गुढीपाडवा - हिंदू नववर्षाचा आरंभ (Gudhi Padwa)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

गुढीपाडवा - हिंदू नववर्षाचा आरंभ (Gudhi Padwa)

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
पाडवा हा सण का साजरा केला जातो याबाबत वेगवेगळ्या उपपत्ती आहेत. ब्रम्हदेवाने हे विश्व निर्माण केले आणि कालगणना सुरू झाली असे ब्रम्हपुराणात म्हटले आहे. ती चैत्र शुद्ध प्रतिपदेची सकाळ मानतात. अशा तऱ्हेने पाडवा हा जगाच्या उत्पत्तीचा दिवस ठरतो. त्या दिवशी श्रीरामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासानंतर, रावणाचा वध करून अयोध्येत परत आले असेही मानले जाते. त्या वेळी अयोध्यावासीयांनी घरांना तोरणे लावून, विजयपताका अर्थात गुढ्या उभारून आनंद साजरा केला. म्हणून भारतीय लोक त्यांच्या निवासस्थानी गुढ्या उभारून त्या दिवसाचे व नववर्षाचे स्वागत करतात. 
आणखी एक कथा अशी आहे, की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या सहा हजार सैनिकांचे पुतळे तयार केले. त्यांमध्ये प्राण फुंकून त्यांच्या साह्याने शकांचा पराभव केला. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. शालिवाहनाने मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजामध्ये चैतन्य, स्वाभिमान आणि अस्मिता जागृत केली - शालिवाहनाच्या चमत्काराचा असा तर्कसुसंगत अर्थ काढता येतो. त्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शकअशी सुरू करण्यात आली. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा! ज्याने विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते शकअशा दोघांचाही अंतर्भावशालिवाहन शकया संज्ञेमध्ये झाला आहे. भारतीय कालगणना अजूनही शालिवाहन शकानुसार होते. त्यानुसार हिंदू पंचांगे तयार केली जातात. भारतातील काही प्रांतांत कार्तिक प्रतिपदेला, तर काही ठिकाणी मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानले जात असले तरी शालिवाहन शकमात्र सर्वदूर रूढ आहे.
          चैत्र महिन्यात सभोवतालच्या सृष्टीत बदल होऊ लागतात. शुष्क झालेली सृष्टी चैत्राच्या नव पालवीने फुलून जाते. वसंत ऋतूची चाहूल लागते. निसर्गातील त्या परिवर्तनाचे, नवचैतन्याचे स्वागत करण्याचा उद्देश दारी गुढी उभारण्यामागे दिसून येतो. त्या दिवशी पहाटे घरातील सर्व माणसे तैलाभ्यंग करून गरम पाण्याने स्नान करतात. नंतर कडुलिंबाची पाने भक्षण करतात. पूर्वी ओवा, जिरे, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खाण्याची प्रथा होती. अंगण शेणाने सारवून रांगोळ्या काढल्या जात. गुढी तयार करण्यासाठी स्वच्छ धुतलेल्या बांबूला रंगीत रेशमी वस्त्र, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांचा हार व साखरेची गाठी बांधतात. यासाठी कळकाच्या काठीचाही उपयोग केला जातो. त्यावर चांदी, तांबे किंवा पितळ यांचा गडू किंवा भांडे पालथे घातले जाते. काठीला गंध, फुले, अक्षता लावतात. अशी तयार झालेली गुढी नियोजित जागेवर उभी करतात. गुढी उभारण्याची जागा स्वच्छ करून रांगोळीने सुशोभित केली जाते.
          गुढीपाडव्याला काही धार्मिक विधी पार पाडले जातात. त्यात ब्रह्मपूजा हा महत्त्वाचा विधी असतो. गुढीला धर्मशास्त्रात ब्रम्हध्वजअसे म्हणतात.ब्रह्मही भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ कल्पना आहे. ब्रह्महा शब्द बृह म्हणजे वाढणे, मोठे होणे या धातूवरून बनला आहे. जे बृहत्तम किंवा महत्तम आहे आणि ज्यात वाढणेया क्रियेचे सर्व अर्थ समाविष्ट आहेत तेब्रह्माआहे. गुढीचे पूजन म्हणजे ब्रह्मध्वजाचे पूजन. परंपरेप्रमाणे गुढीची पूजा करून तिला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. निरांजन आणि उदबत्ती लावली जाते. पूजा करताना ब्रम्हध्वजाय नम:अर्थात - 
ब्रम्हध्वज नमस्तेsतु सर्वाभिष्ट फलप्रद | प्राप्तेस्मिनसंवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ||
          हा मंत्र म्हणतात. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवतात. गुढी उतरवण्यापूर्वी तिला हळदकुंकू, फुले, अक्षता वाहतात. गुढीला नैवेद्य दाखवून ती उतरवण्याची पद्धत आहे.
          गुढीला कडुलिंबाची डहाळी लावली जाते. पुराणातील कथेप्रमाणे - समुद्रमंथनातून वर आलेला अमृतकुंभ मिळवण्यासाठी देव-दानवांत झटापट झाली. त्या झटापटीत अमृतकुंभातील काही थेंब पृथ्वीवर पडले. त्यातून कडुलिंबाचे रोप तयार झाले. कडुलिंबाला ब्रम्हदेवाचे प्रतीक मानतात. कडुलिंबामुळे हवा शुद्ध होते. ते एक उत्तम कीटकनाशकही आहे.
          पाडव्याला पंचांगपूजन व वाचन करतात. त्या तिथीला युगादी तिथी असेही म्हणतात. चैत्र महिन्यात रोज सकाळी अंगणात एक चौकोन सारवून त्यावर विशिष्ट प्रकारची रांगोळी म्हणजेच चैत्रांगणकाढतात. चैत्रांगणाला हळदकुंकू व फुले वाहतात. देवीचे वासंतिक नवरात्र श्रीरामाचे नवरात्रही गुढीपाडव्यापासून सुरू करतात. तो कुलाचाराचा भाग मानला जातो.

