शीतलादेवी |
ग्रामदेवतांचे शेंदूर फासलेले ओबडधोबड आकारातील तांदळे
गावोगावच्या वेशींवर पाहण्यास मिळतात. त्यांची नावे म्हसोबा, विरोबा, वेताळदेव,
बापदेव, गावदेवी यांसारखी असतात. ‘शितलादेवी’ अथवा ‘शीतळादेवी’ ही त्या देवतांपैकी वैशिष्टयपूर्ण देवता. शीतलादेवी
ही स्वच्छतेचे अधिष्ठान असलेली देवता आहे. तिच्या हातात असलेली केरसुणी व
माथ्यावरील सूप स्वच्छतेचे आवाहन करणारे आहेत. त्या देवतेला प्रसन्न करणे म्हणजेच
भक्ताने आजूबाजूला स्वच्छता राखणे हा अर्थ सद्यकाळात उपयुक्त ठरणारा आहे. शीतलादेवी
ही लोकदेवता असून तिचे ठाणे गावकुसाबाहेर घुमटीत निंबाच्या किंवा पिंपळाच्या
झाडाखाली असते. ती देवता कोपली असता देवी हा रोग होतो. मग तिला शांत करून त्या
रोगाचे उपशमन करतात अशी भारतभर समजूत आहे. पुजेचा विधी शीतल असल्यामुळे व तिला
शीतल पदार्थच आवडतात म्हणून तिला हे नाव पडले असावे. मुलांना गोवर-कांजिण्या
यांसारख्या उष्णतेमुळे होणाऱ्या रोगांचा संसर्ग झाल्यास शीतलादेवीची पूजा करण्याची
व देवीची गाणी म्हणजेच बायांची गाणी म्हणण्याची प्रथा काही भागांत आहे. देवीच्या
पुजेमध्ये थंड समजली जाणारी पानेफुले वापरली जातात. देवीला नैवेद्यदेखील थंड
दहीभाताचा दाखवला जातो.
शीतलादेवीच्या जुन्या काळातील कोरीव प्रतिमा आढळल्या आहेत.
सर्वसामान्यपणे देवीच्या चतुर्भूज मूर्ती आढळतात. परंतु काही ठिकाणी सहा, आठ,
दहा आणि बारा हात असलेल्या प्रतिमाही
मिळाल्या आहेत. स्कंद पुराणात शीतलाष्टक नावाने देवीचे स्तोत्र दिले आहे.
शीतलादेवीची आराधना करण्यासाठी पुढील मंत्र म्हटला जातो: वन्देऽहंशीतलांदेवीं
रासभस्थांदिगम्बरीम्।। मार्जनीकलशोपेतां सूर्पालंकृतमस्तकाम्।। त्याचा अर्थ,
गाढवावर विराजमान, दिगम्बरा, हातात झाडू आणि कलश धारण करणारी, मस्तकावर सूपाचे
अलंकार घालणाऱ्या शीतलादेवीला मी वंदन करत आहे.
महाराष्ट्रात तिची चतुर्भूज व उभ्या अवस्थेतील मूर्ती आढळते.
तिचा एक हात आशीर्वादासाठी असतो तर उरलेल्या तीन हातांत कमळ, कलश व सीताफळ असते. तिची विविध प्रदेशांत उजाली, बसंतबुढी, सेडलमाता, चेचकमाता, मसानी,
जगदम्मा, मोठीबाई अशी भिन्न नावे आहेत. तिच्या
अकराव्या-बाराव्या शतकांतील मूर्ती राजस्थान-गुजरात येथे आढळतात. दक्षिणेत ती
चतुर्भुज व बसलेली आढळते. तेथे तिच्या तीन हातांत त्रिशूळ, डमरू
व ब्रह्मदेवाच्या पाचव्या शिराची कवटी असते, तर चौथा हात हा
आशीर्वादासाठी उभारलेला असतो.
उत्तरप्रदेशात चैत्र महिन्याच्या कृष्णाष्टमीपासून
शीतलादेवीच्या पूजेस आरंभ होतो. साधारणपणे आषाढ महिन्यापर्यंत येणारी प्रत्येक
कृष्णाष्टमी हा देवीचा पूजा दिवस असतो. त्या दिवशी शीतलादेवीची पूजा आणि बासोडा
म्हणजेच शीळे जेवण भक्षण करण्याची पद्धत आहे. देवीचे प्रमुख आयुध खूर आणि वाहन
गाढव आहे. काही ठिकाणी अक्षमाला, कलश, धनुष्य, बाण, ढाल, त्रिशूल, डमरू, केरसुणी यांसारखी आयुधेही पाहण्यास मिळतात. त्यांतील गाढव हे वाहन व हाती
केरसुणी ही रचना अक्कादेवी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठा या देवतेशी साम्य
दर्शवणारी आहे.
अलिबागजवळील शीतलादेवीचे मंदिर |
रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील दिघोडे येथील शीतलादेवीचे
मंदिरही प्रसिद्ध आहे. ते लहानसे मंदिर दिघोडे-पनवेल रस्त्यावर आहे. मंदिरामध्ये
शीतलादेवीसह भग्न अवस्थेतील शेंदूरचर्चित इतर मूर्ती आहेत. त्या मूर्तींमुळे ते
स्थान पुरातन असल्याचे ठरवता येते. नवीन पनवेल येथील शीतलादेवीचे मंदिरही प्रसिद्ध
आहे. पालघर जिल्ह्यात केळवे येथेही शीतलादेवी मंदिर आहे.शीतलादेवी गावोगावी पूजली
जाते ती शांतरसासाठीच!
शीतला ही देवीचा रोग पसरवते ही समजूत दृढ करणारी कथा दक्षिण
भारतात प्रचलित आहे, ती येणेप्रमाणे –
पिरुह नावाचे ऋषी व त्यांची सुंदर व पतिव्रता अशी नागावली ही पत्नी.
तिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्म-विष्णू-महेश हे पिरुह ऋषी
दुसरीकडे बाहेर गेले असताना घरी आले. नागावलीने त्यांच्या मनातील इच्छा जाणली व
तिने त्या तिघांना बालके बनवले. त्या कारणाने ते त्रिदेव चिडले व त्यांनी नागावलीला
शाप दिला, की तू कुरूप बनशील. त्यामुळे तिला देवी आल्या व
त्याच्या व्रणांनी तिचा चेहरा विद्रूप झाला. काही काळाने पिरुह ऋषी घरी आले,
त्यांनी तिचा असा विद्रूप चेहरा पाहताच तिला घराबाहेर काढले व शाप
दिला, की ‘तू राक्षसी होशील व देवीचा रोग लोकांत पसरवशील.’ त्या दिवसापासून ती पृथ्वीवर देवीचा रोग
फैलावू लागली!
तुषार म्हात्रे हे माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. ते रायगडमधील
पिरकोन या गावी राहतात. त्यांनी बीएससी, बीएड आणि डीएसएम (डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट) पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे विज्ञान विषयातील दोन शोधनिबंध
आंतरराष्ट्रीय ऑनलाईन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. ते 'तुषारकी'
ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करतात. ते 'लोकसत्ता',
'सकाळ', 'रयत विज्ञान पत्रिका', 'नवेगाव आंदोलन', 'कर्नाळा' या
दैनिकांतही लेखन करतात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
खूप छान आणि अभ्यासपूर्ण.
उत्तर द्याहटवा