मुलांना आत्मविश्वास लष्करी शिक्षणातून मिळेल? (Military Education is Needed for School Children to Inculcate Right Values)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

मुलांना आत्मविश्वास लष्करी शिक्षणातून मिळेल? (Military Education is Needed for School Children to Inculcate Right Values)

 


शिक्षणक्रमात जितकी आधुनिकता येत आहे, जितकी सूट मुलांना दिली जात आहे तितकाच माणसाच्या मनाचा कमकुवतपणा वाढत आहे. उलट, प्रगतीसाठी आत्मविश्‍वास आवश्यक आहे! मग हा आत्मविश्‍वास म्हणजे नेमके काय? आणि तो मिळवावा कसा? आत्मविश्वासाच्या अभावी मनुष्य मोठी डिग्री घेऊनही असमाधानी किंवा अयशस्वी राहतो आणि कमी शिकलेला दिव्यांगदेखील आत्मविश्वासामुळे यशस्वी आयुष्य जगतो! मेजर मनीष सिंग हा राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र मिळालेला स्पेशल फोर्सेसचा कमांडो. त्याला अतिरेक्यांशी झालेल्या ज्या चकमकीत पराक्रम गाजवण्यासाठी शौर्यचक्र मिळाले, त्याच चकमकीत त्याला कायमचे अपंगत्व आले! त्यावेळी तो लेफ्टनंट होता. मनीष सिंगने एका अतिरेक्‍याला 25 सप्टेंबर 2012 रोजी मारले, पण त्या अतिरेक्याने मरता मरता मारलेली गोळी मनीषच्या स्पायनल कॉर्डला लागली आणि त्याचा कमरेपासून खालील भाग पूर्ण दुर्बल (पॅरलाइज) झाला. मनीषला त्याच्या पराक्रमाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र मिळाले व त्याची बढती कॅप्टन या पदावर झाली.

मनीष मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन भावंडांपैकी मोठा मुलगा. अभ्यासात हुशार. आईवडिलांच्या खूप अपेक्षा होत्या त्याच्याकडून. त्यांनी इंजिनीयर झाल्यावर त्याला मोठ्या पगाराची नोकरी मिळेल, मग त्याचे आयुष्य सेटल होईल अशी स्वप्ने पाहिली होती. पण मनीषने आर्मी ऑफिसर बनायचे असा निश्चय त्याला समज आल्यापासून मनाशी केला होता. तो एनडीएला सिलेक्ट झाला. त्याने इंजिनीयरींग कॉलेजचे शिक्षण सोडून दिले. 

PRC चे (Paraplegic Rehabilitation Centre) मुख्य कर्नल मुखर्जी यांनी मनीषविषयी आम्हांला माहिती सांगितली. मी PRC येथे भेट भाग्यश्री फाऊंडेशनच्या कामाच्या संदर्भात बर्‍याच वेळा दिली आहे. त्यांनी मला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन कॅप्टन मनीष याला भेटायला सांगितले. मी, माझी दोन्ही मुले व गीता कपाडीया (ज्यांचा मुलगा लेफ्टनंट नवांग कपाडीया शहीद आहे) मनीष यास भेटण्यास गेलो. मनीष हॉस्पिटलमध्ये असूनही त्याच्या चेहऱ्यावर कोठलेही रुग्णाचे चिन्ह नव्हते. तो ज्या यातनांमधून जात होता व आजही जात असतो त्याची थोडीफार कल्पना कर्नल मुखर्जी यांनी मला दिली होती. नंतर मला त्याची परिस्थिती हळूहळू व्यवस्थित समजत गेली. स्नायपर बंदुकीची विषारी गोळी लागल्यामुळे कमरेखालील भाग लुळा होण्याबरोबरच त्याच्या शरीरामध्ये त्या गोळीची विषारी द्रव्ये पसरली आहेत - त्यामुळे त्याला सतत जळजळ होत असते. आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज त्याच्या शरीराला येत नाही. कपडा अंगाला लागला, की शरीर जळजळत राहते. त्याच्यावर मध्येमध्ये सर्जरी होत असते व त्याला कित्येकदा आयसीयूमध्ये अॅडमिट व्हावे लागते.

