मराठी संगीत रंगभूमी- मर्मबंधातील ठेव (Musicals on Marathi Stage - Rich Tradition)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

मराठी संगीत रंगभूमी- मर्मबंधातील ठेव (Musicals on Marathi Stage - Rich Tradition)


मराठी संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे पद्याला, संगीतकलेला रंगभूमीचे अधिष्ठान मिळाले आणि तो वेलू जो गगनावेरी गेला, तो अनेक वळणे घेत, चढउतार अनुभवत, आजतागायत लोकप्रियतेच्या किमान पातळीवर राहिला. संगीत नाटकांचे युग 1970-80 नंतर राहिलेले नाही. तरीही मानापमान’, ‘सौभद्र’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘हे बंध रेशमाचेइत्यादी संगीत नाटकांचे प्रयोग पाहण्यास प्रेक्षक गर्दी करत.

 

मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासातील संगीत रंगभूमीची सोनेरी पाने 1880 ते 1920 या कालखंडातील आहेत. विष्णुदास भावे (विष्णू अमृत भावे: जन्म-1819 ते 1824 च्या दरम्यान. निधन 9 ऑगस्ट 1901) यांनीसीता स्वयंवरचा प्रयोग सांगली येथे 1843 मध्ये करून मराठी रंगभूमीची स्थापना केली. त्या मागील प्रेरणा होती सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांची. त्यांनी कर्नाटकी भागवत मंडळीचे यक्षगान हे नाटक पाहिले आणि तसे काही मराठीत करा, असे त्यांच्या पदरी असलेल्या हरहुन्नरी विष्णुदास यांना सांगितले; शिवाय, त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य त्यासाठी केले. विष्णुदास यांनी नाट्यप्रयोगांसाठी पन्नास-पंचावन्न आख्याने रचली. त्यांच्या प्रयोगांचे वैशिष्ट्य तालासुरात म्हटले जाणारे पद्यरूप संवाद हे होते. लोकांना संस्कृत नाटकांची आणि लोकरंगभूमीची पूर्व परंपरा, रंगभूमीवरील दशावतार, लळीत, कीर्तन, तमाशा हे मनोरंजनाचे प्रकार परिचित होतेच. विष्णुदास यांनी रंगभूमी लोकाभिमुख केली हे त्यांचे कार्य थोर आहे

पहिले व्यवसायीक मराठी नाटक संगीत शाकुंतल (1870) - सादरकर्ते अण्णासाहेब किर्लोस्कर

          मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झाली. विद्यापीठीय शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मंडळींना विष्णुदासांची आख्याने - त्यांच्या प्रयोगातील ओबडधोबडपणा, भडकपणा आवडेना. त्यांची अभिरुची शेक्सपीयरच्या इंग्रजी आणि कालिदास आदींच्या संस्कृत नाटकांवर पोसलेली होती. विष्णुदासी नाट्यप्रयोग दहा-पंधरा वर्षांतच मंदावले. अण्णासाहेब किर्लोस्कर (बळवंत पांडुरंग किर्लोस्करजन्म 31 मार्च 1843. निधन 2 नोव्हेंबर 1885) यांनी मराठी संगीत नाटकाचा देदीप्यमान प्रयोग करून संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1880 मध्ये रोवली. त्यांनी 31 ऑक्टोबर 1880 रोजीसंगीत शाकुंतलया स्वरचित नाटकाचा एक ते चार अंकांचा प्रथम प्रयोग पुणे येथे आनंदोद्भवनाट्यगृहात केला. त्या नाटकाने मराठी रसिकांच्या मनात आनंदोर्मी उसळल्या. किर्लोस्कर यांनी पारशी कंपनीच्याइंद्रसभाया नाटकावरून प्रेरणा घेतली होती. नाटकात ऑपेरा धर्तीचा इंग्रजी रस आणला. तरी त्यांनी अंजनीगीत, साकी, दिंडी, कटाव अशा परिचित मराठी वृत्तांचा वापर केला होता. चाली लावणी ढंगाच्या वापरल्या होत्या. पदरचना यमन, भूप, बागेश्री, भीमपलास, भैरवी अशा परिचित रागांमध्ये केल्या होत्या. प्रेक्षक त्या अफाट आविष्काराने भारावून गेले. पूर्वी सूत्रधार एकटा गात असे. त्या ऐवजी प्रत्येक पात्र पदे गाऊ लागले. त्यांनी लावणी संगीत, कर्नाटकी संगीत, शिवाय कीर्तन यामुळे श्रोत्यांना परिचित असलेली सोप्या चालीची भक्तिगीते आणि स्त्रीगीते या शैलीचाही वापर केला होता. ‘शाकुंतललोकांनी डोक्यावर घेतले. त्यात गायकांचे गायन उत्कृष्ट होते. किर्लोस्कर नाटक मंडळीची नाटके सुरुवातीच्या काळात मोरोबा वाघोलीकर, बाळकोबा नाटेकर यांनी व पुढे भाऊराव कोल्हटकर, नानासाहेब जोगळेकर, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ यांनी गाजवली.

