विष्णूचे मूर्तिरूपात पूजन आणि त्यासाठी मंदिरनिर्माण परंपरा
भारतीय भूमीवर गेल्या बावीसशे वर्षांपूर्वीपासून दिसून येते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या लोकप्रिय त्रिमूर्तीपैकी
विष्णू हा एक. विष्णूचे उल्लेख वैदिक वाङ्मयापासून मिळतात. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांत
वैष्णवभक्तीची समृद्ध परंपरा काळानुरूप विकसित होत गेली आहे. त्यात राज्यकर्ते, कलाकार व भाविक यांनी त्यांच्या सामर्थ्यानुसार भर टाकली.
विष्णूची वासुदेव -संकर्षण रूपातील सर्वात
प्राचीन प्रतिमा बॅक्ट्रिया येथील अगॅथोक्लेस राजाच्या (इसवी सनपूर्व 190) नाण्यांवर दिसून येते. बॅक्ट्रिया हे राज्य सध्याच्या अफगाणिस्तान – उझबेकीस्तान – अफगानिस्तान – ताजिकिस्तान या प्रदेशात होते. साधारण
त्याच काळात, राजस्थानातील घोसुंडी येथील शिलालेखात नारायण
वाटिकेच्या निर्माणाचे उल्लेख दिसतात. मध्यप्रदेशातील बेसनगर येथे तक्षशिलेहून
आलेल्या राजदूताने गरुड स्तंभासाठी दान दिल्याची माहिती मिळते. त्याचे नाव हेलिओडोरस असून तो ग्रीक वंशांचा होता. त्याने भागवत धर्म स्वीकारला होता. तेथे 1964-65 च्या दरम्यान झालेल्या उत्खननात तत्कालीन मंदिराचे अवशेष दिसून आले.
त्याशिवाय मध्यप्रदेशातील टिकला येथील नैसर्गिक शैलगृहात उपलब्ध वासुदेव, संकर्षण आणि एकांशना यांचे चित्रदेखील उल्लेखनीय आहे.
त्या काळात मथुरा नगरीत भागवत धर्म विशेष प्रसिद्ध होता. तेथे
मिळणारे पुरावशेष तेच अधोरेखित करतात. मथुरेत आणि विशेषतः त्याजवळील मोरा या गावी
मिळलेल्या अनेक मूर्ती आणि अभिलेखात नोंदवलेले वृष्णी (यादव) कुळातील पंचवीर
यांच्या प्रतिमा आणि शैल-देवगृहाचे निर्माण नक्कीच विशेष आहे. त्याच काळात
विष्णूची चतुर्भुज मूर्ती विशेष प्रचलनात आली. चेहऱ्यावर शांत भाव, माथ्यावर किरीट-मुकुट, कुंडलादी
अलंकार, गळ्यात वनमाला आणि समभंग अवस्थेत उभ्या विष्णूचे रूप
खरेच विलोभनीय दिसते. शंख-चक्र-गदा-पद्म या चार आयुधांच्या संयोगाने एकूण चोवीस
प्रकारे केशव-नारायणादी विष्णुमूर्ती निर्माण केलेल्या दिसतात.
मध्यप्रदेशातील देवगढ येथील गुप्त राजांच्या काळातील मंदिर |
गोपालक समाजासोबतच भारतातील अनेक राज्यकर्त्या कुळांनी राजस विष्णूची पूजा
आपलीशी केली. अनेक पुराणांची निर्मिती इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या आसपास झाली.
विष्णूच्या मत्स्य-कुर्मादी अवतारांचे वर्णन पुराणांत येते. मध्यप्रदेशातील देवगढ
येथील गुप्त राजांच्या काळातील मंदिर हे प्राचीन तरीही अतिशय परिपूर्ण वैष्णव
मंदिर म्हणून गणले जाते. ते मंदिर उंच जोत्यावर लाल वालुकाश्मात बांधलेले असून, भिंतीवर कोनाड्यात मोजकीच परंतु अतिशय
देखणी शिल्पे आहेत. त्यात शेषशायी विष्णू तसेच नर-नारायण यांचे अंकन अद्वितीय आहे.
