फडावरचा गुढीपाडवा (Sugarcane Cutters celebrate Gudhipadwa in their Style)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

फडावरचा गुढीपाडवा (Sugarcane Cutters celebrate Gudhipadwa in their Style)

 


फड म्हणजे साखर कारखान्याच्या शेजारी वसलेली गाडीवाल्या ऊसतोडणी कामगारांची हंगामी वस्ती. ती काही महिन्यांसाठी असते आणि तेथे येणारे कामगार स्थलांतरित असतात. असे फड प्रत्येक साखर कारखान्याच्या बाजूला असतात. आमजनांसाठी गुढीपाडवा म्हणजे वर्षाची सुरुवात तर ऊसतोडणी कामगारांसाठी तो सण म्हणजे त्या वर्षीच्या साखर हंगामाची अखेर. त्यामुळे त्यांचा गुढीपाडवा म्हणजे एक प्रकारे, ती वस्ती सोडण्याचा निरोप समारंभ ! कामगार स्त्रीपुरुष हंगाम संपल्याची हुरहूर आणि गावाकडे जाण्याचे लागलेले वेध अशा संमिश्र मनःस्थितीत असतात. मी तो सण एका वर्षी हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याच्या परिसरातील कामगार वस्तीत अनुभवला. हुपरी हे गाव कोल्हापूरजवळ आहे.


होळी आणि धूळवड संपली तसा वस्तीतील प्रत्येक जण गुढीपाडव्याबद्दल बोलू लागला होता. कोणी म्हणे, पाडव्याला घरी परत जायची बांधाबांध सुरू करू; तर कोणी म्हणे, पाडव्याच्या मुहूर्तावर कारभारणीला सोन्याचे चार मणी आणि चांदीची पैंजणे विकत आणू; कोणाला त्या दिवशी घरी न्यायला चार भांडी खरेदी करायची होती; कोणाला दवाखान्यात जाऊन पुढील सहा महिन्यांसाठी औषधे आणायची होती. प्रत्येक कामगाराच्या पोराबाळांना नवे कपडे तर मिळणारच होते. तसेच, वस्तीवरील सर्व बायकांना हुपरीच्या अंबाबाईची ओटी पाडव्याच्या दिवशी खणानारळांनी भरायची होती. 

खरे तर, हंगामाची अखेर आली की ऊसतोडणी कामगार सकाळी आणि संध्याकाळीही काम करत. पण गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र फक्त सकाळचे काम असणार होते. त्या दिवशी दुपारी दोन नंतर सगळे आपापले राजे ! मी केवळ उत्सुकतेपोटी आदल्या दिवशी कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर येऊन राहिले. तेथील खोलीच्या खिडकीतून सगळ्या वस्तीचा नजारा दिसे - 

सगळ्या झोपड्या पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान जाग्या झाल्या. एरवी, वस्तीवरील बापई उठले, की निघाले शेतावर. बायका मात्र भराभर भाकऱ्या थापायच्या; त्याच तव्यात भाजी परतायच्या; उगीच कसला अनर्थ घडू नये म्हणून पेटलेल्या त्या चुलींवर पाणी ओतून त्या विझवायच्या आणि मग शेतावर पळायच्या. पण गुढीपाडव्याची ती पहाट वेगळी होती. वस्तीवरील सर्वांनी आंघोळी केल्या. प्रत्येकाच्या घरी साखर घालून दूधाचा चहा झाला. त्यासाठी दूध आदल्या दिवशीच आणले होते. एरवीचा म्हणजे बिनदूधाचा गूळ घातलेला काळा चहा ! (साखर कारखान्यासाठी काम करत असूनही हंगामाच्या शेवटी प्रत्येक कुटुंबाला पाच किलो साखर मिळे.) त्यानंतर प्रत्येक झोपडीच्या बाहेर गुढ्या उभारल्या. गुढीला उसाचे तुरे, खण, पांढऱ्या आणि गुलाबी देवचाफ्याच्या माळा लावल्या. मात्र गुढीवर भांडे पालथे न घालता पितळीचा डाव अडकावला होता. डाव म्हणजे गावाकडे लवकर पोचवणारा शकून ! गुढीच्या समोर एक पितळी थाळी ठेवलेली होती. त्यात हळद, कुंकू, बुक्का आणि खोबऱ्याचे तुकडे होते. संध्याकाळी गुढी उतरली की खोबरे-साखर खायची आणि वाटायची. 


