समर्थ रामदासांची स्थाने (Saint Ramdas left footprints at many a places)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

समर्थ रामदासांची स्थाने (Saint Ramdas left footprints at many a places)

समर्थ रामदास यांचे प्रभू रामचंद्र हे परमदैवत; तसेच, रामदास हे हनुमानाचे परमभक्त. समर्थांच्या जीवनाशी निगडित महाराष्ट्रातील काही स्थाने -

1. जांब (समर्थ) (जालना जिल्हा) : समर्थांचे ते जन्मगाव. त्यामुळे त्यास जांब समर्थ असेही म्हणतात. त्या ठिकाणी समर्थांचे घर आहे. वाड्यातील ज्या खोलीत समर्थांचा जन्म झाला ती खोली तेथे दाखवतात. जवळच, श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर जुन्या पद्धतीचे, चिरेबंदी आहे. त्या ठिकाणी पत्नीने पतीचे व पतीने पत्नीचे दर्शन घ्यायचे अशी रीत आहे. पुजाऱ्याने मला पायरीवर उंच जागी उभे केले व माझ्या पतीस माझ्या पायाचे दर्शन घेण्यास लावले. ही पद्धत मजेशीर वाटली. जांबपासून तीन किलोमीटर अंतरावर आसनगाव आहे. तेथे रामदासांचे विवाहस्थान आहे. तेथे एका लिंबाच्या झाडाखाली, उंचावर कट्ट्यासारखी मोठी जागा बांधली आहे. रामदासांनी सावधान हा शब्द ऐकला आणि ते मंडपातून निघून गेले ती त्यांच्या जीवनातील घटना त्या ठिकाणी घडली असे सांगतात. तसा फलक तेथे लावलेला आहे. लग्नाची तारीख त्यावर लिहिलेली आहे.

2. टाकळी (नाशिक जिल्हा) : समर्थ रामदास लग्नमंडपातून निघून गेल्यावर टाकळी येथे बारा वर्षे राहिले. त्यांनी श्रीराम नामाचा जप गोदावरी नदीकाठी केला. टाकळी ही रामदासांची तपोभूमी. समर्थांनी हनुमान मूर्तीची स्थापना अनेक ठिकाणी केली आहे. त्यांपैकी टाकळीची मूर्ती ही पहिली. ती शेणाची असल्याने तिला शेण्या मारूती’ (गोमय मारूती) असे म्हणतात. टाकळीमठ नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.

शेण्या मारुती

3. शिवथर घळ (रायगड जिल्हा) : दासबोधाची जन्मभूमी म्हणजे शिवथर घळ. घळ म्हणजे गुंफा किंवा नैसर्गिक गुहा. त्याला सुंदरमठ असेही म्हणतात. शिवथर घळ महाड शहरापासून चोवीस किलोमीटर अंतरावर आहे. वरंधा घाट उतरून गेल्यावर महाडच्या अलिकडे शिवथर घळीकडे जाणारा फाटा आहे. ती घळ त्या फाट्यापासून साताठ किलोमीटर आत, डोंगराच्या कुशीत आहे. शिवथर घळ म्हणजे निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण करणारे विलोभनीय स्थान ! घळ व तिचा परिसर विकसित केला आहे. समर्थ सेवा मंडळातर्फे रोज तेथे विविध कार्यक्रम होतात. ग्रंथराज दासबोधाची जन्मभूमी असणाऱ्या शिवथर घळीच्या पार्श्वभूमीचा शोध समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव यांनी लावला. त्या घळीला लागूनच एक धबधबा कोसळतो. त्या धबधब्याविषयी समर्थांनी लिहिले आहे - गिरीचे मस्तकी गंगा, तेथूनि चालली बळे, धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे

          डोंगराच्या आत वळणे घेत गेलो, की सेवा मंडळाची इमारत दिसते. पार्किंगजवळ छोटी हॉटेल्स आहेत. पायऱ्या चढून वर गेलो, की ट्रस्टचे कार्यालय व हॉल आहे. त्या ठिकाणी समर्थांची ग्रंथसंपदा, इतर धार्मिक पुस्तके व काही ऐतिहासिक पुस्तके मिळतात. तेथे जवळच हनुमानाचे व गणपतीचे मंदिर आहे. त्याच आवारातून पुढे गेलो, की डोंगर कपारीच्या आत मोठी गुहा आहे. माणसाच्या डोक्यावर पाच-सहा फूट अंतर राहील इतक्या उंचीवर डोंगराचा छतासारखा सपाट भाग आहे. बाजूलाच धबधबा आहे. त्याच्या बाजूने लोखंडी पाईपचे रेलिंग आहे. आतील भागात दासबोध सांगत असलेले समर्थ व लिहून घेत असलेले कल्याण स्वामी अशी मूर्ती आहे. बाजूला मोठी समई असून मागील बाजूस प्रभू रामचंद्र आशीर्वाद देत आहेत असा मूर्तीचा देखावा आहे. तो देखावा काचेमध्ये ठेवला आहे.