गुढीपाडव्याला सकाळी ठिकठिकाणी मिरवणुका काढून नववर्षाचे स्वागत केले जाते.

          गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत काळानुसार बदलत गेली आहे. गुढीपाडव्याला २००० सालानंतर सकाळी ठिकठिकाणी मिरवणुका काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक पोशाखात स्त्री-पुरुष स्वागतयात्रांत सहभागी होतात. त्याशिवाय समाजप्रबोधन करणारे चित्ररथ साकारले जातात. मिरवणुकींमध्ये लेझीम, ढोल, झांज, कीर्तन अशा विविध पथकांचा समावेश केला जातो. सोबत लाठीकाठी, दांडपट्टा आणि भाला फिरवणे अशी प्रात्यक्षिके दाखवली जातात. ज्या मार्गावरून स्वागतयात्रा जाणार असतात, तेथील चौकाचौकांत भव्य रांगोळ्या आणि उंच गुढ्या उभारल्या जातात. अशा मिरवणुका, चित्ररथ आणि शोभायात्रांसाठी गिरगाव-ठाणे-डोंबिवली यांसारखी मुंबईजवळील ठिकाणे प्रसिद्ध आहेत. ते लोण सर्वत्र; विशेषत: जिल्हाशहरांत पसरत आहे.
          महाराष्ट्राबाहेर विखुरलेली मराठी मंडळी त्यांच्या राहत्या ठिकाणी गुढीपाडवा साजरा करतात. दिल्लीत काही लाख मराठीजन आहेत. त्यामुळे तेथे अनेक ठिकाणी गुढीपाडव्याचा उत्सव दिसून येतो. जनकपुरी येथील दत्तविनायक मंदिरात सकाळी गुढी उभारून तिची पूजा केली जाते. मंदिरावरील ध्वज दरवर्षी गुढीपाडव्याला बदलला जातो. गुढीपाडवा पश्चिम दिल्लीतील आनंदवन मराठी सहनिवास, चौगुले विद्यालय, मध्य दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदन अशा अनेक ठिकाणी साजरा होतो. इंदूर संस्थानाला देवी अहिल्याबाईंसारख्या धर्मपरायण व कुशल प्रशासकीय गुण असलेल्या महिलेचे नेतृत्त्व लाभल्यामुळे तेथे मराठी संस्कृती अधिक जोमाने फुलली आणि फळली. त्यामुळे तेथे महाराष्ट्रातील सणवार श्रद्धेने अन् दणक्यात साजरे करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा हा सण होळकर राजघराण्यातही विधीपूर्वक साजरा केला जाई. त्या घराण्याच्या वंशजांमार्फत तो साजरा होत असतो. पूर्वी होळकर राजे किंवा त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रतिनिधींद्वारा व राजपुरोहितामार्फत त्या परंपरेची पूर्तता होत असते. नव्या पिढीने त्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले आहे. जुन्या राजवाड्यासमोरील उद्यानात व इतरत्रही नव्या वस्त्रालंकाराने सजलेले स्त्री-पुरुष सूर्योदयाच्या वेळी सूर्याला सामूहिक अर्घ्यदान करून नव्या वर्षाचे स्वागत करतात. त्या सोहळ्यात मराठी भाषिकांबरोबर स्थानिक हिंदी भाषिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात. तो सोहळा प्रेक्षणीय असतो. सानंद न्याससंस्थेच्या वतीने प्रात:कालीन संगीत सभेच्या माध्यमातून सुमधुर संगीत लहरींनी नव्या वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे.
पाडव्याचा सण नव्या ऋतूला सामोरे जाण्यासाठी शरीर बलवान करण्याची तयारी या दृष्टीनेही मानला जातो. त्या दिवशी प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे आणखी काही औषधी गुण आयुर्वेदशास्रादृष्ट्या कडुलिंबाच्या अंगी आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.
          गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असा संकेत रूढ आहे. येणाऱ्या - जाणाऱ्या  वाटसरूंना त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व्हावा हा त्यामागील हेतू.
सर्जनाला मिळणा-या ऊर्जेशी जोडलेला तो सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक सांगतात. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार, गुढीपाडव्यास लोकसंस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. कृषी संस्कृतीत त्याला विशेष महत्त्व आहे. आधीच्या हंगामातील पीक हाती येऊन आलेली समृद्धी साजरी करणे असाही आशय त्यामागे आहे.  लोकगीतातील -
गुढी पाडव्याला उंचे गुढी उभवावी
कुळाची कीर्ती जावी दाही दिशा ॥
गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी
खण घाली जरतारी गोपूबाळ ॥
गुढी पाडव्याला कडुलिंब खाती
आधी कडू मग प्राप्ती अमृताची ॥  
 
