![]() |
रजनी देवधर |
मी लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदींमध्ये
लिहित असलेल्या काही लेखांबाबत विशेष औत्सुक्य येणाऱ्या प्रतिसादावरून जाणवते. ते प्रल्हाद
जाधव याच्या 'थोरो-दुर्गा भागवत भेटी'च्या कल्पनेबाबत तसेच घडले. त्यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरांतून
वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या. त्यात ठाण्याच्या रजनी देवधर यांनी तर विचारवंत थोरोच्या
अमेरिकेतील स्मारकजागेला, वॉल्डन तळ्याला भेट दिल्याचे व तत्संबंधी 'लोकसत्ते'च्या
वास्तुरंग पुरवणीत लिहिले असल्याचे कळवले. मी त्यांना फोन केला तेव्हा देवधर
म्हणाल्या, की मी ठाण्यात तलावपाळीला फिरण्यास जाते तशी वॉल्डन परिसरात चार वेळा,
वेगवेगळ्या ऋतूंत फिरून आलेली आहे. माझा मुलगा तेथून जवळच राहतो. मॅसेच्युसेट
स्टेटमधील फ्रॅमिंगहॅम हे त्याचे गाव. देवधर यांचा थोरोच्या स्मारकाबद्दलचा लेख
पुढे जोडला आहे. पण येथे काही ओळी रजनी देवधर यांच्याबद्दल, त्यांच्या आवडींबद्दल
लिहाव्याशा वाटतात. त्यांचे 'वास्तुरंग' पुरवणीतील लेख वाचनात होते. आम्ही त्यांतील
दापोलीजवळच्या देगाव येथील आजीच्या घराबाबतचा लेख 'थिंक महाराष्ट्र'वर
पुनर्मुद्रित करू इच्छितो. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क निर्माण झाला होता. देवधर
यांच्याशी फोनवर अधूनमधून वेगवेगळ्या विषयांवर बोलणे होई. त्यांचा रोख मुख्यतः
बांधकाम व्यवसाय आणि वैद्यक व्यवसाय यांवर असे आणि त्यांचा कटाक्ष त्या
व्यवसायांतील गैरव्यवहारांबद्दल असे. बिल्डर लोक ग्राहकांना आणि डॉक्टर लोक
रोग्यांना कसे आडकवतात, फसवतात व नाडतात यांच्या कहाण्या त्यांच्याकडे आहेत. मात्र
त्यांच्या कहाण्या गॉसिपपुरत्या राहत नाहीत, कारण देवधरतत्संबंधी वाचन करतात व नंतर
बोलतात.
मी
थोरोसंबंधीचा लेख लिहिल्यानंतर देवधर यांच्या आवडीचा नवा रुचिदार विषय माझ्या ध्यानी
आला. तो म्हणजे त्यांची इंग्रजी-मराठी साहित्याची आवड, त्यांनी केलेले विविध वाचन
आणि मुख्य म्हणजे लक्षात ठेवलेले संदर्भ... मला वाटले, की त्या प्राध्यापक
असाव्यात! तर त्या म्हणाल्या, 'छे हो! मी मुंबई महानगरपालिकेत कारकुनी नोकरी
केली.' त्यांनी तेथील एक गंमतीदार किस्सादेखील सांगितला. त्या म्हणाल्या, की "मी
व्हील टॅक्स डिपार्टमेंटला होते. एकदा गंगाधर गाडगीळ यांची तत्संबंधात काही तक्रार
आली. महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष झाले. तर गाडगीळ यांचा संतापून फोन आला. तो मीच
घेतला. त्यांचे व्हील टॅक्स संदर्भात काही काम होते. ते अनावधानाने प्रलंबित
राहिल्याने गाडगीळ साहजिकच संतप्त झाले होते. त्या वेळी अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ
हे मराठीमधील मोठे साहित्यिक आहेत ही बाब फारशी कोणाला माहित नव्हती. गाडगीळ यांचे
प्रलंबित काम त्वरेने निपटले गेले. त्या वेळी उडालेली तारांबळ यामुळे गंगाधर
गाडगीळ हे नाव तेव्हा संबंधित साऱ्यांच्या चर्चेत राहिले होते.
