आर्याचा आडखेड्यातील अभ्यासवर्ग (Village Education in Lockdown)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

आर्याचा आडखेड्यातील अभ्यासवर्ग (Village Education in Lockdown)


आर्या जोशी यांच्या घरी शिकायला येणारी मुले
रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाने हे आमचं बारा वाड्यांचं गाव. आम्ही इथं सेंद्रीय शेती करतो. मी आणि कन्या होळीच्या सणासाठी गावाला आलो आणि लॉकडाऊनचे पडघम वाजायला लागले होळीचा उत्सव, प्रत्येक वाडीत घरोघरी फिरणारी पालखी अशा वातावरणात सगळे दंग असतानाच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि आम्ही इथं अडकून पडलो. छोटं गाव, दुकानं, शाळा, सगळं बंद. अनिश्चिततेचं आणि भीतीचं सावट सर्वदूर! आमचं गावही त्याला अपवाद नव्हतं.
            मी पुण्याला ज्ञानप्रबोधिनी या संस्थेच्या पौरोहित्य उपक्रमाचं काम गेली पंधरा वर्ष करत आहे. मी गावातील शाळांमधे प्रबोधिनीचे पूरक शिक्षणाचे उपक्रम नेहमी घेत असते. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी स्नेहबंध तयार झालेला आहे. आमच्याकडे येणार्‍या मावशींची मुलगी दहावीला आहे. ती आईबरोबर घरी आलेली असताना मी तिला सहज म्हटलं, की 'तुझं महत्त्वाचं वर्ष आहे. अभ्यासात काही मदत लागली तर विचार.' दुसर्‍या दिवशी तिची मोठी बहीण तिला घेऊन आली आणि 'मॅडम हिचा अभ्यास घ्याल का?' असं तिने विचारलं. मी फारसा विचार न करता 'हो' म्हटलं. एक दिवस वाट पाहिली, ती आली नाही. दोन दिवसांनी दहावीची एक, नववीचे दोन आणि आठवीच्या तीन विद्यार्थिनी आल्या. एकाच वाडीत राहणार्‍या. मुंबईहून शिमग्यासाठी आलेली बरीच कुटुंबं इथंच अडकली होती. त्या कुटुंबांतील मुलंही त्यामध्ये होती.
इयत्तानिहाय मुलांना बसवून आर्या जोशी मुलांचा अभ्यास घेतात
            आठ मुलांसह सुरु झालेला हा प्रवास पंचवीस मुलांपर्यंत येऊन थांबला. आठवी ते दहावीची एकूण दहा मुलं रोज आमच्या घरी अभ्यासाला येतात हे दोन वाड्यांमधे समजलं आणि छोट्या वयोगटाचे पालक घरी येऊन गेले. 'शाळा अजून सुरू नाहीत तर यांचाही क्लास घ्या, मॅडम'. सकाळी दहा मोठी मुलं येत होती. ही छोटी मुलं संख्येने बारातेरा होती. त्यामुळे त्यांना संध्याकाळी बोलावलं. ज्ञान प्रबोधिनीत अनेक वर्ष असल्याने शिक्षणविषयक चिंतन ऐकायला मिळत होतं. व्याख्यानं, शिबिरं, कार्यशाळा याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, काही वेळा ठरवून घेतली आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची संधी मला इथं मिळाली! शाळा सुरू नाहीत, हातात पाठ्यपुस्तके नाहीत अशा परिस्थितीत मी आणि इयत्ता दुसरी ते दहावीची पंचवीस मुलं असा सहप्रवास सुरू झाला. इयत्ता पहिलीतील माझी मुलगीही याच गटाचा भाग झाली. तिला मित्रमैत्रिणी आणि ताईदादा मिळाले. मुलं ग्रामीण भागातील असल्याने शहरी मुलांच्या तुलनेत ती थोडी मागे असतात हा सामान्यतः अनुभव येतो. पण दोन महिने एकत्र अभ्यास केल्यावर मला जाणवलं, की ग्रामीण मुलांतही अनेक कौशल्यं आहेत. गरज असते, त्यांना थोडासा विश्वास आणि आपुलकी देण्याची.
            १. ज्यांना वरच्या इयत्तेतील मुलांची पुस्तकं मिळाली त्यांचा अभ्यास आम्ही थेट सुरू केला. पण सुरूवातीला शुद्धलेखन करायला दिल्यावर वाचनातील उणिवा, लेखनातील त्रुटी, स्पेलिंग पाठ नसणे अशा गोष्टी लक्षात येऊ लागल्या. मग त्यावरही काम सुरू केलं. वाचन चांगल्या पद्धतीने करता येणं, हस्ताक्षर चांगलं आणि शुद्ध लिहिता येणं, शब्दांचे अर्थ समजणं यासाठीची तंत्रे वापरली. इंग्रजी आणि हिंदी या भाषांसाठीही तसंच काम केलं. छोट्या गटाबरोबर काम करताना अ ते अः आणि क ते ज्ञ लिहिता येणं, पाढे पाठ करणं, स्पेलिंग पाठ करणं यावर आधी काम सुरू केलं. उच्चारानुसार इंग्रजी शब्द वाचणं व त्याचा अर्थ समजून घेणं यावरही विचार केला.
           