मी मनीषला भेटल्या भेटल्या एक प्रश्‍न विचारला होता, “इंजिनीयर होऊन अमेरिकेत गेला असतास तर आता सुखाने जगत असतास. सैन्यामध्ये आल्याबद्दल पश्चाताप नाही होत का तुला?” मनीषने त्या प्रश्‍नाचे तडफदारपणे उत्तर दिले. तो म्हणाला, “सैन्यात येणे हीच माझी आवड होती. अमेरिकेत मला केव्हा जायचेच नव्हते. गोळी लागून माझे पाय निकामी झालेले आहेत, पण माझा मेंदू चांगल्या प्रकारे काम करत आहे. आणि तो जोपर्यंत काम करत आहे तोपर्यंत मी माझ्या युनिटसाठी, माझ्या देशासाठी जे जमेल ते काम करीन. वेगळाच जोश त्याच्या बोलण्यात होता.

मी फाऊंडेशनतर्फे काम करत असताना अनेक तरुणांना, मुलांना भेटते. मी मुलांना, शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम करते. पण मनीषकडून वेगळीच मनोवृत्ती मला शिकण्यास मिळत होती. पुढे आमची चांगली ओळख झाली.

जेव्हा मी PRC ला जायचे तेव्हा मिलिटरी हॉस्पिटल येथे आवर्जून जायचे. दर वेळेला माझ्या मुलांना घेऊन जायचे, कारण मला असे वाटायचे, की माझ्या मुलांना त्या ठिकाणी पुस्तकी शिक्षणापेक्षा अधिक काहीतरी मिळणार आहे. मला मनीषकडून सैनिकांच्या दृष्टिकोनाविषयी बरेच काही शिकण्यास मिळाले आणि त्यातूनच ही विचारसरणी माझ्या मनात रुजली, की सैनिकी प्रशिक्षणाचा थोडा भाग नित्य, सर्वसाधारण शिक्षणक्रमात येण्यास हवा. सैनिकांना कसे घडवले जाते, शिस्तीचे महत्त्व त्यांच्या मनात कसे रुजवले जाते, “मी' म्हणजे कोणी अलग नसून मी माझ्या टीमचा एक हिस्सा आहे आणि माझ्या टीमसाठी, म्हणजेच माझ्या देशासाठी काम करणे हे माझे कर्तव्य आहे. मला कोठलाही मोह त्यापासून अडवू शकत नाही. माझा हे काम करताना जीव जरी गेला तरीही मी मागे हटणार नाही. ही भावना प्रत्येक सैनिकाच्या मनात ट्रेनिंगमधून कशी बाणवली जाते व त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास कसा वाढत जातो हे मला मनीषकडून कळले.

उलट, समाजात तरुणांना घडवण्यात कोठेतरी पालक, शिक्षक कमी पडत आहेत. मला जाणवू लागले, की आत्मविश्वास हरवत चाललेल्या या मुलांकरता लष्करी प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे. तशा प्रशिक्षणामुळेच कमरेखालील पूर्ण भाग लुळा असलेला, सहाय्यकाच्या मदतीशिवाय धड उठून बसताही न येणारा मनीष किती आत्मविश्वासपूर्ण होता! श्रीमंत घरातील एखाद्या मुलावर जरी असा प्रसंग आला, त्याला सर्व मेडिकल सोयी उपलब्ध करून देता आल्या तरी तो असा विश्वासाने जगेल का?

एक गोष्ट मनीषशी बोलताना माझ्या लक्षात आली. मला तो एकदा म्हणाला, “मॅडम, या बेडवर मी असा आनंदी का राहू शकतो माहीत आहे! कारण मी आतापर्यंतचे माझे संपूर्ण आयुष्य शंभर टक्के भरभरून जगलो आहे. त्या सर्व आठवणी या एकांतात मला आनंद देतात. एकाकी पडू देत नाहीत.पंचवीस वर्षांचा मनीष तेव्हा मला हे सांगत होता. मला तो म्हणाला, “अपंगत्व नशिबात असते, ते कोठेही गेलात तरी चुकवता येत नसते” (या गोष्टीवर सैनिकांचा दृढ विश्‍वास असतो. जी गोळी माझ्या नशिबात आहे तीच मला लागणार. नाहीतर मला काहीही होणार नाही. ही दृढ भावना त्यांच्या मनात रुजली असल्यामुळे ते लढाईच्या प्रसंगीदेखील बिचकत नाहीत.) मनीष मला म्हणाला, “अशा प्रकारचा अपघात जर अमेरिकेत झाला असता तर मी खचून, संपून गेलो असतो. सैन्यात येऊन माझी स्वतःशी ओळख झाली. मी मला जसे हवे तसा प्रत्येक क्षण जगलो. आज मी जो काही आहे ते मला या सैनिकी जीवनाने घडवले आहे.

