शहाबाज
हे रायगड जिल्ह्यातील तीनचार हजार लोकवस्तीचे छोटे गाव, पण ते
शिक्षणक्षेत्रातील प्रसिद्धीने खूप मोठे झाले. त्या खेड्याने रायगड जिल्ह्याला
शिक्षकांचा पुरवठा सतत केला. शहाबाज गावाने त्याचे वेगळे स्थान आगरी समाजाच्या
चळवळीचे व सुधारणांचे उगमस्थान म्हणूनही निर्माण केले आहे. शहाबाज गावात मुख्यत: आगरी लोक राहतात. महाराष्ट्रात व
महाराष्ट्राबाहेर सुमारे दहा लाख आगरी लोकसंख्या असावी. शहाबाज गाव रायगड
जिल्ह्यात धरमतर खाडीच्या व बंदराच्या जवळ पश्चिमेकडे कोसभर अंतरावर आहे.
मुंबईपासून दक्षिणेस सागरी मार्गाने केवळ पंचवीस मैल. गावाचा पसारा लहानशा
टेकडीच्या सभोवताली पाच पाडे एवढाच. घसवड नामक पाड्यात कोळी समाजाचे वास्तव्य आहे.
अन्य समाजांतील थोडीफार लोकवस्ती पाड्यापाड्यांवर आहेच. सर्व लोकांचा मूळ व्यवसाय
शेती. शेतकऱ्यांच्या पुढील पिढ्या मंबईसारख्या शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झाल्या
आहेत. नामवंत साहित्य समीक्षक म.सु. पाटील, त्यांची कन्या कवयित्री नीरजा या शहाबाज
गावच्या प्रमुख व्यक्ती.
‘शहाबाज’ या नावाला इतिहास आहे. रणजितसिंग नावाच्या
राजाची सत्ता त्या प्रदेशावर होती. रणजितसिंगच्या दोन मुलांपैकी शहासिंगाने शहाबाज
वसवले तर, दुसऱ्या आबासिंगने आवास, सासवने
या गावांची स्थापना केली. मात्र ‘शहा’ या
शब्दाचा मुसलमानी सत्तेशी संबंध नाही. ‘शहाबाज’ हे पूर्वी व्यापारी मार्गावरील गाव म्हणून प्रसिद्धी पावलेले होते. तेथे काही राजांचा प्रवासातील मुक्काम असायचा. त्यांनी
लोकांना हाताशी धरून मिठागरे तयार केली. आधी मिठागरे झाली आणि त्यानंतर गाव वसले
गेले. तो काळ अकराव्या-बाराव्या शतकातील. लोकसंख्या वाढू लागली आणि मिठागरांच्या
ठिकाणी भातशेती आली. ते स्थित्यंतर सतराव्या शतकात झाले असावे.
शहाबाज
धरमतर खाडीच्या नजिक वसलेले आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीपासून शेतीचे संरक्षण
करणे आवश्यक होते. त्यासाठी ‘बाहेरकाठा’ म्हणजे
खाडीच्या किनाऱ्याला उलटून येणाऱ्या पाण्याच्या बंदोबस्तासाठी मोठा बांध घालून
खलाटी वाचवणे शक्य झाले व वाचवलेल्या त्या शेतीला पुढे ‘कोटीक’
असे नाव पडले. शहाबाज गावात पुढे अनेक कुटुंबे आली, त्यांनी त्या खाडीत प्रथम पंधरा कोटिके तयार केली. काटेवाडीच्या कमल पाटील
यांनी सागरगडावरील आंग्रे यांच्या साहाय्याने नवेखार जमीन आणि कमळपाड्याची वसाहत
केली. धामणपाड्यातील काही कुटुंबांनी शहापूर खारीतील ‘भेंडे’
भागात भातशेती तयार केली. वालवडच्या लोकांनी वालवडखार वसवली.
याप्रमाणे पाच पाड्यांनी बंदरखार, दिवाणखार, अंगारकोठा अशा नावाने शेतजमिनी तयार केल्या. काही कुटुंबे त्यांचा
उदरनिर्वाह आसपासच्या गोड्या जमिनीत शेती करून साधत. त्या कुटुंबांनी स्थलांतर
करून टेकडीच्या पायथ्याशी वसाहत तयार केली. ती पहिली वसाहत. तेथे तळे खोदण्यात
आले. त्याच वेळी ‘बहिरी’ देवीची
स्थापना करण्यात आली. गावात बहिरी देवीची यात्रा भरते, छबिना
निघतो, यात्रेत आल्यावर लाट फिरते. रात्री बळ निघते. ती
सीमेपलीकडे नेतात. घसवड वसाहत दोनशे वर्षांपूर्वीची आहे. त्या पाड्यातील कोळी
लोकांचा मासेमारी हा धंदा असून ते शेतीही करतात.
