माझे साधे गाव – मोहटा (Mohata Village)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

माझे साधे गाव – मोहटा (Mohata Village)

मोहटा हे माझे छोटेसे गाव दक्षिण अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात वसलेले आहे. सह्याद्रीची डोंगररांग अहमदनगर जिल्ह्यात आल्यानंतर तिला गर्भगिरी हे नाव पडते. त्या गर्भगिरीच्या कुशीमध्ये वसलेले आहे माझे छोटेसे गाव- श्री क्षेत्रमोहटादेवी. त्यालाच मोहटे किंवा मोहटा या नावानेदेखील ओळखले जाते. पाहतो आनंदाने मी, त्या वाटेकडे... जी वाट जाते पुढे, माझ्या गावाकडे...माझ्या गावाशी संबंध असणारी प्रत्येक वस्तू, व्यक्ती यांपासून मला नेहमीच आनंद मिळत आला आहे. मोहटा गाव पाथर्डीपासून पुढे नऊ किलोमीटर अंतरावर येते. तेथे वस्ती दीड हजार लोकांची आहे, पण ते गाव केवळ राज्यात नाही तर देशातही माहितीचे आहे, कारण ते तीर्क्षक्षेत्र आहे. मोहटादेवी ही महाराष्ट्रातील अनेक घरांची कुलदेवता आहे. ते माहूरच्या रेणुकादेवीचे अंशात्मक स्थान मानले जाते.
अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण भागाची भौगोलिक रचना ही अवर्षणप्रवण आहे. मोहटा हे गावदेखील दुष्काळी भागात येते. तसेच, तेथील जमिनीची रचना सलग नसून गाव डोंगरी भागात वसले असल्यामुळे जमीन खालीवर आढळून येते. शेतीसाठी मृदा ही काळी आहे, तर हवामान सर्वत्र कोरडे आहे. शेती ही पावसाच्या पाण्यावर पूर्णत: अवलंबून आहे. काही ठिकाणी विहिरी आहेत. त्यावर सिंचन थोडेफार होते. गावातील तलाव आणि नदी हे पाण्याचे हंगामी स्रोत आहेत. ते पावसाळ्यानंतर पूर्णपणे आटून जातात.
गावाचा उल्लेख मोगल आणि निजाम यांच्या काळापासूनचा आढळतो. कारण एका आख्यायिकेनुसार मुसलमानी सत्तेतील एका सरदाराच्या म्हशी गावात आल्या होत्या! तो उल्लेख पुढे आहे. त्यामुळे निजामाच्या आणि मोगलांच्या राजवटीपूर्वीही गावाचे अस्तित्व होते असे म्हणता येते. गावकरी गावात वास्तव्यास मोहटादेवीचे मंदिर निर्माण होण्यापूर्वीही होते. गावातील लोक हे माहूरच्या रेणुकादेवीचे भक्त होते आणि त्यापैकी दहिफळे बन्सी, हरी गोपाळ व इतर काही भक्त देवीची वारी पायी करायचे. त्यांच्यामुळे गावात मोहटादेवीचे स्थान निर्माण झाले.
शेती हे गावातील बहुतेक कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. पिकांचे उत्पादन खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत घेतले जाते. पण शेती विशेषत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने खरीप पिकांवर लक्ष जास्त दिले जाते. बाजरी, ज्वारी आणि कापूस ही प्रमुख पिके खरीपाची आहेत. एकपिक पद्धत गावात अवलंबली जात नसल्या कारणानेच तेथील जमीन अधिक सुपीक आहे. गावातील शेती ही काही भागांमध्ये विभागलेली असून त्या भागांना चांदणी’, ‘मळ्हई अशी नावे देण्यात आली आहेत. मला आमची पूर्वापार चालत आलेली शेतजमीन दोन्ही भागांमध्ये असल्याने त्या भागांबद्दल विशेष आकर्षण आहे.
मोहटा गावाच्या पुढे काही अंतरावर बीड जिल्ह्याची हद्द लागते. तेथील भौगोलिक आणि प्रादेशिक रचना, भाषाशैली, राहणीमान ही अहमदनगर जिल्ह्यापेक्षा बीड जिल्ह्याच्या जास्त जवळची वाटते. मोहटादेवी ही तेथील ग्रामदेवता आहे. मोहटादेवीचे मंदिर हे गावापासून थोड्याशा अंतरावर, एका डोंगरावर स्थित आहे, तर मारुतीचे सुंदर देऊळ गावात मध्यभागी आहे. शेंदूर लावलेल्या मारुतीचे मंदिर दगडी प्रकारातील असून ते जुन्या काळात बांधलेले असावे. मारुतीच्या मंदिराशेजारी विठ्ठल आणि रुक्मिणी यांचेही देऊळ आहे. संत वामनभाऊ आणि भगवानबाबा यांच्या मूर्ती त्याच देवळात आहेत. मोहटा या गावातील अन्य देवता म्हणजे ग्रामरक्षक म्हसोबा, भैरोबा, लक्ष्मीआई आणि माऊलाई. त्या देवता गावाच्या प्रत्येक वेशीवर आढळतात. त्यांचे देऊळ फार मोठे नसते, पण त्यांचा मान व त्यांचे स्थान, दोन्ही मोठे असतात. आषाढाच्या महिन्यात लक्ष्मीआई आणि म्हसोबा यांना मान मोठा असतो.

