प्रत्येक व्यक्तीची तिच्या गावची नदी ही मोठी आठवण असते. भले ती नदी छोटी असो नाही तर मोठी, आटलेली असो अगर वाहणारी; नदी असणारी गावे किती सुंदर आणि किती भाग्यवान! माझ्या गावालाही कान्होळा नावाची नदी लाभली आहे. मात्र तिची अवस्था खूप दयनीय झाली आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या त्या नदीला पूर्वी उन्हाळ्यातही पाण्याचा खळाळ होता. त्यामुळे उन्हाळा गावासाठी, गायीगुराख्यांसाठी, पशुपक्ष्यांसाठी सुसह्य असायचा. गावातील पोरं कडक उन्हात मनसोक्त पोहायची-पाठशिवणीचा खेळ एखाद्या डोहात खेळायची. नदीचे पात्र कोठे कोठे रुंद असे. तशा ठिकाणी नदीच्या काठावरील शेती सुंदर हिरवाईने नटलेली असायची. नदीवरील प्राणी व पक्षीसृष्टी रम्य असे. नदीत काही ठिकाणी डोहात तासंतास म्हशी, बगळे, बदक, पानकोंबड्या बसायचे, पोहायचे. मासे, खेकडे, पाननिवळ्या यांच्याबद्दल तर काही सांगायलाच नको! शेतकऱ्यांच्या वाडवडिलांनी बांधलेल्या ‘बुडकी’ नदीच्या काठालगत असायच्या. बुडकी म्हणजे छोट्या विहिरीच, पण नदीतील पाणी बुडकीत येण्यासाठी विशिष्ट जागा असायच्या. म्हणूनच ‘बुडकीचे पाय डोहात’ अशी म्हण आली असावी. बुडकी दगडी बांधकाम केलेली असायची. बुडकीतील पाणी बैलमोटेने शेंदले जायचे. नदीच्या काठी पडझड झालेल्या बुडकी अजूनही दिसून येतात. कान्होळा नदी खूप काही तिच्या अंगाखांद्यावर घेऊन पुढे धावत राहायची. नदीच्या काठाला हिरवीगार मोठ्याच मोठ्या वडा-पिंपळाची, जांभळाची, कडुनिंबाची, चिंचेची झाडे असायची. नारळाच्या झाडासारखी दिसणारी शिंदीची झाडेही असायची. त्यांतील बोटावर मोजण्याइतकीच शिल्लक राहिली आहेत!
काही लोक नदीतील मासे धरून ते विकायचे. बायापोरी धुणे धुण्यासाठी नदीवर गेल्या तर त्यांच्या पाण्याच्या बादलीतही माशांच्या चिंगळ्या नाचायच्या. नदीच्या पात्रात भुयारी आकारांची छोटी छोटी बिळे असायची. त्या बिळांतून खेकडे ओल्या मातीचा उकीर बाहेर काढायचे. त्यावर त्यांच्या नांग्यांचे ठसे दिसायचे. छोट्या पेटीला बारीक डोळे आणि अडकित्त्यासारखे हातपाय असे ते खेकडे. खेकडे बिळात खूप खोलवर राहायचे. पकडलेले खेकडे नांग्या मोडून, वाळल्या काड्याकुड्यांच्या जाळात-विस्तवात भाजून तेथे वडाच्या सावलीत खायचे. अगदी हुळा केल्यासारखे... मला ते सारे बघण्यास खूप मजा यायची. गुराखी पोरांपैकी कोणीतरी मलाही कधी एखादी भाजलेली नांगी खायला द्यायचे. भाजलेल्या नांगीचे वरचे कठीण कवच फोडून आतील पांढरा लोण्यासारखा मऊ भाग खाण्यास छान वाटायचा. पण त्यांच्या नांगीत कोवळ्या हातांची बोटे सापडली तर...! त्या ‘पेटी’तून कधी कधी खेकड्याची मुंगळ्यांच्या आकाराएवढी शेकडो पिल्ले बाहेर पडायची! पोरं त्याला व्यायलेला खेकडा असे बोलायची. खेकड्यांच्या औषधी गुणधर्माचा ‘मेसेज’ आता मोबाईलवर कधीतरी वाचण्यास मिळतो आणि लहानपणी नदीत चालणारे खेकडे आणि लाकडाच्या सहाय्याने त्यांच्याशी केलेली गंमत हे सारे आठवत राहते.
