काकाचीवाडी येथील पीर |
काकाचीवाडीमध्ये ‘मुस्लिम’ समाज संख्येने बऱ्यापैकी मोठा आहे. त्यांची वस्ती गावाच्या पूर्वेस, पश्चिमेस व उत्तरेस आहे. गावात ‘तकिया’ म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे. काकाच्यावाडीतील सर्व जाती-धर्माचे लोक ते देवस्थान मानतात. दरवर्षी मोहरमवेळी निघणारी 'पीर सवारी' गाजते. सर्वधर्मीय लोक ती अगदी मनापासून मानतात. काकाचीवाडी गावाची लोकसंख्या चार हजार आहे. त्यात अकराशे मुस्लिम आहेत. मराठे पंधराशे, धनगर आठशे, माळी सहाशे अशी बाकी समाजरचना आहे.
संबंधित लेख - बागणी, काकाचीवाडी – एकत्र आणि विभक्त !(Communal harmony is the common feature of two neighbouring villages- Kakachiwadi and Bagani, Maharashtra)
गावात पाणी घेण्यास जात असताना पीर सवारी |
वैशिष्टय म्हणजे मोहरमवेळी ‘खत्तल रात्री’ शाकाहारी गोड नैवेद्य पिरांना दिला जातो. तेथेही कोणता भेद नसतो. मोहरमनंतर काही दिवसांतच ‘रोट’ बनवण्याची पद्धत मुस्लिम समाजात दिसते. रोट हे गव्हापासून तयार करून भट्टीत भाजले जातात. त्यांचे प्रसाद म्हणून फार महत्त्व आहे. ते रोट गावात व मळ्यातील प्रत्येक घरी दिले जातात. तशीच प्रथा ‘ईद-ए-मुबारक’ या सणा वेळीही दिसते. लोक त्यांच्या जवळच्या इतर समाजातील लोकांना घरी खीर खाण्यासाठी बोलावतात अथवा त्यांना घरी खीर पोचवून देतात.
‘दिवाळी’ हा हिंदूंचा महत्त्वाचा सण. अगदी गरिंबापासून श्रीमंतांसाठीही ते आनंदाचे दिवस. करंजी, चकली, चिवडा, लाडू वगैरे पदार्थ कोणाला नाही आवडत? काकाचीवाडी व माळी समाजातील लोक दिवाळीतील पदार्थ मुस्लिम समाजात आनंदाने घरी जाऊन देत असतात. त्यांना घरी फराळासाठीही बोलावणे होते. हिंदूंमध्ये रोट केले जात नाहीत तर मुस्लिमांकडे दिवाळीचे पदार्थ बनत नाहीत. म्हणून ते पदार्थ घरोघरी पोचवण्याची पद्धत पडली असावी.
दोन्ही सणांच्या माध्यमातून हिंदू व मुस्लिम पूर्वीपासून समन्वयाने, आनंदाने काकाचीवाडीमध्ये राहतात. रोट व दिवाळीच्या पदार्थांची देवाणघेवाण त्यांच्या आपापसातील प्रेमाचे उदाहरण होय. सण हे केवळ निमित्तमात्र आहे पण माणुसकी हा त्यांना बांधणारा दुवा आहे. समाजात धार्मिक अढी दिसत नाही; पक्ष कोणताही सत्तेवर असला तरी सामाजिक एकात्म भाव व्यक्त करणाऱ्या या कोणत्याही प्रथा बंद होत नाही. लोकांच्या मनात सहिष्णुता भरली गेली ती या सणांनी, देवाणघेवाणीने!
- नगिना माळी 89752 95297 naginamali2012@gmail.com
---------------------------------------------------------------------------------------------------------
तकिया |
मोहरमप्रसंगी हिंदू -मुस्लिम ऐक्य |
2 टिप्पण्या
अतिशय छान लेख. माळी समाज गावाबाहेर का राहतो ते समजले नाही.
उत्तर द्याहटवासामाजिक सद्भावना जपण्याची अशी परंपरा अनेक गावात आहे. मात्र हिंदु मुस्लिमांसह इतर समाजघटकातील एकात्मभाव वाखाणण्यासारखा आहे. डॉ. नगिना यांनी लेखन सुंदर समरसून केले आहे. त्या ऐतिहासिक संदर्भांची आणखी भर घातली असती तर लेख आणखी वाचनीय, रोचक बनला असता. असो. लेखनाच्या चांगल्या प्रयत्नासाठी खूप अभिनंदन व शुभेच्छा ...
उत्तर द्याहटवा