मेजर मनीष आणि जितेंद्र खेर

माणसाला स्वतःची ओळख होणे ही त्याच्या आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे. भारतीय शिक्षणक्रमामध्ये या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे आणि म्हणूनच मोठमोठ्या डिग्री घेतलेली मुले जराशा संकटाने कोलमडून जातात. मनुष्याला स्वतःची ओळख होते म्हणजे त्याला त्याच्या क्षमतांची ओळख होते. कोणाला चित्रकला आवडत असेल, कोणाला एखादे वाद्य वाजवण्यास आवडत असेल, कोणाला डॉक्टर व्हावेसे वाटत असेल, कोणाला शिक्षणशास्त्राची, तर कोणाला तंत्रज्ञानाची आवड असेल. मुलांना स्वत:च्या क्षमतांची, आवडींची ओळख शालेय वयातही होणे आवश्यक आहे. शिक्षणक्रमात या गोष्टीवर भर दिलेला नाही. सर्व भारतीय शिक्षणपद्धत मार्कांभोवती केंद्रित आहे. विद्यार्थ्यांची क्षमता पाठांतर करून मिळवलेल्या मार्कांवर ठरवली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची खरी क्षमता कळतच नाही. मनीष म्हणतो, “माझ्या शाळा, ज्युनियर कॉलेजने व इंजिनीयरिंगच्या एका वर्षाने जे मला दिले नाही ते मला सैन्यातील चार वर्षांच्या ट्रेनिंगने दिले. मी आर्मीमधे जाताना एक बारीकसा, कोठल्याही खेळात प्राविण्य नसलेला, भरपूर मार्क मिळूनही आत्मविश्वासाची कमी असलेला असा सर्वसामान्य मुलगा होतो. मला आर्मीने माझ्यामधील असामान्यत्वाची जाणीव करून दिली. तेथील प्रशिक्षणामधे कित्येकदा धड झोपू दिले जात नाही. खाणे समोर असते पण खाण्यास वेळच देत नाहीत, छोट्याशा चुकीसाठी अनेक शिव्या दिल्या जातात. सुरुवातीला थोडी चिडचिड होई. पण मी त्यातून घडत गेलो. मलाच माझ्यामधील गुणांचे शक्यतांचे आश्चर्य वाटू लागले.माणसाला कठीण काळ घडवतो. हे जर माणूस समजला तर तो कधीच दुःखी होणार नाही. अतिलाडावलेली मुले पुढे आयुष्यात आत्मविश्वासात कमी पडतात. शालेय अभ्यासक्रमात मुलांचे लाड चालवले आहेत - परीक्षा नको, मार्कांचे टेन्शन नको, शिक्षकांचे ओरडणे नको... त्यामुळे मुलांचे व्यक्तिमत्त्व कमकुवत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अर्थातच मुलांना कोठलीही शिक्षा देताना शिक्षक पण त्या योग्यतेचा हवा. ती शिक्षा देण्यामागील भावना सुस्पष्ट हवी. शिक्षकांनी त्यांच्या आचरणातून मुलांवर संस्कार करण्यास हवेत. शिक्षकांनी मुलांकडून आदर मागू नये तर त्यांनी तो कमावायला हवा. आदर त्यांच्याबद्दल वाटण्यास हवा. जसे आर्मी ट्रेनिंगमधे प्रशिक्षक स्वतः प्रत्येक कठीण गोष्ट करून दाखवतो. तेव्हाच तो त्याच्या विद्यार्थ्यांना करण्यास सांगतो. सैनिक, लीडर त्यालाच मानतात, जो स्वतः छाती काढून संकट आल्यावर पुढे जातो, अनुयायांच्या सुखदुःखात तो बरोबर असतो. मग अशा प्रशिक्षकाने किंवा सिनिअरने कोठलीही शिक्षा दिली तर ती आनंदाने स्वीकारली जाते. सैनिकांच्या मनामध्ये 'मला घडवण्यासाठीच सर असे वागले.' ही ठाम भावना असते. असे सर व मॅडम शाळा शाळांमध्ये असतील तर विद्यार्थी का नाही चांगले घडणार


