शेषराव घाटगे यांच्या आयुष्याची
चित्तरकथा मोठी रोमांचकारक आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करूनही
त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यांच्या चरित्रसाधनांवर 2011 ते 2012 या
शताब्दी वर्षात प्रकाश पडला! त्यांचा
चरित्रग्रंथ एकशेदोन वर्षांनी (मरणोत्तर एकोणसत्तर वर्षांनी) प्रसिद्ध झाला.
शेषराव त्या काळी शिक्षणासाठी कोलकाता येथे गेले. शेषराव तेथे स्वातंत्र्याच्या
उर्मीने झपाटले आणि त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात अमरावती जिल्ह्यात उडी घेतली.
उपलब्ध छायाचित्रे आणि प्राथमिक साधने यांतून ते अमरावती जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यात
पुढे आलेले दिसून येतात. महात्मा गांधी यांनी ‘हनुमान व्यायाम शाळे’स भेट दिली, तेव्हा ते अन्य मित्रांसह गांधींजींच्या
जवळ उभे होते. शेषराव हे अमरावतीत झालेल्या मिठाच्या सत्याग्रहातही होते. ते
विदर्भ प्रांतिक शेतकरी परिषदेचे मंत्री होते.
घाटगे यांचे घराणे कर्नाटकातील बिदर
जिल्ह्याच्या कल्लूर तालुक्यातील उडमनळीचे. शेषराव यांचे पूर्वज प्रारंभी सांगली
जिल्ह्याच्या विटा गावाजवळील सोन्याची वाडी येथे स्थलांतरित झाले. पंरतु त्या
घराण्यातील दौलतराव अमृतराव घाटगे हे विट्याला दुष्काळामुळे रोजगाराची भ्रांत निर्माण
झाल्याने रोजगाराच्या शोधात अमरावतीला गेले. त्यांच्या तीन पिढ्या मोर्शी
तालुक्यातील नेरपिंगळाईत गेल्या. दौलतराव घाटगे यांचे भाऊ पिराजी हे पुढे
मूर्तिजापूरला स्थायिक झाले. पुढील पिढीने धुळे येथे स्थलांतर केले तर शेषराव
यांची तिसरी पिढी डॉ. विजय श्रीकांत घाटगे,
राजेंद्र श्रीकांत घाटगे हे गंगा-गोदावरीच्या सान्निध्यात नाशिक
क्षेत्री 1980 पासून स्थायिक झाले आहेत.
शेषराव यांची चरित्रसाधने काळाच्या ओघात गडप झाली असली तरी
त्यांनी पत्नीला लिहिलेली प्रेमपत्रे त्यांच्या वारसांनी जतन करून ठेवली आहेत.
त्यातून पत्निवियोगाचे दुःख तीव्रतेने व्यक्त होते. शेषराव तरुण वयात कोलकाता येथे
‘दंतरोग चिकित्सा’ अभ्यासक्रमासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी पत्नीशी पत्ररूप संवाद केला.
ती पत्रे पती, प्रियकर, विद्वान व
सुधारक अशा व्यक्तीची असल्याने त्या पतिपत्नी संवादाला
बहर येतो. ते त्यांच्या पहिल्याच पत्रात म्हणतात, ‘नवऱ्याने
बायकोस व बायकोने नवऱ्यास पत्र लिहिणे-वाचणे चांगले नव्हे अशी एक (वेडगळ) समजूत आहे.’ परंतु जे जे म्हणून शिकले सवरलेले आहेत त्या पतिपत्नीमध्ये
पत्रव्यवहार झपाट्याने सुरू आहेत आणि त्याच वाहत्या गंगेत आपणही हात धुऊन घ्यायचे
ठरवले आहे.” शेषराव पुढे लिहितात, “तू जर चांगलीच स्त्रियांची पुस्तके वाचलीस तर कस्तुरीबाई
(गांधी ) होशील.” त्यांनी साध्वी स्त्रियांची चरित्रे वाचत जाण्याचा सल्ला
पत्नीला दिलेला आहे. ते दुसऱ्या एका पत्रात म्हणतात, ‘पत्नीपासून दूर असल्याने सहारा वाळवंटात फिरत असलेला प्रवासी
तहानेने व्याकुळ झाला असता, पाणी त्याच्या नजरेस पडत नाही, म्हणून थोड्याफार
अंतरावर झळझळत असलेल्या मृगजळालाच पिण्याचे पाणी समजून हरणासारखी धाव घेतो व
त्याजवळ जाताच निराशेने खाली मान घालून जीव मेटाकुटीस आल्यामुळे मृतवत होतो.
