शिकागोची मराठी शाळा (Marathi School At Chicago)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

शिकागोची मराठी शाळा (Marathi School At Chicago)


विद्या जोशी यांनी शिकागो येथीशाळा 2014 साली स्थापन केली. चाळीस विद्यार्थ्यांपासून सुरु झालेली ती शाळा आता दोन बॅचेसमध्ये चालते. त्या शाळा नेपरव्हिल आणि शॉनबर्ग येथे असून 2020मध्ये एकूण एकशेचाळीस विद्यार्थीसंख्येपर्यंत गेली आहे." शाळा चालू ठेवण्याकरता अनेक स्थानिक शिक्षक आणि स्वयंसेवक झटत असतात. शिकागो मराठी शाळेत शिक्षणाचा दर्जा उत्तम सांभाळला गेला आहे. त्यामुळे शिकागो ज्या राज्यात आहे त्या इलिनोईस स्टेट ऑफ बोर्डकडून मराठी भाषेला फॉरेन लँग्वेज म्हणून मान्यता मिळाली आहे. मराठी शाळेतील परीक्षेचे मार्क क्रेडिट म्हणून हायस्कूल प्रवेशासाठी गृहित धरले जातात.
शिकागो मराठी शाळेचा कारभार सुलक्षणा कुलकर्णी पाहतात. त्या म्हणाल्या, "मुलांसाठी कार्यक्रम बसवणे हा आनंदमय सोहळा असतो. रामायण असो की शिवाजी महाराजांवरील नाट्य असो, नाटकाचा बॅकड्रॉप, त्याचा सेट तयार करत असताना पालक आनंदाने सहभागी होतात; त्याबरोबर मुलेसुद्धा. त्यांनाही सेटची माहिती मिळते. कार्यक्रमात जवळ जवळ सर्व मुलांना सहभागी करून घेण्याकडे आमचा कल असतो."
संज्योत बोरकर शिकागो मराठी शाळेच्या शिक्षिका आहेत. त्या त्यांच्या पाच वर्षांच्या अनुभवावरून सांगत होत्या, की "सुरुवातीला मुले मराठी शाळेत येण्यास तेवढी उत्सुक नसतात, पण पालक मराठीच्या प्रेमाखातर त्यांना शाळेत सोडून जातात. शाळेत मुलांना त्यांच्या वयाचे आणि त्यांच्यासारखे मराठी बोलणारे मित्र मिळतात आणि त्यांना शाळा त्यांची वाटू लागते. परदेशस्थ मराठी मंडळींना त्यांचा भाषिक समाज भेटणे आणि त्यांच्या समान संस्कृतीची माणसे भेटणे ही मोठीच चैन असते. आम्ही महाराष्ट्रातून बालभारतीची पुस्तके मागवतो, पण जास्त भर संभाषणावर असतो. कारण मुलांना मराठी संभाषण हे शाळेतच शक्य आहे. मुलांना शाळेतून बाहेर पडल्यावर ती भाषा वापरण्यास आणि सुधारण्यास वाव नसतो. त्यांचे आजी-आजोबा त्यांच्या घरी भारतातून कधी तरी येतात. मुलांना मराठी बोलण्यातून शिकवणे असल्यामुळे पुस्तकातील धडेही नाटक किंवा संवादरूपात सादर करून शिकवण्यात येतात. तयार व्हिडीओ वगैरे न वापरता मुलांच्या क्रिएटिव्हिटीला वाव दिला जातो. मुलांना मराठी उच्चार करणे सुलभ जावे म्हणून पहिल्या वर्षी
त्यांच्याकडून गणपती अथर्वशीर्ष म्हणवून घेतले जाते." टॅम्पा मराठी शाळेच्या शिक्षिका वृषाली पेडणेकर म्हणाल्या, की "शाळा सुरु होताना आम्ही जन-गण-मन म्हणतो आणि शाळा सुटण्यापूर्वी सर्व विद्यार्थी पसायदान म्हणतात."
विद्या जोशी या बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्या बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळेचे संपर्क अधिकारी म्हणूनही काम पाहतात. विद्या जोशी यांना शिकागो शाळेला चालना दिल्याबद्दल 2017च्या बीएमएम संमेलनात उत्कृष्ट शिक्षिका म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.
- मेघना साने 98695 63710
meghanasane@gmail.com

मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर नाट्यसंपदाच्या 'तो मी नव्हेच'सुयोगच्या 'लेकुरे उदंड झाली' या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी 'कोवळी उन्हे' या स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या