शहाबाज
गाव दैवतांच्या मंदिरांनी संपन्न आहे. श्री काशी विश्वेश्वर, गणपती, विठोबा-रखुमाई, नारायण-लक्ष्मी, भैरवनाथ, श्रीशंकर, दत्त,
मुरलीधर, श्रीराम, मरीआई
अशी अनेक व प्रथेनुसार हनुमान मंदिरे आहेत. त्या देव-दैवतांचे उत्सव मोठ्या
उत्साहाने आणि संघटितपणे साजरे केले जातात. पूर्वी त्या उत्सवानिमित्त गावची तरुण
मंडळी नाट्यप्रयोग करत; पालखीपुढे बैलगाड्या सजवून ‘चित्ररथ’ तयार करत. गावचे उत्सव म्हणजे चैतन्याची बहार असे.
शहाबाज
गावाला वैभव प्राप्त झाले ते प्राथमिक मराठी शाळेमुळे. इंग्रजांनी 1835 साली
भारतात प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. रायगड जिल्ह्यात महाड येथे पहिली
प्राथमिक शाळा स्थापन झाली. शहाबाज येथे प्राथमिक शाळा 1865 साली निघाली.
शिक्षणाची व्याप्ती 1865 ते 1890 पर्यंत मुळाक्षरे, पाढे, लेखन, वाचन आणि गणित इतक्या मर्यादेत होती. मोडी
कित्ता समोर ठेवून बोरूने पुस्ती काढायची हा लेखनाचा पहिला तास होता. शाळा स्थापन
झाली, त्यावेळी आरंभी काही वर्षें एका शिक्षकाच्या ताब्यात
चार वर्ग असत. त्यावेळी गावात शाळा निघाली या गोष्टीचे लोकांना अप्रुप वाटले.
शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास प्राप्त झालेली ती शाळा जिल्ह्यात प्रगतिपथावार
होती. धारप नावाच्या शिक्षकांनी केवळ चार मुले घेऊन ती शाळा सुरू केली. बाळा जानू
पाटील, हशा राघो मुकादम, पांडू कष्णा
माळी, केशव बाळा जुईकर हे ते चार विद्यार्थी. व्हर्नाक्युलर
फायनल परीक्षेत शहाबाज शाळेतील पहिले आलेले विद्यार्थी नारायण जाखू भगत (1901),
तुकाराम जाखू भगत (1906), गणेश भिकाजी गोडबोले
(1908), दत्तात्रय रामचंद्र पाटील (1928), दत्तात्रेय रामदास पाटील (1914), मधुकर गोपाळ पाटील
(1945), मधुकर सुदाम पाटील (1946). शाळेत प्रथम एकतीस मुले
दाखल झाली.
धारपगुरूजी
धामणपाड्याच्या मारूतीची पूजा करत व फावल्या वेळात शिकवत. शाळेची सुरुवात
गणपतीच्या देवळात झाली. कमळ विठू व हशा महादू मुकादम-पाटील ऊर्फ दत्तू मास्तर
यांनी शाळेवर 1884 च्या सुमारास काही काळ शिक्षकांचे काम केले. शाळेची भरभराट 1884
पासून 1918 पर्यंतच्या सुमारे पंचवीस वर्षांच्या काळात झाली, त्यास दत्तू
मास्तरांचे श्रम कारणीभूत ठरले. त्यांच्या खटपटीने अलिबागेत ‘आगरी विद्यार्थी बोर्डिंग’ स्थापन झाले होते. नाना
पाटील यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी त्या बोर्डिंगात राहून इंग्रजी शिक्षण
घेतले असे म्हटले आहे. दत्तू मास्तरांचे मोडी हस्ताक्षर वळणदार होते.
