यशवंतराव आणि हॅम्लेट (Did Y B Chavhan face Hamlet's crisis in public life?)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

यशवंतराव आणि हॅम्लेट (Did Y B Chavhan face Hamlet's crisis in public life?)

 


यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते मुरब्बी राजकारणी व दूरदृष्टीचे समाजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्रातील माळावरचा माणूसउभा केला, सहकाराचे अमृत सर्वसामान्यांपर्यंत पोचवले, शिक्षणाचा संदेश घरोघरी नेला - त्यांनी हवालदिल शेतकऱ्यांसाठी कसेल त्याची जमीनहा कायदा राबवून त्याची मातीशी जोडलेली नाळ घट्ट केली. त्यांनी विविध कल्याणकारी योजना राबवून स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीची पायाभरणी केली. त्यांनी बेरजेचे राजकारण केले आणि महाराष्ट्रातील आम माणसाला परिवर्तनाच्या नव्या लाटेत सामील करून घेतले. महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे त्याचे मोठे श्रेय यशवंतरावांच्या कार्यक्रमाधिष्ठित राजकारणाला व त्यांच्या ध्येयवादाला जाते. त्यांची प्रतिमा एक यशस्वी राजकीय नेता अशी तयार झाली आणि त्यांची वाटचाल राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने कळत नकळत सुरू होत गेली. ते जवाहरलाल नेहरू यांच्या हाकेला प्रतिसाद देत दिल्लीला गेले. मात्र तेथे त्यांच्या जमेच्या राजकीय बाजूच त्यांच्या अंतिम यशाच्या आड आल्या ! तो सल त्यांनीच त्यांच्या वेणुतार्इंना लिहिलेल्या एका पत्रातून व्यक्त केला आहे.

टी.व्ही. कुन्हीकृष्णन यांच्या चव्हाण ॲण्ड द ट्रबल्ड डिकेडया ग्रंथात त्यांच्याबद्दल एक वाक्य आढळते...‘There is in him a certain thin streak of the quality of Hamlet.’ त्याचा अर्थ हॅम्लेटच्या मानसिक संघर्षासारखा यशवंतरावांचाही मानसिक संघर्ष कधी तरी झाला असला पाहिजे किंवा अधून-मधून होत राहिला असला पाहिजे. मी यशवंतरावांवर वाचन-मनन दीर्घ काळापासून करत होतो, पण त्यांनी त्यांच्या मानसिक संघर्षाबद्दल लिहिल्याचे किंवा बोलल्याचे एखादे उदाहरण सापडत नव्हते. मात्र, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात (13 मार्च 2012 ते 12 मार्च 2013) त्यांच्यावरसाहित्यिक यशवंतरावहा ग्रंथ लिहिताना त्यांचे 4 मे 1975 रोजीचे माँटेगो बे (जमैका) येथून लिहिलेले पत्र आढळले आणि कुन्हीकृष्णन यांच्या विधानाची प्रचीती मलाही आली.

यशवंतरावांना त्यांच्या भरगच्च राजकीय कारकिर्दीत फार कमी वेळा फुरसतीचे, विश्रांतीचे, विरंगुळ्याचे क्षण मिळत असत. त्यांना कराडच्या प्रीतिसंगमावर, दौऱ्यावेळी लोकांच्या सान्निध्यात आणि निसर्गात थोडा निवांतपणा मिळत असे. ते परदेश दौऱ्यावर असताना स्वदेशापासून खूप दूर असल्यामुळे स्वत:कडे व भारतीय राजकारणाकडे तटस्थपणे व वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहू शकत असत. ते त्या एकटेपणात सर्जनशील निर्मिती करत असत- मग ती वाचनाच्या माध्यमातून असेल किंवा लेखनाच्या.

यशवंतरावांचे उल्लेख केलेले पत्र त्यांनी त्यांच्या सत्ताराजकारणाच्या जवळजवळ शेवटी लिहिले आहे. हॅम्लेटचे स्वगत हे त्याने स्वत:शी केलेले संभाषण आहे, तर यशवंतरावांचे हे पत्र (आणि इतरही) म्हणजे वेणुतार्इंशी त्यांनी केलेले संभाषणच आहे. त्या पत्राच्या शेवटी ते म्हणतात, ‘हे सर्व लिहीत असताना तू समोर बसली आहेस, असे मला एकसारखे वाटत होते.’ (विदेश दर्शन, पृष्ठ140). यशवंतरावांनी त्या पत्रातून केलेले आत्माविलोकन, आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण, आत्मसमीक्षा व जीवनसमीक्षा हे त्यांच्या संवेदनशीलतेचे व सदसद्‌विवेक बुद्धीचे प्रतीक आहे.

