नयन बारहाते |
नयन बारहाते
यांचे व्यक्तिमत्त्व एकच एक उपाधी लावून वर्णन करणे कठीण आहे. नयन हे कमर्शियल
आर्ट व पत्रकारिता या दोन्ही विषयांतील पदवीधर. त्यांचा संचार त्यांच्यात दडलेला
चित्रकार, पत्रकार, मुखपृष्ठकार
नयन बारहाते मूळचे नागपूरचे. त्यांच्या वडिलांचे भाजीचे छोटेसे दुकान होते. आई घरकाम करायची. त्यातून सात भावंडांचे भरण-पोषण, शिक्षण कसेबसे होई. त्यामुळे बारहाते यांना काम करत शिक्षण घ्यावे लागले. कमावा आणि शिका या तत्त्वानुसार नयन बारहाते व त्यांची भावंडे यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. कौतुकाची बाब म्हणजे बारहाते कुटुंबातील सातही मुले उच्चशिक्षित झाली ! नयन यांनी सुरुवातीच्या काळात ‘देशोन्नती’, ‘लोकपत्र’ या दैनिकांच्या पुरवण्या सजवण्याचे काम केले. पण त्यांचा जीव नोकरीत काही रमेना. मग त्या अवलियाने नोकरीला ठोकर मारून, ‘सृजन कम्युनिकेशन्स’ हा स्वत:चा डिझाईन स्टुडिओ नांदेडमध्ये उघडला. नयन यांच्यातील प्रतिभावंताचा आगळावेगळा प्रवास तेथून सुरू झाला. त्यांनी ज्येष्ठ चित्रकार प्रमोद कांबळे यांच्यापासून ते नरेंद्र बोरलेपवार यांच्यापर्यंत महाराष्ट्रातील व देशातील अनेक चित्रकारांबरोबर काम केले आहे. त्यांनी स्वत:ही काही चित्रकार घडवले आहेत.
मुखपृष्ठकार म्हणून नयन यांची बीजे रोवली गेली होती ते कॉलेजमध्ये शिकत असताना. ते नागपूरात अनिल बुक डेपोमध्ये पार्टटाईम नोकरी करत होते. तेथे काम करत असताना पुस्तकांची मुखपृष्ठे पाहण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली. नयन म्हणतात, की त्यांच्याजवळ कल्पकतेचा तिसरा डोळा आहे. त्यामुळे ते पुस्तकाच्या अर्थाच्या गाभ्याशी जाऊन पोचतात आणि विलक्षण असे मुखपृष्ठ साकारले जाते. त्यांनी अनेक नामांकित प्रकाशन संस्थांची मुखपृष्ठे केली आहेत. त्यांनी मॅजेस्टिक, मौज, पॉप्युलर, पद्मगंधा, श्रीविद्या, विजय, संवेदना, अभिजित, ग्रंथाली, संस्कृती, निर्मल आदी मराठी पुस्तक प्रकाशन संस्थांसाठी पुस्तकांच्या मुखपृष्ठ डिझाईन आणि मांडणी ही कामे केली. ते राष्ट्रीय पातळीवरील ‘वाणी’ व आंतरराष्ट्रीय पातळीवरील लंडनचे ‘केंब्रिज’ अशा दोन प्रकाशन संस्थांपर्यंत पोचले आहेत. नयन यांनी त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे केली आहेत. त्यात सआदत हसन मंटो आणि अफज़ाल अहमद सैयद या पाकिस्तानी लेखकांसह हबीब तन्वीर, शशी थरूर, उदय प्रकाश, सिनेगीतकार इर्शाद कामील, शिवानी, के. सच्चिदानंदन, असंगघोष, सुधीर पचौरी, दीप्ति मिश्र, अरुणा मुकीम, दामोदर खडसे, अनामिका, झारा खादेर, न्या. देवीप्रसाद सिंह आदी मान्यवर लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे नयन यांनी केली आहेत. नयन बारहाते म्हणतात, की “मुखपृष्ठ करताना, मी लेखक व प्रकाशक या दोघांच्याही भूमिकांचा विचार करतो. लेखकासाठी त्याचे पुस्तक लेकरू असते तर प्रकाशकासाठी त्याचे ते पोट असते. त्यामुळे दोघांच्याही त्या भावना लक्षात घेऊन मुखपृष्ठ करावे लागते.”
नयन यांना ‘अनावृत’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी अखिल भारतीय प्रकाशक संघाचा पुरस्कार मिळाला
आहे.