          किर्लोस्करांच्यासौभद्रचा प्रथम प्रयोग 18 नोव्हेंबर 1882 ला आणि 'रामराज्यवियोग'चा प्रयोग 1884 मध्ये झाला. किर्लोस्कर यांचे निधन 1885 मध्ये झाले. पण त्या दोन नाटकांतील किर्लोस्करी संगीताने एक युग निर्माण केले.

          कालांतराने त्या संगीतावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. नाटकामध्ये पदांची संख्या विपुल असणे, कथानकाशी जोडलेल्या पदांऐवजी चांगली चाल मिळाली, की पदांचा भरणा नाटकात करणे, वन्स मोअरचा अतिरेक, अभिनयाला कमी महत्त्व असणे अशा विविध कारणांमुळे संगीताचे नवीन प्रयोग सुरू झाले. पांडुरंग गोपाळ गुरव (यवतेश्वरकर) यांच्या वाईकर संगीत मंडळीने नाट्यसंगीतात शास्त्रीयता आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे मत किर्लोस्करी संगीतात रागदारीचे नियम पाळले जात नाहीत असे होते. म्हणून त्यांनी नाट्यसंगीताला शास्त्रीय बैठकीच्या शुद्ध गाण्याचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला. पण नाट्यगायनातील ते पांडित्य सर्वसामान्य लोकांना मानवले नाही. माधव नारायण पाटणकर यांनी तर रंगभूमीवरझगडे’ (Action songs) सुरू केले. त्यांनी गुजराती आणि पारशी धर्तीच्या चाली पदांसाठी वापरल्या. त्यांचा प्रेक्षकवर्ग प्राधान्याने गिरणी कामगार व मजूर वर्ग होता. त्यांची नाटके हलक्या दर्ज्याचे संगीत, स्त्री-पुरुषांचे शृंगारिक हावभाव, भडक कथानके यामुळे सवंग लोकप्रियतेकडे झुकणारी झाली. त्यांचेविक्रमशशिकलासारखे नाटक गाजले. परंतु त्यांच्या नाटकांना एकूण प्रतिष्ठा मिळाली नाही. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी त्यांच्या नाटकात पारसी पद्धतीची व उर्दू पद्धतीची उडत्या चालीची पदे घालून नावीन्य आणले. किर्लोस्करी संगीतात स्वरविलास नाट्याशयानुसार असे. कोल्हटकर यांच्या नाटकात बोजड पदे, कृत्रिमता, चमत्कृती हे सगळे आले. श्रीपाद कृष्णांनी नटी-सूत्रधार यांच्या प्रवेशाला रजा दिली आणि मंगलाचरण आणले. त्यांनी असे काही बदल केले, पण त्यांची नाटके संगीत मूकनायक, ‘वीरतनय इत्यादी वगळता लोकप्रिय ठरू शकली नाहीत. अशा रीतीने किर्लोस्करी संगीताला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न फसले

          किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी या नाटककारांच्या काळात संगीत रंगभूमी सर्वार्थांनी संपन्न होती. त्यांनानाट्यपंचायतनम्हटले जाते. बालगंधर्व हे किर्लोस्कर नाटक मंडळीत 1905 साली आले. किर्लोस्कर नाटक मंडळीने बालगंधर्वांना प्रथम फुटक्या काठाचे मडकेम्हणून नाकारले होते. ते बालगंधर्व रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांनी संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतले नव्हते, पण त्यांना गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले यांच्याकडून संगीतशिक्षण आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्याकडून नाट्यशिक्षण मिळाले. त्या थोर कलावंताने त्यांच्या अलौकिक गायनाने सुमारे पन्नास-साठ वर्षे संगीत रंगभूमीची अजोड सेवा केली. गोविंद बल्लाळ देवल यांचीसंगीत शारदा’, ‘संगीत संशय कल्लोळ’, ‘संगीत मृच्छकटिकही नाटके विलक्षण गाजली. किर्लोस्कर यांच्यासंगीत शाकुंतलनंतर मराठी संगीत रंगभूमीवर क्रांती केली ती खाडिलकर यांच्यासंगीत मानापमानने. मुंबईतसंगीत मानापमानचा प्रथम प्रयोग 12 मार्च 1921ला झाला. खाडिलकर गद्य नाटके लिहित. ते संगीत नाट्यलेखनाकडे वळले ते बालगंधर्व यांना डोळ्यांपुढे ठेवूनच. खाडिलकर यांनीमानापमानसाठी स्वतंत्र संगीत दिग्दर्शकाची योजना केली. गोविंदराव टेंबे यांनी अभिजात सांगीतिक चाली दिल्या. धैर्यधर आणि भामिनी या दोन प्रमुख भूमिकांसाठीनारायणराव जोगळेकरआणिबालगंधर्वहे दोन उत्कृष्ट गायक नट लाभले. नाटकाचे कथानकही शृंगार आणि हास्य या रसांनी युक्त असे होते. ते संगीत रंगभूमीवरील अजरामर नाटक ठरले. तशीच कीर्ती खाडिलकर यांच्यास्वयंवरनाटकाने मिळवली. त्याला भास्करबुवा बखले यांचे संगीत होते.