वॉल्डनचे तळे |
रजनी
देवधर मार्क ट्वेन याच्या गावाला जाऊन त्याचे स्मारकही पाहून आल्या. ते गाव
त्यांच्या फ्रॅमिंगहॅमपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. त्यांनी परवा ग्रंथ दिनाला
मला शुभेच्छा पाठवताना मार्क ट्वेन याच्या स्मारकास भेट दिल्याचा उल्लेख
करून लिहिले -गुलामगिरीवरचे पुस्तक Uncle Tom's cabinची लेखिका हॅरिएट स्टोव आणि मार्क ट्वेन यांची घरे जवळ कनेक्टिकटला आहेत. Uncle
Tom's cabin माझ्या घरी नाही. ते मला एशियाटिकमध्ये
मिळाले होते. वॉल्डन माझ्या घरी आहे. Uncle
Tom's cabin चे मराठी भाषांतर दादरला, घाटकोपर, ठाण्याला लायब्ररीमध्ये शोधले होते, पण ते मिळाले
नाही. जुनी चांगली इंग्रजी पुस्तके आयआयटीच्या लायब्ररीमध्येसुद्धा मिळतात. मराठी शोधावी
लागतात. जे वाचलेले असते तो सगळा कालखंड इतिहास, भूगोल, समाजजीवन, तेथील व्यक्ती त्या वास्तू पाहताना डोळ्यांपुढे येतात. कनेक्टिकटला
आगळा भूगोल आहे. टेक्टॉनिक प्लेटचा आणि मार्क ट्वेन, हॅरिएट
स्टोव अशा लेखकांचा इतिहास आहे.
![]() |
अशोक आणि रजनी देवधर येऊरला काढलेला फोटो |
विचारवंत व निसर्ग अभ्यासक हेन्री डेव्हिड थोरो
(रजनी देवधर)
![]() |
हेन्री डेव्हिड थोरो |
थोरो वॉल्डन सरोवराकाठी जंगलात प्रयोग म्हणून राहिला. स्वतः जमीन खणून, मशागत करून, धान्य-बटाटे पिकवून रांधलेली श्रमाची भाकरी किती रुचकर लागते तो अनुभव घ्यायला हवा हे त्याचे श्रमाचे महत्त्व पटवणारे विचार आणि त्यानुसार कृतीदेखील. तत्कालीन अमेरिकेतील शोषणावर आधारलेल्या गुलामगिरीच्या पद्धतीविरुद्ध थोरोने वॉल्डन काठच्या त्या दोन वर्षाच्या वास्तव्यात मेक्सिकन युद्ध पुकारणाऱ्या जुलमी सरकारचा निषेध म्हणून कर भरला नाही आणि शिक्षा म्हणून तुरुंगवासदेखील भोगला. त्याचा त्या अनुभवावर आधारित विचारप्रवर्तक निबंध Civil Disobedience यातून गांधीजींना प्रेरणा मिळाली. वॉल्डनने सरोवराकाठी निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवसंपन्न होत, मानवी आयुष्यात शारीरिक श्रमाचे महत्त्व, शोषण-अन्याय याविरुद्ध सविनय कायदेभंग हे विचार जगाला दिले. त्याने विविध विषयांवर साहित्यसंपदा निर्माण केली. वॉल्डन सरोवराचा विस्तीर्ण जलाशय हिवाळ्यात गोठलेला असतो. त्यात येणारी बदके, काठी असलेले मेपलवृक्ष -हिवाळ्याअगोदर लाल-किरमिजी-केशरी रंगांत न्हाऊन पानगळीत पर्णभार उतरवणारे ...या साऱ्याचा आस्वाद घेत जगणारा तो निसर्गपुत्र! Enjoy land but own it not. जमिनीवर मालकी हक्क मिळवण्यापेक्षा निसर्गाचा आनंद घ्या असे म्हणत त्याने साधी जीवनपद्धत सहज अंगिकारली. त्याने वॉल्डन या पुस्तकात माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते, माणसाच्या ठायी असलेल्या निसर्ग जाणिवांचा शोध या संबंधीचे वॉल्डन सरोवराच्या सान्निध्यातील आणि वास्तव्यातील अनुभव लिहिले आहेत. ते इंग्रजी भाषेतील क्लिष्ट शैलीतील पुस्तक मराठी साहित्यात दुर्गा भागवत या विदुषीने 'वॉल्डनकाठी विचारविहार' या नावाने आणले.
थोरोच्या घराची प्रतिकृती |
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या
वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या