अफूबंदीची अद्भुत कहाणी (The Truth About Opium Smoking)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

अफूबंदीची अद्भुत कहाणी (The Truth About Opium Smoking)

 


गोष्ट आहे 1882 सालची. लंडनच्या एक्स्टर सभागृहात एक परिसंवाद आणि त्यानंतर एक जाहीर सभा झाली. त्या परिसंवादात आणि नंतरच्या सभेत जे सहभागी झाले होते त्यात नऊ मिशनरी, काही ब्रिटिश अधिकारी, बिशप, आर्चबिशप आणि काही खासदार होते. कार्यक्रमाचा हेतू होता, की जनसामान्यांना अफूबद्दलचे वास्तव समजावून सांगणे आणि त्यांना सरकारला विनंती करण्यास लावणे, की भारतातून चीनबरोबर चाललेला अफूचा व्यापार ताबडतोब थांबवावा !

हिंदुस्तानात पिकलेली अफू 1858 पासून चीनमध्ये निर्यात होत असे. अफूची पहिली लढाई 1841 मध्ये आणि दुसरी 1850 मध्ये झाल्या. दुसऱ्या लढाईनंतर इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांनी स्वतंत्र करार चीनबरोबर केले. त्या करारांद्वारे या देशांना चीनमध्ये वकिलाती स्थापन करण्याची, मिशनरींना धर्मप्रसार करण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अफू अधिकृत रीत्या चीनमध्ये आणण्याची परवानगी मिळाली. ब्रिटिशांनी हिंदुस्तानात पिकवलेली अफू चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाठवण्यास त्यानंतरच्या वीस वर्षांत सुरुवात झाली. तो व्यापार किती मोठा होता? त्या व्यापारातून ब्रिटिश सरकारला भारताच्या कारभारासाठी 13.45 कोटी स्टर्लिंग पाउंड एवढा नक्त नफा वीस वर्षांत झाला ! से असताना ब्रिटिश लोकांनीच तो व्यापार सरकारने थांबवावा अशी मागणी का केली? ब्रिटनचे साम्राज्य त्या व्यापारामुळे मजबूत होत असताना लोक त्या व्यापाराविरूद्ध का उठले ?

त्याचे एक महत्त्वाचे कारण होते - ब्रिटिश सरकार चीनमध्ये अफू जवळजवळ जबरदस्तीने उतरवत होते आणि त्याचा अतिशय वाईट परिणाम चीनच्या सर्वसामान्य जनतेवर आणि काही अंशी वरील वर्गातील लोकांवर होत होता. त्यावर पुढील प्रश्न साहजिकच असा येईल, की वीस वर्षे व्यापार निर्वेध चालत असताना लोक एकाएकी त्याविरुद्ध उठले, याला काही तात्कालिक असे कारण झाले का?

तसे कारण झाले होते.

चिनी व्यापारी

लंडनच्या 'द टाइम्स' या अग्रगण्य वृत्तपत्रात 6 डिसेंबर 1881 रोजी एक पत्र प्रसिद्ध झाले. सर जॉर्ज बर्डवूड यांनी त्यांच्या त्या पत्रात असे म्हटले होते, की “अफू पिणे (अफूचे धूम्रपान) हे संपूर्णपणे निरुपद्रवी आहे - अंगठा तोंडात घालण्याची सवय निरुपद्रवी असते, अगदी तसे” त्या पत्राच्या प्रसिद्धीनंतर सर्वत्र निषेधाची लाट उसळली आणि परिणामी, तो उपरोल्लेखित परिसंवाद व नंतर सभा यांचे आयोजन करण्यात आले. तो परिसंवाद, सभेतील भाषणे आणि नंतर काही मुद्यांचा परामर्श असे सर्व पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. त्या पुस्तकाचे नाव आहे - The Truth about Opium Smoking, stated by Missionaries, British officials, Chinese officials, Archbishops and Bishops. ते पुस्तक रेअर बुक्स सोसायटीच्या साईटवर उपलब्ध आहे.

प्रिन्स कुंग आणि वेन सांग

त्या सभेत ब्रिटिश मिशनरी - त्यांपैकी काही वैद्यकीय पात्रता असलेले आणि चीनमध्ये नऊ वर्षे ते तेवीस वर्षे काम केलेले असे होते - आणि इतर यांनी मुख्यतः चिनी लोकांवर अफूचे दुष्परिणाम कसे आणि किती मोठ्या प्रमाणावर होत होते याचे अनेक तपशील दिले आहेत - त्यांतील निवडक येथे सांगितले पाहिजेत असे आहेत.

1. तंबाखू ओढणारा माणूस चटकन वेगळा करता येत नाही, पण अफू - धुम्रपान करणारा माणूस चटकन ओळखता येतो. त्याची त्वचा फिकुटलेली, ओठ निळे आणि घट्ट असतात. त्याच्यात कोणत्याही प्रकारची ताकद नसते. तो कामधंदा करू शकत नाही, संपूर्णतः निर्धन होतो आणि त्याच्या कुटुंबाची दैन्यावस्था होते.

2. शिक्षकांतही अफू खाण्याचे प्रमाण खूप आहे. असे शिक्षक पुस्तकावर लक्ष फार काळ केंद्रित करू शकत नाहीत.

3. पालखी वाहणारे भोई, अफूची वेळ झाली की पालखी वाटेतच सोडून अफूच्या शोधात जातात आणि ती मिळाल्यानंतरच कित्येक तासांनी परततात !

4. अफूचा प्रसार इतका वाढला आहे, की लोक पूर्वी पाहुण्यांना चहा देत असत, आता, त्याऐवजी अफू पुढे करतात.