गावाला पाणीटंचाईचा कधी सामना करावा लागत नसे. म्हणजे पाण्याची गरजही मर्यादित होती. गुराखी पोरंच नदीत एखाद्या लोखंडी किंवा लाकडी मेखीने विहिरा खणायची. हा विहिरा म्हणजे विहिरीची छोटीशी प्रतिकृती. कमरेइतका खोल खड्डा खोदला गेला, की त्याला स्वच्छ पाणी लागे. लोक ते प्यायलासुद्धा वापरायचे. आम्ही मोठ्या मुलांना विहिरा खणण्यास मदत करत असायचो. गाळ, वाळू त्या बांगडीसारख्या गोल खड्ड्यातून बाहेर काढायचो. सारे अंग आणि अंगावरची कापडे चिखलपाण्याने माखली जात. त्यामुळे घरच्यांचा खूप मार खावा लागायचा. आता, नदीतच काय गावात चारशे-साडेचारशे फूट बोअरवेल घेऊनही पाणी लागत नाही. नदीचे पाणी गेले कोठे? या प्रश्नाने डोके चक्रावून जाते.
नदीच्या डोहात बक्कळ शंख, शिंपले, सुंदर सुंदर रंगीबेरंगी गारगोटी सापडायच्या. दोन हात जोडल्यावर जसा आकार होतो तशा दोन शिंपा जोडीने असायच्या. शिंपा मोठ्या प्रयासाने वेगवेगळ्या कराव्या लागायच्या. त्यात कसला तरी विशिष्ट मांसल भाग असायचा. म्हणून शिंपा उघडायला भीती वाटायची. शिंपल्यातील मांसल भाग लहान बाळाच्या आजारावर लोक वापरायचे. शिंपा महिला त्यांच्या चटणीमीठाच्या बरणीत, मडक्यांत ठेवायच्या. शिंपांचा उपयोग चमच्यासारखा व्हायचा. शिंपल्यांनी लहानग्या बाळांना दूध पाजले जायचे. नदीच्या पात्राच्या कडे-काठाने कितीतरी रानफुले असायची. आता फक्त तेथे काटेरी झाडी वाढली आहे.
वालवडचा डोंगर ते निलज (संगोबा) या गावापर्यंत तिचा
प्रवास नागमोडी वळणाने चाळीस किलोमीटरचा आहे. नदी अहमदनगर जिल्ह्यातून वाहत
शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात आमच्या करमाळा तालुक्यात येते व पुन्हा नगर जिल्ह्यात
जाऊन सीना नदीला मिळते.
कान्होळा नदीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि सोलापूर
जिल्ह्यातील करमाळा या दोन तालुक्यांतील क्षेत्र हिरवे होते. कोल्हापूरी पद्धतीचे
दहा-बारा बंधारे कर्जत तालुक्यात त्या नदीवर बांधले
आहेत. नदीच्या दक्षिण बाजूने कर्जत, धांडेवाडी, नेटकेवाडी, आंबीजळगाव, शेगुड,
लिंबेवाडी, रावगाव, धगटवाडी, दक्षिण वडगाव अशी गावे येतात. नदीच्या उत्तरेस रेहेकुरी, कोरेगाव, बजरंगवाडी, लोणी, पूनवर, उत्तर वडगाव अशी गावे येतात. पुढे मांगी गाव आणि तेथेच कान्होळा नदीवरील तलाव बांधण्यात आलेला आहे. नदीमुळे वडगावची
दक्षिण वडगाव आणि उत्तर वडगाव अशी विभागणी झाली आहे.