शिक्षक
दत्तू मास्तरांना ‘हशाबा’ या नावाने हाक मारत व गावातील लोक ‘दत्तू मास्तर’ या नावाने संबोधत. हशाबा शाळेतील
हजेरी पट वाढवणे, गैरहजर मुलांना शाळेत आणणे, हुशार मुलांना ‘स्कॉलरशिप’ परीक्षेस
बसवणे, स्कॉलर मुलांची समजूत घालून त्या मुलांना दुय्यम
शिक्षणासाठी अलिबागेस पाठवणे, पब्लिक सर्व्हिस परीक्षा पास
झाल्यावर मुलांना नोकरीस लावणे; इतकेच नव्हे, तर एखाद्या शिक्षकाला
त्याच्या सांसारिक अडीअडचणीच्या वेळी मदत करत. शहाबाज गावची दगडी शाळेची जुनी
इमारत उभी आहे. ती 1898 मध्ये बांधली गेली, पण त्याआधी पूर्ण
प्राथमिक शाळेला 1896 साली सुरुवात होऊन 1899 साली सातवी इयत्ता पूर्ण करून, शाळेने रायगड जिल्ह्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्ह्यातील
बहुजन समाजाचे नेते व ‘कृषिवल’चे संस्थापक कै.
नारायण नागू तथा आप्पासाहेब पाटील यांचे प्राथमिक शिक्षण शहाबाज शाळेत झाले. ते
शहापूर येथे चौथीच्या शिक्षणाची सोय नसल्यामुळे पुढील शिक्षणासाठी शहाबाज शाळेत 1904
साली दाखल झाले. ते त्या शाळेचे स्कॉलर विद्यार्थी होते. शहाबाज शाळेच्या माजी
विद्यार्थिनी आणि आगरी समाजातील पहिल्या ट्रेंड शिक्षिका सावित्रीबाई गोपाळ माळी
यांचा कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा सत्कार झाला त्यापासून स्फुरण घेऊन
शिक्षण खात्याने मुलींची शाळा काढावी यावर लक्ष केंद्रित केले. शहाबाज येथे
मुलींच्या स्वतंत्र शाळेची स्थापना 1912 साली करण्यात आली. ती शाळा काशी विश्वेश्वर
मंदिराच्या माडीवर भरत असे. मुलींच्या शाळेचे पहिले शिक्षक होते गोपाळ सखाराम
म्हात्रे. त्यांनी चार वर्षें शिक्षकाचे काम केले. चौसष्ट मुलींच्या पाच
वर्गांसाठी एकच शिक्षक होते.
शिक्षणमंत्र्यांनी
त्या गावच्या
शाळेस 1926 साली भेट दिली. खेडेगावच्या शाळेस मंत्र्यांनी भेट देण्याची ती पहिलीच
वेळ असावी. त्याच वर्षात मुंबई विभागाचे एज्युकेशन इन्स्पेक्टर कादरी यांनीही
शहाबाज गावच्या शाळेस भेट दिली. शाळेने केलेल्या प्रगतीवरून आणि विद्यार्थ्यांची
हुशारी लक्षात घेऊन त्या शाळेतून द्वारकाबाई कमळे पाटील, सावित्रीबाई
गोपाळ माळी आणि कै. ना.ना. पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाई नारायण पाटील यांना
पुणे येथील ट्रेनिंग कॉलेजमध्ये पाठवण्याची शिफारस करण्यात आली. त्यावेळी सातवी
इयत्ता पूर्ण झाली म्हणजे मुले पब्लिक सर्व्हिस परीक्षेस पाठवत. मात्र
विद्यार्थ्यांना सतरा वर्षें पूर्ण झाल्याखेरीज परीक्षेस बसता येत नसे. सोमण
गुरूजी यांनी त्या परीक्षेसाठी पाच मुले तयार केली होती. त्यांची नावे अशी- नारायण
जाखू भगत, हरी जोमा पाटील, शांताराम
हसूजी पाटील, कमळ राघो पाटील आणि पाचवे चांगू गणू पाटील.
त्या पाचांपैकी चार विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले व ते सर्व दहा नंबरांच्या
आत आले. पब्लिक सर्व्हिस परीक्षेच्या निकालामुळे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष शहाबाज
शाळेकडे वेधले गेले. विद्यमान काळात ‘कोकण एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेने अनेक
शैक्षणिक उपक्रम राबवून गावच्या शैक्षणिक प्रगतीची आगेकूच चालू ठेवली आहे.