गुढीला साखरगाठीच्या माळा लावल्या नव्हत्या, पण झोपडीच्या दाराच्या दोन्ही बाजूंना ऊस वाढ्यासकट उभे केले होते. गुढीभोवती रांगोळया काढल्या होत्या. त्या दरम्यान, पोरांनी आम्ही साखरशाळेत शिकवल्याप्रमाणे केलेल्या पताका वस्तीभर लावल्या. कोणाही कामगार स्त्रीला त्या सकाळी स्वयंपाक करायचा नव्हता. ज्याच्या शेतातील ऊस तोडायचा होता त्या शेतकऱ्याच्या घरातून नाश्त्याला पोहे येणार होते. त्यात घरातून नेलेल्या शेव-कुरमुऱ्यांबरोबर शेतातील कांदे आणि कोथिंबिर मिसळून त्याचा शेतातच फडशा पडणार होता.

दुपारी वस्तीवरील प्रत्येक घरात पाडव्यासाठी म्हणून पुरणाचा स्वयंपाक होणार होता. आता, ऊसाच्या फडात कोणी ठेवणीतील कपडे घालून जाते का? पण आमच्या त्या बायांना काय त्याचे! त्यांनी बाप्यांच्या कटकटीला न जुमानता चांगल्या चकमकीत जरीच्या साड्या नेसल्या आणि वरून जुनेरी पांघरली होती. स्वतः मुकादमाने वस्तीतील प्रत्येक पोरग्याला वीस रूपये दिले होते. त्यामुळे त्यांना कारखान्यासमोरच्या गाड्यांवर चहा, पाव, वडा, भजी... काय पाहिजे ते घेता येणार होते. मुकादम आक्काने म्हणजे त्याच्या बायकोने वस्तीमध्ये वाटण्यासाठी म्हणून गावातील आचारी बोलावून बुंदीचे लाडू करून घेतले होते. एरवीचे कजाग असणारे मुकादम नवरा- बायको आज भलतेच नरम झाले होते ! दररोज गाडीतील ऊस कारखान्यात उतरवून झाला की त्या दिवसाचा हिशेब देण्यासाठी प्रत्येकाला मुकादमाच्या दारात थांबावे लागे. वस्तीवरील बाया मात्र दुपारी जेवणे झाली की मुकादमिणीकडे जात. मुकादमीण म्हणजे बडे प्रस्थ होते. ती मुकादमाची तिसरी बायको होती. ती वस्तीवरील घरातील कटकटी आणि अडचणी हातासरशी सोडवत असे. हंगामात कधी कोणाला गावाकडे जाण्याची गरज असेल आणि रजा हवी असेल तर तिच्याकडे रदबदली केली की मुकादम ते निमूटपणे मान्य करी. 


तर मुकादमीण तिच्या दारात दुपारी बारापासूनच बुंदीच्या लाडवाचा एवढा मोठा हारा घेऊन बसली होती ! त्याच्याबरोबर कडुनिंबाच्या पानांच्या जिरे-धणे-चिंच-गूळ घालून केलेल्या चटणीचा सट होता. दुसरीकडे, पाण्याचा मोठा डेरा होता आणि मुकादमिणीचा गडी हैबती ओगराळ्याने अलमिनचे ग्लास पाण्याने भरून ठेवत होता. आक्का दुपारहून शेतातून घामेजून आलेल्या प्रत्येक कामगार बाईच्या हातात, तिच्या घरातील माणसांच्या संख्येनुसार लाडू आणि कडुनिंबाची चटणी ठेवत होती. वर ती कडू चटणी पाडव्याच्या दिवशी खायचीच खायची म्हणून दमही भरत होती. बायकाही मग चटणी तोंडात धरून हैबतीकडून घेतलेले पाणी गटागट पिऊन घराकडे पळत होत्या. घरी आल्याबरोबर हातपाय धुऊन भराभर कामाला लागत होत्या. एरवी आई घरी आली, की भुकेने कालवा करणारी पोरे आज गाड्यांवरील हे-ते खाऊन तृप्त होती. बायांनी पोळ्या करायच्या म्हणून प्रथम कणिक आणि मुगाचे पीठ घालून कणकेचे मोठे गोळे भिजवले होते. दुसरीकडे पुरणाची डाळ रटरटत होती. ठेचलेल्या बटाट्याच्या भाजीसाठीचा हिरव्या मिरचीचा मसाला दगडावर वाटत होत्या. त्याबरोबर पोरीबाळी कटाच्या आमटीसाठी कोरडा मसाला तयार करत होत्या. पुरण वाटण्यासाठीचा मात्र खास पाटा. तो प्रत्येकीकडे नव्हता. वस्तीत चार-पाच पाटे फिरत होते.

