दया डोंगरे |
दया डोंगरे यांचे नाव घेतले, की डोळ्यांसमोर येते ती
‘खट्याळ सासू नाठाळ सून’ या चित्रपटातील सुनेच्या विरोधात गनिमी कावा करणारी,
मुलाला मुठीत ठेवू पाहणारी अशी धूर्त, खमकी, कावेबाज सासू! त्यांचा करारी
चेहरा, आवाजातील जरब आणि इतरांवरील वचक पाहून कोणालाही त्यांचा दरारा वाटेल. त्यांनी
प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपटक्षेत्रातही त्यांच्या
स्वतंत्र अभिनय शैलीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना त्यांच्या
अभिनयक्षेत्रातील कारकीर्दीबद्दल नाट्परिषदेच्या जीवन गौरव पुरस्काराने 14 जून 2019
रोजी सन्मानित करण्यात आले.
दया
डोंगरे यांचा जन्म अमरावतीचा. त्या बालपणी काही वर्षे कोल्हापूरमध्ये होत्या.
तेव्हा वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी त्यांनी ‘खबरदार जर टाच मारूनी’ हे गाणे
सादर करून रंगभूमीवर पदार्पण केले. दया डोंगरे यांच्या आई हौशी कलाकार होत्या.
त्यांच्या आई व आत्या शांता मोडक या दोघींमुळे गायन व अभिनयाचे संस्कार
त्यांच्यावर लहानपणी झाले.
वयाच्या
चौदाव्या वर्षी 1954 साली धारवाड आकाशवाणीचे उद्घाटन दया डोंगरे यांच्या गायनाने
झाले. त्यांनी पुढे शिक्षणानिमित्त पुण्याला आल्यानंतर हरिभाऊ देशपांडे
यांच्याकडून नाट्यसंगीताचे तर नागेशबुवा खळेकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण
घेतले. त्यांना वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ऑल इंडिया रेडियोच्या सुगम संगीत
स्पर्धेत राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिकदेखील मिळाले. त्या स्पर्धेच्या
परीक्षकांच्या पॅनलवरील पु. ल. देशपांडे यांनी ‘ही पुण्याहून आलेली, नाट्यसंगीत
गाणारी मुलगी कोण?’ अशी त्यांच्याबाबत खास विचारणा केली.
पुढे काळाच्या ओघात व रंगभूमीवर काम करत असल्यामुळे त्यांचे गाणे मागेच राहिले.
महाराष्ट्रीय
कलोपासक संस्थेतर्फे त्यांनी ‘रंभा’ व ‘वैदेही’ ही दोन नाटके केली. या दोन्ही नाटकांतील
त्यांच्या अभिनयाला त्यांना दाद मिळाली. त्यापैकी ‘रंभा’ या नाटकात त्यांना
त्यांच्या कथ्थकच्या शिक्षणाचा उपयोग झाला. याच काळात त्यांनी महाविद्यालयीन
नाट्यस्पर्धा व एकांकिकांमधूनही काम केले. त्यांना पदवी प्राप्त केल्यानंतर सांस्कृतिक
मंत्रालयातर्फे गायन व अभिनयाची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांच्या लग्नानंतर यजमानांची
दिल्लीला बदली झाली. त्यांचा अशा प्रकारे एनएसडीमध्ये प्रवेश झाला. तेथे लीला
गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अभिनयाबरोबर नेपथ्याची कामेसुद्धा करायला
शिकल्या.
त्या
एनएसडीमधून बाहेर पडल्यानंतर व मोठी मुलगी तीन वर्षांची झाल्यावर पुन्हा प्रायोगिक
नाटकांतून काम करू लागल्या. त्यांनी सई परांजपे, अरूण जोगळेकर यांच्यासोबत
नाट्यद्वयी संस्थेतर्फे ‘नांदा सौख्यभरे’, ‘इडा पीडा टळो’, ‘तुझी माझी जोडी जमली’ इत्यादी
नाटकांतून कामे केली. ‘नांदा सौख्यभरे’ हे नाटक म्हणजे प्रहसनांचा अभिनव प्रयोग
होता. या नाटकाच्या मुंबईतील प्रयोगांना सर्व जाणकार, नाट्यलेखकांनी हजेरी लावली व
दादही दिली.
त्या
गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘मंतरलेली चैत्रवेल’ या नाटकाच्या सातारा दौऱ्यावरून परत
येत असताना त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातातून प्रसंगावधानाने वाचल्या. परंतु
त्यांचे सहकलाकार शांता जोग, जयराम हर्डीकर यांना मात्र आपला जीव गमवावा लागला. हा
प्रसंग दया डोंगरे यांच्या मनावर कायमचा कोरला गेला.
त्यांनी
प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांव्यतिरिक्त दूरदर्शनवरील मालिकांतूनही काम केले. त्या
दिल्ली दूरदर्शनमध्ये 1964 सालापासून काम करत होत्या. त्यांनी मुंबई दूरदर्शन सुरू
झाल्यावर ‘गजरा’, ‘बंदिनी’, ‘आव्हान’ इत्यादी मालिका 1972 मध्ये केल्या. तसेच त्यांनी
‘स्वामी’ या मालिकेत गोपिकाबाईंचे
पात्र साकारले, जे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले.
दया
डोंगरे यांनी ‘उंबरठा’ या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून चित्रपटसृष्टीत
प्रवेश केला. त्यांनी विशेष म्हणजे या चित्रपटासाठी व इतर सर्व कलाकारांनी मेकअप न
करता चित्रीकरण केले. त्यांनी त्यानंतर सचिन पिळगावकर यांच्या ‘मायबाप’ या
चित्रपटात खल भूमिका केली. त्यांना या दोन चित्रपटांसाठी पुरस्कार प्राप्त झाले. त्यांनी
मराठीप्रमाणे हिंदीतूनही ‘दौलत की जंग’ या चित्रपटात आमीर खान यांच्या आईची भूमिका
केली. त्यांनी हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अभिनेत्यांची वाट बघण्यात जास्त
वेळ जातो हे लक्षात आल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीपासून लांब राहण्याचा निर्णय
घेतला.
त्यांनी
अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले व त्यांनी त्यांची प्रत्येक भूमिका स्वतःच्या
पद्धतीने जिवंत करण्याचा प्रयत्न केला. जीवन गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात
जब्बार पटेल यांनी ‘केवळ गुणी नाही तर बुद्धिमान अभिनेत्री’ असा माझा उल्लेख केला
यातच सगळे मिळाले, असे त्या नम्रपणे म्हणतात.
दया डोंगरे यांना दोन विवाहित कन्या आहेत. मोठी मुलगी संगीता ही मुंबईत त्यांच्या
घराजवळ राहते तर धाकटी अमृता बंगलोर येथे असते. कन्या, जावई
आणि नातवंडे अधूनमधून येऊन-जाऊन असतात. त्यांचे पती शरद डोंगरे
यांचे 2014 मध्ये आकस्मिक
निधन झाले. त्या दु:खातून त्यांनी स्वत:ला सावरले आहे.
हातीपायी धड असताना ‘त्याचे’ बोलावणे यावे, असे
अगदी सहजपणे सांगून जातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधानी, आनंदी
आणि कृतार्थतेची भावना असते.
रश्मी किर्लोस्कर ही मुलुंडच्या वि.ग.वझे महाविद्यालयात मराठी विषय घेऊन पदवीच्या अंतिम वर्षास शिकत आहे. तिने इ-पुस्तकांचे डीटीपी केले आहे. ती भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहे. तिला वाचन आणि नृत्यासोबत गायनाची व कीबोर्ड वादनाची आवड आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या