पुण्याच्या पानपट्टीचा अनोखा ब्रँड (‘Traditional Eatable Paan’ In Modern Brand)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

पुण्याच्या पानपट्टीचा अनोखा ब्रँड (‘Traditional Eatable Paan’ In Modern Brand)


ज्ञानेश्वर पगारे
पुण्याच्या माऊली पानपट्टीने पुणेकरांच्या जीवनात दोन-पाच वर्षांत वेगळेच स्थान मिळवले आहे. पौड रोडवरील पानाच्या टपरीपासून सुरू झालेला पानपट्टीचा तो ब्रँड आता पुण्यात पाच ठिकाणच्या दुकानात मिळतो. थुंकण्याची गरज नसलेले व पचनाला पोषक अशा या पानपट्टीची कल्पना ज्ञानेश्वर पगारे यांची. ते ग्रंथालयशास्त्र शिकलेले, कॉलेजच्या ग्रंथालयात काम करणारे, परंतु ती नोकरी करता करता त्यांनी शिर्डीला पानपट्टीचे दुकान चालवले व तेथेच त्यांच्या डोक्यात या अभिनव पानपट्टीची कल्पना शिजली. त्यांचा मुलगा भरत पुण्यात फार्मसी शिकण्यास आला तेव्हा त्यांनी त्याच्यामार्फत पौड रोडला पानाचा ठेला चालवला आणि डेक्कन जिमखान्यावर पहिले दुकान थाटले.
पानाचे दुकान म्हणजे बिहारी किंवा युपीच्या भय्याने मोठ्या पितळी ताटात हारीने मांडून ठेवलेली चकचकणारी पितळी भांडी आणि त्याच्या हातातील पानविडा बनवून कळकट्ट झालेला टॉवेलचा तुकडा! पण माऊली फॅमिली पान हाऊसमध्ये वेगळेच चित्र दिसते. बाहेरून दिसणार्‍या रंगीत कागदांच्या चिटोर्‍यांवर रसिक पानखवय्यांच्या इन्स्टंटमजेशीर प्रतिक्रिया होत्या - जणू एकाद्या दिग्गज गवयाचे गाणे ऐकल्यानंतर रसिकांनी उत्स्फूर्तपणे दिलेली दादच ती! मी दुकानात शिरले तेव्हा व्यवस्थित कपडे घातलेले, गळ्यात अॅप्रन बांधलेले पानवाले काका हसतमुखाने माझे स्वागत करते झाले. पानवाले काका म्हणजेच ज्ञानेश्वर लक्ष्मण पगारे.
पानवाले काका मूळ नगर जिल्ह्याच्या कोपरगावचे. ते के.जे. सोमय्या कला-वाणिज्य महाविद्यालय (कोपरगाव) येथे नोकरी 1979 पासून करत होते. तेथे त्यांनी साधी साधी कामे करत असताना, पुणे विद्यापीठातून बी लिब, एम लिब परीक्षा दिल्या व ते लायब्ररी असिस्टंट पदापर्यंत पोचले. त्यांच्या नोकरीची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशी असे. कुटुंब मोठे, त्यामुळे त्यांच्या पगारात घरखर्च भागत नव्हता. सायंकाळी पाचनंतर त्यांच्या हाताशी बराच वेळ राहत होता. त्यांनी पानाचा ठेला कोपरगावपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिर्डीत सुरू केला- अगदी छोट्या स्वरूपात. तो धंदा बर्‍यापैकी चालू लागला. त्यांच्या मुलाचे- भरतचे बी फार्मसीचे शिक्षण झाल्यानंतर, त्याला एम फार्मसीचे शिक्षण घेण्यासाठी एमआयटी कॉलेज (पुणे) येथे प्रवेश मिळाला. काकांची मुलाला त्याचा शैक्षणिक खर्च-राहणे-खाणे यांसाठी लागणारे पैसे पुरवताना ओढाताण हो. त्यामुळे त्यांनी भरतला त्याने पानाचा छोटा स्टॉल लावावा असे सुचवले. भरतलाही काकांची सूचना आवडली. त्याने त्याचे पानपट्टीचे दुकान तो पुणे येथे राहत असलेल्या इमारतीसमोर फूटपाथवर सुरू केले. त्यातून त्याला थोडे पैसे सुटू लागले. त्याचा शिक्षणाचा, राहण्या-खाण्याचा खर्च निघू लागला; फायदाही होऊ लागला. त्यामुळे भरतने तोच व्यवसाय पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. काकाही सेवानिवृत्तीनंतर पुण्यात आले. त्यांचा माऊली फॅमिली पान हाऊसहा ब्रँड झाला आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेत दोन, गंगाधाम चौक, मार्केट यार्ड, मुंढवा येथे प्रत्येकी एक अशा त्यांच्या पाच शाखा आहेत.
