अमेरिकेत मराठी भाषाशिक्षण (Marathi Language Learning In US)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

अमेरिकेत मराठी भाषाशिक्षण (Marathi Language Learning In US)


विद्या जोशी
अमेरिकेत मराठी शाळा गेली काही दशके चालू आहेत. त्यांचे स्वरूप अनौपचारिक रीत्या भरवलेले वर्ग असे अनेक वर्षे होते. ते आता सुसूत्र संघटित केले जात आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम आखला गेला आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठातर्फे त्यास मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेतील बीएमएम अर्थात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष विद्या जोशी यांनी त्या बाबतीतील माहिती देताना त्या म्हणाल्या, की तशी मराठी शाळा शिकागो येथे स्थापन 2014 साली झाली. त्यावेळी नितीन जोशी हे बीएमएमचे अध्यक्ष होते.
महाराष्ट्रातील लोक नोकरी किंवा व्यवसायानिमित्त कॅनडा, अमेरिका येथे जाऊन 1960 ते 70 च्या दशकात मोठ्या प्रमाणावर वस्ती करू लागले, स्थायिक होऊ लागले, पण ते मराठी भाषा आणि संस्कार विसरू शकत नव्हते. त्यांना त्यांच्या भाषिक समूहाला भेटण्याची आणि त्यांच्या भाषेत व्यक्त होण्याची गरज भासत असे; त्यांना त्यांचे संस्कार टिकवणे महत्त्वाचे वाटे. त्यामुळे मग मराठी वंशाच्या लोकांना एकत्र करण्यासाठी आणि एकमेकांत संवाद घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र मंडळे स्थापन होऊ लागली. ती महाराष्ट्र मंडळे त्यांच्या परीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत. कधी खेळ, कधी पिकनिक, कधी निरनिराळ्या स्पर्धा, मनोरंजन कार्यक्रम यांतून मराठी लोक तेथे स्थिहोत गेले. उत्तर अमेरिकेत ठिकठिकाणी अशी महाराष्ट्र मंडळे कार्यरत आहेत. त्यांतील शिकागो महाराष्ट्र मंडळ हे सर्वात जुने 1969 साली स्थापन झाले. त्यानंतर इतर महाराष्ट्र मंडळे स्थापन झाली.
बृहन्महाराष्ट्र मंडळ या मध्यवर्ती कमिटीची स्थापना मराठी जनांना एकत्र आणण्यासाठी व सुसूत्रपणे कारभार चालवण्यासाठी 1981 साली झाली. आठ महाराष्ट्र मंडळांची कार्यकारिणी शिकागो येथे निर्माण करण्यात आली. सर्व महाराष्ट्र मंडळांना एका छत्राखाली आणले गेले. त्यातूनच पुढे 1984 मध्ये, बृहन्महाराष्ट्र मंडळाने सर्व मंडळांना एकत्र आणून एक संमेलन (सोशल कन्व्हेन्शन) भरवले. त्या संमेलनास प्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या, लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. त्यानंतर प्रत्येक महाराष्ट्र मंडळाने स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे से अनेक कार्यक्रम आखले. त्यात काही सण साजरे करण्याची कल्पना सर्वांनी उचलून धरली. त्याप्रमाणे गणपती, दिवाळी यांसारखे सण साजरे करून रांगोळी, फराळ, आकाशकंदील यांसह मराठी भावगीत, नाट्यगीत यांचे कार्यक्रम रंगू लागले. त्या सर्व कार्यक्रमांना भरपूर प्रतिसाद मिळत गेला. मात्र मराठी जनांची इंग्रजीत शिकणारी मुले त्या समारंभांशी जोडली जात नव्हती. तेव्हा बीएमएमने मुलांना मराठी भाषा शिकवण्यासाठी शाळा स्थापन करण्याचे ठरवले. काही प्रमाणात स्थानिक पातळीवर तसे उपक्रम सुरूही झाले होते. 'बीएमएम, 2020 समी' या नावाने फिलाडेल्फिया येथे संमेलन झाले ते 2007 मध्ये. तेथे मराठी शाळेच्या उपक्रमाला मान्यता मिळाली. बीएमएम कार्यकारिणीने मराठी शाळेसाठी वेगळी समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये सुनंदा टुमणे यांच्या अध्यक्षतेखाली काही मराठी भाषा जाणकारांचा समावेश होता. त्यांच्यावर अमेरिकेतील मराठी शिक्षणाचा मुद्दा पुढे नेण्याचे काम सोपवण्यात आले.
