संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने मनुस्मृतीतील संकेतांनुसार 11 मार्च 1689 या दिवशी केली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधकांनी, मुख्यतः विरोधक ब्राह्मणांनी आनंदाच्या भरात गुढ्या उभारल्या अशा आशयाचे संदेश सोशल मीडियात अधुनमधून फिरतात. औरंगजेबाने संभाजी महाराजांचे मुंडके छाटून, ते काठीवर अडकावून वढू–तुळापूर भागात नाचवले आणि त्याचा संबंध काठीने गुढी उभारणे या प्रथेशी जोडला जातो. म्हणून गुढीपाडवा साजरा करणे हा संभाजी महाराजांचा अपमान होय असे काही जणांकडून मनावर ठसवले जाते. त्यामुळे दोन प्रश्न उद्भवतात -
1. गुढीपाडवा हा सण इतिहासात केव्हापासून साजरा होतो? हा मराठी सण संभाजीराजांच्या मृत्यूनंतर रुजला का?
2. गुढीपाडव्याला गुढी उभारण्यामागे कारण/भावना काय आहेत?
प्रचलित धारणेनुसार श्रीरामाने रावणावर विजय प्राप्त करून, लंका जिंकून, तो अयोध्येत परतल्यावर जनतेने विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारून त्याचे राज्यात स्वागत केले, तेव्हापासून चैत्र महिन्याचा पहिला दिवस – मराठी दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस हा गुढीपाडवा या सणाने साजरा होतो. हिंदू धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे चैत्रातील गुढीपाडवा होय. त्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीपाडवा हा सण विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो याबाबत संदर्भ आहेत.
गुढीपाडवाविरोधी (ब्राह्मणविरोधी) गटाचा युक्तिवाद -
- संभाजीराजांची क्रूर हत्या
मनुस्मृतीच्या कायद्यानुसार, ब्राह्मणांच्या
सांगण्यावरून झाली. त्यासाठी आठवा अध्याय, एकेशपंचविसावा
श्लोक याचा संदर्भ दिला जातो.
- मुंडके शरीरापासून छाटून एरंडाच्या बांबूला खोवले. गळ्यात खेटरांची माळ घालून संपूर्ण तळावर मिरवणूक काढण्यात आली.
- हिंदू धर्मात तांब्या (कलश) शुभ कोणता? उलटा का सरळ? मग गुढीला पालथा तांब्या शुभ कसा? हिंदू धर्मात पालथे सर्व अशुभ तर त्याच दिवशी पालथा तांब्या शुभ कसा होतो? --- संभाजी महाराजांना मारून त्यांचे मुंडके बांबूला लावण्यात आले आहे. त्याचाच अर्थ असा, की तो दिवस अशुभ आहे. म्हणून गुढीला कलश उलटा लावलेला असतो.
- ब्राह्मणांना असे सांगायचे आहे, की तुमच्या आईबहिणींची इज्जत आमच्या हातात आहे, म्हणून गुढीला साडीचोळी लावलेली असते.
- जर गुढीपाडवा हा सण विजयी रामाच्या अयोध्येस परतल्याच्या औचित्याने साजरा केला जातो तर मग उत्तर भारतात, खास करून उत्तर प्रदेशात तो सण का बरे साजरा केला जात नाही? किंबहुना तो तेथे प्रचलितही नाही.
खल करण्याचे मुद्दे -
औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या क्रूरपणे केली हे जरी खरी असले तरी ते ब्राह्मणांच्या सांगण्यावरून केले हे मानणे अतिशयोक्तीचे वाटते. खरे तर, औरंगजेबाने संभाजीराजांना मृत्युदंड देण्यासाठी ‘कुरान’चा आधार घेऊन त्याचे स्वतःचे कृत्य धर्मानुसार असल्याची खात्री केली असे शंभुसाहित्यातून प्रतीत होते. मृत्यू ज्या क्रूरपणाने झाला त्याबाबत बोलायचे तर औरंगजेब हा कपटी, कारस्थानी, क्रूरकर्मा म्हणूनच ओळखला जात होता. औरंगजेबाने कौटुंबिक सत्तासंघर्षाच्या काळात स्वतःच्या बापाला कैदेत टाकून स्वतःच्या सख्ख्या भावाला- दाराशुकोहला क्रूरपणे मारले आणि त्याच्याही मुंडक्याची विटंबना केली होती. त्यावरून त्याच्या क्रूरतेची परिसीमा आणि तशीच मानसिकता यांची कल्पना येते.