एक गोष्ट आहे एका बेस्ट सेलर पुस्तकाची. नयन बारहाते यांनी विजय पाडळकर यांच्या 'गंगा आये कहा से' या पुस्तकाचे मुखपृष्ठ केले आहे. ते पुस्तक गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांवर आधारित असे आहे. गुलजार यांनी जेव्हा ते हातात घेतले तेव्हा ते त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून भारावून गेले. त्यांनी स्वतःहून नयन यांना भेटण्यासाठी निमंत्रण धाडले. गुलजार यांनी त्या भेटीत 'गंगा आये ...' या पुस्तकाच्या एका प्रतीवर सही करण्याआधी प्रतिक्रिया लिहिली – “For your splendid designs, I have no poem to match.” गुलजार यांचे ते उत्कट शब्द ; त्यापेक्षा सर्वोच्च पुरस्कार तो कोणता ! पण तरीही नयन यांना पुरस्कार मिळतच गेले. नयन बारहाते यांना ‘अनावृत’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी अखिल भारतीय प्रकाशक संघाचा पुरस्कार मिळाला आहे. ते पुस्तक आहे पत्रकार संदीप काळे यांचे. नयन हे शब्द, अर्थ, रंग, रेषा आणि प्रतिमा यांचा किती सुंदर मेळ घालतात याचे ते उत्तम उदाहरण होय. संदीप काळे यांनी ग्रामीण भागातील विविध घटनांवर आधारित सदर लिहिले होते. त्या सदरातील लेखांचे संकलन ‘अनावृत’ या पुस्तकात आहे. बारहाते यांनीच त्या पुस्तकाचे शीर्षक सुचवले. त्यांनी त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशाची तिरीप, निळसर कापड, विझता दिवा, एक गोणपाट या प्रतिमांचा वापर केला आहे. त्यातील प्रकाशाची तिरीप ही प्रतिमा पत्रकारितेसाठी येते. प्रकाशाची एखादी तिरीप संपूर्ण परिसर उजळून टाकते, त्याप्रमाणे पत्रकार एखादे वास्तव प्रकाशात आणतो. निळसर कापड ही प्रतिमा तर विलक्षणच. निळेपण हा रंग सात्त्विकता, चांगुलपणा सूचित करतो. पत्रकाराने समाजातील ज्या विधायक, चांगल्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे त्याचे प्रतीक म्हणजे निळसर कापड; तर गोणपाट हे प्रतीक आहे समाजाबाहेर फेकल्या गेलेल्या दुर्लक्षित समाजाचे. विझलेला दिवा मालवलेल्या आशा व्यक्त करतो. एकूणच, ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय समाजाच्या जगण्याचे प्रतीक म्हणून या सगळ्या प्रतिमा मुखपृष्ठावर येतात. ग्रामीण वातावरणाचा ‘फिल’ही चित्राच्या रंगसंगतीतून येतो.
नयन बारहाते यांच्या मुखपृष्ठांतून त्यांचा सूक्ष्म विचार व त्यांनी साचेबद्धतेला दिलेला छेद लक्षात येतात. त्यांचे मुखपृष्ठ हे आभासी नसते; ते लेखकाचा सूर अचूकपणे पकडून कलात्मक मुखपृष्ठ साकारतात. बारहाते यांना पुरोगामी विचारांची बैठक आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या शैलीतही दिसतो. नयन यांच्यामध्ये सतत नवीन काहीतरी करण्याची उत्साही वृत्ती आहे. ते लोगो डिझाईन्स, ब्रोशर्स, निमंत्रण पत्रिका, लग्नपत्रिका अशी विविध व्यावसायिक कामे करतात. पण सगळी कामे जरा हटकेच असतात. नयन बारहाते लग्नपत्रिकेवर चक्क स्वतःची कविता टाकतात आणि साध्या कागदाला बोलके करतात, काहीतरी विचार मांडतात. एका लग्नपत्रिकेवर त्यांनी स्त्री-पुरुष समानता या विषयावरील स्वतःची सुंदर कविता लिहून, त्याला अनुरूप फोटो टाकून मांडणी केली आहे. त्या पत्रिकेचे शब्द असे आहेत-
प्रवासाला निघताना काय घेऊ रे सोबत
चंद्राच्या दुकानातून थोडी स्वप्ने आणून घेते
थोडी जागही घेऊन येते गुलमोहराच्या मंडईतून...
....आणि हा प्रवास नितांत रुमानी व्हावा म्हणून
सोबत मीच निर्माल्य शिरवू दोघंही समर्पणाच्या सरोवरात...