          मराठी संगीत रंगभूमीवरील एक अपूर्व नाट्यप्रयोग संयुक्तमानापमानया नावाने 8 जुलै1921ला लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य फंडाच्या मदतीसाठी झाला. बालगंधर्व आणि केशवराव भोसले हे दोघे अनुक्रमे भामिनी आणि धैर्यधर होऊन रंगभूमीवर एकत्र उभे राहिले आणि श्रोत्यांना अवर्णनीय संगीताची मेजवानी मिळाली. त्या प्रयोगासंबंधी अनेक प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत. संयुक्तसंगीत सौभद्रचा प्रयोगही 22 जुलै 1921 रोजी झाला

          राम गणेश गडकरी यांची नाटके संहिता आणि संगीत या दोन्ही दृष्टींनी महत्त्वाची आहेत. त्यांच्यापुण्यप्रभाव नाटकाला किर्लोस्कर नाटक मंडळीतील नटांनी आणि हिराबाई पेडणेकर यांनी वएकच प्यालाला गंधर्व नाटक मंडळीतील नटांनी आणिसिंधूया पात्राच्या पदांना सुंदराबाई जाधव यांनी, तरभावबंधनआणिप्रेमसंन्यास या नाटकांना मास्टर दीनानाथ व कृष्णराव कोल्हापुरे यांनी संगीत दिले. दीनानाथ यांनी मराठी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग आणला. किर्लोस्कर, गंधर्व, बलवंत या नाटक मंडळींनी मोलाची कामगिरी केली. संगीत रंगभूमीवरील पहिल्या पाच महत्त्वाच्या नाटककारांखेरीज वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, .चिं. केळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, भा.वि. वरेरकर असे महत्त्वाचे नाटककार अनेक होते. वरेरकर यांचीसत्तेचे गुलाम’, ‘तुरुंगाच्या दारातही संगीत नाटके गाजली. वझेबुवांनी त्या नाटकांना चाली दिल्या होत्या. टिपणीस, कमतनूरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, .. शुक्ल यांची संगीत नाटके 1920 च्या नंतर आली.

मराठी रंगभूमीला उतरती कळा 1930 च्या सुमारास आली. किर्लोस्कर, गंधर्व, बलवंत, यशवंत इत्यादी नाटक मंडळ्या बंद पडल्या. ललित कला ही 1933-34 पर्यंत कशीबशी सुरू होती. बोलपट 1932 मध्ये सुरू झाले. नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडे वळला. रंगभूमीवरील बिनीचे नट चित्रपटांकडे वळले. तशा तमोयुगात दामुअण्णा जोशी यांच्याबालमोहन नाटक मंडळीने आचार्य अत्रे यांचेसाष्टांग नमस्काररंगमंचावर आणले आणि पुन्हा एकदा प्रेक्षक रंगभूमीकडे खेचले गेले. नाट्य मन्वंतर या संस्थेची स्थापना होऊन 1 जुलै 1933 ला आंधळ्यांची शाळाचा प्रयोग केला गेला, पण ती संस्था अल्पजीवी ठरली. मो.. रांगणेकर यांनीनाट्यनिकेतनची स्थापना 1941 मध्ये केली. त्यांचे पहिले नाटकआशीर्वाद’. त्यांचे दुसरे संगीत कुलवधू’ 22 ऑगस्ट 1942 ला रंगभूमीवर आले. ते नाटक, ज्योत्स्ना भोळे यांचा अभिनय, गायन, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी त्या नाटकातील पदांना दिलेल्या चाली यांमुळे विलक्षण गाजले. जयमाला शिलेदार यांचेही रंगभूमीवर 1942 मध्ये पदार्पण झाले. जयराम शिलेदार आणि जयमाला यांनी मराठी रंगभूमीही संस्था 1949 मध्ये स्थापन केली. त्यांनी अनेक जुनीनवी संगीत नाटके रंगभूमीवर आणली. अ.ना. भालेराव यांच्या पुढाकाराने सांगली, मुंबई आणि महाराष्ट्रात अन्यत्रही नाट्यमहोत्सव 1943 मध्ये झाले. मराठी रंगभूमीवर पुन्हा नवचैतन्य आले. जुन्या नटांना रंगभूमीवर वाव मिळाला. नवे संगीत दिग्दर्शक नट-नट्या पुढे आल्या, पण कालांतराने, ती परिस्थिती पालटली. संगीतामुळे रंगभूमी गाजली असे, जुन्या काळाप्रमाणे घडले नाही. रंगभूमीची घडी चित्रपटांचे आकर्षण, ठेकेदारीची पद्धत, नाईटची प्रथा या कारणांमुळे विस्कटली. प्रेक्षकांचे मन संगीत रंगभूमीपासून दूर गेले.