कृष्णी म्हणजे मुकादमिणीला त्रास वाटे. कारण ती तिच्या माहेरातील होती. कृष्णीने तिच्या चार पोळ्या झाल्याबरोबर गुढीच्या नैवेद्याला एक काढली. दुसरी पोरग्याच्या ताटलीत दिली. मग ती मुकादमाच्या दारात एका ताटलीत दोन पोळया, थोडा भात, एका वाडग्यात भाजी आणि मोठया तांब्यात कटाची आमटी घेऊन गेली. मुकादमिणीने तिला पाडव्याचे हळदकुंकू लावता लावता तिच्या ताटावर बारीक नजर फिरवली. पोळ्यांची कणिक जरा जाड होती जणू!ती म्हणाली, “न्हाई आक्कासाब. तुमच्यागत कुटल्या आमच्या पोळ्या व्हायला?कृष्णी वरमून म्हणाली. असू दे गं... पाडवा गोड म्हनायचा बग. जा, जेव जा. देवीची ओटी भराया संग जाऊ.मुकादमिणीने तसे म्हणता क्षणी कृष्णीचा जीव थंडा झाला. ती पटापट घरी आली. तिने ताटे केली... तर तिचे मालक म्हणाले, “तळण कुटं हाय गं? झालं का! तिने डब्यातील चार कुरडया, पापडया तळून पोराला मुकादमाच्या घरी पिटाळले. आये, मुकादमकाकीने आणखी दोन लाडू आणि चिच्चेची चटणी दिल्या बग...असे म्हणत पोरगा ताट घेऊन बसला. सगळ्यांनाच हंगामाच्या दिवसात रोज अर्धपोटी राहण्याची सवय पडली होती. त्यामुळे एकदम पोट भरल्यावर झोपा येऊ लागल्या. पण फडावर झोपून कुठं चालतंय... ते बी पाढव्याच्या दिवशी... असे म्हणत तिने भांडी घासली. चूल सारवली. स्वतःचे आणि पोराचे तोंड धुऊन पावडरटिकली केल्यावर... तिच्या मालकाला त्याची बायको कृष्णी ओळखेनाच झाली. कोण म्हनायच्या? शहरातल्या आक्का काय वो?असे तो चेष्टेने म्हणाला. तशी कृष्णीने जावा तिकडं तुमी!... असे म्हणून जो मुरका मारला की तिच्या मालकालाच काय पण रिकामी फिरत असलेल्या मलाही कृष्णी म्हणजे अप्सराच वाटली!

हळुहळू, मुकादमाच्या घरी पोळ्यांचा ढीग जमला. भात, भाजी, कटाची आमटी, तळण... वस्तीतील प्रत्येकाकडे तेच जेवण बनवलेले होते. सगळे प्रत्येक झोपडीतून मुकादमिणीकडे पोचवले गेले. आता, वस्तीतून गावाकडे परतेपर्यंत मुकादमाच्या घरी स्वयंपाक नव्हता. पुढील काही दिवस घरातील कोयते (कामगार) कामाला गेल्यावर त्या वस्तीत राहिलेली पोरेही सकाळी मुकादमाच्या घरीच जेवणार होती.

