माझे गाव चौगाव. चौगाव-गोताणे म्हटले, की लक्षात येते ते धुळे जिल्ह्याच्या, धुळे तालुक्यातील चौगाव. नाही तर सटाणा गावाजवळ एक चौगाव-रातीर आहे, चोपडा तालुक्यात एक चौगाव-लासूर आहे. माझे गाव मालेगावपासून साधारण चाळीस किलोमीटर उत्तरेला आणि नासिक जिल्ह्याच्या सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे. ते ईराज नदीच्या काठावर डोंगरउतारावर वसले आहे. तिचा उगम नासिक जिल्ह्यातील गाळणे किल्ल्याजवळील ढोक्या डोंगरावर आहे. नदी तीस-चाळीस किलोमीटर वाहत जाऊन; पुढे, कुसुंबाजवळ पांझरा नदीला मिळते. आम्ही तिला नदीच म्हणतो. मात्र तिचा उल्लेख कागदोपत्री 'ईराज नाला'असा आहे. तरी नदीचे पात्र आमच्या गावाजवळ चांगले रूंद आहे. नदीत काही ठिकाणी डोह (डुखाड्या) होते. नदीत भरपूर वाळू असायची. मी तिसरीला असताना, आम्हाला धुळे जिल्ह्याचा भूगोल होता. त्यात नद्यांचे एक गाणे होते.
ईराज धरण परिसर |
'बोरी, पांझरा, बुराई, अमरा
अमर अमरावती,
पुढे त्या तापीला मिळती.
बऱ्याच जातींची माणसे गावात गुण्यागोविंदाने राहत असत. माणसांचा उल्लेख त्यांच्या जातींवरून करत. त्यामध्ये कोणालाही कमीपणा वाटत नसे किंवा अपमानास्पद वाटत नसे. त्याचे कारण गावात जाती होत्या, पण जातीयता नव्हती, उच्चनिच्च अशी भावना नव्हती. कोणालाही परंपरेने चालत आलेली कामे करण्यात कमीपणा वाटत नव्हता. प्रत्येकाचे जीवन, बलुतेदारी पद्धत असल्याने एकमेकांवर अवलंबून होते. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना धरून चालत असत. कोणी कोणत्याही समाजाचा असो तो माझा काका, मामा, बाबा, भाऊ असायचा. कोणतीही बाई माझी काकू, मावशी, मामी, आत्या किंवा बहीण असायची. गावातील लोक ती नाती पिढ्यान् पिढ्या जपत आली होती.
बस स्थानक परिसर |
गावाच्या सुरुवातीलाच चांभारवाडा. त्यानंतर कोळीवाडा, सुतार गल्ली, न्हावी गल्ली. पश्चिमेकडे तोंड केलेले मारुती मंदिर व मंदिराच्या मागे राजवाडा (महार लोकांची वस्ती). प्रत्येक गावात मारूतीचे मंदिर असतेच; मारूती गावाचे संरक्षण करतो असे मानतात. पुढे गवळीवाडा, डोंगराच्या उतारावर खडकांवर भिलाटी. आमची पहिली ते सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा सुतार गल्लीला लागून गावात मध्यभागी होती. प्राथमिक शाळेच्या पुढे, गढी. गढीवर हाटकर पाटलांची घरे. गावच्या दोन बाजूंना एल आकारात माळी गल्ली आणि शिंपी-सोनारांची काही घरे. माळी, हाटकर (धनगर) समाजाची घरे सर्वात जास्त. देवीदास ब्राह्मण लोणखेडी येथून सात-आठ किलोमीटर अंतरावरून पायी पायी यायचा. तिथीवार, सण सांगायचा व धान्य गोळा करायचा. सत्यनारायणाची पोथी वाचायचा व लग्नात मंगलाष्टके म्हणायचा. एक गोसावीबाबा गोताणेहून यायचा. हातातील चिमटा वाजवून 'आलख् निरंजन' असे म्हणायचा. त्याच्या झोळीत पीठ टाकावे लागे. दुपार होत आली, की कमरेवर डालक्या (टोपली) धरून दोन मांगीणी यायच्या. 'भाकर वाढ वं माय' म्हणायच्या. त्यांना शिळ्या भाकरी चतकोर चतकोर वाढल्या, की त्या जायच्या. सणासुदीला मात्र त्या पूर्ण खापराचा (मातीचे भांडे) मांडा घ्यायचे. गावात कोठे काही कमीजास्त घडले असेल तर मांग बायांमार्फत ते कळायचे.
