कलाविष्कार, मुक्ततेच्या दिशेने... (Art Individuality InTechnology World)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

कलाविष्कार, मुक्ततेच्या दिशेने... (Art Individuality InTechnology World)


राज शिंगे
कला या माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत्या व असण्यास हव्यात. आदिमानवाचा प्रत्येक आविष्कार ही कलाकृती होती मग ती माती, दगड, लाकूड, हाडे इत्यादींपासून बनवलेले भांडे असो किंवा मातृदेवतेचे शिल्प! पण माणूस समाजव्यवस्थेचा भाग बनला आणि सर्वसामान्य माणूस व कला यांमध्ये अंतर पडू लागले. बदलत्या अतिव्यस्त जीवनशैलीने तर माणूस व कला यांत दरीच निर्माण केली आहे. कला हे प्रकरण अगम्य आहे असा समज गेल्या शतक-दोन शतकांत सर्वसामान्यांत पसरत गेला आहे. जीवनातील कलेचा प्रत्यक्ष सहभाग त्याकाळात कमी झाला.
या अगम्य कलेचे स्वरूप सध्या तर आणखीच गोंधळात टाकणारे होत आहे का? नव्या काळात भिंती वरील चित्रे वेगळ्या स्वरूपात दिसू लागली आहेत. त्यांची माध्यमेही बदलली आहेत. रसिक त्या बदलांमुळे अचंबित झाला आहे. सहज कळणारी, प्रत्येकाला आवडणारी निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे या पलीकडे सामान्यत: न गेलेला रसिक या नवीन कलाप्रकारांबद्दल जितका अचंबित तितकाच उत्सुक आहे हे मात्र खरे. त्याचे एक कारण म्हणजे नव्या तंत्रज्ञानाने कलेचे विकेंद्रीकरण होत आहे आणि ती आदिमानवाच्या काळातील कलास्वातंत्र्यापर्यंत जाऊन पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कलाकाराला अनेक बाजूंनी मिळणाऱ्या प्रेरणेतून व्यक्त व्हावेसे वाटते आणि कलेची निर्मिती होते. समाजात घडणाऱ्या घटना, सातत्याने येणारे अनुभव, कलाकाराचे निरीक्षण यांतून कलाकाराला येणाऱ्या मानसिक अस्वस्थतेतून कला निर्माण होत असते आणि कलाप्रकारांतील बदल निर्माणप्रक्रियेतील नावीन्याच्या शोधातून होत जातात. जागतिकीकरण, आंतरजाल यांचा प्रभाव आजच्या चित्रकलेवर आहे. संगणकीय वापरातूनही चित्रकला निर्माण केली जात आहे. चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य, नाट्य यांच्या एकत्रित आविष्कारातून कलानिर्मिती होत आहे.
कलाकाराच्या भोवताली वेगाने होणारे बदल आणि विविध संस्कृतींची सरमिसळ कलानिर्मितीत नावीन्याची भर घालताना दिसत आहे. ललित कलेतील सृजनात्मकता आणि उपयोजित कलेतील तांत्रिक-यांत्रिकता यांचा मेळ आधुनिक कलेत बेमालूमपणे होत आहे. व्हिडिओ आर्ट, मांडणी कला (इन्स्टॉलेशन आर्ट), पब्लिक आर्ट, संकल्पना कला (कन्सेप्च्युअल आर्ट), सादरीकरण (परफॉर्मिंग आर्ट), जुळणी जोडणीकला (असेंबल आर्ट) हे नवे कलाप्रकार ही त्याचीच उदाहरणे आहेत.