सगळ्यांची जेवणे उरकेपर्यंत संध्याकाळ झाली. गुढ्या उतरल्या. हंगाम संपला याची खूण म्हणून थाळीवर डाव वाजवले आणि सगळ्या वस्तीत खोबरे-साखर वाटली. मग प्रत्येक घरातील नवरा, बायको आणि मुले देवाला आणि खरेदीसाठी बाजाराला निघाले. हरणी आणि तिची सासू, दोघीच फडावर आल्या होत्या. त्यांच्या घरी बापई नव्हता कोणी. मग मुकादमिणीने त्या दोघींनाही कृष्णीबरोबर तिच्या रिक्षात घेतले. थोड्या वेळापूर्वी गजबजलेली वस्ती एकदम शांत झाली. आजचा दिवस फारच आनंदाचा होता. वस्तीवर भांडण नाही. मारामारी नाही. आज वस्तीवर मी सोडून बाहेरचे कोणीही आलेले नव्हते. मंडळी देवी दर्शन आणि खरेदी उरकून आठच्या सुमाराला परत आली. मंडळी सगळी खरेदी बेतशीर लावून सर्वजण मुकादमाच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत जमली. हैबती यळकोट यळकोट जय मल्हारकरत नाचायला लागला होता. मुकादमाने भंडारा उधळला. चारपाच गडी मशाली घेऊन नाचत आले. बारकी पोरे पण नाचू लागली.

हैबती तिथला हरकाम्या. स्वैपाक म्हणू नका, झोपडी बांधायचं म्हणू नका... सगळ्या कामात तरबेज - त्याच्याकडे बायको मात्र टिकत नसे. त्यामुळे साऱ्या वस्तीचा तो चेष्टेचा विषय असे. तोही ते हसण्यावारी नेई. हैबतीचा खंडोबा नाच संपल्यावर गळ्यांत टाळ घातलेले पंढरीचे वारकरी उठले. ग्यानबा तुकाराम... मीच तो रे आत्मारामहा नाद घुमू लागला. टाळकरी बायका पण उठल्या. एकीच्या हातात तुळशी वृंदावन. दोन पोरं घोडा बनली. उरलेल्या बायकांनी फेर धरला. खाली वाकून धुणं धूते शालू भिजला, आमच्या भावानं बांधियेला गाडी बंगला... अशी चारपाच गाणी गाऊन फेर धरल्यानंतर फुगड्या सुरू झाल्या. साधी फुगडी, घसर फुगडी, जातं... नाना प्रकार. मग, कोणीतरी मुकादमाला आणि त्याच्या बायकोला फुगडी धरायला लावली. मुकादम असा लाजला की त्याची बायको पण हसू लागली. मग सगळेच नवरा-बायको एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढत फुगडी घुमू लागले. अशा वेळी वस्तीवरील बापयांना तरण्या पोरींबरोबर फुगडी खेळायचा पण नाद करता आला. त्या दिवशी सगळे चालत होते. 

एकाएकी बारीक आवाजात पण तारस्वरात लकेरी ऐकू आल्या. हरणाबाई आणि तिची सासू नव्या नथी घालून आली ठुमकत नार लचकत... हिरव्या रानी म्हणत गात होत्या. त्यांच्या मागून कृष्णीचा नवरा गं साऱ्याजणी...म्हणून जोरात गायल्यावर पोरांनी ढोलकी वाजवून नाचण्यास सुरुवात केली. मग एकामागून एक गाण्याची चढाओढच लागली. मंडळी भलतीच सुरात होती !

गुजर आणि लमाण मंडळी बाजारातून अजून आली नव्हती. लमाणाची आणि गुजरांची आली की बगाच तुम्ही...राधी म्हणत होती. एरवी, या दोन्ही जमाती इतर वस्तीतील कामगारांशी फटकून वागत, पण आजचा दिवस वेगळा होता. गुजरांनी आल्या आल्या दूध आणि माव्याचे लाडू वस्तीला वाटले, कारण त्यांच्याकडे दूध-दुभते भरपूर असते. वास्तविक त्यांच्या जातीत बायकांवर खूप बंधने असतात. पण आज गुजरांच्या बायका-पोरांनी श्रीकृष्णाच्या घरातील रूक्मिणी आणि तिची सून गायकी यांची सॉस बहू की लडाईही नृत्यनाटिका केली. त्यात हनुमानापासून कोणीही पात्रे होती. रूक्मिणी आणि गायकी या ऊसतोडीसाठी जातात आणि तेथील कामावरून दोघींच्यात झगडा होतो. मग कृष्ण येऊन दोघींची समजूत काढतो. घरी येऊन स्वयंपाक करताना पण दोघी भांडू लागल्यावर मग कृष्ण ऊसाचा एक कांडका घेऊन दोघींना देतो दोन दोन फटके... आणि मग दोघी सरळ होतात. ही त्या नाटकाची गोष्ट! वस्तीतील बहुतेक सर्वांना ती गोष्ट माहीत होती आणि सर्वाना ती फारच आवडत होती.