२. कविता किंवा धडा याचं नीट आकलन होण्यासाठी पाठ्यपुस्तकांमधे असलेला आशय नीट समजणे आवश्यक होतं. त्यामुळे आठवी ते दहावीला विशेषतः पाठानुरूप असे युट्यूबवरचे व्हिडिओ दाखवले. त्यावर आम्ही गप्पा मारल्या. दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग केल्यामुळे मुलांना पाठातील संकल्पना समजणे सोपं झालं. उदाहरणार्थ राजगडाचं वर्णन असलेलं पत्र मुलगा वडिलांना लिहित आहे असा धडा आहे. या मुलांनी राजगड कधीच पाहिलेला नाही. त्यामुळे राजगडावरचा व्हिडिओ पाहिल्यावर धड्यातील वर्णन मुलांना नजरेने अनुभवायला मिळालं. सर्कशीतला विदूषक, उम्मेद भवन आणि राजस्थानातील प्रदेश, गोव्याचे समुद्रकिनारे आणि संस्कृती, शाहिर विठ्ठल उमप यांचे पोवाडा सादरीकरण असे व्हिडिओ मुलांना दाखवले. त्यामुळे धडा शिकणं सोपं आणि आनंददायी झालं.
            ३. धड्याखालील प्रश्नांची उत्तरं गाईडमधे पाहून लिहिण्याची अनेक वर्षांची सवय मोडणे हे मोठे आव्हान होते. धड्यातील कविता किंवा पाठातील एकेक संकल्पना शिकून घेतली की ती लिहून काढणे, कवितेचा समजलेला अर्थ स्वतःच्या शब्दात लिहिणं यातून मुलांचा विश्वास हळूहळू वाढला. एक धडा शिकून झाला, की त्या त्या धड्यावर ओपन बुक टेस्ट घेतली. इतिहासातील धडे शिकताना घटनांचा कार्यकारणभाव समजून घेतल्यानं सनावळ्या पाठ न करताही इतिहास अभ्यासणं रंजक झाले. नववी- दहावीच्या भाषांच्या पुस्तकात काही धडे, कविता या मुलांच्या भावी जीवनाला दिशा देणार्‍या आहेत. त्यामधे व्यक्तिगत संवाद साधण्याची संधी घेतली. त्यामुळे प्रत्येक मुलाला- मुलीला स्वत:च्या आयुष्याशी ते जोडून पाहता आलं. त्यातून एक बंधही आमच्यात तयार झाला.
            ४. एकाच वाडीत राहणारी दुसरी ते सातवीची मुलं हे बलस्थान होतं. त्यांच्याशी गावात पडणारा पाऊस, सभोवतालचा निसर्ग, भातशेती, पावसाळ्यात दिसणारे कीटक, प्राणी, स्वतःच्या घराची रचना यावर बोलण्याची संधी दिली. मुलं त्या विषयांवर मिळून निबंध तयार करत आणि प्रत्येकजण त्यावर चित्रं काढून व्यक्त होत असे. धड्याच्या पलीकडे जाऊन केलेला हा अभ्यास पूरक आणि आनंददायी ठरला.
           
