जागतिकीकरणाच्या काळात मराठी समाजाच्या वृत्तिप्रवृत्ती, स्वभावविशेष, सवयी, इच्छाआकांक्षा जपल्या तर जाव्यातच; पण त्याबरोबर त्यांना जागतिक चित्रात अढळ व अव्वल स्थान मिळावे ही भावना स्वाभाविक आहे. त्यासाठी विविध सूचना-योजना येत गेल्या. ‘मराठी विद्यापीठ’ ही त्यांपैकी एक. पण ‘मराठी विद्यापीठ’ या नावात जादू आहे. मराठी भाषेला त्या माध्यमातून तिचे या समाजातील अनन्य स्थान प्राप्त होईल व त्याचबरोबर, मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून जगासमोर ताठ मानेने ठामपणे उभी राहिलेली दिसेल अशी मराठी जनतेची अपेक्षा जाणवते. हे मराठी जनतेचे स्वप्न आहे. वेगवेगळ्या जाणकारांनी वेगवेगळ्या तऱ्हांची मांडणी त्याबाबत केलेली आहे. चर्चा त्या नामकरणापासून होते. विद्यापीठ म्हटले, की सरकार पुरस्कृत संस्था नजरेसमोर येते. दुसऱ्या बाजूला गुगल, युट्यूब यांनाही विद्यापीठ म्हटले जाते. कारण ती ज्ञानकेंद्रे असतात.
’मराठी विद्यापीठा’ची कल्पना ‘ग्रंथाली’, ‘ग्रंथाली-ज्ञानयज्ञ’ व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ यांबाबतच्या गेल्या पंचेचाळीस वर्षांच्या अनुभवातून व जाणत्या निरीक्षणातून उद्भवली आहे. ‘ग्रंथाली’ने ‘ग्रंथाली-ज्ञानयज्ञा’च्या ओघात ‘मराठी विद्यापीठा’चा उल्लेख प्रथम केला तो 2001 साली, नवीन सहस्रकाच्या उदयानंतर. ’ग्रंथाली-ज्ञानयज्ञा’तील पुस्तकांची कल्पनाच अभिनव होती. मराठी भाषा-संस्कृती म्हटले, की सुरुवात महानुभाव-ज्ञानेश्वर-शिवाजी यांच्यापासून करून आजच्या काळापर्यंत येण्याची पद्धत आहे. त्यामध्ये सहसा इतिहासात रमायला होते. उलट, ‘ग्रंथाली-ज्ञानयज्ञा’त विचार असा होता, की मलबार हिल व गडचिरोली ही आजच्या महाराष्ट्राची दोन रूपे आहेत. ती जाणून घेऊन इतिहासक्रमात उलटे जाऊन पाहू. त्या प्रयत्नांत स्थानिक सूक्ष्म पातळीवरील वैशिष्ट्यांची नोंद होत गेली. गावोगावच्या जुन्या धातुशाळांपासून श्रीवर्धनचे भटभिक्षूक पेशवे म्हणून पराक्रमी कसे निपजले येथपर्यंतचा वेध घेतला गेला. उस्मानाबादजवळच्या तेरची बाहुली रोमच्या बाजारात बार्बी डॉलच्या कितीतरी आधी, म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी विकली जात होती हा शोध लागला. अगदी गेल्या दीडशे वर्षांत माहीत झालेल्या व आता ‘कॅशक्रॉप’ म्हणून लोकप्रिय असलेल्या सोयाबीनचादेखील इतिहास तपासला गेला. रामदास-तुकाराम व जयंती बोटी बुडाल्या, त्यांच्याबाबतचे पुस्तक तर फारच चर्चिले गेले.
ग्लोबल वारे सर्व बाजूंनी वेढून टाकत असताना स्थानिक संस्कृतिवैशिष्ट्यांची ती नोंद व त्यांची उजळणी मनोवेधक ठरली. त्यामधून स्वत:चीच ओळख स्वत:ला पटत असल्याचे जाणवले. पुस्तक प्रसिद्ध झाले, की माणसे नवनवीन माहिती देण्यास सरसावत, परंतु तिचा उपयोग एकदा छापून काढलेल्या पुस्तकात शक्य होत नसे. म्हणून ‘ग्रंथाली’ने ‘मराठी विद्यापीठ’ ही वेबसाइट सुरू केली. तो ‘ग्रंथाली-ज्ञानयज्ञा’चा विस्तार होता. ती साइट इंटरअॅक्टिव्ह अभिप्रेत होती. तेथे क्राऊडसोर्सिंग शक्य होते. तो मराठीत व महाराष्ट्रात उपलब्ध ज्ञानाचा खुल्या वातावरणात शोध घेण्याचा पहिला प्रयत्न होता.
तो प्रकल्प मूळ धरू शकला नाही, कारण आम्ही ‘ग्रंथाली’मधील सिनियर ट्रस्टींनी निवृत्ती घेऊन कारभार तरुण पिढीच्या हाती दिला. सुदेशने सूत्रे ताब्यात घेतली व धडाडीने ‘ग्रंथाली’ला पुढील टप्प्यावर नेले. त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी चळवळीच्या बाबतीत जुन्या पिढीची निस्पृहता, निष्पक्षता व निरपेक्षता कायम ठेवून ‘ग्रंथाली’स स्थैर्य देण्यासाठी जोमाने व यशस्वी प्रयत्न केले.