त्याचप्रमाणे आजची माझी स्थिती झाली आहे.’ अशा शब्दांत ते
त्यांची उलघाल व्यक्त करून विषयवासनेपासून दूर राहण्याचे अभिवचन पत्नीला देऊन
टाकतात! होळीच्या सणाला घरातील आठवण शेषराव
काढतातच आणि पत्नीला लिहिताना, ‘तूही थोडीशी माझ्या मनाच्या बागेतून हंसाप्रमाणे
विहार करून गेलीस’
अशी कबुली देतात. ‘स्त्री
हीच सर्व जगाची सार आहे, स्त्रीशिवाय सुखदुःखाचे भोग तुच्छ होय. जिथे स्त्री नाही तिथे जगाचा
खटाटोप व्यर्थ होय’ असेही त्यांनी तरुण पत्नीला सांगितले आहे.
त्याचबरोबर, शेषराव यांच्या पत्रांतून ‘प्रोग्रेसिव्ह’ व्यक्तिमत्त्वाचेही दर्शन घडते. त्यातून विशेषतः त्यांचे
स्त्रीशिक्षणविषयक विचार आणि स्वातंत्र्य आंदोलनाची स्पंदने ध्वनित होतात. आधुनिक
मराठी पत्रवाङ्मयात आद्यपत्राचा मान त्या पत्रव्यवहारास मिळेल एवढी ती अस्सल आणि
खरी आहेत. पंडिती साहित्य, अभिजात संस्कृत वाङ्मय यांचा
व्यासंगही त्यातून दिसून येतो. ते ‘रुक्मिणीतनय’ असे उपनाव घेऊन कविताही लिहीत. ‘विरहकटुता’ ही कविता त्यांच्या पत्निविरहाने झालेल्या शोकाकूल मनाचे दर्शन घडवते.
शेषरावांच्या पत्राचा प्रारंभ ‘चिरंजीव सौभाग्यवती वज्रचुडेमंडित लाडके’ अशा ऐतिहासिक पद्धतीच्या शैलीने होतो. ते
पती-पत्नी संवादाचे महत्त्व पत्नीला सांगत राहतात. पत्रे दीर्घ स्वरूपाची आहेत.
मराठी मानसही त्या पत्रांतून समोर येते. त्या काळात व्यक्ती किती प्रमाणात
समष्टीचा विचार करत होती हेही दिसून येते. ती पत्रे प्रेमवीराची आहेत आणि
देशभक्ताचीही आहेत.
महाराष्ट्रीय समाजावर स्वामी
विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर,
शरदश्चंद्र बोस, सुभाषचंद्र बोस, अरविंद घोष या बंगाली बाबूंचा जसा प्रभाव त्याकाळी होता तसाच टिळक,
आगरकर, महात्मा गांधी, लाला
लजपतराय यांचाही होता. ते शेषरावांच्या पत्रसंवादातून ठळकपणे दिसते. ते इतिहासकालीन
मराठा स्त्रियांचा गौरव करताना कस्तुरीबाई गांधी, रमाबाई
रानडे यांचा आदर्श पत्नीसमोर ठेवतात. शेषराव सुधारणा चळवळीला अनुकूल दिसतात.
त्यांना क्रांतिकारक आणि सुधारक यांचे आकर्षण होते असेही दिसून येते.
शेषराव साम्यवादी चळवळीत असल्याचेही
जाणवते, पण ती साधने दुय्यम
स्वरूपाची आहेत. त्या काळात विदर्भात साम्यवादी चळवळ नुकती सुरू झाली होती.
कम्युनिस्ट पक्षाची शाखा नागपूर येथे 1935 मध्ये स्थापन झाली. कम्युनिस्ट पक्ष
अमरावती जिल्ह्यात कायदेशीर 1941 मध्ये झाला. श्रीपाद अमृत डांगे यांच्यापासून
अनेक कम्युनिस्ट कार्यकर्ते स्वातंत्र्यलढ्याला अनुकूल होते. अनेक कम्युनिस्ट
कार्यकर्त्यांनी 1942 च्या ‘चलेजाव आंदोलना’त सहभाग घेतल्याचे तत्कालीन पोलिस रिपोर्टवरूनही दिसून येते. साम्यवादी,
समाजवादी विचारांची माणसे काँग्रेसअंतर्गत काम करताना दिसतात.