गावात
प्लेगची साथ 1901 साली होती. प्लेग पुन्हा 1903 साली आला. पुन्हा 1911 साली
सप्टेंबरच्या अखेरीस प्लेगच्या साथीने गावाला ग्रासले. लोकांनी शाळा तशाही
परिस्थितीत बंद पडू दिली नाही. विठोबा राघोबा पाटील यांच्या प्रोत्साहनाने, नारायण आल्या,
विठू हिरू प्रभृतींनी शाळा दत्ताच्या टेकडीच्या पश्चिमेस मोठा मंडप
घालून चालू ठेवली. शाळेने बालवीर चळवळीला सुरुवात 1928 च्या सुमारास केली.
गावात
‘मंगल मोफत वाचनालय’
1912 च्या सुमारास सुरू करण्यात आले. त्याची स्थापना काशी
विश्वेश्वराच्या देवळात झाली. मात्र पुढे सार्वजनिक वाचनालय ‘ज्ञानमंदिर’ नावाच्या स्वतंत्र वास्तूमध्ये 1938
मध्ये सुरू झाले. केतकर यांच्या ज्ञानकोशाचे सगळे खंड, महाभारत
खंड, गीतारहस्य, ज्ञानेश्वरी, स्वामी विवेकांनद खंड, स्वामी रामतीर्थ, ब्रिटिश राज्यव्यवस्था, आर्यांच्या सणांचा इतिहास
आणि हरी नारायण आपटे, नाथ माधव यांचे साहित्य अशी दुर्मीळ
ग्रंथसंपदा ‘ज्ञानमंदिरा’त
जीर्णावस्थेत जपून ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय अनेक वाचनीय ग्रंथ वाचनालयाच्या
भांडारात केविलवाण्या अवस्थेत पडून आहेत. विविध विषयांवरील ग्रंथांची आणि अन्य
पुस्तकांची संख्या एक हजार तीनशे इतकी आहे. त्या भांडाराचा उपयोग सद्यकाळात कोणी
विशेष करून घेत नाहीत.
शहाबाज
गावाने राजकीय चळवळीतही सक्रिय भाग घेतला. तरुणांनी बहिष्काराची चळवळ (1921), मिठाचा सत्याग्रह,
बेचाळीसचे स्वातंत्र्य आंदोलन इत्यादी चळवळींत कारावास भोगला आहे.
मिठाचा सत्याग्रह चळवळीत भाग घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी शाळेवर राष्ट्रीय ध्वज
फडकावला त्यामध्ये शाळेचे एक विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण व सहकार
खात्याचे माजी सभापती गणेश लक्ष्मण पाटील हे अग्रभागी होते. लोकमान्य टिळक यांचा ‘केसरी’, आगरकर यांचा ‘सुधारक’,
अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा ‘संदेश’, ठाणे येथील ‘हिंदू पंच’ या
त्या काळात लोकप्रिय असलेल्या नियतकालिकांचे वाचन गावात होत असे. गावची विचारवंत
मंडळी वृत्तपत्रांतील विषयांवर सामुदायिक चर्चाही करत असत. जिल्ह्यातील श्रमजीवी
बहुजन वर्गाच्या समाजाने उभारलेल्या चळवळींचे केंद्रस्थान खारेपाटातील शहाबाज हेच
होते. ब्राह्मणेतर पक्षाची प्रांतिक राजकीय परिषद (1931-32) त्याच गावामध्ये पार
पडली. देवासचे महाराज श्रीमंत खासेसाहेब पवार यांनी त्या परिषदेचे अध्यक्षस्थान
विभूषित केले होते. ना.ना. पाटील हे त्या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते. पुण्याचे
केशवराव जेधे बंधू, नगरचे रावबहादूर नामदेवराव नवले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि भास्करराव जाधव अशी पुढारी मंडळी त्या परिषदेस
उपस्थित राहिली होती.
आधुनिक
काळात गावातील तळी सिमेंटकाँक्रिटने बांधली गेली. गावाला जोडणाऱ्या पायवाटा ‘डांबरा’च्या झाल्या. नळाच्या तोटीतून घरांच्या दारांशी पाणी आले. बैलगाडीचे संथ
वाहन आणि घोडागाडीचा ‘टांगा’ इतिहासजमा
होऊन स्वत:च्या मालकीची दुचाकी आणि चारचाकी वेगवान वाहने गावात दिसू लागली.
लोकजीवनातही विलक्षण बदल झाला आहे. ‘शुभंकरोति’ची सांजवेळ टीव्हीतील फिल्मी गीतांना देण्यात आली. ‘आई’च्या जागी ‘मम्मी’ आली.