‘मराठी विद्यापीठ’ या संकल्पनेत मराठी भाषा व संस्कृती यांचे जतन व संवर्धन अभिप्रेत आहे. नालंदा, तक्षशीला ही केवळ विद्यापीठे नव्हती, तर ते संस्कृतीचे अड्डे होते - भाषा व अन्य विषयांचा अभ्यास हा त्या संस्कृतीचा एक भाग होता. ‘मराठी विद्यापीठा’मध्ये विद्यमान मराठी समाजाची संमिश्र संस्कृती आणि तिचे भाषिक आधार अधोरेखित केले जावेत असे आम्हाला वाटते. ‘मराठी विद्यापीठ’ त्याच अनुषंगाने विविध मराठी बोली आणि प्रमाण भाषा यांच्या अभ्यासास आणि त्यांच्या उपयोगास महत्त्व देईल.
जगभर पसरत चाललेल्या मराठी भाषिक जनांना एका सांस्कृतिक दुव्यात जोडून घ्यावे (नेटवर्क) ही मुख्य कल्पना ‘मराठी विद्यापीठा’मध्ये आहे. ‘मराठी विद्यापीठा’ने मराठी भाषा व संस्कृती यांमध्ये काम करणाऱ्या विविध संस्था-संघटनांच्या सहाय्याने मराठीकारणाचे काम पुढे न्यावे असे गृहित धरले आहे.
विद्यमान मराठी भाषा-समाज गेल्या चार-पाचशे वर्षांत मुख्यत: घडत गेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांचे आणि विविध जातिधर्मसमूहांचे लोक एकजीव झाले आहेत. त्यातच गेल्या काही दशकांत मराठी लोक अमेरिका-ऑस्ट्रेलियापासून कोरिया-नायजेरियापर्यंत पसरत गेले आहेत. त्यांच्या नव्या पिढ्या ‘ग्लोबल’ जाणिवा सांभाळणाऱ्या आहेत. ‘मराठी विद्यापीठा’त अशा सर्व पिढ्यांच्या मराठी जनांच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा व्यक्त व्हाव्यात, ‘ग्लोकल’ वातावरणासाठी अनुरूप मराठी भाषा विकसित होत जावी, मराठीतील योग्य-निकोप मूल्यांची जपणूक व्हावी आणि तेणेकरून मराठी संस्कृती संवर्धित होत राहवी असे अभिप्रेत आहे.
‘मराठी विद्यापीठा’त मराठीकारण करत असताना इतर भाषाभगिनींशी हितगुज करावे, त्यांच्याशी आदानप्रदान व्हावे असेही गृहित आहे. किंबहुना वाढत्या नागरीकरणामध्ये समाजाची संमिश्रता जसजशी वाढत आहे तसतसे ‘विविध भाषांच्या खिडक्यांमध्ये मराठीचे दार’ ही संकल्पना जपली जाणे महत्त्वाचे आहे.
‘मराठी विद्यापीठा’त आरंभी पुढील उपक्रम समाविष्ट असावेत. त्यासाठी वेगवेगळ्या संस्था व व्यक्ती यांचे सहकार्य घेतले जात राहावे.
- मराठी संस्कृती - ढोबळ व सूक्ष्म पातळीवरील वेध
- मराठीपण - विविधांगांनी शोध व बोध
- मराठी भाषेचे सद्यकाळातील अस्तित्व व संभाव्य विस्तार
- मराठीचा विविध भारतीय व जागतिक भाषांशी संबंध - कायमस्वरूपी व्यवस्था
- मराठी चित्रपट-नाटक, अन्य कला यांमधील प्रज्ञाप्रतिभेचे हुंकार – नोंद व आस्वाद
वेगवेगळे गट या विविध क्षेत्रांमध्ये काम करून राहिले आहेत, त्या सगळ्या गटांचे प्रयत्न एका सूत्रात यावे - त्यातील डुप्लीकेशन टळावे असा इरादा आहे. यामुळे मराठी संस्कृती विविधांगांनी, विविध प्रदेशांमध्ये, विविध बोलीभाषांमधून प्रकट होत असताना तिची दिशा मात्र उर्ध्वगामी राहील. राज्याची भौतिक समृद्धी व तांत्रिक प्रगती यांना जुळेल असा सांस्कृतिक आशय तयार होत राहील.
‘मराठी विद्यापीठा’त अभिप्रेत आहे ते आम बारा कोटींच्या मराठी समाजातील ज्ञान व माहिती यांचे संकलन, प्रसरण व विनिमय. तशी साधने तंत्रविज्ञानाने उपलब्ध करून दिली आहेत. देव जसा माणसात असतो, परंतु माणसे मात्र देवाला मंदिरात शोधतात, तसे ज्ञानाचे झाले आहे. ते सर्वसामान्य जनांकडेदेखील आहे, पण आम जनता मात्र ते शाळा-महाविद्यालये-विद्यापीठे यांत शोधत आहे. ज्ञानोत्सुक मराठी समाजाचे पहिले पाऊल ‘मराठी विद्यापीठा’मार्फत पडेल अशी आशा आहे.
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे दहा वर्षांपासून मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल हे ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत. साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
नमस्कार दिनकर गागंलसरानी थोडक्यात परंतु नेमका आढाव्यात त्यांच गेल्या पाच दशकातिल प्रयत्न मांडले असून काहिचा मी साक्ष आहे. फक्त लेखात नमुद केलेले जागतिक अभिसरणात जाती व्यवस्थेच गारूड कायम आहे. ग्रंथालीनेच डॅा नरेंद्र जाधवांचे डॅा आबेडकरांवरील वैचारीक लिखाण अनेक महत्वाचे विचार मांडतात त्या तून मराठी पुन्हा नव्याने पाहू शकतो. गागंल नेहमी वास्तवात अस्ताना भविष्यातले वैज्ञानिक बदल टिपत असतात.
उत्तर द्याहटवासस्नेह
रंजन र. इं. जोशी
ठाणे