खिलाफत चळवळ आणि निजाम (Khilafat Movement & Nizam)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

खिलाफत चळवळ आणि निजाम (Khilafat Movement & Nizam)


तुर्कस्थानच्या ऑटोमन साम्राज्यात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घटनात्मक लोकशाहीसाठी राजकीय सुधारणांच्या मागणीकरता तरुण तुर्कांची (यंग टर्क्स) चळवळ सुरू झाली. भारतात अबुल कलाम आझाद यांच्यासारख्या सुधारक मुसलमानांनी तिला पाठिंबा दर्शवला. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान जर्मनीच्या बाजूने लढला, पण भारत तुर्कस्तान म्हणजे खलिफाविरुद्ध इंग्रज-दोस्त राष्ट्रांच्या बाजूस होता. भारतातील मुसलमानांची त्यामुळे कुचंबणा झाली होती. भारतीय सैन्यात मुस्लिम हजारोंच्या संख्येने होतेच. युद्धकाळी भारतातील निजामासकट सर्व मुस्लिम संस्थानिकांनी आणि मुस्लिम लीगने ब्रिटिश साम्राज्याशी पूर्ण एकनिष्ठ राहण्याचे उघडपणे जाहीर केले. आगाखान यांनी तर “आता तुर्कस्तानला मुसलमानांचा विश्वस्त (ट्रस्टी) म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही” अशा शब्दांत तुर्की सुलतानावर टीका केली होती. महायुद्धातील पराभवानंतर तुर्की साम्राज्याचा बिगर तुर्की भाषिक प्रदेश स्वतंत्र झाला. मुस्तफा कमाल त्याचा अध्यक्ष झाला. त्याने आधी सलतनत खालसा करून टाकली. परंतु तुर्की सुलतान हा जगातील समस्त सुन्नी मुसलमानांचा खलिफा म्हणजे मुख्य धर्मगुरूही होता. सुलतान आता सुलतान न राहता फक्त खलिफा राहिला. महंमद पैगंबर यांच्यानंतर चालत आलेली ती संस्था होती. कमालने ती प्राचीन संस्थाच बंद केली खलिफाला ‘उद्या सकाळच्या सूर्योदयाआधी देश सोडून जा’ असा आदेश दिला. त्याला कायम  देशाबाहेर परागंदा व्हावे लागले. देवभोळी प्रजा आणि जुन्या वळणाचे नेते यांना सांभाळून ही गोष्ट करणे सोपे नव्हते. पण कमालने दोन्ही निर्णय खंबीरपणे राबवले. सुलतानाला इस्तंबुलचा प्रसिद्ध डोल्माबाचे राजवाडा रातोरात सोडून फ्रान्समधे आश्रय घ्यावा लागला. कमालने मग सामाजिकधार्मिक आणि राजकीय सुधारणा झपाट्याने सुरू केल्या. तुर्की भाषेची अरबी लिपी बदलून रोमन लिपीचा वापर चालू केला. बॉलरूम डान्सिंग लोकप्रिय केले. त्याबरोबर स्त्रियांचा पडदा आपोआप गेला हे सांगणे नकोच. स्विट्झर्लंडसारखा सामान नागरी कायदा आणला. मदरसे बेकायदेशीर ठरवले. तुर्कस्तानला निधर्मी प्रजासत्ताक लोकशाही बनवून युरोपच्या बरोबर आणून बसवले. तुर्की संसदेने त्यासाठी कमालला अतातुर्क म्हणजे तुर्कांचा पिता अशी संज्ञा दिली. इकडे मराठीत माधव जुलीयन यांनी कमाल पाशावर केलेल्या कवितेतील ओळी यथायोग्यच वाटतात : प्रसिद्ध तू रणांगणी ... तसाच राजकारणी | सुधारकात अग्रणी ... कमाल तूच मोहरा ||                       

मुस्तफा कमालने केलेल्या तुर्कस्तानातील सुधारणा भारतातही आणाव्या अशा विचारांचा भारतातील मुसलमानांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. उलट, खिलाफतच नष्ट होणे ही गोष्ट भारतातील मुसलमानांना सहन झाली नाही. खलीफाला भारतात आणून खिलाफत भारतातून चालू ठेवण्यासाठी त्यांनी जोरात चळवळ चालू केली. लखनौत खिलाफत समिती स्थापन केली. मौलाना अबुल कलाम आझाद हे तिचे एक नेते होते. असहकार चळवळीत मुसलमानांचा सहभाग मिळावा म्हणून काँग्रेस आणि महात्मा गांधी यांनीही तिला पाठिंबा दिला.