हॅम्लेटचा मानसिक संघर्ष काय होता? त्याच्या जीवनात अशी एक वेळ येते, की हॅम्लेट डेन्मार्कमधील लोकांचे भ्रष्ट, दुटप्पी वर्तन पाहून संतापतो. त्याला अशा जगात कसे तरी जगण्यापेक्षा मेलेले बरे असे वाटू लागते आणि त्याचे प्रसिद्ध असे 'To be, or not to be' that is the question' हे स्वगत येते. त्या स्वगतात हॅम्लेटचा वैचारिक कल्लोळ व मानसिक संघर्ष व्यक्त झाला आहे. तेथे तो मानवी अस्तित्वासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करतो. कसेतरी रडत-कुढत जगण्यात काही उदात्तता आहे का? काळाने केलेला तिरस्कार, त्याच्या चाबकाचे फटकारे, जुलमी माणसांचा अन्याय व अत्याचार, भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांचा उद्दामपणा, कायद्याचा विलंब इत्यादी गोष्टी सहन करत जगण्यात काही अर्थ आहे का? माणूस तशा जीवनातील दु:ख सहन करत असतो, कारण मृत्यूनंतर येणाऱ्या अज्ञात दु:खापेक्षा ते ज्ञात दु:ख केव्हाही बरेच म्हणायचे, अशी त्याची समजूत होते.

हॅम्लेटला तो रंगभूमीवर एकटाच असताना त्याच्या अत्यंत खासगी भावना व्यक्त करण्यास ती वेळ योग्य वाटते, तर माँटेगो बे (जमैका)च्या निवांत वातावरणात सागराला साक्ष ठेवून यशवंतराव त्यांच्या मनाचे कप्पे उघडू-उलगडू लागतात. त्यांच्या जिव्हाळ्याच्या भावना, राजकारणात उपसलेले कष्ट, लोकांकडून आलेले भलेबुरे अनुभव, लोकांचे स्वार्थ, वरिष्ठांकडून झालेला अवमान-अपमान-अवहेलना व त्यातून आलेली अगतिकता इत्यादी गोष्टी व्यक्त करताना यशवंतराव अंतर्मुख होतात आणि ते स्वत:लाच हॅम्लेटप्रमाणे धारेवर धरतात. त्यांच्या त्या अंतर्मुखतेला प्रांजळपणाची झाक असल्यामुळे ती पराकोटीची उंची गाठते.

हॅम्लेटची प्रश्नार्थी मनस्थिती त्याच्या स्वगतात सर्वत्र व्यक्त होते. यशवंतरावांच्या प्रश्नार्थी मनस्थितीचे दर्शन त्यांच्या पत्रातही घडते. त्या पत्राची सुरुवातच मुळी अशी आहे- गेले दोन-तीन दिवस अनेक प्रश्नांनी माझ्या मनात काहूर मांडले आहे. त्या प्रश्नांची उत्तरे काय आहेत, कोण जाणे; पण प्रश्न तरी नेमके काय असू शकतील हे एकदा कागदावर मांडून पाहवे, असे मनात आले आहे. हॅम्लेट त्याच्या भोवतीची माणसे, त्यांचे राजकीय डावपेच, ढोंगी मित्र, आई-चुलता-प्रेयसी या सर्वांबद्दल साशंक, संशयी बनतो; तो वेळ आल्यावर त्यांच्याबद्दल कटू प्रतिक्रिया व्यक्त करतो. यशवंतरावांच्या दीर्घ काळच्या राजकारणात माणसांचे थवेच्या थवे त्यांच्या आजूबाजूला राहिले. ते त्यांच्या स्वत:च्या, त्यांतील काही लोकांच्या वर्तनाबद्दल तत्त्वचिंतकाच्या भूमिकेतून संशय व्यक्त करत राजकीय कारकिर्दीच्या मुळालाच हात घालतात. जे आपणासाठी कोणी केले नाही ते आपण इतरांसाठी करावे आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असताना ते जर केले, तर अधिक फलदायी होते. म्हणून अधिक मित्रभावाने, हळुवारपणे पण विचारांच्या दिशा कायम ठेवून माणसे मी वागवली आणि वाढवलीही... हे सर्व ठीक आहे. पण आज मी जेव्हा राजकारणाचे चित्र पाहतो, तेव्हा माझे मन अस्वस्थ होते. आपण काही नव्या कामाचा पाया घातला होता का? खरी, जिव्हाळ्याची माणसे अवतीभोवती होती का? काही माणसांचे नमुने पाहिले म्हणजे आश्चर्यही वाटते- खरे म्हणजे दु:ख होते. (विदेश दर्शन, पृष्ठ137)

