नेहरोली हे गाव पालघर
जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील दक्षिण सीमेवर वसलेले
आहे. ते पालघर जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण साठ
किलोमीटरवर येते. गाव आहे निसर्गरम्य, परंतु औद्योगिकीकरण आणि दळणवळणाच्या सोयी यांमुळे गावाचा विकासही साधला
गेला आहे. गावाची लोकसंख्या अडीच हजारांच्या आसपास आहे. त्यात ऐंशी टक्के कुणबी समाज आहे. गावात गावकऱ्यांच्या छोट्या छोट्या
वस्त्या आहेत; त्या गुजरपाडा, डोंगरपाडा,
तिनईपाडा, जिंबलपाडा अशा नावांनी ओळखल्या
जातात. जिंबल म्हणजे आदिवासी. कातकरी, वारली या आदिवासी
जमातींचे पाडे तेथे आहेत. ते
सर्व एकात्मतेने व गुण्यागोविंदाने राहतात.
नेहरोली हे गाव नावाप्रमाणेच ‘नेह’ या आद्याक्षराने
सुरू होणारे, सौंदर्याचे कोंदण असलेले आहे. नेहरोली हे निसर्गाच्या कुशीत अलगद वसलेले आहे.
विकासाच्या जवळच्या टप्प्यावर आहे. नेहरोलीचे हवामान
उष्ण व दमट आहे. शेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. तेथे मुख्यतः तांदूळ
पिकवला जातो. कोलम, गुजरात
या तांदळाच्या तेथील जाती प्रसिद्ध
आहेत. शिवाय हरभरा, मूग, तूर, तीळ ही पिकेही घेतली जातात. गावापासून काही अंतरावरून वैतरणा ही नदी वाहते. तिच्यामुळे गाव
सुजलाम-सुफलाम बनले आहे. गावाजवळ इतर अनेक छोट्यामोठ्या नद्या आहेत. त्यामुळे कधी
पाणीटंचाई जाणवत नाही. म्हणून शेतकरी हे सधन आहेत. गावाजवळ ‘खापऱ्या’ नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरातून पाऊस पडू
लागल्यावर धूर निघत असल्याचा भास होतो... त्यावरून जास्त पाऊस पडणार असे भाकित
केले जाते. डोंगरात विविध वाटा-आडवाटा आहेत.
गावाचा परिसर
औद्योगिकीकरण झाल्यामुळे प्रगत आहे. तेथे आयुर्वेदिक औषधांची निर्मिती, प्लायवूड कटिंग, धातूंवरील प्रक्रिया यांचे कारखाने आहेत. आईस्क्रीमच्या कांड्या
बनवण्यासारखे उद्योगही तेथे चालतात. त्यामुळे गावातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेती
करण्याचे प्रमाण कमी होत आहे. तरीही गावाची एकंदरीत अर्थव्यवस्था चांगली आहे.
![]() |
नेहरोलीचे हनुमान मंदिर |
नेहरोलीचे ग्रामदैवत हनुमान आहे. महाबली
जय हनुमानाचे मंदिर गावाच्या मध्यावर आहे. त्याखेरीज शिव, खंडोबा व जरीमरी यांची प्रमुख देवळे आणि इतर छोटीमोठी मंदिरेही आहेत. ती मंदिरे स्वातंत्र्योत्तर काळात उभारली गेली
असावीत. तेथील महत्त्वाचा उत्सव ‘हनुमान जयंती’चा असतो. त्यासाठी खास सभामंडप सजवला जातो. त्यावेळी देवतेचे विधिवत
पूजन होऊन दर्शनाकरता गावातील मंडळी, त्याच बरोबर आसपासच्या
गावांतील मंडळीसुद्धा येतात. संध्याकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन असते. ढोल-ताशा
वाजवत जल्लोशमय वातावरणात भक्तिभावाने पालखी सोहळा रंगतो. पालखी सोहळ्याचे खास
वैशिष्ट्य म्हणजे एक घोषणा. ती पालखी उचलल्यापासून सुरुवात होते. ती घोषणा अशी आहे
- आया साहेब बया साहेब जयजयकार असो । आळंदी
बादशहा । बोला बोला बजरंग बली की जय | तेव्हा भारावल्यासारखे वाटते. पालखी पूर्ण गावाला वळसा रात्रभरात घालून
पहाटेच्या सुमारास मंदिरात पुन्हा विराजित होते. हनुमान
मंदिर व उत्सव हे गावाला एकत्र बांधून ठेवणारे मोठे
कारण आहे. आंतरिक शक्ति आणि सहकार्य यांचे प्रतीक असा तो मारुतीराया नेहरोली गावाची अस्मिताच होऊन गेला आहे.