व्हिडिओ आर्ट या सृजन कलेत चित्रकार प्रकाशचित्रांचा वापर करतो. मनातील विविध आंदोलने व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर मुक्तपणे केला जातो. विविध कला प्रदर्शनांतून चित्रकार या नवप्रवाहात दृश्य-चित्र मिश्रणातून त्यांची अभिव्यक्ती सादर करत आहेत. नंतरच्या काळात व्हिडिओ आर्टमध्ये नैसर्गिक आवाज व भावभावना कळण्यासाठी विविध ध्वनिमिश्रणांतून अवकाशात, मोकळ्या जागेत, इमारतींवर भव्यदिव्य चित्रपरिणाम साधून चित्रकार त्यांची अभिव्यक्ती सादर करताना सामाजिक परिस्थितीवर चित्रभाष्य करताना दिसतो. या नवप्रवाहात कलेतील नैपुण्य आणि पारंगत व्यवस्था यांना जोड देत, त्यांचे चित्रविचार थेट परिणाम साधण्यासाठी समूह कला प्रदर्शनांतून चित्रकार समाजासमोर मांडू लागला आहे.
एका वर्कशॉपमध्ये लहान मुलास मार्गदर्शन करणारे राज शिंगे
मांडणी शिल्प या सृजनात्मक कलेत त्रिमिती परिणाम साधला जातो. विविध शिल्पकार, समूह संकल्पनेबरोबर प्रकाशयोजना, अवकाश यांतून त्यांचा कलेतील नवप्रवाह अधोरेखित करताना दिसतात. चित्रकार-कलाकार या मांडणी शिल्पातून समाजाशी संवाद साधतो. विविध वस्तू, विशिष्ट आकार, मांडणी, विविध संकल्पना निर्मितीसाठी दैनंदिन गरजेच्या वापरातील सामग्रीला विचारांची जोड देतो. त्य़ा सामग्रीची समूहात मांडणी करून, त्याला मांडणी शिल्पाचे स्वरूप देऊन विविध कला प्रदर्शनांत कलाकार अभिव्यक्ती सादर करतो. या नवकलाप्रवाहात भाषा, प्रांत, जागतिक सीमारेषा हे सगळे पार करत कलाकार एकत्र येत असतात.
माझे महात्मा गांधीहे मांडणी शिल्प 2005 च्या द्वितीय जागतिक बिजिंगच्या 'बीएनाले'मध्ये मांडण्यासाठी भारतातून निवडण्यात आले होते. त्या बीएनालेमध्ये जागतिक शांततेसाठी भारतातून काय प्रयत्न झाले हे कलाकृतीमधून मांडण्यासाठी विषय देण्यात आला होता. त्या विषयमांडणी शिल्पात मी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची विचारसरणी दृश्यमान केली आहे. स्वावलंबन, सलोखा, समभाव, शांती हे विचार अधोरेखित केले आहेत. मी त्यासाठी चरखा आणि कापसाच्या बोंडापासून रंगीत वस्त्र तयार होण्याच्या प्रक्रियेची सांगड समाजघडणीच्या प्रक्रियेशी घातली आहे.
या मांडणीशिल्पात विविध लाकडी बॉक्स एकत्र मांडून एकप्रवाह चित्रातील विविध वस्तू बॉक्समध्ये मांडण्यात आल्या आणि प्रत्येक बॉक्स मांडताना शांततेचा विचार सुचवण्यात आला होता. सुरुवातीच्या खालच्या बॉक्समध्ये शेतातील तयार झालेला कापूस नैसर्गिक अवस्थेत मांडून सर्व लोक त्यांच्या समाजात स्वच्छ कोरे जन्माला येतात, एकमेकांत वावरतात असे सूचित केले होते. पुढील म्हणजे वरच्या बॉक्समध्ये त्यातून समसमान कापूस तयार होतो आणि तो समाजाच्या उपयोगाला येतो. समाजात एकत्र वावरताना समानतेचा वसा बाळगत संवेदनशील मनुष्य शांततेत एकत्र जगतो असे दाखवण्यात आले होते. पुढील बॉक्स रचनेत महात्मा गांधी यांचे विचार अधोरेखित करताना चरखा हे स्वयंचलित यंत्र प्रत्येकाने वापरून देशासाठी त्या कापसापासून असंख्य धागे निर्माण करत खादीचे वस्त्र तयार करण्याचा महामंत्र ज्यांनी भारताला, जगाला दिला