प्रश्न असा आहे, की गुढीपाडवा हा सण प्राचीन काळापासून साजरा होतो का? तर हो. चैत्र पौर्णिमेच्या पाडवा सणाबाबत ऐतिहासिक साहित्यात उल्लेख मिळतात. इतिहासकार वि.का. राजवाडे यांच्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथातील विसाव्या खंडातील लेखांक 176 मध्ये एक निवडपत्र दिलेले आहे, त्यात 'गुढियाचे पाडव्यास कुडव एक देऊ म्हणून पत्र लिहून दिल्हे' असा उल्लेख आढळतो. संभाजीराजांच्या मृत्यूपूर्वीचे, म्हणजे 1689 पूर्वीचे पाडव्याचे आणखी काही संदर्भ:
1. शिवाजी सावंत यांच्या 'छावा'मध्येदेखील पाडवा सणाचा उल्लेख आहे.2. शिवराज्याभिषेकाआधी 1674च्या दोनच महिन्यांच्या आधी पाडव्याचा सण महत्त्वाचा होता. त्यासाठी शिवरायांचे प्रतिनिधी प्रल्हाद निराजीपंत आपल्या घरी आले असा मजकूर शिवकाळातील मराठा आणि इंग्रजांतील दुभाषी म्हणून भूमिका निभावणारा नारायण शेणवी एका पत्रातून ‘इंग्रेनच्या गव्हर्नर’ला कळवतो. तो संदर्भ ‘शिवकालीन पत्रसारसंग्रह’ या पुस्तकातील लेखांक 1625मध्ये सापडतो. थोडक्यात काय तर चैत्र पाडवा हा सण शिवकाळातही (म्हणजेच संभाजीमहाराज यांच्या मृत्यूच्या आधी) साजरा होत होता.
गुढी उभारणे या बाबतीत काही संदर्भ -
1. संत ज्ञानेश्वरांनी (1275 ते 1296) लिहिलेल्या ज्ञानेश्वरीत अध्याय 4, 6 आणि 14 मध्ये गुढीचा संदर्भ आढळतो.2. संत नामदेव (1270 ते1350), संत जनाबाई (निर्वाण 1350), संत चोखामेळा (जन्म साधारणतः 1338च्या आसपास) ह्या सर्व संतांच्या लेखनात गुढीचा उल्लेख आहे. संत चोखामेळा म्हणतात, 'टाळी वाजवावी, गुढी उभारावी | वाट हे चालावी, पंढरीची!'
3. नंतरच्या काळातील संत एकनाथ यांच्या (1533 ते 1599) काळातदेखील गुढीचा उल्लेख येतो.
4. संत तुकाराम सोळाव्या शतकात त्यांच्या गाथेत लिहितात, 'पुढे पाठविले गोविंदेगोपाळा, देउनी चपळा हाती गुढी.'
5. रामदास साहित्यात 'ध्वजा त्या गुढ्यातोरणे उभविली' असा संदर्भ सापडतो. समर्थ रामदासांचा मृत्यू 1681 साली झाला. म्हणजेच ते साहित्य संभाजीमहाराजांच्या मृत्यूपूर्वीचे होय.
6.शिवचरित्र साहित्य- खंड 1 मध्ये 1649 सालचा शिवकाळातील ‘गुढियाचा पाडवा' असा उल्लेख आढळतो.
येथे एक मुद्दा उपस्थित केला जातो. तो म्हणजे संतसाहित्यात लिहिला गेलेला गुढी हा शब्द वारकरी संप्रदायानुसार भगव्या रंगाची एकपाठी पताका असा आहे ! येथे लक्षात घेतले पाहिजे, की मानवी मनाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सगुणसाकार प्रतीक हवे असते, ते गुढी, सरस्वती अशा विविध रूपांनी संस्कृतीच्या प्रवासात विकसित झालेले आढळते.
‘शिवधर्मगाथा’मधील संदर्भ -
शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी गुढीपाडवा या विषयावर भाष्य करताना विचारवंत, लेखक अण्णासाहेब हरी साळुंखे यांनी लिहिलेल्या ‘शिवधर्मगाथा’ या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. त्या पुस्तकात पान क्रमांक 140वर महत्त्वाचे सण दिलेले आहेत. त्यामध्ये गुढीपाडव्याचा कृषिपरंपरेशी निगडित असलेला सण असा उल्लेख केला आहे. खरीप आणि रब्बी हंगाम प्रत्येक भारतीय सणाच्या मुळाशी आहेत. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव लिहितात, की मध्ययुगात हिंदू नववर्ष हे आश्विन शुक्ल प्रतिपदेला सुरू होई. ज्ञानेश्वर, चोखोबा, तुकाराम यांच्या लेखनातील ‘गुढी’चे संदर्भदेखील ‘शिवधर्मगाथा’ या पुस्तकात आढळतात. गुढीपाडवा हा सण साजरा करणे हा शेवटी ऐच्छिक निर्णय आहे, भगव्या पताका उभारून गुढ्या उभारणे कोणास पटत असेल तर त्याबाबतचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे असेदेखील साळुंखे नमूद करतात.