मनीषला कोठल्याही तरुणाप्रमाणे लग्न करण्याची इच्छा होती. तो म्हणाला, मला जेव्हा गोळी लागली तेव्हा माझ्या मनात कोठलेही दुःख नव्हते. मी तेव्हा चोवीस वर्षांचा होतो. माझा आदर्श भगतसिंग याला तेविसाव्या वर्षी फाशी झाली व तो त्याचे कर्तव्य करत हसत हसत मरणाला सामोरा गेला. त्यामुळे मला मरणाची भीती नव्हती. पण माझे लग्न व्हावे ही इच्छा मात्र राहून गेली होती.मनीष जेव्हा आम्हांला भेटला तेव्हा मला व माझे पती जितेंद्र खेर यांना पूर्ण खात्री होती, की मनीषची ती इच्छा पूर्ण होणार. आम्ही त्याला तसे बोलून दाखवतही असू. पण मनीषचे मन कधीतरी साशंक व्हायचे. आजुबाजूचा बदलणारा समाज पाहता अशी कोणी व्यक्ती जी त्याचा त्याच्या अपंगत्वासह स्वीकार करेल, या जगात सापडू शकेल का? त्याला वाटे. तो हरून मात्र केव्हाही गेला नाही; नेहमी आनंदात राहायचा! त्याला तरुण मुलांना मार्गदर्शन करण्यात फार आनंद वाटतो. एखादी स्त्री तिच्या लहान मुलाला मनीषकडे सल्ला मागण्यास घेऊन आली, की त्याला फार आनंद व्हायचा. कोणाच्या मदतीशिवाय उठताही न येणारा मनीष तशा वेळेला त्याच्या हातांवर जोर देऊन हळूहळू उशीला टेकून बसायचा. मला सांगायचा, “मॅडम, माझ्या आयुष्याचा थोडा जरी उपयोग दुसर्‍या कोणाला घडवण्यासाठी होत असेल तर तो करताना मला फार आनंद वाटतो. मी या अपंगत्वामुळे शत्रूशी लढू शकत नाही. पण एवढा तरी माझा उपयोग होतो, ही गोष्ट मला जगण्याचे बळ देते.मी मनीषच्या कथेवर आधारित 'ए मेरे वतनके लोगो? ही कादंबरी लिहिली आहे. त्यातील कॅप्टन मिहिरचे व्यक्तिमत्त्व मनीषशी बरेचसे मिळतेजुळते आहे. त्या कादंबरीत कॅप्टन मिहिरला सर्वार्थाने योग्य अशी जोडीदार मिळते असेही दाखवलेले आहे. त्या कादंबरीच्या सुरुवातीचा सर्व भाग मनीषच्या जीवनावर आधारित आहे. पुढील भागाला काल्पनिक वळण दिलेले आहे. पण मनीष या व्यक्तिरेखेची विचारसरणी त्यात कोठेही दूर केलेली नाही. जितेंद्र खेर हे नेहमी म्हणतात, कीमनीषसारखी व्यक्ती कधी अपंग असूच शकत नाही. अपंगत्व हे मनाचे असते; शरीराचे नसते.ते त्याला 'फायटर' म्हणूनच हाक मारतात.