5. अफूमुळे पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो, बद्धकोष्ठ मोठ्या प्रमाणावर होतो; श्वसनसंस्था हळुहळू निकामी होते. मलविसर्जन दहा किंवा पंधरा दिवसांतून एकदा होणे हे अफू पिणाऱ्या लोकात सर्रास दिसते.

6. अफूची सवय एकदा लागली, की अजिबात सुटत नाही. धूम्रपान आणि मद्यपान हे एकवेळ उपचाराने बंद करता येईल, पण अफू सुटत नाही. राजघराण्यातील एक तरुण रोज दोन औंस अफू आणि भरपूर वाईन पीत होता. त्याचे अफूचे व्यसन महत्प्रयासांनी थांबवावे लागले. तो व्यसनमुक्त झाल्यावर एका परिचितांकडे गेला - अफू पुढे आली, त्याने घेतली आणि तात्काळ मरण पावला.

7. अफू घेण्याचे व्यसन बुद्धिजीवी आणि उच्चवर्गीय यांच्यात वाढू लागले आहे. हेच लोक अखेर सत्तावर्तुळात जातात, त्यामुळे अफूच्या व्यसनाचा घातक परिणाम सत्ता- वर्तुळावर होत आहे.

8. अफूच्या व्यसनामुळे जनसामान्यांवर जो परिणाम होत आहे त्याला ब्रिटिश जबाबदार आहेत ही भावना सर्व लोकांची आहे. रस्त्यात खेळणी विकणाऱ्या माणसाकडे एक खेळणे ब्रिटिश माणसाची मूर्ती असे होती. तिच्या एका हातात तराजू व दुसऱ्या हातात अफूचा गोळा दाखवलेला होता.

चिनी प्रशासक ली हुंग- चँग

अफूच्या व्यसनातील विरोधाभास हा होता, की अफूच्या आहारी गेलेला माणूस आणि त्याचे सगेसोयरे, सारेच ते व्यसन लांछनास्पद मानत असत. अफू खाणाऱ्या माणसाला चर्चमध्ये प्रवेश देणे मिशनऱ्यांना शक्य होत नसे, कारण त्याबद्दल चिनी अधिकारी आणि लोक नाराजी व्यक्त करत असत. त्यामुळे मिशनरी लोकांना धर्मप्रसार करणे अवघड जाऊ लागले. चिनी लोक मिशनऱ्यांना प्रश्न विचारत असत – “हा व्यापार हे ख्रिस्ती धर्माचेच फळ आहे का?” मिशनरी व्यक्ती अफूच्या व्यापाराला विरोध करण्याचे तेही एक कारण होते. अफू व्यापार चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचा एक मोठा मुद्दा होता, की त्या व्यापारातून मिळणारा प्रचंड पैसा हा हिंदुस्तानात शिक्षण, न्यायव्यवस्था, वाहतूक आणि प्रशासन यांच्यासाठी ब्रिटिश खर्च करू शकत होते. त्याच्याशी प्रतिवाद त्या सभेत आणि नंतरच्या निवेदनांतून करण्यात आला. चिनी प्रशासक ली हुंग- चँग यांच्या अफूविरोधी उपायांच्या सच्चेपणाचा निर्वाळा देण्यात आला. चिनी लोक स्वतः अफू का पिकवत होते याचा खुलासा करण्यात आला - त्याशिवाय अफूच्या व्यापाराच्या समर्थकांचे विविध मुद्दे सभेत हजर असणाऱ्यांनी खोडून काढले. (अफूच्या व्यापारातून ब्रिटिशांनी साम्राज्यवाद कसा रुजवला आणि हिंदुस्तानातील लोकांची पिळवणूक केली हे अमिताव घोष यांच्या Sea of poppies या  2008 साली प्रकाशित झालेल्या कादंबरीत आले आहे. (हिंदू - पी सी कुमार यांचा लेख 3-3-2017))

सभेच्या अखेरीस एक ठराव मंजूर करण्यात आला – “चीनमध्ये दीर्घकाळ वास्तव्य केलेल्या आणि चीनमध्ये खूप प्रवास केलेल्या मिशनऱ्यांची निवेदने ऐकल्यानंतर, या सभेची खात्री पटली आहे, की अफूच्या व्यापाराचे घातक असे परिणाम शारीरिक, सामाजिक आणि नैतिक स्वरूपाचे होतात. त्या बाबतच्या आर्थिक मुद्यांची नोंद घेतल्यावरही सभेचे मत असे आहे, की भारत सरकार आणि चीन यांच्यादरम्यान अफूचा व्यापार चालू ठेवणे हे या देशाच्या लौकिकास साजेसे नाही. या विषयावर पार्लमेंटमध्ये त्वरित आणि प्रामाणिक चर्चा झाली पाहिजे”

सनदशीर उपायसुद्धा किती प्रभावी पद्धतीने करता येतात आणि त्याबरोबर ब्रिटिशांनी केलेल्या हिंदुस्तानच्या आर्थिक पिळवणुकीचा आणखी एक पदर यांचे प्रभावी दर्शन या पुस्तकातून होते. हे पुस्तक या लिंकवर वाचता येईल.

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

- रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध  झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. व्यावसायिक माध्यमातून राज्यातील स्थानिक पातळीवर सामान्य जनतेचा विश्वास संपादन करुन राज्य करणे ब्रिटिशांना फायदेशीर ठरते आहे,हे समजले होते.परिणामी अफूच्या व्यापारी माध्यमातून हे दोन्ही हेतू सफल होताना दिसून आले. याचे दूरगामी परिणाम झाले. आजही आपण समाजात नशापाणी करणारा समूह पाहतो.हे हानीकारक आहे.हे प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला हवे. तरच जीवन निरोगी व आरोग्यदायी होईल.

    उत्तर द्याहटवा