4. चाफळ (सातारा जिल्हा) : चाफळ खोरे आणि सज्जनगड ही समर्थांची कर्मभूमी आहे. चाफळचे श्रीराम मंदिर हे प्रसिद्ध आहे. ते ठिकाण सातारा जिल्ह्यात उंब्रजपासून सुमारे अकरा किलोमीटरवर आहे. तेथील राममूर्तीची स्थापना रामदासांनी केली आहे. मंदिर संगमरवरी असून त्याचा गाभारा मोठा आहे. प्रभू रामचंद्रांसह सीता व लक्ष्मण अशी प्रसन्न मूर्ती आहे. समोर हात जोडून उभा असलेला दास मारुती आहे. समर्थस्थापित अकरा मारुतींपैकी ती एक मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूस आणखी एक समर्थस्थापित हनुमान मंदिर आहे. त्याला वीरमारूती असे म्हणतात. त्या ठिकाणी राममंदिराच्या डाव्या बाजूस समर्थांचे मंदिर बांधले आहे. त्याच्या जवळच समर्थांची ध्यान गुंफा आहे. ती गुंफा भुयारासारखी आहे.

 

5. सज्जनगड (सातारा जिल्हा) : सज्जनगड हा किल्ला साताऱ्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. रामदासांची समाधी त्या गडावर आहे. उरमोडी नदी तेथून जवळच वाहते. गडावर जाण्याचा रस्ता नदीचे पात्र ओलांडून गेल्यावर आहे. गडाच्या मध्य भागापर्यंत गाड्या जातात. तेथून पुढे, पायऱ्या चढत गडावर जावे लागते. सज्जनगडाच्या महादरवाज्यास शिवाजी महाराजांचे नाव आहे. पर्शियन भाषेत शिलालेख दरवाज्याच्या कमानीवर आहे. बाजूला भक्कम बुरूज आहेत. पुढे चालत जाऊन दुसऱ्या दरवाज्यापर्यंत चांगल्या दगडी बांधीव पायऱ्या आहेत. तो दरवाजाही मजबूत आहे. पायवाट चढून वर गेलो, की किल्ल्याची सपाटी आहे. गड फार मोठा नाही. मंदिराकडे जाताना, डाव्या बाजूस काही घरे तर उजव्या बाजूस मोठा तलाव आहे.

सज्जनगडावर राममंदिर आहे. समर्थांचा मठ डाव्या बाजूला आहे. मंदिर बरेच जुने असून त्याचा सभामंडप लाकडी आहे व त्यास कमानी आहेत. गाभाऱ्यात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान व रामदास अशा पाच मूर्ती आहेत. त्यांना पंचरसमूर्ती असे म्हणतात. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूकडून खाली भुयारात जाण्यास जिना आहे. रामदासस्वामींची समाधी जिन्यातून खाली गेल्यानंतर आहे. समर्थांच्या पितळी पादुका समाधीपलीकडे भिंतीतील कोनाड्यात आहेत. मारुती मंदिर व वेणाबार्इंचे वृंदावन मंदिराच्या मागील बाजूस आहे. समर्थांच्या दुसऱ्या शिष्या आक्काबाई यांची समाधी मंदिराच्या पुढील भागात आहे. आंग्लाई देवीचे मंदिर जवळ आहे.

राममंदिराचे शिखर चुन्या-विटांचे असून, त्यावर उत्तम गिलावा करून जागोजागी चित्रे काढलेली आहेत. मंदिराचे पुजारी जवळच राहतात. समर्थांच्या वस्तू शेजघरात जपून ठेवल्या आहेत. समर्थांचे वास्तव्य त्या घरात होते. त्यांची निजण्याची खोली, पितळी छप्परपलंग, स्वामींची गुप्ती असलेली लांब कुबडी, वेताची उंच काठी, पाण्याची कळशी, तांब्या, भांडे, पळीपंचपात्र अशा, समर्थांनी वापरलेल्या वस्तू जतन केल्या आहेत. ट्रस्टचे कार्यालय मंदिराबाहेर आहे. त्या ठिकाणी राहण्यासाठी खोल्या मिळतात. दुपारी महाप्रसाद असतो.

 (आदिमाता, फेब्रुवारी 2017 वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)

- रंजना उन्हाळे (020) 25459539 ranjana.unhale@gmail.com

रंजना उन्हाळे यांचा जन्म वैराग (तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर) येथे झाला. त्यांनी बी कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे स्तोत्र सुमनांजली भाग 1 ते 9, यात्रा निसर्गाची व धार्मिक स्थळांची भाग 1 ते 6, मेघदूत- एक रसास्वाद, ऋतुसंहार- एक रसास्वाद, स्मरण पंचकन्यांचे, सप्तचिरंजीव अशी वीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या ‘नवग्रहांच्या कक्षेत या पुस्तकाचे आसामी भाषेत भाषांतर सुरू आहे. त्यांच्या ‘सप्तचिरंजीव’ या पुस्तकास पुणे येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या