मग आली लमाणांची टोळी. त्यांनी सगळ्यांसाठी गोड आणि तिखट शेवकांडे, शेवगाठी आणि त्यांचे खास खडीसाखर घातलेले मोहाचे शरबत आणले होते. पिऊ नका... ताई... वंगाळ दारू असती ती.’ माझ्या कानात कोणीतरी कुजबुजले. लमाणी बायका भलत्याच सुंदर दिसत होत्या ! त्यांचे ते लांब घागरे, कथलाचे चकाकते दागिने... त्यांच्या लमाण टोळीतील सगळे फेर धरून झूलू लागले. किश्ना कही राधा को... जाती कहा रंग छोडके... आती हू घटिका मे सय्याजी को परोसके...या गाण्याची धून छान होती. त्यांचा नाच म्हणजे फक्त वर्तुळाकार फेऱ्यात एकमेकांच्या कंबरेला धरून मागे-पुढे आणि दोन्ही बाजूंला डोलणे एवढेच होते... हळूहळू, वस्तीतील बाकीचेही त्या डोलनृत्यात सामील झाले. डोलाची गती वाढली तशा टाळ्या वाजू लागल्या -  मशाली घेऊन नाचणारी पोरे त्या वर्तुळामध्ये उड्या मारत होती. दिवसभराच्या धांदलीनंतरही कोणी थकले नव्हते, रात्रीचे बारा वाजून गेले होते. एव्हाना, बारकी पोरे झोपी गेली होती. सगळी नाच संपवून निवांत बसली होती. कोणाला घराकडे जावेसे वाटत नव्हते. एक जण गणपत शिरप्याला म्हणू लागला... दादा, मी तुज्या गाडीतून ऊस काढून माज्या गाडीत भरीत व्हतो रे रोज... म्हणून रडू लागला, म्हणजे निरोपाचा कार्यकम सुरू झाला. सगळीच एकमेकांना काही ना काही कबुल्या करून रडत होती. एरवी एकमेकांच्या जातीमुळे जरा वेगवेगळ्या ठिकाणी पाले ठोकणारी आणि एवढ्यातेवढ्या कारणावरून एकमेकांच्या जीवावर उठणारी ती सगळी मंडळी एकमेकांना गळामिठ्या घालून रडत होती. सर्वच मोठी माणसे त्या हंगामातील कडुगोड आठवणी सांगत-रडत आणि हसतसुद्धा होती. शेवटी, मुकादम आपण सगळी एकच रे... आपली जात गबाळीअसे म्हणाला. सर्वांनी माना डोलावल्या. मग एकदाचा मुकादमाच्या बायकोने दिलेला घोटभर चहा पिऊन सगळी त्यांच्या त्यांच्या झोपडीकडे परतली.

मीही जड पावलाने गेस्ट हाऊसवर आले. हैबती आणि मुकादम आक्का मला पोचवायला तिथपर्यंत आले होते. रस्त्यावर अंधार असला तरी चैत्राचे चांदणे होते. प्रतिपदा असल्यामुळे आकाशात चांदण्यांचा नुसता खच होता. वर्षाचा पहिला दिवस, माझ्या रोजच्या विश्वापेक्षा अगदी भिन्न समुदायात सहवासाने निर्माण झालेल्या प्रेमामुळे श्रीमंत झालेला ! असा वर्षारंभ माझ्या आयुष्यातील पहिला आणि कदाचित शेवटचाही होता ! मी माझ्या पीएच डी संशोधनकाळात त्या वस्तीची किती भयाण रूपे पाहिली होती! भीतीने थरकाप उडेल असे अत्याचार पाहिले होते, आपसातील प्रेमप्रकरणे, त्यामुळे होणारी भांडणे, पैशांच्या हव्यासापोटी स्वत:च्या बायकोचा गावातील टवाळ पोरांशी केलेला सौदा, घरात धान्य भरले असले तरी रांधलेले नाही म्हणून भुकेपोटी रडत रडत झोपी जाणारी छोटी छोटी मुले, गरोदरपणात अगदी बाळंत होईपर्यंत काम करणाऱ्या स्त्रिया, मुकादमाने दमात घेऊन मुद्दाम कमी दाखवलेले वजन, त्यानेच कितीही गरज असली तरी रजा देण्यास दिलेला नकार. त्यामुळे ओक्साबोक्शी रडणारी माणसे... मी त्या वस्तीत जाऊन आले, की मला वेठबिगारी आणि गुलामीच आठवत राही !