तर एक लग्नपत्रिका त्यांनी ‘मुलगी शिकावी, सबला व्हावी’ ही संकल्पना घेऊन तयार केली आहे. नयन यांची जगण्याबद्दलची, कलेबद्दलची मते आहेत. ते म्हणतात, प्रत्येक कलावंताला कल्पकतेचा तिसरा डोळा हवा, म्हणजे मग त्याची कला प्रयोगशील होते. नावीन्याचा ध्यास हे त्यांचे वैशिष्ट्य. ते नास्तिक आहेत, पण त्यांची माणसांवर मात्र नितांत श्रद्धा आहे. ‘माझ्या जगण्याला सामर्थ्य दिले, सुगंध दिला तो लेखकांनी, कवींनी व त्यांच्या साहित्याने’ असे ते सांगतात. पण त्या पलीकडे जाऊन ते सांगण्यास विसरत नाहीत, की ‘धूप में निकलो, घटाओं को हटाकर देखो; जिंदगी क्या है, किताबे हटाकर देखो.' पुस्तकांच्या जगाबाहेर एक जग आहे, जे वास्तव आहे. त्यात येणारे अनुभव, भेटणारी माणसे पुस्तकांच्या पलीकडे जाऊन बरेच काही शिकवतात. ज्यामुळे कलाकार खऱ्या अर्थाने समृद्ध होतो.’
डावीकडून राम शेवडीकर, नयन बारहाते, मनोज बोरगावकर आणि संदीप काळे
नांदेडमधील सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवण्यात नयन बारहाते यांचे योगदान मोठे आहे. विविध गाण्यांचे कार्यक्रम ,चर्चासत्रे, संमेलने आयोजित करण्यात नयन यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा व घट्ट आहे. परंतु तो कलावंत गेले काही महिने नांदेडच्या रुग्णालयात पडून आहे. त्याच्या शरीराचा मानेखालील भाग अचेतन होऊन गेला आहे. मुंबईत त्यांच्या कण्यावर एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया चालू असताना हा अपघात घडून आला. मात्र मानेवरील चेहरा, मेंदू, त्यांचे बोलणे-हसणे नियमित आहे. नयन, त्यांची मुलगी आणि जावई असा त्यांचा परिवार आहे. त्यांची मित्रमंडळी त्यांच्या या आजारपणात त्यांना भरीव मदत करत असतात. ते म्हणाले, की अचानक हे आजारपण ओढवल्यावर मी खचलो... हताश झालो. पण ‘सकाळ’चे संपादक संदीप काळे, नाटककार अतुल पेठे असा माझा मित्रपरिवार, मुलगी सावली या सगळ्यांच्या प्रेमामुळे, त्यांनी दिलेल्या आधारामुळे माझ्या मनाला उभारी आली. योगायोग असा, की याच काळात त्यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली. ते हॉस्पिटलमध्ये, परंतु ‘उद्याचा मराठवाडा’ या दैनिकाने त्यांच्या एकसष्टीनिमित्त विशेष पुरवणी प्रकाशित केली. त्यातील लेखात अतुल पेठे यांनी नयन बारहाते म्हणजे ‘नांदेडची मित्रपताका’ असे त्यांचे वर्णन केले आहे. नयन हे मित्र म्हणून किती संपन्न आहेत याचीच ती खूण होय.
दुष्यंतकुमार हे नयन बारहाते यांचे आवडते कवी. ते म्हणतात, मै जो ओढता बिछाता हूँ, वही गझल में तुमको सूनाता हूँ | त्या ओळींचा अर्थ माणसाचे जगणे, त्याचे समाजात राहणे, बोलणे, अनुभव हीच कलेची भूमी होय. तो अर्थ नयन बारहाते यांच्या कलेतही सापडतो.
- अश्विनी शिंदे-भोईर 8830864547 ashwinibhoir23@gmail.com
अश्विनी शिंदे-भोईर यांनी एम ए (मराठी साहित्य व सौंदर्यशास्त्र) चे शिक्षण घेतले आहे. त्या साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे, परिसंवादांचे सूत्र संचालन करतात. त्या विरारच्या विवा महाविद्यालयात लेक्चरर होत्या. त्यांनी विविध वृत्तपत्र व नियतकालिकांतून लेखन केले आहे. त्या संपादन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या विरारला राहतात.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
3 टिप्पण्या
मनाला,आणि सर्वांना उभारी देणारा कलाकार आज या वळणावर अनुभवताना सुन्न व्हायला होते..प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर या कठीण वळणातून बाहेर येईल..आशा आणि प्रार्थना करूया ..माहितीपर लेखन आहे
उत्तर द्याहटवामाझ्या सोबतच्या तीनही पुस्तकांची मुखपृष्ठ व आतली छायाचित्रे, फोटो सर्वच नयनचे आहे. नयन माझा १९८४-८५ बॅचचा पत्रकारिता, जनसंवाद विद्या पदवीचा विद्यार्थीही आहे.
उत्तर द्याहटवानयनजी बारहातेंना मानाचा मुजरा. तुझ्या लेखणीतून अशी रत्नं कायम आम्हाला अनुभवायला मिळू देत..
उत्तर द्याहटवाखूप छान खूप छान लिहितेस तू.