डबीर यांची गझलगाथा (Dabir - Marathi Gazal Writer)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

डबीर यांची गझलगाथा (Dabir - Marathi Gazal Writer)


सदानंद डबीर हे आजच्या काळातले मराठीतील महत्त्वाचे गझलकार मानले जातात. माझा-त्यांचा त्यांच्या पहिल्या 'लहेरा' संग्रहापासूनचा परिचय. ते त्यावेळी रेल्वेत इंजिनीयर म्हणून नोकरी करत होते. परंतु कविता, विशेषत: गझल हे त्यांचे वेड वाढत गेले. ते त्यातच रमलेले असत. मी माझ्या गझलविषयक अनेक शंकांचे निरसन त्यांच्याकडून करून घेतले आहे. त्यामुळे त्यांचा-माझा स्नेह घट्ट होत गेला; इतका की त्यांचा 'अलूफ' हा गझलसंग्रह दोन वर्षांपूर्वी त्यांनी माझ्या हस्ते प्रकाशित करून घेतला. त्यांचे गझलविषयक विचार अधिकाधिक परिपक्व होत गेले आहेत. 'गझलचे गारुड' हे त्यांचे पुस्तक यादृष्टीने वाचण्यासारखे आहे. त्यांना गझलला साहित्य अकादमी व अन्य साहित्य संस्था यांच्याकडून एक साहित्यप्रकार म्हणून मान्यता मिळत नाही याबद्दल फार दुःख होते व ते पोटतिडिकीने त्याबाबत बोलत-लिहित असतात.
          त्यांनी कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यावर मला लिहिले, की "मला माझेच जुने शेर आठवतात आणि लॉकडाऊनचा काळ सुसह्य होतो". त्यांनी पत्रात पुढे लिहिले आहे,  की "उर्दू गझलेत माझा एक शेर आठवतो- शब्दांचे वेड मला, जन्मजात जडलेले | शब्दांतच दिसलो मी, शब्दांतच दडलो मी! ह्याच वेडाने लॉकडाऊनचा काळ सुसह्य होतोय. उर्दू गझलेत तजमीन असा एक प्रकार आहे. म्हणजे एका कवीने लिहिलेल्या गझलच्या जमिनीवर दुस-या कवीने त्याच्या गझलचा महाल बांधायचा. जमीन म्हणजे तेच वृत्त, तेच/तत्सम काफिये (पूर्वयमके) व तोच रदीफ (अंत्ययमक) घेऊन गझल लिहायची. उदाहरण देतो-
डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली
वचने मला दिलेली विसरून रात्र गेली
          ही मंगेश पाडगावकरांची गजल(गायिका-अनुराधा पौडवाल)आधी लिहिलेली आहे. ही गझल सुरेश भट यांना माहिती होती. त्याच जमिनीवर भटांनी स्वतंत्र गझल लिहिली. (हे खुद्द भटांनी लेखकाला सांगितले आहे.) ती अधिक गाजलीही. हे वाङमयचौर्य मानत नाहीत आणि ते योग्यच आहे. तर भटांची ती गझल... केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली
 
        माझा पहिला संग्रह 1994साली, सव्वीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाला. माझ्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या गझला, आज मी कशा लिहिल्या असत्या? असा विचार मनात आला आणि मी तसा प्रयत्न करू लागलो तेव्हा माझ्या ध्यानात आले, की मी माझ्याच गझलवर तजमीन करतोय की! हा आनंद काही वेगळाच होता. इतक्या वर्षांत मी लेखनात काही प्रगती केली की नाही? ह्याचा लेखाजोखाच मांडला म्हणा ना! ह्या उपक्रमात वेळ मजेत जातोय, सत्कारणी लागतोय. मला वाटते, की गायक, वादक जसा रियाज करतात तसा हा कवीचा रियाजच आहे. माझी 'लेहरा' संग्रहातली मूळ गझल (1994) आणि हल्ली केलेली तजमीन देतोय. बघा कशी वाटते...
दूर कोणी                                                                  
दूर कोणी रात्र सारी गात होते
त्या सुरांना सांत्वनाचे हात होते!
छेडिली माझ्या मनाची तार कोणी?
त्याच झंकारात मी दिनरात होते,
अंगणी त्या मोगऱ्याचा वेल होता
त्या सुगंधाने तुझे घर न्हात होते 
आसवांचा तो खरा पाऊस होता 
मेघ केवळ येत होते... जात होते
ह्या तुझ्या माझ्या कथेला अंत नाही 
भेट होतांना, नवी सुरुवात होते !                                                                                
                              