श्री मोहटादेवी गड
मोहटादेवीच्या डोंगराच्या पायथ्याशी खालच्या बाजूला थोडासा दुर्लक्षित आणि ओसाड भाग आहे. त्याला जुने मोहटे म्हणतात. त्या भागात फक्त वडाची झाडे आणि काही जुनी देवळे आहेत. जास्त कोणी त्या बाजूला फिरकत नाही. महादेवाचे जुने पण छोटेसे मंदिर तेथे आहे. गोसावीबाबा यांचे स्थान त्याच्या समोर आहे आणि एक पीर आहे. तिकडे जाणारा रस्ताही दुरवस्थेत आहे. गावात ग्रामपंचायत आहे.
मोहटा गावामध्ये सर्वात मोठी परंपरा म्हणजे तेथील लोक दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करत नाहीत. त्यामागे आख्यायिका आहे – ‘एकदा गावामध्ये एका मुसलमान सरदाराच्या शेकडो म्हशी चरत चरत आल्या. त्या म्हशी कोणाच्या हे गावकऱ्यांना समजेना. त्यामुळे त्यांनी त्या म्हशींना बांधून टाकले. त्या ज्याच्या असतील त्याला देऊन टाकू असे ठरले. पण ज्या वेळेस त्यांना हे समजले, की त्या म्हशी मुसलमान सरदाराच्या आहेत, त्यावेळी ते घाबरले. त्यांना वाटले, तो सरदार त्यांच्यावर चोरीचा आळ घेईल. म्हणून त्यांनी मोहटादेवीला साकडे घातले. देवीची प्रार्थना केली आणि देवीने काळ्या म्हशींचा रंग बदलून पांढरा केला.त्या वेळेपासून आजतागायत कृतज्ञता म्हणून मोहटा गावातील किंवा गावातून स्थलांतरित झालेली आणि फक्त दहिफळे घराण्यातील लोक कोठल्याही दुग्धजन्य पदार्थांची विक्री करत नाहीत. म्हणजे ते गायीम्हशी पाळून, त्यांचे दूध काढून घरच्या घरी वापरू शकतात वा शेजारीपाजारी विनामूल्य देऊ शकतात, पण दुधाचा व्यवसाय करू शकत नाहीत. गावात सत्तर टक्के लोक दहिफळे आडनावाचे आहेत. ते हा निर्बंध पाळतात. मात्र शेजारगावच्या दहिफळे यांना ते बंधन नाही! मोहटा गावातील बहुतांश घरे ही दहिफळे आडनाव असलेल्या कुटुंबांची आहेत.
यात्रेतील पालखी सोहळा


गावामध्ये सर्व सणसमारंभ उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रातील नऊ दिवस यात्रा भरते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध एकादशीला गावात देवीचा छबिना येतो. तो दिवस मिरवणुकीचा म्हणजे मोहटा गावासह पंचक्रोशीतील अनेक गावांसाठी खूप मोठा असतो. त्या दिवशी गावात शोभेच्या दारूची आतषबाजी होते. लोक हजारोंच्या संख्येने गावात जमतात. स्त्रिया त्यांच्या साड्यांच्या पदराने पालखी मार्गाची वाट झाडतात.
कुस्त्यांचा हंगाम गडाच्या पायथ्याशी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भरतो. त्यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम असतो, तो म्हणजे कलावंतांच्या हजेऱ्या. त्यात तमाशा कलावंत, फासेपारधी, बहुरुपी, सोंगाडे अशा कलाकारांचा समावेश असतो. त्यांची कला दरवर्षी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवीसमोर समर्पित करून तिचा आशीर्वाद घेणे आणि पुन्हा त्यांचे पोट भरण्यासाठी गावोगाव फिरणे असा त्या कलाकारांचा ठरलेला क्रम. जवळ जवळ पंधरा दिवस चालणारा तो सर्वात मोठा यात्रोत्सव आहे.
माझ्या मोहटा गावाचा मान पंचक्रोशीतील इतर गावांमध्ये सर्वात मोठा आहे. त्यामुळेच आसपासच्या गावांचे ते मुख्यालय आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ज्या वर्षी गावात अजिबातच पाऊस पडत नाही, पिण्यासाठीदेखील पाणी कमी पडते असा अतिशय भीषण दुष्काळ पडतो, जसे 2019 च्या उन्हाळ्यात घडले होते, त्यावेळी गावातील स्त्रिया नारळ आणि कलश घेऊन देवीच्या मंदिरात जातात आणि पाऊस पडण्यासाठी मोहटा देवीला साकडे घालतात. असे म्हणतात, की त्यानंतर लगेच पाऊस पडतो. त्या समजास यश येवो- ना येवो गावातील लोक अशा प्रकारच्या अनेक परंपरांचे पालन करतात. गावातील माणसे ही साधी आणि कष्टकरी आहेत. बहुतेक स्त्रियांचा पोशाख हा नऊवारी/सहावारी साडी तर पुरुषांचा पोशाख पायजमा अथवा धोतर असा साधा आहे. आजच्या तांत्रिक युगातही माझ्या गावातील लोक मातीशी घट्ट जोडलेले आहेत आणि होणारे बदल स्वीकारत आहेत.
- अभिजीत दहिफळे 8857094032
---------------------------------------------------------------------------------------
लेखक परिचय
अभिजीत देविदास दहिफळे हे अहमदनगर शहरात राहतात. 
ते पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांना वक्तृत्व, लेखन आणि कविता यांची आवड आहे.
इमेल -
abhi.dahifale999@gmail.com

 © थिंक महाराष्ट्र डॉट कॉम


टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. अप्रतिम लेखन आहे•शहरात राहून गावच आगदी बरोबर लेखन केले• भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्या

    उत्तर द्याहटवा
  2. गावाबद्ल अप्रतिम लेखन केले आहे.. मला याचा अभिमानआहे.

    उत्तर द्याहटवा
  3. खरोखर आपला लेख अप्रतिम आणि सुंदर असून मोहटा देवी संपूर्ण महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं आपलं गाव आहे. खूप खूप धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा