कोकणातील आमच्या गावात व आजुबाजूच्या परिसरात दिवाळीचा सण साजरा करण्यास सुरुवात होते ती नरक चतुर्दशीच्या दिवशी. त्या आधी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दोन दिवस दिवाळीचा भाग असले तरी त्या दिवशी 'सेलिब्रेशन' असे फार नसते. वसुबारसेच्या दिवशी ज्यांच्या घरी गाई आहेत ते लोक गाईला हळद-कुंकू लावून पूजा करतात व नैवेद्य दाखवतात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लावतात. दिवाळीची खरीखुरी 'गजबज' सुरू होते नरक चतुर्दशीच्या दिवशी, पहाटेपासून. त्या दिवशी लोक नरकासुराचा वध प्रतीकात्मक रीतीने नाना तऱ्हांनी करतात. काही लोक नरकासुराचा पुतळा बांबूच्या काठ्यांचा वा नारळाच्या पिंढ्यां/पेंढ्यांपासून उभा करतात आणि तो जाळतात. आमच्या परिसरात नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे शौचालयात दिवा लावण्याची पद्धत आहे. काही लोक 'कारीट' नावाचे रानात येणारे फळ पायाखाली फोडून त्याची बी कपाळाला लावून नरकासुर वध झाल्याचे समाधान मानतात!
त्या दिवशी पहाटे अंगाला तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान होते. मग देवाची पूजा करून देवांना फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. देवांमध्ये घरचे देव, ग्रामदैवत, कुलदेवता आणि महापुरुष यांचा समावेश होतो. कोकणात साधारण प्रत्येक घराच्या परिसरात 'महापुरुष' म्हणून एक वृक्ष राखलेला असतो. ते झाड रायवळ आंबा, वड, पिंपळ वा उंबर यांपैकी एक असते. सणावारांना त्या महापुरुषाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवला जातो. दिवाळीच्या दिवशी महापुरुषाचा मान विशेष असतो. नैवेद्य झाल्यावर मग घरातील माणसांना फराळ करण्यास म्हणजे खाण्यास मोकळीक! त्या दिवशी गोरगरिबांना पोहे दान देण्याची पद्धत आमच्या भागात आहे. गावात प्रत्येकाच्या घरी सारखा फराळ असला तरी तो एकमेकांकडे देण्याघेण्याची पद्धत पूर्वापार आहे.
नरक चतुर्दशीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. कधी कधी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी येते. लक्ष्मी पूजन हे काही ठरावीक घरांमध्ये आणि संध्याकाळच्या वेळी केले जाते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळणे, पतीने पत्नीला भेटवस्तू देणे, भाऊबीजेच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जाणे, बहिणीने भावाला ओवाळणे, भावाने बहिणीला 'भाऊबीज' देणे या सगळ्या प्रथा सर्वसाधारणपणे सगळीकडे सारख्या आहेत.
नरक चतुर्दशीपासून भाऊबीजेपर्यंत तिन्हीसांज झाली की प्रत्येकाच्या घरी पणत्या लावल्या जातात. घरातील लाईट थोडा वेळ बंद केले की काळोखात पणत्यांचा पडणारा नैसर्गिक लख्ख स्निग्ध असा प्रकाश वेगळा आनंद देणारा असतो. लहान मुले त्यांच्या आनंदासाठी फटाके वाजवतात. परंतु फटाक्यांचे प्रमाण गेली चार-पाच वर्षें पर्यावरणविषयक प्रबोधनामुळे कमी झालेले जाणवत आहे. आमच्या परिसरात वसुबारसेपासून तुलसीविवाहापर्यंत, म्हणजे सुमारे पंधरा ते वीस दिवस संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावला जातो. 'तुळशीचं लग्न' हा दिवाळीच्या धामधुमीचा समारोप असतो.
- हर्षद तुळपुळे 9405955608 harshadtulpule@gmail.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या