(
1994)
        
साजणा रे!
दूर कोणी रात्र सारी,गात होते-
त्या स्वरांना,चांदण्याचे हात होते!
भास होते,साजणाचे सोबतीला...
साजणाचे स्वप्नही, डोळ्यांत होते!
तार देहाचीच माझ्या,छेडलेली...
त्याच झंकारात मी,दिनरात होते!
मोग-याच्या ओंजळींनी,न्हायले मी,
मोग-याला, साजणाचे हात होते!
तो खरा पाऊस होता...साजणाचा,
मेघ केवळ, येत होते....जात होते!
साजणा रे! या कथेला अंत नाही
भेट होताना,नवी सुरुवात होते!
(३||२०२०)
          डबीर त्यांचे पत्र गझलचे हे दोन नमुने देऊन पूर्ण करतात. मी पत्र म्हटले खरे पण ते आले व्हॉटसअॅप मेसेजने. डबीर विलेपार्ल्याला राहतात. पूर्वी ते काही गझलकारांबरोबर एकत्र गायनवाचनाचे कार्यक्रम करत. समीक्षक व स्वतः गझलकार राम पंडित त्यांना फार मानतात. डबीर यांना काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला. त्यानंतर ते कार्यक्रम बंद झाले. मात्र ते नेहरू सेंटरच्या विविध संगीत कार्यक्रमांसाठी नेहमी गाणी-गझला लिहीत असतात.         
          मराठीत कविता गंभीरपणे करणारा आणि त्यासंबंधी विचार करणारा एक मोठा समुदाय आहे. तसा मराठीत गझलकारांचा गावोगावी पसरलेला मोठा गट आहे, पण त्यांत संस्थाने अनेक आहेत. गझलच्या रचनेची पथ्ये फार आहेत व तशी परिभाषा तयार झाली आहे. सर्व संस्थाने तीच पथ्ये व परिभाषा वेगवेगळ्या जोराने सांगत असतात. सगळ्यांमध्ये एकात्मतेचा आणखी एक घटक आहे. तो म्हणजे सुरेश भट यांचे नाव घेऊन कानाला हात लावणे. कवींमध्ये केशवसुतांपासून पाडगावकर-करंदीकरांपर्यंत तीन-चार पिढ्या झाल्या, तशा गझलकारांमध्ये भटांनंतर होण्याची शक्यता नाही, कारण गेल्या पंचवीस वर्षांत काळानेच कूस बदलून टाकली आहे! नव्या काळामध्ये कविता आणि अर्थात गझल यांना एकूण समाजजीवनात किती व कसे स्थान असणार आहे याचा अंदाज सध्याच येऊ लागला आहे.  
सदानंद डबीर 9819178420
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
'लेहरा' संग्रहातली मूळ गजल (1994)

मंगेश पाडगावकर
सुरेश भट

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. तुमच्या ह्या लिखाणामुळे ज्ञानात खूप भर पडत आहे .श्री डबीर ह्यांची गझल आवडली .श्री सुरेश भटांचे नाव गझलकार म्हणून माहित होते .
    गझलमधला तजमीन हा प्रकार वाचून लक्षात आला .नविन माहिती मिळाली .धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. वरील अभिप्राय सौ.अंजली आपटे दादर यांचा आहे .

    उत्तर द्याहटवा