सावरकर त्या वेळेस रत्नागिरीस स्थानबद्ध होते. खिलाफत भारतात आणण्यास त्यांचा पूर्ण विरोध होता. ही खिलाफत म्हणजे आहे तरी काय’ ह्या लेखात त्यांनी त्याबद्दलचे विचार मांडले आहेत. भारतीयांनी शंकराचार्यांना हाकलून देऊन त्यांचे पीठच रद्द केले तर कोठला तरी मुस्लिम देश त्यांना त्यांच्या देशात बोलावून तेथे त्या पीठाची स्थापना करील का असा प्रतिप्रश्न सावरकर यांचा होता. तिकडे तुर्की संसदेने प्रचंड बहुमताने भारतीय मुसलमानांना किंवा खिलाफत चळवळीला कोठलेही महत्त्व न देता तुर्कस्तानातून खिलाफतीचे उच्चाटन केले, ते कायमचे.

त्या काळात हैदराबादचा निजाम म्हणजे सातवा निजाम जगातील सर्वात धनाढ्य माणूस होता. शिवाय त्याच्याकडे अमर्याद नसली तरी इंग्रज परवानगी देतील तेवढी सत्ताही खूपच होती. मीर उस्मान अलीखान सिद्दीकी असफ जाह (सातवा) हे त्याचे नाव. His Exalted Highness हा त्याच्या बिरुदावलीचा एक भाग. भारतातील संस्थानांमध्ये ते सर्वात मोठे आणि क्षेत्रफळाने फ्रान्सएवढे होते. भारतातील मुसलमानांना ते मुसलमानांच्या भारतातील वर्चस्वाचे प्रतीक आणि म्हणून गौरवास्पद वाटे. तरीदेखील इंग्रजांकडून अनेकांना मिळणारी ‘सर’ पदवी घेण्यात निजामाला कमीपणा वाटला नाही याचे आश्चर्य वाटते. निजामाचा पूर्वज औरंगजेबाच्या वेळेस मध्य आशियातून आलेला तुर्क होता. हैदराबादची कुतुबशाही राजवट नष्ट करून औरंजेबाने त्याला ‘निज़ाम उल मुल्क’ म्हणून नेमला. निजामाला त्याच्या तुर्की वंशाचा फार अभिमान होता. मोगल बादशहाही तुर्की वंशाचे होते. ते दरबारात फारसी वापरत पण घरात तुर्कीच बोलत. वर उल्लेखलेल्या परिस्थितीत शेवटच्या खलिफाच्या दरू शेहवार या देखण्या एकुलत्या एक राजकन्येचा निकाह निजामाच्या मोठा राजपुत्र आझम जाह याच्याशी ठरला. दरू शेहवारच्या वडिलांनी पन्नास हजार पौंड मेहेर म्हणून निजामाकडून मागितले जे निजामाला फार जास्त वाटले. शौकत अलींच्या मध्यस्थीने त्याच रकमेत निलोफर ही दरू शेहवारची चुलत बहीण निजामाचा धाकटा मुलगा मोअझ्झम जाह याला देण्याचे ठरले. निकाह 12 नोव्हेंबर 1931 रोजी फ्रान्समधील नीस शहरी खलिफाचे मेव्हणे दामाद शरीफ पाशा (सावत्र बहिणीचे पती) यांनी लावला. शौकतअली आणि महमदअली हे दोघे बंधू खिलाफत चळवळीचे खंदे पुरस्कर्ते. त्या विवाह संबंधांमुळे हैदराबाद संस्थान भारतातील अनेक लहानमोठ्या संस्थानांप्रमाणे न राहता त्यास आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे किंवा होईलनिजाम इंग्रजांचा मांडलिक नाहीत्यामुळे खिलाफत भारतात आणणे सोपे जाईलकदाचित निजामच खलीफा होऊ शकेल अशी भव्यदिव्य स्वप्ने अलीबंधूंसह अनेकांनी जोपासली होती. कैरो आणि मक्का येथे खिलाफत सुरू करण्यासाठी सभा झाल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. नेहरूंच्या मते खिलाफत चळवळीला भक्कम सामाजिक किंवा आर्थिक पायाच नव्हता. 1930च्या आधीच खिलाफत चळवळही थंड पडली. लॉर्ड किनरॉस यांनी लिहिलेल्या ‘अतातुर्क’ ह्या सहाशे पानी चरित्रात भारतात गोळा केलेल्या ‘खिलाफत फंडातून सव्वा लाख पौंड तुर्कस्तानला पाठवले. त्याचा उपयोग तुर्की सैन्याचा पगारअंकाराला नवी संसद इमारत बांधणे आणि तुर्की नॅशनॅलिस्ट बँकची स्थापना यासाठी झाला.’ एवढाच उल्लेख आहे. खिलाफत चळवळीबद्दल कोठलाच उल्लेख नाही. इतपतच महत्त्व खिलाफत चळवळीला तुर्कस्तानात किंवा मुस्लिम जगतात मिळाले. आगाखान आणि अमीर अली यांनी तुर्की पंतप्रधानाला खिलाफत बंद करू नये म्हणून पत्र पाठवले होते, त्याचा काही उपयोग झाला नाही.