शेषराव घाटगे यांचा कल कम्युनिस्ट विचारांकडे काही काळ होता. मात्र ते
स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसच्या वीर वामनराव जोशी यांच्याबरोबर दिसतात.
त्यांचे विद्यमान वारस डॉ. विजय घाटगे
एम.डी. (मेडिसीन, किडनी विकारतज्ज्ञ)
झाल्यावर पुण्यात रुबी हॉलला सेवेत होते. त्यावेळी त्यांचे धाकटे बंधू राजेंद्र
घाटगे हे अमरावती जिल्ह्यात ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या कामात ओढले गेले होते. भाई मंगळे हे
त्यांचे प्रेरणास्थान होते. घरात मार्क्स, लेनिन यांची
ग्रंथसंपदा असताना आणि शेषराव घाटगे यांच्यापासून क्रांतिकारी विचारांचा वारसा
असल्यामुळे राजेंद्र घाटगे तरुणांचे नेतृत्व करू लागले. परंतु विजय यांनी लहान
भावाला दोन महत्त्वपूर्ण सल्ले दिले : 1. आधी शिक्षण पूर्ण कर; 2. नेतृत्व करायचे असेल तर पुण्यात येऊन कर (‘पुढारी व्हायचे असेल तर पुण्यात हो’ असे त्यांचे
शब्द). राजेंद्र घाटगे यांनी डी.फार्म.पर्यंतचे शिक्षण पूर्ण
केले. त्यांना पुण्यात एका औषध कंपनीत एम.आर.ची नोकरी मिळाली. ते सिंगापूरला
कंपनीच्या वतीने जाऊन आले होते. ते नाशिकला औषधविक्रीच्या व्यवसायात स्थिरस्थावर
झाले आहेत.
शेषरावांची ही कथा मुळात वाचताना
महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची गरज लक्षात
येते. शिवाय, किती बहुजन
नायकांच्या शौर्यकथा अंधारात, अज्ञातात असतील असेही मनात
येते.
संदर्भ -1) अमरावती जिल्हा कम्युनिस्ट
चळवळीचे सिंहावलोकन, एन.डी. मंगळे,
सचिव-भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जिल्हा कमिटी,
अमरावती 2) तत्रैव : पृष्ठ-30.
3. देशभक्त शेषराव घाटगे – लेखक : शंकर बोऱ्हाडे
- शंकर बोऱ्हाडे 9226573791
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य
रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत
सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी,
दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने
मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या
वृत्तपत्रांतून लेखन करतात. 'अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलना'चे (ठाणे) अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय
भाषणाची चिकित्सा करणारा त्यांचा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व
दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
देशभक्त शेषराव घाटगे पुस्तकातील काही छायाचित्रे -
देशभक्त शेषराव घाटगे पुस्तकातील काही छायाचित्रे -
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
5 टिप्पण्या
शेषराव घाटगेंसारख्या स्वातंत्र्यकाळात कार्य करणार्या अनेक नायकांची कथा लोकांसमोर येणे महत्वाचे आहे —
उत्तर द्याहटवास्वातंत्र्य सैनिक .
उत्तर द्याहटवाशेषरावजी घाटगे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान प्रशंसनीय आहे.
या कार्यात मोलाची साथ देणारी संसाराचा रथ ( सोबत व ) समर्थपणे ओढणारी अर्धांगिनी श्रीमती लक्ष्मीबाई यांचा वाटा तेवढाच मोलाचा .
स्वातंत्र्य दिनि १५.०८.२०२०
आदरांजली
प्रणाम
सौ.आशा घाटगे
नाशिक
( नातसुन )
घाटगे परिवार समजतील एक आदरणीय , वंदनीय व उच्चशिक्षित असून समाज घडवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावत आहे.
उत्तर द्याहटवाआदरणीय व्यक्तित्व आणि
उत्तर द्याहटवातितकेच रंजक आणि ओघवते वाचनीय लेखन
उत्तम लेख .....
उत्तर द्याहटवाRamesh Kalaskar