उदयगिरी येथील कोरीव लेण्यांतही गुप्त राजांच्या आश्रयाने कोरली गेलेली अनेक शिल्पे आहेत. त्यातील प्रचंड असा भू-वराह हा विशेष अभ्यासनीय
आहे. भू-वराहाच्या
मूर्तीत धड मनुष्याचे व मुख वराहाचे, त्याच्यावर भूदेवी
(पृथ्वी) मनुष्यरूपाने दाखवलेली असते.
उदयगिरी लेण्यातील भू-वराह मूर्ती |
महाबलिपुरमच्या कृष्णमंडपातील गोवर्धन उचलतानाचे श्रीकृष्णाचे शिल्प |
त्याशिवाय दक्षिणेत अनेक प्राचीन वैष्णव मंदिरे आहेत. त्यामध्ये
विष्णूचे तिरुपती बालाजीच्या रूपातील स्थान अधिक ठळक आहे. आंध्रप्रदेशातील त्या
देवस्थानाचा इतिहास दहाव्या शतकापर्यंत, पल्लव राजांच्या काळात पोचतो. त्या देवस्थानाला आता दिसणारे महत्त्व आणि
वैभव विजयनगर साम्राज्यात प्राप्त झाले. तेथे बालाजीसोबत भूदेवी व पद्मावती या
त्याच्या दोन पत्नींची पूजा होते. तिरुपतीप्रमाणे अतिशय जगप्रसिद्ध वैष्णव स्थान
म्हणजे पुरी. ओदिशातील पुरी येथे जगन्नाथाचे मंदिर गंग राजांच्या काळात (बारावे
शतक) निर्माण झाले असावे. तेथे जगन्नाथासोबत बलराम आणि सुभद्रा यांच्याही लाकडी
मूर्तीचे पूजन होते. त्या हात-पाय-कानविरहित विशिष्ट आहेत. तेथील मंदिरात आणि
शास्त्रीय नृत्यात कवी जयदेवाच्या ‘गीतगोविंद’मधील अष्टपदीचा समावेश आवर्जून असतो. तेथील रथयात्रेचा सोहळा अवर्णनीय
आहे.
विठ्ठल |
सोळाव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी श्रीराम व हनुमंत
यांच्या उपासनेचा आग्रह धरला. साधारणतः त्याच काळात बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू व
आसाममध्ये श्रीमंत शंकरदेव यांनी वैष्णवभक्तीची परंपरा जागृत ठेवली. त्याच्या
नंतरच्या काळात बंगालमध्ये विष्णुपूर येथे मल्ल राजांनी मंदिरांची निर्मिती केली. ती
सारी विटांची परंतु सुंदर नक्षीकामाने सजलेली मंदिरे आहेत. रासमंच, श्यामराय, मदनगोपाल, मुरलीमोहन, राधागोविंद, राधामाधव आणि राधाश्याम इत्यादी अशा अनेक मंदिरांची नावे वाचताच मल्ल
राजांचे कृष्णप्रेम समजून येते.
याव्यतिरिक्त भारतात व भारताबाहेर अनेक प्राचीन-अर्वाचीन वैष्णव
मूर्ती आणि मंदिरे आहेत जी या समृद्ध परंपरेची स्मृतिचिह्ने आहेत व भारताच्या
विशाल सांस्कृतिक संचिताचा महत्त्वाचा भाग आहेत.
- दिग्विजय पाटील
8975932510
दिग्विजय
पाटील हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक आहेत. त्यांचा प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती हा संशोधनाचा विषय आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण डेक्कन कॉलेज
(अभिमत विद्यापीठ पुणे) व पदव्युत्तर पदविका पं. दीनदयाल उपाध्याय पुरातत्त्व
संस्थान (नोएडा) येथे पूर्ण झाले आहे. ते प्रकल्प सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.
तसेच,
त्यांची शिखर-शिंगणापूरच्या शंभू-महादेवसंबंधी अभ्यासात विशेष रुची
आहे. ते मूळ सोलापूर जिल्ह्यातील अकलूजजवळचे: सध्या पुण्यात असतात.
बोस्टन संग्रहालयातील वैकुंठ विष्णू |
बिष्णुपूर येथील मंदिर |
---------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
आतिशय सुंदर आणि दुर्मिळ माहिती 👌
उत्तर द्याहटवा