पानात वापरल्या जाणार्‍या तंबाखूमुळे पान खाणे आधुनिक काळात टाळले जाते हा काकांचा अनुभव होता. शिवाय, परंपरेने पान ही गोष्ट पचनक्रिया सुधारण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. म्हणून काकांनी कल्पना लढवून पचनासाठी मदत करणारे, लवंग-दालचिनी असे मसाले घालून पान तयार केले. तो प्रयोग यशस्वी झाला. तेव्हा ते वेगवेगळे आयुर्वेदिक मसाले वापरून पानांचे विविध प्रकार तयार करू लागले. त्यांच्याकडे मिळणार्‍या पानांमध्ये आठशेएक्याण्णव इतके विविध प्रकार आहेत! आयुर्वेदिक चौतीस मसाला आणि सोळा आयुर्वेदिक पावडरी यांचे मिश्रण केलेले, पचनास पूरक असे ते पानांचे प्रकार लोकप्रिय होऊ लागले आहे. स्वीट पानांत साठ फ्लेवर्स, चॉकलेट पानांत सत्तावीस फ्लेवर्स आहेत. पानांचे फ्रूट पान, गुलकंद पान असे वेगवेगळे प्रकार तेथे मिळतात. महिलांनी पानाच्या दुकानात जाणे फारसे प्रशस्त मानले जात नस. परंतु काकांच्या पानाची चव महिलांना, लहान मुलांना इतकी आवडते, की त्यांच्या दुकानी येणाऱ्या महिला/मुलांची संख्या लक्षणीय रीत्या वाढली आहे. काका म्हणाले, की गोडपणा आणि सुगंध असल्यामुळे महिलावर्गाचे प्रमाण अधिकच वाढत आहे. कुल्फीपान, कोकोनट स्पेशल, चॉकलेटवडी, चॉकलेट कँडी या फ्लेवर्सची पाने मुलांमध्ये प्रिय आहे.
त्यांच्याकडील गिऱ्हाइकांमध्ये पुण्यात शिकण्यास येणार्‍या युपीएससी/एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही भरपूर आहे. त्या विद्यार्थ्यांमधील अनेक मुलांनी पान कधी चाखलेही नव्हते, पण इकडे विविध फ्लेवर्सची पाने खाऊन त्यांना पान खाणे आवडू लागले आहे. पानवाले काका गिऱ्हाइकाने वर्षभर रोज जरी पान खाल्ले तरी कोठलाही फ्लेवर रिपीट होणार नाही असा दावा करतात. ते म्हणाले, की पानामध्ये कोठल्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत. नैसर्गिकपणे मिळणारे फ्लेवर्स; शी, फळे पान तयार करताना वापरले जातात. त्यांच्याकडे थुंकण्याचे पान मिळत नाही. पान खाऊन थुंकणेह्या कन्सेप्टला त्यांच्या पानामुळे काट मिळतो. पानात मसाले, तसेच सुकामेवा घालून ते सजवले जाते. त्यांच्या पानाची किंमत साधारण वीस रुपयांपासून आहे.
भरतने एम फार्म, एमबीए शिक्षण पानाचा ठेला चालवत पूर्ण केले आहे. त्याचा पानाचा ठेला म्हणजे सुरुवातीला फक्त टेबल होते, टेबलावर पितळी भांडे वगैरे पानठेल्याचे सगळे सामान असे. मात्र गुटखा-तंबाखू यांची विक्री त्याने कधीच केली नाही. त्याबरोबर तो मुलांच्या शिकवण्याही घेत असे. दिवसभर कॉलेज, संध्याकाळी शिकवण्या व रात्री बारापर्यंत चार तास पानाचा ठेला असा त्याचा दिनक्रम होता. तो म्हणाला, की माझे वडील उद्योगी होते व कष्टही अमाप करत. तेच गुण माझ्या अंगी आले आहेत.
सर्व पगारे कुटुंब आईवडील, भरत, गौरव, बहीण पूनम हे आता एकत्र बिबवेवाडी येथे राहतात. भरतचे लग्न झाले आहे. त्याला चार वर्षांचा मुलगा आहे. गौरव आयटीआय शिकला आहे, पण आता तो दुकानातच बसतो. पूनम सीएच्या टर्मस् भरत आहे. पगारे यांचे कुलदैवत रेणुकामाता. माहुरची देवी आणि तुळजाभवानी यांना परंपरा म्हणून पानाचा विडा दिला जातो. माहुरच्या देवीला पान पाटा-वरवंट्यावर वाटून ते भक्तांमध्ये वाटण्याची प्रथा आहे. म्हणून काका धंद्याला सुरुवात करताना देवीला पानाचा विडा अर्पण करता. काका नवीन कन्सेप्ट घेऊन बाजारात आले. त्यामुळे जम बसण्यासाठी त्यांचा वेळ गेला, परंतु आता त्यांना समाधान वाटते.
भरत पगारे 8087502449
bharatpagare30@gmail.com                       
- मंगला घरडे 9763568430
लेखक परिचय -
मंगला भगवान घरडे या पुण्‍यात कात्रज परिसरात राहतात. त्‍यांनी पुणे विद्यापीठातून मराठी भाषेतून एम.ए.ची पदवी मिळवली आहे. त्‍यांनी यशवंतराव चव्‍हाण मुक्‍त विद्यापीठातून 'डिप्‍लोमा इन जर्नालिझम'चा पद्व्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम पूर्ण केला आहे. मंगला घरडे एका खासगी कंपनीत काम करतात. त्‍यांना वाचन आणि लेखनाचा छंद आहे.
----------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या