 

तशा त्या काळात (1960 ते 1970-72) विद्याधर गोखले यांनी संगीत नाटके लिहिण्याचे धाडस केले. त्यांनी मराठी संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले. त्यांचीपंडितराज जगन्नाथआणि सुवर्णतुलाही दोन संगीत नाटके रंगभूमीवर 1960 मध्ये आली. पुन्हा एकदा संगीत रंगभूमीत नवचैतन्य आले. ललितकला, गोवा हिंदू असोसिएशन या नाटक मंडळ्यांनी संगीत नाटकांचे अनेक प्रयोग केले. ‘ययाती देवयानी’, ‘मत्स्यगंधा’, ‘मीरा मधुरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘हे बंध रेशमाचेअशी संगीत नाटके आली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या कट्यारने तर इतिहास घडवला. वसंतराव देशपांडे आणि कट्यार हे समीकरणच झाले ! त्या कालखंडापर्यंत हिराबाई, ज्योत्स्नाबाई, जयमालाबाई, मीनाक्षी शिरोडकर, कान्होपात्रा, जयश्री शेजवाडकर, रजनी जोशी, निर्मला गोगटे या स्त्रिया रंगभूमीवर भूमिका करू लागल्या होत्या. त्याच प्रमाणे नवीन गायक, संगीत दिग्दर्शकही त्यांचा ठसा रंगभूमीवर उमटवू लागले. प्रसाद सावकार, पु.ल. देशपांडे, राम मराठे, छोटा गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, रामदास कामत या मंडळींनी नावलौकिक मिळवला. संगीत रंगभूमीने प्रेक्षकांना आकर्षून घेतले. त्या कालखंडानंतर मात्र मराठी संगीताने वेगळे वळण घेतले. नाट्यसंगीताचा वेगळ्या दिशेने विचार सुरू झाला. ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘बेगम बर्वे’, अवघा रंग एक झाला’, ‘जांभूळआख्यान’, ‘देवबाभळीया नाटकांमध्ये संगीत आहे, पण ती संगीत नाटके नव्हेत. शारदा’, ‘सौभद्र’, ‘मृच्छकटिकया जुन्या आणि तुलनेने नव्या म्हणजेकट्यार’, ‘बंध रेशमाचेया संगीत नाटकांचे प्रयोग हौसेने होतात. प्रेक्षक मुख्यत: जुन्या स्मृती म्हणून ती पाहतात. पण नव्या उत्साहाने, संगीत नाटक लिहिणारे लेखक नंतर दिसत नाहीत. तरुण गायक, संगीत दिग्दर्शकही नाहीत. संगीत रंगभूमीचा वैभवशाली कालखंड भूतकाळात जमा झाला आहे ! पण त्या सुंदर आठवणी मात्र मराठी मनाने, बालगंधर्वांचा भरजरी शालू आणि अत्तराचा फाया जपून ठेवावा तसा जपून ठेवल्या आहेत !

- मेधा सिधये 9588437190 medhasidhaye@gmail.com

मेधा वासुदेव सिधये या मराठी विषयाचे अध्यापन, लेखन, कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन आणि व्याख्यानादी कार्यक्रमांतील सहभाग यांत गुंतलेल्या असतात. त्यांचा पीएच डी चा अभ्यास विषय रंगभूमीमासिकातील नाट्यसमीक्षा हा होता. त्यांनी नाट्य संमेलनाध्यक्षांची भाषणे (स्वातंत्र्योत्तर ते 2000) या ग्रंथाचे संपादन केले आहे. त्यांचे घाटातले आभाळ आणि रानपाखरं हे दोन बालकविता संग्रह प्रकाशित आहेत. त्या साहित्यवैभव या ग म भ न प्रकाशनच्या दिनदर्शिकेचे संपादन अठरा वर्षांपासून करत आहेत. त्यांचे लेखन आकाशवाणीवर आणि विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या