अजिबात उत्पन्न नसलेल्या शेवटच्या खलिफाची स्थिती युरोपात शोचनीय झाली, म्हणून निजामाने हैदराबादच्या तिजोरीतून त्याला सालीना चार हजार पौंड पेन्शन लावून दिले होते. खिलाफत चळवळीमुळे हिंदू-मुसलमान ऐक्य झाले असे काही लोक समजतात, तर बरेच जण मुस्लिमांसाठी वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीची ती सुरुवात होय असे मानतात. शौकत आणि महंमद अली बंधूंना पाकिस्तानचे एक जनक समजतात. पण खिलाफत चळवळीत जीनांचा भाग फारसा दिसत नाही. मलबारातील 1921-22 मधील मोपल्यांच्या बंडाला खिलाफत चळवळीमुळे खतपाणी मिळाले. केरळात खलिफाचे राज्य आलेच आहे असे भासवून हिंदूंविरूद्ध सहा महिने दंगल झाली. कालिकत जिल्ह्याचे त्या वेळचे डेप्युटी कलेक्टर दिवाण बहादूर सी. गोपालन यांनी लिहिलेल्या ‘मोपला रिबेलियन 1921’ (The Moplah Rebellion, 1921) पुस्तकात त्यावेळी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे हृदयद्रावक वर्णन केले आहे. बंडाबाबत आंबेडकरअॅनी बेझंट यांच्यासह अनेकांनी गांधी यांच्याशी असहमती व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतर केरळातील मुस्लिमांनी आणि कम्युनिस्टांनी मोपल्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून संबोधले, त्यावरही बरेच वादळ झाले.

स्वामी रामानंद तीर्थ

निजामाच्या राज्याचे अस्तित्वच बोगस आहे असे नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडियात लिहिले आहे. टिपूचा (आणि इतरांचा) पराभव करून ते राज्य वाटून घ्यायचे पण इंग्रजांचे मांडलिकत्व मान्य करायचे असा इंग्रजांचा प्रस्ताव निजामाने स्वीकारला. त्या आधी पेशव्यांनाही तोच प्रस्ताव दिला होता; तो पेशव्यांनी त्या अटींवर स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. सत्तेचाळीस साली सर्व संस्थाने खालसा झाली, पण धर्मवेड्या रझाकारांना हाताशी धरत काळाची पावले न ओळखलेल्या निजामाने भारतात विलीन होण्यास ठाम नकार दिला. तेरा महिने चाललेला तो एक फार मोठा तिढा कायमचा होऊन बसत होता. रझाकारांचे अत्याचार आणि हैदराबादचा मुक्ती संग्राम हा एक मोठा आणि वेगळा विषय आहे. हैदराबादसंस्थान 1948 साली झालेल्या पोलिस अॅक्शननंतर खालसा झाले. देशाच्या पायातील एक काटा कायमचा दूर झाला (17 सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस’ म्हणून मानला जातो). निजामाचे जीवित आणि त्याचे अमाप वित्त सुरक्षित राहिले. निजामाने स्वतंत्र भारतातील हैदराबाद राज्याचा राजप्रमुख ही नेहरू यांनी केलेली नेमणूक स्वीकारली. राजप्रमुख या नात्याने निजामाला भारतीय तिरंगी राष्ट्रध्वजाला अभिवादन करणे भाग पडले. बहुसंख्य मुस्लिम प्रजा असलेल्या काश्मीरच्या महाराजा हरीसिंगांनी भारतामध्ये विलीन होऊनही त्यांना मात्र काश्मीरातून तडीपार केले गेले ही बाब त्या वेळेस अनेकांना खटकली. हैदराबाद राज्याचे त्रिभाजन 1956 साली झाले. त्याची आग्रही मागणी स्वामी रामानंद तीर्थ 1948 सालापासूनच करत होते. मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्राला जोडला गेलातेलगू भाषिक जिल्हे आंध्रात गेले आणि कन्नड प्रदेश कर्नाटकात गेला. पुन्हा निजामाला आंध्रचे राज्यपालपद (गव्हर्नर) देऊ केले होते, पण प्रकृतीचे कारण देऊन त्याने ते घेतले नाही आणि तो निवृत्त झाला.