शाळा समितीने भारत आणि अमेरिका येथील शिक्षणतज्ज्ञ, मराठी भाषा जाणकार, पाठ्यपुस्तक मंडळ यांच्याशी चर्चा करून मराठी शाळेसाठी अभ्यासक्रम ठरवला. त्यात आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रम सूचीसुद्धा विचारात घेतली गेली. मराठी वंशाच्या अमेरिकेत वाढलेल्या मुलांसाठी तीन स्तरीय मराठी भाषा अभ्यासक्रम तयार केला गेला. अमेरिकेतील मराठी भाषाशिक्षणाच्या अभ्यासक्रमाला भारती विद्यापीठ (पुणे) यांची मान्यता मिळाली आहे. अभ्यासक्रमाची निश्चिती काही वर्षांमध्ये होत गेली. भाषाशिक्षणाचे प्रयोजन, शिक्षकांचा अनुभव, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, भाषेची वैशिष्ट्ये असे सगळे ध्यानी घेत अभ्यासक्रमाचा मूळ आखलेला मसुदा सुधारत गेला. त्या प्रत्येक टप्प्यावर भारती विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. एकदा अभ्यासक्रम पक्का झाल्यावर त्यानुसार पाठ्यपुस्तकेही तयार करण्यात आली आहेत.
अमेरिकेच्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी
बीएमएमने चालवलेल्या काही मराठी शाळांना त्या त्या राज्यांमध्ये मान्यता मिळाली आहे. बीएमएम मराठी शाळेच्या शाखांचा उपक्रम छत्तीस मंडळांच्या त्र्याहत्तर शाखा एवढा वाढला आहे. प्रत्येक शाळेदोन बॅच असतात. चार ते नऊ वर्षे हा पहिला  वयोगट. दुसऱ्या, दहा ते सोळा वर्षे वयोगटाच्या बॅचमध्ये मुले अधिक असतात. अभ्यासक्रम गेल्या काही वर्षांत विकसित होऊन पाच स्तरीय झाला आहे. शाळा आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी किंवा रविवारी असते. ती साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होऊन मे-जूनपर्यंत चालते. हौशी शिक्षक आणि स्थानिक मंडळी शाळेकडे लक्ष देतात. तेथे तोंडी परीक्षेवर भर असतो. कारण भाषा ही बोलण्यासाठी शिकायची आहे हे शाळांचे मुख्य प्रयोजन! मराठी पुस्तके वाचावीत ही अपेक्षादेखील असते आणि थोडेफार लिहिता आले तर उत्तमच! बीएमएमच्या सुनंदा टुमणे कॉर्डिनेटर म्हणून काम करतात.
शाळांमध्ये केवळ भाषेचे शिक्षण दिले जात नाही, तर मुलांची मराठी संस्कृतीशी नाळ जोडली जाते. उदाहरणार्थ त्यांना हस्तकला या विषयात शाडूचे गणपती तयार करणे, गुढी बनवणे, रांगोळी काढणे असे उपक्रम शिकवले जातात; मराठी सणांची आणि पोषाखांचीही माहिती दिली जाते. मुले रामायणाची कथा, शिवाजीच्या शौर्यकथाही सांगू शकतात. अमेरिकेत काही ठिकाणी भारतीय शास्त्रीय नृत्याचे वर्ग चालतात. शास्त्रीय गायन, भावगीते ही तरुण मुले ऑनलाइन शिकतात. त्यामुळे ती तरुण मुलेही मराठी संस्कृतीशी जोडली गेली आहेत. त्यांच्या लेचा आविष्कार वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमिताने होत असतो. बीएमएमच्या संमेलनांमध्ये मराठी संस्कृतीचे उत्तम दर्शन दिसून येते. पोशाख खास मराठी असतात. जेवणात पारंपरिक मराठी पदार्थांची रेलचेल दिसते. काही तरुणी नऊवारी साड्या नेसून मिरवतात. बीएमएमच्या अधिवेशनात मराठी शाळांसाठी काही वेळ दिलेला असतो. त्यात मुले समूहगीत, पोवाडा गाऊन मराठी संस्कृती दाखवून देतात. शिवाजीराजांच्या जीवनावर एखादे नाट्य किंवा रामायणातील एखादा प्रसंगही सादर करतात.
महाराष्ट्रात मराठी शाळा एकामागून एक बंद होत असताना, अमेरिकेत मात्र मराठी भाषा आणि संस्कृती रुजवण्याचे प्रयत्न वाढत आहेत. तेवढेच नव्हे तर तेथे 1 मे रोजी सर्व मराठी विद्यार्थ्यांना घेऊन 'महाराष्ट्र दिन'सुद्धा थाटात साजरा होत असतो. मूळ मराठी मुलांनी ढोलताशांची पथकेही हौसेने तयार केली आहेत.
आपल्या भाषेत व्यक्त होता येणे हे केवढे मोठे सुख आहे हे अमेरिकेत गेल्यावर कळते असे विद्या जोशी म्हणाल्या.
- मेघना साने 98695 63710 
meghanasane@gmail.com

मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर नाट्यसंपदाच्या 'तो मी नव्हेच'सुयोगच्या 'लेकुरे उदंड झाली' या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी 'कोवळी उन्हे' या स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------------------



 ---------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या