त्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सूत काततानाचे चित्र मांडण्यात आले होते. त्या उत्कांतीतून जगाला शांततेचा संदेश दिला गेलेला दिसतो. पुढच्या बॉक्समध्ये असलेले धागे हे लोकशिक्षण, स्वशिक्षणातून शिस्त, संयोजन, निर्मिती आणि समानतेचा संदेश देत सर्व लोक एक आहेत, एकाच कापसापासून तयार झाले आहेत हे सूचित करतात. तर अगदी वरच्या बॉक्समध्ये असलेले विविध रंगांचे सुती धागे एकमेकांत भरून लोक त्यांचा रंग जपताना दुसऱ्या रंगाचा आदर करत एका समाजात वावरत असतात आणि विविध रंगांतून एकता साधते हा विचार त्या सुंदर मांडणीशिल्पातून सादर केला.
हे मांडणी शिल्प चीनमधील बिजिंग शहरात जागतिक समूह कलाप्रदर्शनात मांडण्यात आले होते आणि त्या मांडणीशिल्पाचे वैशिष्ट्य असे होते, की त्या मांडणी शिल्पासमोर शिल्प पाहण्यास उभे राहिल्यास वैष्णव जन तो तेणे कहिये जो, पीर परायी जाने रे... पर दुख्खे उपकार करे पर, मन अभिमान न जाने ... वैष्णव जन तो... हे गांधीभजन एकतारीवर ऐकू येते. हे माझे मांडणी शिल्प चीनच्या संग्रही आहे.
पब्लिक आर्ट या नवकला प्रवाहात काही शिल्पे कायमची किंवा कलाप्रदर्शनांतून लोकसमूहासमोर मांडण्याची कला अस्तित्वात आली. उद्यानात भव्यदिव्य शिल्पाकृती उभारून त्या वातावरणात छायाप्रकाश, पाणी यांचा उपयोग कलाकृतीचा प्रभाव निर्माण करण्यासाठी होऊ लागला. या नवकला प्रवाहाचा उपयोग सामाजिक व राजकीय विचार मांडण्यासाठीही केला जातो.
ग्राफिटी आर्ट या पब्लिक आर्टमध्ये वेगवेगळ्या भिंती, पृष्ठभाग रंगवले जातात. मोठमोठ्या इमारतींच्या दर्शनी भागात चित्रसंकल्पना साकारून भव्य कलाविष्कार साकारले जातात. ही कला मोठे पूल, रहदारीचे छोटे पूल, रेल्वे स्थानकाच्या भिंती, संपूर्ण रेल्वे गाडी, पब्लिक बस, चौक हे रंगवताना स्प्रेचा वापर विविध रंगांत साकारली जाते. या चित्रातून आकर्षक रंगसंगती भव्य आकार-रचना व्यक्त होताना दिसतात.
परफॉर्मिंग आर्ट कलाकार, चित्रकार त्यांच्या भावना, मनातील आंदोलने समूहाने किंवा व्यक्तिश: अभिनय-नृत्य करून व्यक्त करतो. चित्रकार स्वत:च्या शरीराच्या हालचालींद्वारे वा शरीराला रंग लावून हवा तो परिणाम साधतो. जागतिक कला प्रदर्शनात व्हेनिस बीएनाले व भारतातील कोची 'बीएनाले' यांसारख्या प्रदर्शनांतून असे सादरीकरण बघण्यास मिळाले.
असेंबल आर्ट यामध्ये, विविध कला महोत्सवांना हजेरी लावणाऱ्या विविध कलाकारांनी- कलारसिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन कलाकृती साकारावी, तिचा भाग बनावा असा उद्देश असतो. विविध रंगांचे धागे कलाकृतीत बाधून कलारसिकांनी त्यात रंग भरणे, एखादी वस्तू लावणे, लिहिणे, स्वत: उभे राहणे आणि कलाकृती सजवणे असा प्रकार असतो. त्यात सर्व कलारसिक, चित्रकार, कलाकार एकत्रितपणे कलाविश्वात नांदताना प्रेक्षक पाहतो आणि ती जिवंत कलाकृती अनुभवतो. या रंगरंगील्या दुनियेत कलाकार, कलारसिक एकमेकांत मिसळून जातात.
संगणकीय जगात कला आदानप्रदान व्यवस्था निर्माण झाली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून, यूट्यूबसारख्या माध्यमातून प्रत्येक जण व्यवस्थेच्या जवळ पोचत चालला आहे. कोठलीही कला शिकण्यासाठी आर्ट स्कूलमध्ये जावे लागते असे नाही. जगभरातील कलाशिक्षक विविध माध्यमे वापरून चित्रकृती कशी साकारावी याचे धडे घरातच देऊ शकतात, देतात. चित्रकला, जलरंग, पोर्ट्रेट आर्ट, पेंटिंग, सिरॅमिक, पॉटरी आर्ट आदी सगळ्याची माहिती व्हिडिओ स्वरूपात मिळू शकते. घरबसल्या ते शिकता येते. मेटल क्राफ्ट, फॉइल आर्ट, टेक्सटाइल, विव्हिंग आर्ट असे सगळेच एका बोटाच्या क्लिकवर मिळते. त्याचा फायदा असा झालेला दिसतो की सृजनाविष्काराला ना माध्यमाचे बंधन राहिले आहे, ना अन्य कसले! त्याची वाट मुक्ततेच्या दिशेने चालू आहे. कलाकृती प्रदर्शित करण्यासाठीही इंटरनेटने फेसबूकपासून वेबसाइटपर्यंत विविध पर्याय खुले करून दिले आहेत. कलाकाराला त्याची कलाकृती जगभर पोचवणे शक्य केले आहे. त्याचे फायदेतोटे, दोन्ही आहेत. तपश्चर्या कमी व सवंग प्रसिद्धी जास्त असा त्याचा दुष्परिणाम दिसू लागला आहे. कारण शेवटी आंतरजालावरून कला शिकणे म्हणजे केवळ तंत्र शिकणे आहे हे लक्षात घेण्यास हवे. त्यात भावभावना आणि आत्मा ओतण्यासाठी तपश्चर्या लागेलच. कलेच्या या नवप्रवाहात नव्या कलाविचारात मनापासून सामील होत प्रत्येकाने त्याचे जीवन समृद्ध करत जगण्यास हवे असे मात्र नक्की म्हणावेसे वाटते.
- माणिक शिंगे 9987 369963 manikshinge@gmail.com
(आरोग्य संस्कार ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 वरून संकलित, संस्कारित)
राज शिंगे आणि माणिक शिंगे हे दोघे पती-पत्नी चित्रकार आहेत. त्यांचे जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण झाले आहे. माणिक शिंगे यांचा जन्म राजापूरचा. त्या दोघांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शने होत असतात. दोघांनाही अनेक मान-सन्मान मिळाले आहेत. ते दोघेही ठाण्याजवळील वाशिंद  येथे राहतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


थायलंड येथील प्रदर्शनात
---------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या

  1. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळातील चित्रकला व त्यातील बदलांची माहिती सुंदर रित्या वर्णिली आहे.
    प्रा.पुरुषोत्तम पटेल, म्हसावद

    उत्तर द्याहटवा
  2. राज शिंगे यांच्या पेंटिंग्ज खूप छान आहेत.

    उत्तर द्याहटवा
  3. श्री शरद मांडे नमस्कार ..फोनवरून परदेशातून लेखावर प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार सर

    उत्तर द्याहटवा
  4. Raj Shinge Sir, 'Mahatma Gandhi' installation is unique and beautiful....all paintings are very nice... ManikRaj 🙏

    उत्तर द्याहटवा