गावाच्या जवळ तिळसेश्वर हे पांडवकालीन महादेव मंदिर आहे. ते
वैतरणा नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग
आहे. मंदिर परिसरातील जलाशयात असलेले वैशिष्ट्यपूर्ण मासे
बघण्यास पर्यटक येतात. तेथे नथनी नावाचा अनोखा मासा
आढळतो. तो मासा केवळ शिवरात्रीच्या दिवशी दर्शन देतो अशी भाविकांत आख्यायिका आहे.
कोहोजच्या किल्ल्याच्या बुरुजाच्या डावीकडे मारुतीचे
छोटे मंदिर आहे. माचीवर शंकराचे जीर्णोद्धारित मंदिर आहे. गडमाथ्यावरील
श्रीकृष्णाचे मंदिर हा अजून एक विशेष. त्याचे कारण म्हणजे सहसा श्रीकृष्णाची
मंदिरे गडकिल्ल्यांवर आढळत नाहीत.
![]() |
नेहरोलीचे प्रवेशद्वार |
ग्रामीण संस्कृतीची अजोड परंपरा
लाभलेले माझे नेहरोली गाव. तेथील विविध सण-उत्सव तेवढ्याच दिमाखात आणि आनंदाने साजरे केले
जातात. गावात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्या दिवशी गावातील सर्व घरांमधून लाकडे गोळा केली
जातात. होळी ज्या ठिकाणी पेटवली जाते त्या ठिकाणी ठेवली
जातात. त्या दिवशी घरोघरी तांदळाच्या पिठाच्या पापड्या केल्या
जातात, पुरणपोळीचा नैवेद्य असतो. होळीसाठी आठवडाभर
अगोदर गावचे तरुण, बाल मित्रमंडळ, त्यातच ज्येष्ठ व्यक्ती छोट्या होळ्या करून पेटवत. तो कार्यक्रम मोठ्या
होळीपर्यंत चालतो. ते सगळे करण्यामागील मजा काही औरच असते. विविध खेळ रात्री जेवण
आटोपून रस्त्यावर खेळले जातात ते अर्ध्या रात्रीपर्यंत चालतात. ‘लाप का सूट’ हा खेळ सर्वांच्याच आवडीचा ! त्याला आटयापाटयांचा खेळसुद्धा म्हटले जाते.
त्यात लाप आणि सूट असे दोन संघ असतात. ‘लाप’वाले खेळाडू हे पळतात
व त्यांना चौकोनी पाट्यांवरून ‘सूट’चे खेळाडू पकडत असतात. ‘लाप’चे खेळाडू त्यांचे कौशल्य लावून पळत असतात. त्यांचा एक जरी
खेळाडू पकडला गेला तर त्यांचा पूर्ण संघ बाद होतो व नवा डाव चालू होतो. हत्तीची
सोंड हा खेळ पकडापकडी करून खेळला जातो व साखळी तयार केली जाते. नाविन्यपूर्ण व
मनोरंजनात्मक खेळांची मेजवानी अशा प्रकारे चालू राहते. गावचे ते दिवस आठवले, की अंतरंगी त्या संस्कृतीची ऊब मनाला नव
उत्तेजना देते. त्या सर्व गोष्टींतून गावाची एकात्मता आणि सहकार्य यांचे चित्र
प्रतिबिंबित होते.
घराघरांत सकाळपासून गृहिणींचे
तांदळाच्या पिठाच्या पापड्या काढणे, खमंग पुरणपोळी तयार करणे यांची लगबग सुरू असते. त्यामुळे घराघरातील
वातावरणसुद्धा उल्हसित असते व सणाची अपूर्वाई वाटू लागते. संध्याकाळी होळी तयार
झाल्यावर विधिवत पूजा केली जाते. गावातील सानथोर एकत्र येऊन होलिका दहनाचा आनंद
घेतात. वाईट विचारांचे दहन करून, नवविचार प्रस्थापित करून
गाव सुखमय होवो याकरता आरोळ्या दिल्या जातात - ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी, गावच्या वेशीला सुखाची झोळी.’ त्यानंतर
जोरात ढोल वाजवला जातो. होळी दहनानंतर सर्वच एकमेकांना भेटून साखरगाठी तोडण्याचे
श्रेय घेतात व सणाच्या शुभेच्छा देतात. त्यावेळी एकमेकांच्या गळ्यात घातलेल्या साखरगाठी दाताने तोडण्याची प्रथा पाळली जाते.