आणि खरेच की! फायटर मनीषला, त्याला सर्वार्थाने योग्य अशी जोडीदार मिळाली आहे. त्यांचा विवाह 21 ऑगस्ट 2020 रोजी झाला. त्याची पत्नी आस्था. मनीष तर आनंदी होताच पण ती अतिशय स्मार्ट, हुशार पण वृत्तीने धार्मिक आहे. आस्थाची प्रतिक्रिया होती, की मनीषहून छान नवरा तिला मिळूच शकत नाही! ती म्हणते, मी आयुष्यात फार सुखी आहे.मनीष हा त्याच्या आयुष्यात फार सुखी झाला आहे. तो त्याचे युनिट 9 पॅराच्या उधमपूर येथील ऑफिसमधील काम पाहतो. आस्था त्याची सर्वार्थाने जोडीदार झालेली आहे. मनीषचे आईवडील आयुष्यभर भाड्याच्या घरात राहत आले आहेत. मनीषने त्यांना दिल्लीच्या बाजूला स्वतःचे घर घेऊन दिले आहे. मनीष आर्मीच्या परीक्षा देऊन कॅप्टनचा आज मेजर झालेला आहे. पुढील आयुष्याची स्वप्न रंगवत आहे. तो या सर्वांचे श्रेय आर्मी प्रशिक्षणाला देतो!

आणि म्हणूनच मला ठामपणे वाटते, की भारतीय शिक्षणक्रमामध्ये मिलिटरी ट्रेनिंगचा (फक्त शारीरिक नव्हे तर मानसिकदेखील) समावेश करण्यास हवा. सर्वांनी सैन्यात जावे म्हणून नव्हे. पण निदान प्रत्येकाचे जीवन आत्मविश्वासपूर्ण व्हावे एवढ्यासाठी. त्यामुळे मुले बिकट परिस्थितीमुळे खचून जाणार नाहीत, लाचार होणार नाहीत. जिद्दीने उभी राहतील. त्याचा फार सकारात्मक परिणाम आपल्या समाजावर दिसून येईल.

- शिल्पा खेर 98197 52524 khersj@gmail.com

संयोजक, शिक्षक व्यासपीठ, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

शिल्पा खेर या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या त्यांच्या 'भाग्यश्री फाउंडेशन'तर्फे विविध शैक्षणिक उपक्रम करत असतात. त्यांचे 'यश म्हणजे काय?' हे पुस्तक गाजत आहे. त्यामध्ये मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतीआधारे यशाचे गमक उलगडून दाखवले आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------


 ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. प्रत्येक मुलाला सैनिकी शिक्षण मिळायला हवे तसेच संवीधानाचेही ज्ञान मिळायला हवे.केवळ पुस्तकी ज्ञान नको.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. श्री.निवास शिंदे M.D.Keni vidylay Bhandup भारतीय शिक्षणक्रमामध्ये मिलिटरी ट्रेनिंगचा समावेश करण्यास हवा. त्यामुळे मुलांचा शारिरीक व मानसिक विकास होईलच. निदान प्रत्येकाचे जीवन आत्मविश्वासपूर्ण व्हावे एवढ्यासाठी तर गरजेचेचं आहे.त्यामुळे मुले बिकट परिस्थितीमुळे खचून जाणार नाहीत, लाचार होणार नाहीत. जिद्दीने उभी राहतील. त्याचा फार सकारात्मक परिणाम आपल्या समाजावर दिसून येईल. माझ्या मते तरी सर्वांना सैनिकी शिक्षण मिळायला हवेच.याच्यापुढे तर मी म्हणेन सैनिकी शिक्षण दिलेच पाहिजे.

