मला पुरस्कार मिळाला त्याचे कारण आहे, मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी केलेले काम. त्यामुळे मी ही रक्कम पुन्हा त्याच कामासाठी वापरत आहे. इतर नऊ शिक्षकांकडून पण ती त्याच कामासाठी वापरली जाणार आहे. यामुळे मला त्याचे अधिकच समाधान आहे.”
डिसले यांच्या कामाचा आढावा घेणारा लेख ‘शिक्षक व्यासपीठ’वर यापूर्वीच प्रसिद्ध केला आहे. डिसले हे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. ते उच्चशिक्षित असूनही जाणीवपूर्वक ग्रामीण भागात शिक्षक झाले. विशेष म्हणजे त्यांचे वडीलदेखील जिल्हा परिषदेचे शिक्षक होते. डिसले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाविषयी आस्था निर्माण व्हावी यासाठी घेतली. मुलांच्या घरोघरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवले. डिसले यांची नियुक्ती ज्या गावात सुरुवातीला झाली तेथील शाळा म्हणजे केवळ नावाला शाळा होती. तेथे एका वर्गात गुरे बांधण्यात येत, मुले शिक्षकांच्या माराला व न कळणाऱ्या अभ्यासाला घाबरून शाळेतच येत नसत. पालकांची वृत्ती मुलांनी शिकून काय करायचे? अशी होती. कारण त्यांची समजूत म्हणजे त्यांना त्यांच्या गावातील परंपरागत शेती व इतर छोटे-मोठे व्यवसाय यांसाठी शिक्षणाची काहीच आवश्यकता नाही. पण डिसलेसर परिस्थितीला शरण गेले नाहीत. त्यांनी त्यांचे काम सच्चेपणाने केले.
त्यांनी विद्यार्थी जमवले, मुलांना आकर्षित करणारे कार्यक्रम शाळेत आखले. त्यांनी लॅपटॉप शाळेसाठी घेतला आणि ते त्यावर मुलांना आवडतील असे चित्रपट दाखवू लागले. शाळेत जायचे आणि सिनेमा बघायचा! कोठल्या मुलाला ते आवडणार नाही? शाळेची पटसंख्या वाढू लागली. डिसलेसर त्यांना अभ्यासक्रम गोष्टीरूपाने सावकाशपणे हळूहळू शिकवू लागले. परीक्षेची भीती नाही, आरडा-ओरडा नाही, धाक नाही. यामुळे मुले शाळेत रमू लागली. डिसलेसर मुलांच्या कलाने त्यांना समजेल अशा भाषेत शिकवायचे आणि नंतर हळूहळू, त्यांनी क्यूआर कोडचा शिक्षण अभ्यासक्रमात समावेश केला. तेव्हा पुस्तकातील लिखित धडे जिवंत होऊन मुलांसमोर दृश्य स्वरूपात वावरू लागले! भूगोलाच्या धड्यातील, इतिहासाच्या धड्यातील ठिकाणांना मुले व्हर्च्युअल भेटी देऊ लागली. त्यांच्या मनातून अभ्यासाची भीती, कंटाळा दूर होऊ लागले.
डिसले यांचे हे कार्य नक्कीच मोठे आहे. पण भारत देशात असे अनेक डिसलेसर दडलेले आहेत. ते मुलांसाठी काहीना काही करत आहेत. अनेकांना मुलांसाठी काम करायचे आहे, पण त्यांना मार्गदर्शन हवे आहे. त्यांना इच्छा असूनही आजुबाजूच्या परिस्थितीमुळे त्यांना हवे असलेले कर्तव्य करता येत नाही. पण तरी त्यातूनही आगळावेगळा उपक्रम राबवणारे शिक्षक देशाच्या व राज्याच्याही खेड्यापाड्यांत आहेत. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘शिक्षक व्यासपीठ’च्या माध्यमातून ज्या शिक्षकांनी वेगळे कार्य केलेले आहे, त्यांचे जे प्रयत्न आहेत, ज्यांनी चाकोरीबाहेरची वाट निवडली आहे, त्या गोष्टींना समाजासमोर आणायचे आहे.