दुसऱ्या दिवशीची धुळवड तर सांगूच नका ! ओळखता न येणारे असे
एकशेएक चेहरे तयार होतात. ते रंगवण्याच्या पद्धतीसुद्धा लाजवाब असतात. त्यातील ‘गांगोड्या’चे सोंग तर सर्वांना वेगळाच आंनद देऊन जाते. गांगोडया म्हणजे
गावातीलच व्यक्ती नकली केस, अंगावर वेगवेगळे
चित्रविचित्र कपडे घालते. तिच्या हातात मुसळ असते. ती व्यक्ती ते मुसळ दाखवून लहान
मुलांना घाबरवत असते आणि गावातील प्रत्येक घरासमोर उभी राहून मुसळ आपटत नाचत असते
व त्याचे (पोस्त) पैसे घेत असते. तो खेळ
संध्याकाळपर्यंत चालू राहतो.
गावात ‘भागवत सप्ताह’ दरवर्षी आयोजित केला जातो. आठवडाभर गावात वारकरी मंडळींची रेलचेल असते.
पहाटेपासून प्रवचन चालू असते. त्यात वातावरण भावपूर्ण बनते; तसेच, रात्री कीर्तनाचा सोहळा रंगतो. कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश गावकऱ्यांना मिळतात. त्यामुळे
गावात एकोपा टिकून आहे.
गावाच्या सुरुवातीला हायवे आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी पोचणे गावकऱ्यांना सुलभ
जाते. गावकरी महाराष्ट्र शासनाच्या बस सुविधा; तसेच, इतर खाजगी वाहतूक सुविधा यांचा लाभ घेतात. ते विशेष खरेदीसाठी वाडा आणि
कुडूस या शहरातील बाजारपेठांना जातात. रविवारी गावात आठवडी बाजार भरतो.
![]() |
नेहरोलीतील शारदा विद्यालय |
गावात दोन अंगणवाड्या आणि एक मिनी
अंगणवाडी आहे. त्या ठिकाणी मुलांना पोषक आहार दिला जातो. तेथे वेगवेगळे उपक्रम
राबवले जातात. गावात जिल्हा
परिषदेची प्राथमिक शाळा आहे. तिची स्थापना 1949 मध्ये झाली आहे. बाजूला पाड्यामध्ये दोन
शाळा आहेत. त्या शाळाही उत्तम अवस्थेत आहेत; सर्व
सोईसुविधा शाळांमध्ये आहेत. शाळेतील विद्यार्थी हे नवनवीन स्पर्धा-परीक्षा, कला, क्रीडा, विविध
प्रकल्प यांत अभिमानास्पद कामगिरी बजावतात. त्यामुळे गावाचे नाव प्रकाशझोतात असते. गावात माध्यमिक शाळा आहे, तिचे नाव ‘शारदा विद्यालय’. तिची स्थापना 1968 मध्ये झाली आहे. शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग
भरतात. विद्यार्थी जवळपासच्या गावांतूनही शाळेत शिकण्यासाठी येतात. शाळेचा
परीक्षेचा निकाल उत्तम लागतो. गावातील काही तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी
वाडा, कुडूस, अंबाडी या
शहरांत जातात. शाळेने यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत.
काही विद्यार्थी अमेरिकेसारख्या देशात स्थायिक झाले आहेत. त्यात भरत दत्तात्रेय
पाटील याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ते अमेरिकेत रसायनशास्त्र अभियंता
आहेत. निरक्षरता गावात दोन टक्यांपर्यंत असावी.
गावात ग्रंथालय आहे. त्यात दैनिक
वृत्तपत्रांपासून ते कथा-कादंबरी यांची अनेक पुस्तके आहेत. गावातील
आबालवृद्धापासून सर्व त्या ग्रंथालयाचा माफक फी भरून लाभ घेतात. विविध स्पर्धा
परीक्षा पुस्तकांचा भरणाही ग्रंथालयात आहे.
गावात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गावात खाजगी दवाखाने
आहेतच. गावात ‘आशा केंद्र’ही आहे. त्याच बरोबर विविध महिला बचत गटही आहेत. तेही विविध उपक्रम राबवत
असतात. गावात रस्ते, पाणीपुरवठा, वीज, पथदिवे यांच्या सुविधाही चांगल्या
पद्धतीने कार्यरत आहेत.
नेहरोली या गावाला काही पुरस्कार मिळाले आहेत. त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे 2008
सालचा ‘हागनदारी मुक्त गाव’, हा. 2016 सालचा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’, 2012 सालचा ‘तंटा मुक्त गाव’.
- जयेश
काशिनाथ जाधव 9819910238/ 8369857485 jadhavjayesh987@gmail.com
जयेश
जाधव हे मुंबईतील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक आहेत. ते नेहरोली येथे
राहतात. ते 'थिंक महाराष्ट्र' आयोजित 'गावगाथा' स्पर्धेत सहभागी झाले होते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
Great work
उत्तर द्याहटवा