कान्होळा नदीच्या पात्राची रूंदी साधारणतः अडीचशे फूट आहे. खोली सद्यस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी कमीजास्त प्रमाणात आढळते. तरीही ती पंधरा फूटांपर्यंत आहे. काठालगतच्या शेतशिवारातील माती पाण्यासोबत नदीच्या पात्रात वाहत येत असते. त्यामुळे मांगी-पोथरे परिसरात तीन-चार फूट गाळमातीचा थर व नंतर वाळू आढळून येते. त्यामुळे त्या परिसरात नदीच्या पात्रातील वाळू सुरक्षित आहे. पण सुपीक पात्रात गाळपेर व अन्य कारणास्तव अतिक्रमण वाढले आहे. आमच्या वाडवडिलांच्या काळातील नदी तर खूपच मोठी समृद्ध होती. पलीकडच्या काठावर गेलेल्या लोकांना अलिकडे मोठ्या प्रयत्नाने यावे लागायचे. आता जागोजागी शासनाने छोटेमोठे पूल बांधून लोकांना सोयीचे केले आहे.
नदीच्या उगमस्थानाला नंदिकेश्वर असे संबोधले जाते. त्या ठिकाणी श्री महादेवाचे छोटेसे देऊळ आहे. कान्होळा करमाळा तालुक्यातील आमच्या पोथरे गावातून वाहत पुढे जाते. काही अंतरावर कान्होळा व सीना नद्यांचा संगम झाला आहे. ते ठिकाण संगमेश्वर किंवा संगोबा या नावाने संबोधले जाते. त्या ठिकाणी श्री आदिनाथ महादेवाचे सुंदर मंदिर आहे. नदी आता, पावसाळ्यातही काही थोडेच दिवस वाहते. तिचे पूर्वीचे वैभव हरपले आहे असे वाटते, पण नदीकाठच्या शेतीत धान्योत्पादन खूप वाढले आहे, शेतकरी सुखी झाला आहे आणि म्हणून त्याच्या मागण्याही वाढल्या आहेत.
- हरिभाऊ हिरडे 8888148 083 haribhauhirade@gmail.com
हरिभाऊ हिरडे हे विविध नियतकालिकांत कथा, कविता व वैचारिक लेखन करतात. त्यांनी बी ए, एम सी जे (वृत्तपत्र विद्या) पदवी मिळवली आहे. ते पोथरे (जिल्हा सोलापूर) येथे राहतात.
---------------------------------------------------------------------------------------------------------
बुडकी |
नदीकिनारची झाडे |
शिंपले |
6 टिप्पण्या
हरिभाऊ जी खरच इतकं सार्थ वर्णन केलेले आहे की आमच्या गावाकडील एक नाही तर दोन दोन नद्या आठवल्या गावाच्या दोन्ही बाजूंनी वहात असून गावाला आपल्या कवेत घेऊन गावाच्या पश्चिमेला त्या एकरूप होऊन पुढे चांदणी या नावाने वहाते आपण सांगितलेला विहिरा पण आम्ही त्याला हिरा म्हणायचो मासे पकडून तिथेच त्याची भाजी करायची व भाकरी घरची आणायची यालाच आम्ही मिटिंग म्हणायचो बऱ्याच गोष्टी केल्या त्याची अलगद खपली आपण काढली
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाखूप छान हरी भाऊ नदीच्या काठावर माझे शेत आहे तुमच्या लेखनातील खूप गोष्टी मी अनुभवल्या आहेत. आपण दोघेही कान्होळा नदीच्या काठावर च मोठे झालो आहोत. खूप आठवणी ताज्या केल्या त्या बद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवाछान वर्णन केले आहे.दिवस पालटले त्याबरोबर नदीचे रूपही पालटले आहे.कधी काळी खळखळून वाहणारी,नदीकाठ हिरवागार ठेवनाऱ्या छोटया नद्या आज आज ओसाड झाल्या आहेत.नदी म्हणजे एक नैसर्गिक ठेवा आहे.तो जतन केला पाहिजे.याबाबत सरकारने धोरण ठरवणे गरजेचे हे.नद्यांना गतवैभव मिळवून देऊन आपण पुढील पिढीला हा ठेवा दिला पाहिजे
उत्तर द्याहटवाआदरणीय गटकळ सर, शिंदे सर, नितीनजी झिंजाडे आपल्या सर्वांचे मनापासून आभार..... 🌿👏👏
उत्तर द्याहटवाआदरणीय गटकळ सर, शिंदे सर, नितीनजी झिंजाडे आपल्या सर्वांचे मनापासून आभार...
उत्तर द्याहटवा