‘युनेस्को’ व ‘वार्की फाऊंडेशन’ ग्लोबल पुरस्कार शिक्षकांना कशाकरता देतात, तर शिक्षक ही व्यक्ती किती महत्त्वाची आहे हे जगाला पटावे म्हणून! डिसलेसर तेच सांगतात. शिक्षकी पेशा पुढील पिढीला, पर्यायाने भविष्यातील समाजाला घडवत असतो. देशासमोर ज्या काही समस्या आहेत, मग ते ग्लोबल वॉर्मिंग असू दे, वाढते प्रदूषण, दहशतवाद, वाढत्या आत्महत्या, ड्रग्जच्या आहारी जाणारी मुले, भ्रष्टाचार, वाढता चंगळवाद, बेरोजगारी... या सर्व समस्यांचे मूळ शिक्षणात आहे. तज्ज्ञ व्यक्तीही तेच सांगत असतात. त्यासाठीच आम्ही ‘शिक्षक व्यासपीठ’चे योगदान म्हणून काही ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेत आहोत.
पुढील निकषांवर आधारित काही वेगळे उपक्रम किंवा कार्य जर कोणती शाळा किंवा शिक्षक वैयक्तिक रीत्या करत असतील तर त्यांनी किंवा इतर व्यक्तींनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून तो उपक्रम ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’पर्यंत पोचवायचा आहे.
· मुले व शिक्षक यांच्यामधील दरी कमी व्हावी यासाठी केलेले प्रयत्न.
· शिक्षणक्रम प्रत्येक भागानुसार (विविध भाषिक मुले, ग्रामीण क्षेत्र, झोपडपट्टी, आर्थिक रेषेखालील मुले) मुलांना कळण्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न.
· शाळेतील एका शिक्षकाने उपक्रम सुरू करून त्यात इतर सहकारी शिक्षक जमवून त्यांच्या मदतीने केलेले प्रयत्न व त्या उपक्रमाचे फलित.
· मुलांच्या मनातील अभ्यासाची भीती कशा प्रकारे दूर झाली, त्यांची विचारसरणी, दृष्टिकोन यांवर शिक्षक म्हणून तुमच्यावर काय परिणाम झाला व त्याला एक चांगला नागरिक घडवण्यामध्ये तुमचे योगदान?
· इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून घेतलेले अधिकचे प्रयत्न व त्यांचा मिळालेला प्रतिसाद (इतर विषयसुद्धा चालतील).
· मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी केलेले प्रकल्प- त्याविषयीची माहिती व मिळालेला प्रतिसाद उदाहरणांसहित पाठवणे.
· ग्रामीण भागातील मुलांची भाषेची अडचण कशा प्रकारे सोडवली?
· मुलांना ‘शिकून काय/कसा फायदा आहे’ हे कसे पटवले? त्यांच्याशी त्याविषयी काय चर्चा केली?
· मुलांचा दृष्टिकोन, विचारसरणी विकसित करण्यासाठी घेतलेली मेहनत, कर्तव्य, जबाबदारीची भावना कशा प्रकारे निर्माण केली? त्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट कसा बनवला?
· खेळाचे महत्त्व शालेय जीवनात काय आहे? खेळांचा उपयोग मुलांचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी कसा करून घेतला याविषयी माहिती पाठवणे.
· सर्वधर्मसमभाव, संस्कृतीचा आदर, देशप्रेम, गरजूंना मदत या भावना तुम्ही मुलांच्या मनात रुजवल्या का? त्याचा काय उपयोग झाला? उपक्रमाची सविस्तर माहिती.
· आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याकरता कशा प्रकारे केला?
· शिस्त व मेहनत यांचे महत्त्व मुलांना कशा प्रकारे पटवले?
· पाठांतराची भीती ज्या विद्यार्थ्यांना वाटते, तुम्ही ज्यांचे मन शाळेत एकाग्र होत नाही, अति मस्तीखोर असलेली मुले, आकलन लवकर न होणारी मुले अशा मुलांसाठी काय प्रयत्न केले? काही भागांमधून जसे, की झोपडपट्टीमधून आलेल्या मुलांना काही चुकीच्या सवयी असतील- जसे, की चोरी करणे, शिव्या देणे वगैरे, तर एक शिक्षक म्हणून तुम्ही त्यांतील काही मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यशस्वी झालात का? तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न केले?
· तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनावर स्त्री-पुरुष समानता कशा प्रकारे बिंबवली? दुसर्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करणे हे कोणत्या उदाहरणाने शिकवले? मुलांमधील नेतृत्वगुण शोधून त्यांना आकार देण्याचा प्रयत्न केला का?
· तुम्ही चित्रकला या विषयाचा मुलांमधील कलेला वाव देण्यासाठी; तसेच, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी कशा प्रकारे उपयोग केला?
· तुम्ही सुशिक्षित आणि सुसंस्कृत या दोन गोष्टींमधील फरक व आवश्यकता विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून त्याविषयी त्यांना मार्गदर्शन केले का?
· गुरुंचे महत्त्व आचरणातून व गोष्टीद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवले का? तशी जाणीव मुलांमधे कशा प्रकारे निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी झालात?
वरील निकषांवर आधारित काही उपक्रम/कार्य जर शिक्षक करत असतील तर त्यांनी ती माहिती उदाहरणे व फोटो यांसहित ‘शिक्षक व्यासपीठ’कडे पाठवणे.
'शिक्षक व्यासपीठ’च्या माध्यमातून अशा उपक्रमांचे अधिकाधिक लेख पुढील काही महिन्यांमध्ये प्रकाशित करण्याचा आमचा निश्चय आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे उपक्रम पाठवून सहकार्य करावे. आणखी एक गोष्ट म्हणजे या आगळ्यावेगळ्या उपक्रमांमुळे इतरही अनेक शिक्षकांमध्ये काही नवीन करण्याची प्रेरणा उत्पन्न होईल. ज्या शिक्षकांनी असे प्रयोग सुरू करायचे ठरवले आहे त्यांनीदेखील त्यांचा निश्चय व उपक्रमाचा आराखडा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडे जरुर कळवावा.
अरूणिमा सिन्हा |
अरुणिमा सिन्हा यांनी दोन्ही पाय अपघातात गेले असताना एव्हरेस्ट चढण्याची इच्छा केली. अपंगत्वावर मात करून एव्हरेस्टचे शिखर सर केले. त्यांना ते करताना अनेक यातनांचा सामना करावा लागला. लोकांनी त्यांना वेड्यात काढले. तरीही ती इच्छा त्यांच्या मनातून जात नव्हती. म्हणून त्या बचेंद्री पाल यांना भेटल्या. त्यांनी एव्हरेस्ट अनेक वेळा सर केले आहे. ज्यांनी यशाची चव चाखलेली असते तेच तुम्हाला यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतात. इतर लोक अरुणिमा यांना वेड्यात काढत असताना, बचेंद्री पाल त्यांना म्हणाल्या, “तू एव्हरेस्ट चढण्याचे जेव्हा मनापासून ठरवलेस त्या दिवशीच ते तू चढलीस! आता तुला फक्त प्रयत्न करायचे आहेत.” आणि त्यानंतर अरुणिमा सिन्हा यांनी इतिहास घडवला; अशक्य ते शक्य केले!
त्याचप्रमाणे शिक्षकांना आमचे आवाहन आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, पर्यायाने समाजासाठी, पर्यायाने देशासाठी प्रगतीचा उपक्रम तयार करा. आम्ही तो उपक्रम सर्व लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेऊ. आपण सर्वांनी मिळून, मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणू या. डिसलेसरांप्रमाणे गावागावातील, देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रयोगशील, विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी झटणार्या शिक्षकांना शोधुया. चला तर मग, 'शुभस्य शीघ्रम!
- शिल्पा खेर 98197 52524 khersj@gmail.com
संयोजक, शिक्षक व्यासपीठ, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
शिल्पा खेर या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या त्यांच्या 'भाग्यश्री फाउंडेशन'तर्फे विविध शैक्षणिक उपक्रम करत असतात. त्यांचे 'यश म्हणजे काय?' हे पुस्तक गाजत आहे. त्यामध्ये मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतीआधारे यशाचे गमक उलगडून दाखवले आहे.
------------------------------
1 टिप्पण्या
डिसले सरांचे अभिनंदन
उत्तर द्याहटवा