इसवी सन 78चा संदर्भ -
संजय सोनवणी या संशोधी वृत्तीच्या लेखकांनी गुढीपाडव्याचा व शालिवाहन शकाच्या सुरुवातीच्या इतिहासाचा मागोवा घेऊन अभ्यासपूर्वक लेख लिहिला आहे. त्या द्वारे गुढीपाडवा या सणाबद्दल नवीन माहिती मिळते. त्या संदर्भाआधारे वादावर पडदा पडू शकतो.
संजय सोनवणी लिहितात त्याप्रमाणे, सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवी सनपूर्व 220 ते इसवी सन 230 अशी साडेचारशे वर्षे सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती ही सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले ही त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहनांच्या राजवटीत चढउताराचे प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. त्यासाठी त्याने सातवाहनांचा राजा गौतमीपुत्र याच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे केली. त्यामुळे गौतमीपुत्र राजा झाला तेव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. नहपानाने कोकण प्रदेशही हिरावून घेतला होता. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरू झाले. नासिकच्या पांडव लेण्यांची निर्मिती नहपानानेच त्याच्या काळात केली. नहपानाचा जावई रिषभदत्ता प्रत्यक्ष नासिकमध्ये कार्यरत होता. त्याने कोरलेले काही शिलालेख तेथे सापडतात. पांडव लेण्यांतील दहाव्या क्रमांकाच्या गुंफेचे नामकरण 'नहपाना -विहार' असे आहे. गौतमीपुत्र हा पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्षे त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरीदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबर युक्तीचाही वापर केला. खरे तर, गनिमी काव्याचा आद्यजनक गौतमीपुत्र सातकर्णी होय असे सोनवणी नोंदवतात. गौतमीपुत्राने नाशिकजवळ अतिशय निकराचे युद्ध करून नहपानाचा समूळ पराभव केला, त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ती घटना इसवी सनाच्या 78मध्ये घडली. त्या विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. तो विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते ! तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अभिमानाने 'क्षहरातवंसनिर्वंसकरस' अशी त्या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद केली आहे.
संजय सोनवणी नमूद करतात, की मराठी लोक दरवर्षी जी गुढी उभारतात ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. सातवाहनांच्या इतिहासाचा दाखला लक्षात घेता गुढीपाडवा हा सण मुख्यत्वे सातवाहन राज्याच्या प्रदेशात – प्रामुख्याने महाराष्ट्रात, गुजरात, आंध्र आणि मध्यप्रदेशातील काही भागांत साजरा केला जातो.
निष्कर्ष -
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विरोधकांनी विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुढ्या उभारल्या असे जे काही ठसवण्याचा प्रयत्न दिसतो, त्यात तथ्य नाही. औरंगजेबाच्या धर्मांधतेबाबत, कट्टरतेबाबत आणि एकंदर हिंदू धर्म म्हणा किंवा मुस्लिमेतर धर्मद्वेष याबाबत दुमत नसावे. या सर्व गोष्टी लक्षात घेता, त्याने हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला हिंदूंच्या मनात कायमची दहशत निर्माण करावी या हेतूने, धर्मांध मानसिकतेतून मुद्दामहून हिंदूंच्या (मराठ्यांच्या) महत्त्वाच्या सणाआधी संभाजीराजांना मारून त्यांचे मुंडके वढू-तुळापूर भागात मिरवले. औरंगजेबाची ती कपटी कृती असण्याची शक्यता आहे. एकूण घटनाक्रम पाहिला तर गुढीपाडव्याच्या दिवशी संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण व्हावी हे उचितच ! मात्र त्या निमित्ताने अपप्रचार होऊ नये.
- संदीप चव्हाण 9890123787 drsandeep85@gmail.com
संदीप चव्हाण यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेलगतच्या गोरखपूर भागात बालमृत्यू कमी करण्यासासंबंधीच्या कामानिमित्त गोरखपूरमध्ये स्थित आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
अभ्यासपूर्ण लेख. धन्यवाद
उत्तर द्याहटवा