एकेकाळी घरात मंद तेवणारे, समई आणि लामणदिवे माळ्यांवर गेले.
त्यांची जागा लख्ख प्रकाश देणाऱ्या विजेच्या दिव्यांनी घेतली. घासलेटच्या प्रभाकर
कंदीलांचा ‘अस्त’ झाला. गावच्या
गल्लीबोळातून ग्रामपंचायतीचे खांबावरील दिवे आले. पोशाखात बदल झाला. ‘सलवार सूट’ दिसू लागले. नव्याचा स्वीकार करताना
जुन्यातील ‘सोने’ जपणारे काही लोक
गावात आहेत. शहाबाज गावाने मध्यंतरी पाचसहा वर्षें जीवघेण्या दुष्काळाची आपत्ती
सोसली. दुष्काळातील भयंकर यातनांतून गाव ताठ कण्याने उभे राहिले आहे.
- म.ना. पाटील
---------------------------------------------------------------------------------------------------------
16 टिप्पण्या
नामवंत साहित्य समीक्षक म.सु. पाटील, त्यांची कन्या कवयित्री नीरजा यांचा दीर्घ परिचय आहे पण ते मूळचे शहाबाज या गावातले आहेत ही गोष्ट आज कळली .लेखात भरपूर माहिती दिल्यानं वाचण्यास खूप आनंद वाटला. लेखकाचे आणि थिंक महाराष्ट्राचे आभार
उत्तर द्याहटवाग्रामें ग्रामें रत्न-सम्पदा 👌 गांधीजींनी खेड्या कडे चला हा सन्देश दिला होता कारण गाव पातळीवर खूप काही सकारात्मक आणि नवे करण्याजोगे होतं / आहे.
उत्तर द्याहटवाआजतागायत तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे गाव इतकंच ज्ञान होतं. आज खुप सारा इतिहास वाचावयास मिळाला.
उत्तर द्याहटवाधन्यवाद 👏👏👍
आज माझे वय 56 आहे,शिवाय शहाबाज गावातीलच पण इतकी छान गावविषयी माहिती माहीत नव्हती,खूप छान,सुंदर
उत्तर द्याहटवाथोडीफार कल्पना होती, इतकं काही माहिती नव्हती. ती सांगितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद 🙏🙏 छान सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाथोडीफार कल्पना होती, इतकं काही माहिती नव्हती. ती सांगितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद ���� छान सुंदर ����
उत्तर द्याहटवाvery good information about our Village.
उत्तर द्याहटवाशहाबाजचा इतिहास फार सुंदर रितीने सांगितला आहे
उत्तर द्याहटवामाझ्या गावा विषयी सुंदर माहिती, एक शंका 'बहीरी देवी'तीची जत्रा ,व भैरवनाथ ही वेगळी आहेत का या विषयी योग्य ते शंका निरसन व्हावे ही नम्र विनंती. -सतिश मोडखरकर
उत्तर द्याहटवाखुप सुंदर
उत्तर द्याहटवाAwesome information...
उत्तर द्याहटवागावा बद्दल माहित नसलेली माहिती मिळाली.. खूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवाअत्यंत बहुमोल माहिती आहे
उत्तर द्याहटवाप्रा. सुभाष पाटील.
उत्तर द्याहटवाफारच उद्बबोधक व शहाबाज गावाचा ऐतिहासिक,
सामाजिक व भौगोलिक परामर्ष थोडक्यात घेणारा
लेख.अर्थातच त्याचे लेखन सर्वसमावेशक नसले तरी
शैक्षणिक क्षेत्रात आजी माजी मान्यवरांनी मारलेली भरारी
किती कौतुकास्पद आहे हे यातून व्यक्त होताना दिसून येते.
छान माहिती
उत्तर द्याहटवाफार उत्कुष्ट माहितीआहे. शहाबाज गाव हा रायगडमध्ये एक नंबर आहे गावात पहिल्यापासुन आता पर्यंत शैक्षणिक तसेच वेगवेगळे क्षेञात दैदिप्यमानकामगिरी केली अशा माण्यवरांची यादी दिल्यास गावात किती रत्न झाली ,आहेत,वपुढे वाटचाल करीत आहेत याची माहीती होईल म.ना पाटील साहेब धण्यवाद रामदास पाटील सेवानिवृृृृत्त API कणे पेण
उत्तर द्याहटवा