पण त्या दिवशी मात्र ती सगळी काजळी पुसून टाकणारे, त्या वस्तीत क्वचितच प्रकटणारे मानवी संबंधांचे किती सुंदर आणि आनंदी पैलू माझ्याकडे जणू घरंगळत आले होते ! खरे तर, अगदी क्षणभंगूर म्हणावा असा तो केवळ एका दिवस-रात्रीपुरता सामूहिक स्नेहाचा आविष्कार आणि त्यावेळी आपसातील गळून पडलेले भेद... पण तेथील कोणाच्या तरी मनात त्या रात्रीच्या प्रेमाचा आविष्कार कायम झिरपत राहीलच की आणि हळुहळू... खरोखरच, सगळा दुष्टावा संपून जाईल का? त्या विचाराने माझ्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. माझ्या मनातील विचार मुकादम आक्काने वाचले जणू ! तिने माझ्या हातावर आश्वासक थोपटले आणि तिनेही मला रडत रडत घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, 'ताई, पहाट आता दूर न्हाई...' तिचे ते शब्द माझ्या काळजात जणू रूतून बसले आहेत. मला आतापर्यंत मिळालेल्या नववर्षाच्या सगळ्यांत यथार्थ शुभेच्छा होत्या त्या ! 

ताजा कलम

प्रस्तुत लेखातील वर्णन 2003 सालचे आहे. त्या वेळी मी अनुभवलेला ऊसतोडणी कामगारांच्या वस्तीवरील पाडवा अविस्मरणीयच होता. मी हुपरीला काही कारणाने 2018 मध्ये पुन्हा गेले होते. त्या दिवशी नेमका गुढीपाडवा होता. मी वस्तीवर गेले तर रंगीबेरंगी पताका लावलेल्या होत्या. कर्कश्य डॉल्बीवर सिधी साधी छोरी शराबी हो गयीहे गाणे वाजत होते. वस्तीवर बाईक होत्या. जवळ जवळ प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन होता. झोपड्यांची संख्या रोडावली होती. वस्तीवरील बहुतेक तरुण कॉलेजमध्ये शिकतात. ते पुढील शिक्षणासाठी पैसे जमवतात. आता, ऊसतोडणीच्या हंगामाची अखेर साजरी करण्याची ती पध्दत बदलली आहे. पण त्या सणामागील संकल्पना तीच आहे. त्या सणाच्या रात्री त्यांच्या पुढील वर्षाच्या आशा जाग्या होतात. त्यांना स्थलांतर संपवून एका जागी स्थिर होण्याची स्वप्ने दिसत असतात. वर्षागणिक कामगारांची आर्थिक स्थिती सुधारत आहे; शिक्षणाची कास धरल्यामुळे परिस्थिती बदलत आहे. पूर्वी केविलवाणे दिसणारे कामगार आत्मविश्वासाने श्रीमंत ऊस शेतक-यांच्या बरोबरीने वावरतात. हा विश्वास स्थलांतराच्या चरक्यात पिळत असलेल्या कामगारांमध्ये पाडव्याच्या रात्रीने जागवला अशी माझी खात्री आहे.

- मंजुषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com

मंजुषा देशपांडे या शिवाजी विद्यापीठात लोकविकास केंद्राच्या संचालक आहेत. केंद्रातर्फे समाजविकासाचे अभ्यासक्रम चालतात. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात एम एससी केली आहे. त्यांचा पीएच डी प्रबंध विषय Health and Nutritional Status of Women Seasonal Migrants - A study of sugarcane cutters in Kolhapur District हा होता.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या