मुंजोबा मंदिर |
सावता महाराज मंदिर भव्य स्वरूपात लोकवर्गणीतून बाधून तयार झाले आहे. दोनमजली भव्य सभागृहात लग्ने लागतात. मोठे अहिल्यादेवीचे मंदिर पिंपळाईच्या मंदिराशेजारी झाले आहे. नवरदेव त्यानंतर महादेव पारावर न जाता तेथील पारावर उतरतो. मरीआईच्या मंदिराशेजारी संत नामदेव यांचे विशाल मंदिर झाले आहे. इतर समाजाची माणसेही त्यांच्या त्यांच्या समाजातील देवदेवतांची मंदिरे बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. महापुरुषांना, देवदेवतांना, साधू-संतांना वाटून घेऊन त्यांना संकुचित करण्याचे महान कार्य करणारे भक्त वाढताना दिसत आहेत. मरीआई मंदिर, भवानी मंदिर, पिंपळाई मंदिर ही होती तशीच आहेत. कारण ते देव कोण्या एका जातीचे नाहीत. मारूती मंदिराचा मात्र जीर्णोद्धार झाला आहे. भक्तगणांनी उभारलेली लहानमोठी बाकी मंदिरे बरीच झाली आहेत.
'भालदेव' बसवण्याची पद्धत गावात होती. दाराबाहेर शेणाचा गोळा ठेवायचा. तेथे लव्हाळ्याच्या काड्या उभ्या करायच्या. दह्याचा नैवेद्य दाखवायचा. भालदेव प्रत्येक घरी मागे-पुढे वेळेत बसवायचे. त्या सप्ताहात दुधदुभते विकायचे नाही किंवा बाहेर कोणाला द्यायचे नाही. ज्यांच्याकडे दूध-दही कमी असेल किंवा अजिबात नसेल अशांना घरी बोलावून त्यांना भरपूर दूध-दही खाऊ घालण्याची पद्धत होती. दिवाळी-आखाजीला हेल्यांची टक्कर व्हायची.
आमच्या गावात नाटके बसवण्याची परंपरा होती. शंकरशेठ सोनार नाटकाचे दिग्दर्शन करत. ऐतिहासिक, पौराणिक नाटकांसाठी लागणारे पडदे, मुखवटे व इतर सर्व साहित्य मंडळाकडे असायचे. मोठी माणसे नाटकांत काम करायची. दरवर्षी दोन नाटके बसवली जायची. एक ऐतिहासिक व एक पौराणिक. नाटकाच्या तालमी महिना महिना चालायच्या. नाटकातील पदे शास्त्रीय पद्धतीने गायली जायची. नवलबापूंकडे पाय पेटी होती. ते पेटीवादन व तबलावादन यांमध्ये तरबेज होते. मी सातवीत असताना मलाही 'स्वर्गावर स्वारी' या नाटकात भक्त प्रल्हादाची भूमिका करण्यास मिळाली होती.
इंग्रजांच्या काळापासून आमच्या शेत-शिवारात पाट खोदून तयार होते. पण पाटांना पाणी येत नव्हते. आमच्या वाट्याचे पाणी लोणखडी आणि वरील भागातील गावचे लोक परस्पर त्यांच्या शेतात वळवून घेत. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांकडे विहिरी, मळे होते. बाकी सर्व शेती जिराईत होती. बाजरी, ज्वारी, भुईमूग, तीळ, मठ, मूग, उडीद, चवळी, कपाशी ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात. नवलबापू व गंगारामबापू या मातब्बर आसामी गावात होत्या. त्यांच्याकडे बैलजोडी आणि सालदारांची संख्या जास्त होती. गावात मला आठवते तेव्हापासून नवलबापू मोरे सरपंच होते. त्याशिवाय भिका महाजन, जंगला महाजन, एका पाटील, गेंदा नंदा पाटील, वेडू पहिलवान, रामदास मास्तर, काळू फौजदार, गटलू रतन, भटू शेठ, नामदेव शिंपी ही मोठी सधन माणसे होती.
अक्कलपाडा धरण |
आमचे गाव खूप बदलले आहे. मराठी शाळेतील हातमाग भंगारात कधी गेले ते समजलेच नाही. शाळा इमारत गावाच्या बाहेर आहे. मुले रात्री अभ्यास करण्यास शाळेत जात नाहीत. कारण गुरूजीच रात्री शाळेत येत नाहीत. गावात हायस्कूल झाले आहे. लांब कुसुंब्याला जाण्याची गरज राहिलेली नाही.
गावाचा विस्तार झाला आहे. गावाभोवती पूर्वी उकिरडे होते, खळे होते, झाडे होती. ते सर्व नाहीसे झाले आणि तेथे घरे उभी राहिली. गरीब लोकांना सरकारने घरे बांधून दिली. घरे मिळाली तरी त्यांना बेघरवाले म्हणतात. धाब्याची घरे जाऊन सिमेंट काँक्रिटची घरे तयार होत आहेत. माडीवर माडी तयार होत आहे. देवीदास ब्राह्मणाची दोन्ही मुले चौगावमध्ये स्थिरावली आहेत. दोघांची माडीची (मजला) घरे भिक्षुकी व किराणा व्यवसाय करता करता झाली आहेत. दुकाने बरीच झाली. बाजारासाठी कुसुंब्याला जाण्याची गरज राहिली नाही. चौगावला गुजरी (गुजरातचा बाजार/गुजरी बाजार - तेथे बोहारणींनी भांड्यावर जमवलेले कपडे, त्यांवर प्रक्रिया करून विकले जातात. जुन्या/दुय्यम कपड्यांचा बाजार) भरते. छोटा बाजारही भरतो.