हॅम्लेटदेखील उद्वेगापोटी एके ठिकाणी म्हणतो- What a strange piece of work is a man! हॅम्लेटच्या चुलत्याने त्याला डेन्मार्कच्या गादीपासून (त्या गादीचा तो खरा वारसदार असूनही) दूर ठेवले आहे. त्याचा चुलता इतरांच्या साह्याने हॅम्लेटविरूद्ध कटकारस्थाने करतो, त्याला ठार मारण्याची योजनाही आखतो. हॅम्लेटला तशा सत्तालोभाचा, सत्तास्पर्धेचा वीट येतो. तशी राजकीय परिस्थिती सर्वत्र सर्व काळी आढळते. यशवंतरावही तशाच प्रकारच्या राजकीय अनुभवातून काही अंशी गेले होते. यशवंतराव तो अनुभव आणि त्या नंतरची त्यांची भावना शब्दबद्ध करताना लिहितात, ‘आज अनेकांची धडपड सत्तास्थानावर राहण्याची चालू आहे. जे आहेत ते तेथेच कसे राहता येईल यासाठी साधनशुचितेचा कसलाही विचार न करता अगदी क्रूरपणे कारस्थाने करताहेत... तसल्या कारस्थानात अप्रत्यक्षपणे सामील न होता किंवा त्या कारस्थानाचे बळी होण्यापूर्वीच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन बाजूला झाले तर बरे नाही का- असा प्रश्न मनात घोळत आहे.’ (विदेश दर्शन, पृष्ठ 137)

हॅम्लेटचा चुलता क्लॉडियस हा हॅम्लेटच्या वडिलांचा खून करून व हॅम्लेटचे राजेपद हिरावून घेऊन स्वत: डेन्मार्कचा राजा बनलेला असतो. त्याने हॅम्लेटला डेन्मार्कच्या मुख्य सत्ताकेंद्रापासून दूर ठेवलेले आहे. तो हॅम्लेटला विश्वासात घेत असल्याचे नाटक करतो, त्याला चुचकारतो, त्याच्याशी गोड-गोड बोलतो. त्याने हॅम्लेटच्या सर्व हालचालींवर पाळत ठेवलेली असते. यशवंतराव यांची ओळख जनाधार लाभलेले व पुरोगामी चेहरा असलेले नेते अशी देशाला होती. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या राजकारणात कित्येक मित्र होते तसे छुपे आणि उघड प्रतिस्पर्धीही होते. यशवंतरावांतील वक्ता आणि नेता जनमानसावर व वरिष्ठांवर मोठा प्रभाव टाकून गेला. लोकांतून उगवलेले-उभारलेले ते नेतृत्व नेहरू यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. त्यांच्या विनंतीवरून यशवंतराव हिमालयाच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा सह्याद्री बनून, छातीचा कोट करून गेले, पण दिल्लीत सारे काही आलबेल होते असे नाही. जेथे सत्ता आहे तेथे कमालीची स्पर्धा आली आणि स्पर्धेत ऊरस्फोडी व कुरघोडी आली. सुसंस्कृत मनाचे, घरंदाज स्वभावाचे यशवंतराव त्या स्पर्धेत पडण्यास मुळी तयारच व्हायचे नाहीत. सत्ता नेहमी त्यांच्याकडे चालत आली. ते कृतज्ञतेने मान्य करतात, कीपुढल्या वर्षी तीस वर्षे होतील, जेव्हा मी पहिली निवडणूक जिंकून सरकारमध्ये आलो. अनेक अडचणी आल्या, परिश्रम करावे लागले. अनेकांचे आशीर्वाद मिळाले. नावलौकिक मिळाला. सत्तेची अनेक स्थाने पाहिली- राज्यात आणि केंद्रातही. सर्वसामान्य अर्थाने कोणालाही हेवा वाटावा अशी!