दरू शेहवार पाच फूट दहा इंच उंच तर नवरा फक्त पाच फूट तीन इंच उंच होता. ती जेथे जाई तेथे तिचे राजकन्येला साजेल असे व्यक्तिमत्त्व जाणवत असे. युरोपात वाढलेल्या दरू शेहवारला हैदराबादचे पडदानशीनवातावरण पूर्ण विसंगत होते. हैदराबादमधील जुन्या पिढीतील लोक सोडले तर ती आता फारशी कोणाला माहीतही नाही. निजामाच्या मृत्यूनंतर त्याच्या चंगीफंगी मुलांना वारसा न मिळता त्याच्या इच्छेप्रमाणे नातवाला म्हणजे दरू शेहवारपासून झालेला मोठा मुलगा मुकर्रम जाह याला मिळून तो आठवा निजाम 1967 मध्ये झाला. सरकारकडून मिळणारी प्रीव्ही पर्सही त्यालाच सुरू झाली. इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे 1969 साली बंद करून टाकले. मुकर्रम जाहचे शिक्षण डून स्कूलहॅरोसॅण्डहर्स्ट मिलिटरी अॅकॅडमी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे झालेले. नेहरू यांची इच्छा अशा उच्च विद्याविभूषित मुस्लिम राजपुत्राने मुस्लिम देशांना भारताचा राजदूत व्हावे अशी होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याचा भारताला उपयोग होण्यासारखा होता. पण तसे झाले नाही. तो इस्तंबुलला राहतो आणि अधून मधून हैदराबादला भेट देत असतो.

टीपा : 

1. खलिफा अब्दुल मजीद (दुसरा) त्याच्या चारपैकी दोन पत्नीएक मुलगाएक मुलगीफॅमिली डॉक्टर आणि दोन तीन मदतनीस घेऊन पहाटे पाच वाजता राजवाड्यातून बाहेर पडला. आगगाडी मध्यरात्री निघेपर्यंत त्यांना एका लहान स्टेशनवर बसून राहवे लागले. - ‘अतातुर्क -बायोग्राफी ऑफ फाउंडर ऑफ मॉडर्न टर्की’ ले. अँड्रू मँगो. 

2.  स्विस हद्दीपाशी त्यांना थांबवण्यात आले कारण स्विस कायद्याप्रमाणे बहुपत्नीकत्व दखलपात्र गुन्हा होता. शेवटी त्यावेळची सोय म्हणून तात्पुरता व्हिसा देण्यात आला. नंतर खलिफा कुटुंबासहित फ्रान्समधील नीस शहरी राहिला. - ‘अतातुर्क मुस्तफा केमाल’ - ले. लॉर्ड किनरॉस

- मिलिंद रा. परांजपे captparanjpe@gmail.com

मिलिंद परांजपे हे निवृत्त मास्टर मरीनर आहेत. त्यांनी 'Ramblings of Sea-Life' हे समुद्र जीवनावरील अनुभवांचे पुस्तक लिहिले आहे. ते वृत्तपत्रे, मासिके आणि जर्नल्समध्ये लेखन करतात.  

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या