त्यांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर, पण खांडेकर यांना त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या चुलत चुलत्यांनी दत्तक घेतले. त्यामुळे त्यांचे नाव विष्णू सखाराम खांडेकर असे झाले. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी सांगली येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे इंटर आर्ट्सपर्यंत झाले. ते वयाच्या बाविसाव्या वर्षी शिरोड्याच्या ट्युटोरिअल इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक झाले. तेथूनच ते निवृत्त झाले (1938). त्या काळात त्यांचा मुक्काम जवळच्याच आरवली या गावी होता. शाळेतील नोकरी संपल्यावर, 1938 साली ते कोल्हापूरला आले व तेथे स्थायिक झाले. नंतरचे सर्व आयुष्य त्यांनी लेखन, मनन, चिंतन यांत तेथेच घालवले.
त्यांनी वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी ‘शनिप्रभाव’ हे पाच अंकी विनोदी नाटक लिहिले. त्यांचे वडील अर्धांगवायूने आजारी होते. तेव्हा कोणीतरी वडिलांना शनिमहात्म्य वाचून दाखव असे सांगितले. ते वाचत असताना त्यांना त्यावर नाटक लिहावे असे सुचले. त्यांचा पहिला ‘विद्युतप्रकाश’ हा कथासंग्रह 1917 साली प्रसिद्ध झाला. त्यांचे एकूण एकोणतीस कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या ‘कलिका’ या पहिल्या रूपककथा संग्रहानंतर त्यांचे एकूण सहा रूपककथा संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांचे ‘रंकाचे राज्य’ हे नाटक 1928 साली प्रकाशित झाले. त्यांचा ‘धुंधुरमास’ हा पहिला समीक्षा लेखसंग्रह 1929 साली प्रसिद्ध झाला. त्यांचे असे नऊ समीक्षा लेखसंग्रह प्रकाशित झाले. त्यांची पहिली कादंबरी ‘हृदयाची हाक’ ही होय. ती भारत-गौरव ग्रंथमालेने 1930 साली प्रकाशित केली. त्यांच्या ‘कांचनमृग’, उल्का’, ‘दोन ध्रुव’, ‘अमृतवेल’, ‘ययाति’ यांसारख्या सतरा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचा ‘गडकरीः व्यक्ती आणि वाङ्मय’ हा प्रबंध 1932 साली प्रसिद्ध झाला. तसेच, एकूण सहा प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा पहिला ‘वायुलहरी’ हा लघुनिबंध संग्रह 1936 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचे एकूण पंधरा लघुनिबंध संग्रह प्रकाशित झाले. त्यांना ‘ययाति’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार; तसेच, ज्ञानपीठ हा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण हा मानाचा किताब बहाल केला. त्यांनी केलेले इतर भाषांमधील साहित्यकृतींचे काही अनुवाद; तसेच, बावीस संपादित संग्रहदेखील प्रकाशित आहेत. ‘एका पानाची कहाणी’ हे त्यांचे आत्मचरित्र होय. त्यांनी ‘लग्न पहावे करून’ यांसारख्या अठरा चित्रपटांसाठी लेखन केले.
खांडेकर यांच्या लेखणीने स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ असे दोन्ही पाहिले. त्यांचा साहित्याला उद्दिष्ट असले पाहिजे हा सिद्धांत ‘जीवनासाठी कला’ म्हणून प्रसिद्ध आहे. ललित लेखकाने धर्मबुद्धीचा नंदादीप हातात धरला पाहिजे, नव्हे तो अखंड तेवत ठेवला पाहिजे ही त्यांची मानसिक धारणा होती. त्यामुळे वाचकाला त्यांच्या साहित्याने मोहून टाकले. खांडेकर यांच्या लेखनशैलीत कोणी देव म्हणो, कोणी दैव म्हणो, कोणी निसर्ग म्हणो, कोणी योगायोग म्हणो, पण जिला माणसाच्या सुखदुःखाशी काही कर्तव्य नाही अशी एकसंध, अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते, कधी रक्ताच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने हे भान सतत डोकावत राहिले.
मराठीतील काही समीक्षकांना खांडेकर यांची भाषा कृत्रिमतेकडे झुकणारी होती असे वाटे. पण खांडेकर यांनी त्यांच्या वाङ्मयातून सामान्य वाचकांपासून असामान्य प्रतिभेच्या वाचकांपर्यंत सर्वांना गोवून ठेवले हे सत्य विसरता येत नाही. खांडेकर यांनी मराठी भाषेला सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला.
ते त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की “मराठी साहित्यिकांच्या ललित कलेच्या नव्या निशाणावर तीनच छोटी वाक्ये अखंड चमकत राहतील : मनुष्य हा परिस्थितीचा गुलाम नाही. तो त्याच्या मनाचा गुलाम आहे. मनाच्या शृंखला वाङ्मयच तोडू शकते.”
त्यांनी गोमंतक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद 1935 साली मडगाव येथे भूषवले. ते दक्षिण महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे 1946 साली मिरज येथे अध्यक्ष होते; तसेच, चाळिसाव्या नाट्यसंमेलनाचे सातारा येथे 1958 साली अध्यक्ष होते. त्यांना शिवाजी विद्यापीठाने ‘डी लिट्’ ही पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान केला. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले; तसेच, त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध साहित्यिक पुरस्कारही लाभले आहेत. खांडेकर यांच्यावर दोन चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत.
वि.स. खांडेकर यांचा मृत्यू 2 सप्टेंबर 1976 रोजी मिरज येथे झाला.
- वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488
------------------------------
0 टिप्पण्या