 

हॅम्लेट ज्या परिस्थितीतून जात आहे, त्याच परिस्थितीतून यशवंतरावही जात होते. दोघांचेही Political alienation प्रकर्षाने जाणवते. प्रवाहाला दिशा देण्याचे, प्रवाहावर मात करण्याचे- नव्हे, स्वत:च प्रवाह बनण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगात आहे; त्याला किनाऱ्यावर केवळ उभे केले तर तो अस्वस्थ होणार, धुमसणार, हे उघडच आहे. यशवंतरावांना त्या टप्प्यावर सत्तेचा मोह नाही, कारण त्यांनी ती त्यापूर्वी मनमुरादपणे व औदार्याने जनतेसाठी वापरली आहे. हॅम्लेट आणि यशवंतराव या दोघांनाही सत्तेपासून दूर ठेवल्याचे व मुद्दाम दुर्लक्षित केल्याचे दु:ख आहे. यशवंतराव लिहितात, श्रीमतीजी (इंदिराजी) अजून महत्त्वाच्या कामात सल्ला-मसलत घेतात. पण सत्तेच्या केंद्रवर्तुळाच्या बाहेर ठेवण्याचा समजेल असा प्रयत्न करतात, असा अनुभव आहे. मग मन धुमसत राहते. असे अपमानित राहण्याने मी ज्यांचा प्रतिनिधी आहे असे मानतो, त्यांचाही अवमान तर नाही ना होत, अशी बोचणी असते.

हॅम्लेटचे मन दुभंगलेले आहे. तो व्यक्तिगत जीवनात निराश आहे, तर तो डेन्मार्कमधील राजकीय व सामाजिक परिस्थितीबद्दल नाराज आहे. या जगात डेन्मार्क आहे; पण डेन्मार्कमध्येच तो जग पाहू लागतो, एकूण जीवनाची समीक्षा करू लागतो. हॅम्लेटला डेन्मार्कच्या भ्रष्ट व बुरसटलेल्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात गुदमरल्यासारखे वाटते. म्हणून तोडेन्मार्क इज अ प्रिझनअसे म्हणतो. यशवंतरावांनाही बदललेल्या तत्कालीन भ्रष्ट भारतीय राजकारणात आणि ऐतिहासिक ध्येयधोरणापासून दूर जात असलेल्या काँग्रेस पक्षात घुसमटल्यासारखे वाटते. त्यांची द्विधा मनस्थिती आणि मानसिक संघर्ष तसाच व्यक्त झाला आहे- आम्ही साऱ्यांनी वैयक्तिक विचार करूनच वागणे योग्य आहे का, असा संघर्ष मनात चालू आहे. निवडणुकीला उभे राहू नये आणि लोकांत काम करत राहवे- किंवा निवडणूक करून ती जिंकून सत्तेबाहेर राहवे असे दोन पर्याय आहेत. कोणता स्वीकारावा? पण निवडणुका तरी होणार आहेत का?... सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर आजची शक्ती राहणार नाही. लोकांची दृष्टी बदलेल. ते दूर होतील. साधनांची कमतरता होईल आणि मग मनाने कष्टी होऊन एकाकी पडावे लागेल, हेही शक्य आहे. पण त्याची तयारी नको का करायला?’

हॅम्लेट त्याच्या मृत्यूच्या काही क्षण अगोदर त्याच्या 'To be, or not to be'  या भूमिकेवरून 'Let it be'  या तडजोडीच्या भूमिकेवर येतो. तो डेन्मार्कच्या भवितव्याचा विचार करू लागतो. यशवंतरावही तशाच पद्धतीने व्यवहारवादी भूमिकेतून भारताच्या भवितव्याचा विचार करताना दिसतात. ते म्हणतात, ‘असा वैयक्तिक भावनांचा विचार करून निर्णय घ्यावयाचे नसतात. राष्ट्रीय कार्य करत असताना स्वत:ला विसरले पाहिजे- भविष्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. रागाने मोडता येते, जोडता येत नाही. तडजोडीने वागले पाहिजे, असा विचार करून मग काम चालू राहते... पण खऱ्या अर्थाने काम चालू आहे का? की, एका व्यक्तीचा अहंकार सुखावण्यासाठी हे सर्व चालू आहे?... मला हेही कबूल केले पाहिजे, की श्रीमतीजी (इंदिराजी) माझ्याशी कधी सूडाने वागल्या नाहीत. त्यांनी फेअर वागणे म्हणतात तसे गेली सहा वर्षे माझ्याशी व्यक्तिश: वर्तन केले. पण ते सगळे वैयक्तिकच ना? सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात जी तत्त्वे मानली, त्यांच्या भविष्याचे काय?’