आर्या जोशी यांचे यजमान आशुतोष जोशी विद्यार्थ्यांना गणित शिकवतात.
५. मुलं म्हणजे दंगामस्ती. सहसा घरी खेळायला न मिळणारा कॅरम मुलं अभ्यासानंतर गटागटाने आमच्याकडं रोज खेळत. लुडोचे डाव रंगत. शाळेत चित्रकला हा विषय नसला तरी मुलांच्या हातातील कौशल्यामुळे छान चित्रंही रेखाटली गेली. एका विद्यार्थिनीला अभंग शिकवायला सुरूवात केली. आषाढी एकादशीनिमित्त शिक्षण विवेकच्या उपक्रमासाठी छोट्या मुलांचं रिंगणही हिरव्यागार शेतात रंगलं आणि त्याचं चित्रीकरण आम्ही पाठवलं. दोन महिन्यानंतर आता त्यांच्या शाळांमधून अभ्यास येऊ लागले तरीही मुलं अजूनही माझ्याकडे अभ्यासाला येतात. त्यांच्यात आम्हाला अभ्यासातले आणि वर्तनातले सकारात्मक बदल दिसत आहेत. धो धो पावसात या मुलांनी दरवर्षीप्रमाणे स्वतःच्या शेतात भातलावणीही केली. पण त्या चार दिवसांखेरीज एकही दिवस दांडी मारली नाही. माझ्या यजमानांनी त्या मुलांना विज्ञान आणि गणितातील काही मूलभूत संकल्पना समजावून सांगितल्या. मी पुण्याला परत आल्यावर तुम्हाला जी तंत्र शिकवली आहेत ती वापरून तुम्ही अभ्यास करत रहा आणि जे तुम्हाला समजलं ते इतरांनाही सांगा असं मुलांना सतत सांगते असते. आम्ही लौकिकार्थाने शिक्षणक्षेत्राशी संबंधित नाही. तरीही लॉकडाऊनच्या काळात आम्ही गावात असताना मुलांचा अभ्यास मागे पडू नये यासाठी हा छोटा प्रयत्न केला आहे. उच्चशिक्षित असल्याने गावातील पालकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या प्रक्रियेला यश मिळावं म्हणून आम्हीही अभ्यास करून
, तज्ज्ञांकडून संकल्पना शिकून घेत मुलांसह हा छोटा सहप्रवास केला आहे. समाधानी पालक आणि आनंदी विद्यार्थी हे सूत्र यातून मला सापडलं आहे! पावसात भिजून आलेली मुलं आणि आम्ही घरी एकत्र कोरा चहा पिताना हसतो, चेष्टा मस्करी करतो. छोटी मुलं अभ्यासात एकमेकांना मदत करतात, एकमेकांना सांभाळून घेऊन येतात, परत घरी जातात. पावसाने हिरव्यागार झालेल्या आमच्या शेतातून त्यांचा आवाज दूरवरून ऐकू येतो. घराच्या हिरव्या खिडकीतून नाचत, उड्या मारत, खिदळत येणारा त्यांचा समूह न्याहाळणं हा माझा आनंदठेवा बनला आहे!
- आर्या जोशी 9422059795 jaaryaa@gmail.com

आर्या आशुतोष जोशी यांनी 'श्राद्धविधीची दान संकल्पना' या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात एम ए केले आहे. आर्या यांनी विविध  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधे हिंदू धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मशास्र अशा विषयांवर सतरा शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. त्यांना धर्मशास्त्र या विषयातील अभ्यासासाठी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संशोधनासाठी 2010 मध्ये पूर्णकन्या प्रतिष्ठानचा 'कन्यारत्न पुरस्कार' आणि 2011 मध्ये सुलोचना नातू ट्रस्टचा 'स्री शक्ती पुरस्कार' प्राप्त झाला. त्या मराठी विकिपीडियावर दोन वर्षांपासून संपादक म्हणून कार्यरत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या

  1. खूप सुंदर कृतीशील आणि अनुकरणीय उपक्रम!!

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय चांगला उपक्रम!

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर आणि समाजोपयोगी उपक्रम. विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तुम्हा उभयतांचे खूप खूप कौतुक

    उत्तर द्याहटवा
  4. उत्तम उदाहरण. अपघाताने मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान कार्य केले आहे, तुमच्या बद्दलची माहिती वाचली.
    श्रेष्ठ विदुषी आहात. सादर प्रणाम!

    उत्तर द्याहटवा
  6. आर्या जोशींनी अनपेक्षित चालवलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे भाग्यच थोर आहे असेच म्हणावे लागेल.- प्रमोद शेंडे

    उत्तर द्याहटवा