      हटवा
    2. सध्या शैक्षणिक क्षेत्रात सैनिकी शिक्षण गरजेचे आहे सध्याची पीढी ही संस्कारहिन बनत चाललेली पहायला मिळते शिस्त राष्ट्र भक्ती देशप्रेम घ्या संकल्पनाच बोथट होत चाललेल्या आहेत . मोबाईलचा अती वापरामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेले पहायला मिळते .२) याला शिक्षणपद्धती जबाबदार आहे . व्यवसायीक शिक्षणावर भर दिला पाहिजे वर्गातील वेगवेगळ स्किल असलेली मुल आपण एकाच चरकात घालतो व पिळून काढतो त्यामुळे दिशा मिळत नाही मग मुलांची दशा होते हल्ली शिक्षण हे मुलांच्या मनाप्रमाणे नाहीच ते पालकांच्या मनाप्रमाणे आहे . मुलांच्या कलाप्रमाणे जोपर्यंत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रगतीकडे वाटचाल होणार नाही हे माझे ठाम मत आहे म्हणून शैक्षणिक व्यवस्था जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत एकाच फॅक्टरीतून बाहर पडणाऱ्या या मालाला जगाच्या बाजारात किंमत मिळणार नाही वेगवेगळ्या स्किलने परिपूर्ण मुल जोपर्यंत तयार होत नाहीत तो पर्यंत हे असेच चालत राहिल ३) शिक्षण क्षेतात्र सततचे बदल अपेक्षीत आहेत . मुलांना स्व ची जाणिव होणे गरजेचे आहे १- मी कोण?२- मला काय करायचे आहे? ३- काय केले पाहिजे . या प्रश्नांची उत्तर मुलाला स्वताहून मिळाली की मग त्याला स्वची जाणिव होईल व संधी उपलब्द्ध होतील करिअर= आवड+ क्षमता= संधी .

      हटवा
  2. विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील शिक्षण पद्धती ही सर्वात मोठी गुंतागुंतीची आणि तितकीच उत्सुकतेची प्रक्रिया आहे. शिक्षण आणि मूलभूत शिक्षण यामध्ये आपण आज सुद्धा मागासलेले आहोत.ब्रिटिश आमदानीत लॉर्ड मेकॉले याने इंग्रजी कारभाराला प्राधान्य देऊन कारकून निर्माण करणारी शिक्षण पद्धती निर्माण केली आणि त्यांनी जबाबदारी टाळणाऱ्या झिरपत्या सिद्धांताचा पुरस्कार केल्याने मूल्य शिक्षण संपुष्टात आले. कारकून निर्माण करणारी शिक्षण पद्धती त्यामुळे उदयास आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्माण झालेला मूल्यशिक्षण, राष्ट्रीय शिक्षण ,व्यवसाय शिक्षण देणारा प्रवाह जागतिकीकरणाच्या लाटेत निष्प्रभ झाला.सध्याची शिक्षण पद्धती मार्क्सवादाकडे झुकलेली असल्याने अमुक इतके गुण मिळाले तर हुशार आणि त्यापेक्षा कमी गुण मिळाले तर तो गुणवान नाही अशी लेबल मारून दरवर्षी हजारो विद्यार्थी नोकरीच्या बाजारात सोडले जातात. आपल्याकडे नोकरीत चिकटणे हा मजेशीर शब्दप्रयोग त्यामुळेच आला असावा!

    शिक्षणाच्या यांत्रिकीकरणामुळे आत्मविश्वास आणि संस्कारमूल्ये नसलेली पिढी निर्माण होत आहे.त्यामुळेच देशप्रेमाने भारावलेली, सळसळता आत्मविश्वास असणारी दृढ निश्चयी पिढी निर्माण करण्यासाठी लष्करी शिक्षणाचा शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात समावेश केला पाहिजे.पराकोटीचे देशप्रेम आणि प्रतिकूल परिस्थितीतही झुंजण्याचा आत्मविश्वास भारतीय लष्करात ठाई ठाई भरला आहे. हिमालयातील हाडे गोठवनारी थंडी असो वा राजस्थानातील शरीर करपून टाकणारी दाहकता असो तोच जवान तिथे त्याच आत्मविश्वासाने कर्तव्य बजावत असतो.जशा सनदी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण काळात त्यांना अशा काही exposure visit असतात तशा पदवी प्राप्त होण्यापूर्वी किमान तीन महिन्याच्या भेटी बंधनकारक असल्या पाहिजेत.लष्करी शिक्षण केवळ चार भिंतीत न देता अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.लष्करी छावणीत या कालावधीत विद्यार्थ्यांनी जवानांसाठी भोजन बनवणे,भांडी घासणे, बूट पॉलिश करणे इत्यादी स्वयंसेवकांची कामे देखील केली तरच राष्ट्रीय संस्काराचा असलेली व चारित्र्य घडवणारी पिढी यामुळे नक्कीच निर्माण होईल.

    उत्तर द्याहटवा