हॅम्लेट मरणासन्न अवस्थेतही डेन्मार्कच्या गादीचा व डेन्मार्कच्या कल्याणाचा विचार करतो आणि नॉर्वेचा तरुण फॉर्टिनब्रास हा डेन्मार्कच्या गादीचा वारस होण्यास योग्य आहे, असे तो त्याचा मित्र होरॅशियोला सांगतो. तो म्हणतो, 'I do prophesy the election lights on Fortinbrass. He has my dying voice.' यशवंतरावांनी ज्या काँग्रेसला त्यांचे सर्वस्व मानले व त्यांचे सर्वस्व वाहिले- ती काँग्रेस एकाधिकारशाहीच्या मार्गाने चालली होती, निवडणुका जिंकण्याचे यंत्र बनत चालली होती. यशवंतरावांचे मन तशा प्राण हरवलेल्या अखिल भारतीय काँग्रेसमध्ये रमत नव्हते. त्यांना ती काँग्रेस सुधारणेपलीकडे गेल्याचे वाटत होते. म्हणून त्यांच्या मनात निदान महाराष्ट्र काँग्रेस तरी त्या अधोगतीपासून वाचवावी असा विचार आला होता आणि तो त्यांनी सदरील पत्रात व्यक्त केला आहे. आणि मला महाराष्ट्र काँग्रेस पक्षालाच मार्ग दाखवला पाहिजे. छुपे शत्रू आणि आज वरवर दिसणारे मित्रही लांब जातील, विरोध करतील- हे सर्व समजून-उमजून निर्णय घ्यावा लागेल.यशवंतरावांची प्रेरणा महाराष्ट्रातील तेव्हाच्या पुलोद सरकारला होती हे काही अंशी तरी या अवतरणावरून सिद्ध होऊ शकेल.

यशवंतरावांचे हे पत्र म्हणजे त्यांचे आत्मावलोकन आहे; तसेच, ते त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाचे सिंहावलोकनही आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था माँटेगो बे येथील हॅपी डेजया बंगल्यात केली होती. बंगल्यातून समोरचा शांत सागर त्यांच्या दृष्टीस पडत होता... पण मनात काही कढ येत होते, काही लाटा उसळत होत्या. हॅपी डेजया बंगल्यातील वास्तव्यात मन प्रसन्न असताना त्यांना भूतकाळातील काही दु:खद व खेदमय क्षणांची आठवण यावी याला मानसशास्त्रीय स्पष्टीकरण आहे. तरीही आंग्ल कवी शेली यांच्या शब्दांत त्या मनस्थितीचे वर्णन समर्पकपणे करता येईल.

'We look before and after,
And pine for what is not;
Our sincerest laughter
With some pain is fraught;
Our sweetest songs are those that tell of saddest thought.'

(साधना, 27 मार्च 2021 वरून उद्धृत, संस्कारित)

- सहदेव चौगुले-शिंदे 9823431282 dr.sahadeochouguleshinde@gmail.com

सहदेव आबासाहेब चौगुले-शिंदे हे प्राध्यापक-लेखक आहेत. ते कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील भेडसगावचे. ते राहतात कोल्हापूरला. त्यांनी बी ए, एम ए (इंग्रजी), एलएल बी, पीएच डी असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी वकिलीची सनदही घेतली, पण त्यांनी प्रॅक्टिस केली नाही. त्यांनी इंग्रजी विषय बार्शी, वारणानगर, निपाणी येथील कॉलेजांत आणि नंतर निवृत्तीपर्यंत शहाजी लॉ कॉलेजात शिकवला. त्यांचे शब्दसावल्या (काव्यसंग्रह), प्रतिभेच्या पंखावर (सव्वीस इंग्रजी कवींचा मराठीतून परिचय), पाथेय भाग 1-3 (चरित्रसंग्रह- राष्ट्रीय, राज्यस्तरीय), छंद अक्षरांचा (ललित लेख), शब्द आणि संकल्पना (वैचारिक लेख), सोनेरी शब्दशिल्पे (दहा जागतिक लेखक), साहित्यिक यशवंतराव, चाहूल आणि काही इंग्रजी पुस्तकांचा मराठीतून अनुवाद असे विपुल लेखन प्रकाशित झाले आहे. त्यांचे स्फूट लेखन मराठी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असते.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. सर, नमस्कार 🙏
    आपण सदर लेखात यशवंतरावांच्या राजकीय जीवनातील न उलगडलेले महत्वाचे पैलू स्पष्ट केले.लेख वाचनीय आहे.
    © प्रा.पुरुषोत्तम पटेल, म्हसावद

    उत्तर द्याहटवा
  2. साहेब4 वेळा मुख्यमंत्री झाले होते हे अनाकलनीय आहे याचे काही संदर्भ नमुद करा

    उत्तर द्याहटवा