मला शिक्षणासाठी सातवीनंतर गाव सोडावे लागले. मी नामपूर मोराणे, धुळे, मालेगावला शिक्षण केले. प्रत्येकाच्या मनातील त्याच्या लहानपणचा गाव कोठेतरी हरवला आहे! मी गावी कधीतरी जातो. माझी भिरभिरती नजर जुन्या खुणा शोधण्याचा प्रयत्न करते. जुनी जाणती माणसे फारशी भेटत नाहीत. आम्हीच जुने झालो आहोत. नवीन पिढी आम्हाला ओळखत नाही. आम्ही त्यांना ओळखत नाही. आमच्याच गावात आम्हाला परक्यासारखे वाटते.
काही असले तरी मला माझे गाव प्राणाहूनही प्रिय आहे. झाडाच्या मुळांना मातीची ओढ असते तशी मला माझ्या गावाची कायम ओढ असते. माझ्या जीवनाची मुळे माझ्या गावात रूतलेली आहेत.
- गोविंद बी. मोरे 95884 31912 gm24507@gmail.com
गोविंद मोरे मूळचे धुळ्याच्या चौगावचे. ते त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नाशिकच्या 'मराठा विद्या प्रसारक' या समाजसंस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त 2012 एप्रिलमध्ये झाले. त्यांनी कोरोनाकाळात जुन्या आठवणी लिहिल्या आणि सोशल मीडियावर शेअर केल्या. ते सध्या सिन्नर येथेच राहतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सणासुदीला पोळ्यांसाठी वापरले जाणारे खापराचे मांडे | |
हेल्यांची( रेड्यांची) टक्कर |
महादेव मंदिर |
नामदेव महाराज मंदिर |
भटाई देवी मंदिर |
7 टिप्पण्या
सर तुमचा या अगोदरही लेख वाचला छान आठवणी ताज्या केलेल्या या लेखातही जसे की गावात बऱ्याच जाती होत्या परंतु जातीवाद नव्हता,त्यानंर गोसावी बाबाचा चिमटा वाजवून "आलख निरजंन"मागीणबाईचे "भाकर वाढ व माय"या नंतर वीर म्हणजे पुर्वज.तसेच गावातील मोरे संरपंच, ऐका पाटील,वेडु पहीलवान,रामदास मास्तर, काळु फौजदार, भटू शेट,नामदेव शीपंपी ही सदन माणसे व आता गावात गेल्या नंतर भिरभिरतीन नजर जुन्या खुना शोधायचा प्रयत्नत असतात परंतु जुने माणसे,झाडे,पार कोणी भेटत नाही व नवीन कोणी ओळखत नाही.म्हणून आपलाच गाव आपल्याला परक्या सारखा वाटतो हि वस्तू स्थिती आहे.
उत्तर द्याहटवालहानपणातील छान आठवणी तुमच्या लेखनलेखनातुन तुम्ही जसेच्या तश्या माडल्या आहे.असेच लिखाण तुम्ही चालू ठेवा व आमच्या पर्यंत पोहचवा वाचून आम्हाला आनंद होत आहे.👌 धन्यवाद👍💐
धन्यवाद सर.तुमची प्रतीक्रिया काळजाला भिडली.
हटवाबापू आणि मी बालपण व अध्ययन सवंगडी आमच्या जन्मभूमी च्या आठवणी ताज्या झाल्या. मोरे बापूंनी अचल अमुर्तला सहज सरलते ने वास्तव रूप दिले . त्यांचा अभ्यास व अनुभव दांडगा आहे.आज गावचे रुपड बदललं आहे पूर्वजांचे वंशज गावात नांदत आहेत हे सत्य आहे परंतु हरवलं आहे माणुसकी जपणार नाते.सत्यपदाद्याड वेगाने जात आहे . जुना वारसा झपाट्याने नाहीसा होत आहे काळाने प्रगती दिली पण लोकवसा हिरावून नेला.बापूंच्या लेखांमधली माणसे योग्य न्यायदान करीत असत म्हणून त्यांचा उल्लेख आला आहे बापूंची आई रुपा माय म्हणजे चौगाव ची बहिणाबाई त्यांनी लोकसाहित्य जपले व ज्योतीने शब्द बद्ध केले मोरेसरांचे अभिनंदन व धन्यवाद
उत्तर द्याहटवाबापू माळी नीलकंठ नगर कुसुंबा धुळे
उत्तर द्याहटवाधन्यवाद बापू
हटवाफारच छान आठवणी आहेत आपल्या.लिहिलय पण उत्तम.तुमचे गाव डोळ्यासमोर उभे राहिले.
उत्तर द्याहटवातुम्ही अजून खूप लिहा.
कविता जपे . पुणे २८/११/२०
धन्यवाद सर
हटवा