          अशा ओव्या सानेगुरुजींनी नोंदून ठेवल्या आहेत. संत साहित्यातही गुढीचा उल्लेख सापडतो.
माझ्या जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।
          येथे गुढी म्हणजे भगवी पताका असा अर्थ अभिप्रेत आहे. हिंदू धर्माचे व भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याला भगवी पताकाही फडकावण्याचा प्रघात काही ठिकाणी दिसून येतो.
तो दिवस 'उगादी' नावाने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ, तमिळनाडू या दक्षिणी राज्यांमधे साजरा केला जातो. 'युग आदि' म्हणजे 'युगाचा प्रारंभ'. दक्षिण भारतात कैरीचा पचडी नावाचा पदार्थ त्या दिवशी केला जातो. गोड, तिखट, आंबट, तुरट अशा सर्व चवींचे मिश्रण त्यामधे असते. माणसाने वर्षभरात अनुभवाला येणार्याख कडुगोड घटनांसाठी पूर्वतयारी करणे त्यात अभिप्रेत असावे. कर्नाटकामधे ऊसाच्या ताज्या रसापासून तयार केलेल्या गुळामधे कडुनिंबाची कोवळी फुले घालून त्याची चटणी केली जाते.
          मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याचे अधिकारी यांच्याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही तो उत्सव साजरा करत असे. 
          भारतीय संस्कृती निसर्गाच्या हातात हात घालून जाते. मानवाच्या दैनंदिन जीवनशैलीचा ती भाग होते आणि सणांची व उत्सवांची खुमारी वाढवते. संस्कृत साहित्याने त्या सर्व सणउत्सवांना धार्मिक आयाम जोडत त्यांच्याविषयी भारतीय मनात श्रद्धा व आस्था निर्माण केली आहे. एकूणातच, नव्या वर्षाच्या स्वागताचा आल्हाद मनामनात रूजवणारा गुढीपाडवा वसंताच्या चाहुलीत मानवी मनाला दिलासा देतो यात शंका नाही!
- आर्या जोशी, jaaryaa@gmail.com
---------------------------------------------------------------------------------------

आर्या आशुतोष जोशी यांनी 'श्राद्धविधीची दान संकल्पनाया विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात एम ए केले आहे. आर्या यांनी विविध  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधे हिंदू धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मशास्र अशा विषयांवर सतरा शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. त्यांना धर्मशास्त्र या विषयातील अभ्यासासाठी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संशोधनासाठी 2010 मध्ये पूर्णकन्या प्रतिष्ठानचा 'कन्यारत्न पुरस्कार' आणि 2011 मध्ये सुलोचना नातू ट्रस्टचा 'स्री शक्ती पुरस्कार' प्राप्त झाला. त्या मराठी विकिपीडियावर दीड वर्षे संपादक म्हणून कार्यरत आहेत.
संपर्क -
9422059795

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या