'ग्रंथाली'मधून निर्माण झालेल्या आमच्या विशाल स्नेही मंडळात जयंत खेर हा वेगळा होता. तो स्टेट बँकेत उच्चाधिकारी होता. ती नोकरी सोडून तो खाजगी कंपनीत गेला. त्याचे वागणे-बोलणे शिस्तशीर, नेमस्त, तरी आग्रही असे. तो बैठकांमध्येदेखील मुद्द्याला धरून बोले. आमच्या वर्तुळात अर्थविषय तज्ज्ञतेने जाणणारे काही लोक होते, पण जयंत खेरने आम्हाला व्यावहारिक दृष्टी दिली. त्याचा आग्रह प्रत्येक 'अॅक्टिव्हिटी' ही 'प्रॉफिट सेंटर' असली पाहिजे असा असे. आम्हाला तो पटे पण अंमलात आणता कधीच आणता आला नाही. जयंत खेरने 'ग्रंथाली'चा व्यवस्थापन शास्त्रदृष्ट्या यशापयशाचा अहवाल तयार करून घेतला. गंमत म्हणजे आम्ही सगळे बेहिशोबी असूनदेखील त्या कसोटीत उतरलो! त्याचवेळी एक लक्षात आले होते, की त्याच्या व्यवहार चातुर्यात त्याची रसिक वृत्ती छकून जाते की काय!
जयंतने त्याची
पत्नी संजीवनी हिच्या मदतीने ऑडिओ कॅसेट, व्हिडिओ फिल्म असे प्रयोग करून पाहिले,
ते त्याने 'प्रॉफिट सेंटर' म्हणून केले की नाही ते मात्र मी कधी विचारले नाही. मला
जयंतची तरुणपणी सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्याने कर्जतला घेतलेले फार्म हाउस.
तो बऱ्याच वेळा शनिवार-रविवार मित्रमंडळींना घेऊन तिकडे जाई. ते नुसते 'फार्म हाउस'
नव्हते तर तेथे त्याने सहा एकरांत नियोजनबध्द जंगल विकसित केले होते. तेथे फिरताना
मोठी मौज येई. पुढे, वये वाढू लागली तेव्हा त्या 'जंगला'चे काय करायचे अशी चर्चा
सुरू झाली. मी त्याला सुचवले, की तेथे पर्यावरण शाळा सुरू करूया. मला जगातील
सगळ्या गोष्टी म्हणजे सार्वजनिक क्षेत्र वाटते (सरकारी नव्हे). माझ्या डोक्यात 'प्रायव्हेट
प्रॉपर्टीचा कन्सेप्ट' कधी शिरला नाही. तेवढीच गोष्ट मजजवळ वडिलोपार्जित आहे. तरीही
जयंत व त्याच्यासारखे अर्थविषयातले काही जाणकार माझे जवळचे मित्र राहिले आहेत. तर
पर्यावरण शाळेचा मुद्दा तसाच राहून गेला. बघता बघता, आम्ही वृद्ध झालो आणि जयंत
खेरला पार्किन्सनने पकडले. त्याची जाणीव त्याला ड्रायव्हिंग करताना झाली. त्याचे वेगवेगळ्या
अवयवांतील स्नायू काम नीट करत नाहीत हे ध्यानी आले. त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला
त्यातच त्याला हृदयविकाराची बाधा झाली व स्टेन्ट टाकावा लागला. डॉक्टरांनी त्याला
अशा दुर्बलता संभाळत यापुढे जगावे लागेल असे सांगितले. त्याचे हात हलू लागले, चाल
मंदावली. तो बोलायचा आधीपासूनच मृदू, आता उच्चारण अस्फुट होऊ लागले. पण त्याची
बुद्धी आणि त्याची शिस्त मात्र कायम राहिली. बराच काळ त्याने सांस्कृतिक
कार्यक्रमांना-बैठकांना येणे चालू ठेवले. पण तेही हळुहळू कमी झाले -समारंभही आटले.
तो हिंदू कॉलनीत राहायचा -तेथून मदतनीसाच्या अथवा पत्नीच्या सहाय्याने आंबेडकर
रोडवर फिरायला यायचा. तेथे कधी भेट व्हायची. त्याचे बोलणे खूपच कमी झाले होते,
त्यामुळे संभाषण वाढत नसे.
मी जरी ही
वाक्ये सखेद लिहित असलो तरी जयंतला त्या कोणत्याच उणिवेची बाधा वाटत नसावी असे
त्याचे जीवन विधायक रीतीने व कार्यमग्न चालले होते. कारण त्याने त्या काळात जॉन
मार्शलचे चरित्र लिहिले व ते प्रसिद्धही झाले. त्याचा अर्थशास्त्राचा अभ्यास चालू
होताच. तो तत्संबंधी वर्तमानपत्रांमध्ये लिहित असे. त्याखेरीज मेकॉले हा त्याच्या
विशेष चिंतनाचा विषय होता. त्यानी मेकॉले चरित्राची चार प्रकरणे लिहिलीदेखील आहेत.
जयंत खेर पेंटिंग्ज करताना |
मला गंमत जयंतची
वाटते, की त्याचे पंच्याऐंशी वर्षांचे आयुष्य असे विविध छंदांत व व्यवसायात गेल्यावर
त्याने वृद्धपणी पेंटिंग्ज चितारण्याचा वेगळाच ध्यास घेतला आणि तो पूर्ततेस नेला.
त्याला कॅनव्हास उचलून स्टँडवर ठेवताना होणारा शारीरिक अपंगत्वाचा त्रास मी पाहिला
आहे. त्याने आलेल्या त्या अपूर्णत्वावर मात करून पूर्णत्वाची कांक्षा धरली.
त्यातून ती चित्रनिर्मिती झाली. जयंतला वृद्धत्वी लाभलेल्या या आनंदाची थोरवी
प्रत्येक साठीपार माणसाने जाणून घेतली पाहिजे. तेव्हा नवे आनंदी आयुष्य सुरु होऊ
शकते हे जयंतने दाखवून दिले आहे.
13 टिप्पण्या
अनुकरणीय!
उत्तर द्याहटवाप्रेरणादायीव्यक्तीमत्त्व.निर्मितीक्षम मन
उत्तर द्याहटवाप्रेरणादायीव्यक्तीमत्त्व.निर्मितीक्षम मन
उत्तर द्याहटवाप्रत्येक 'अॅक्टिव्हिटी' ही 'प्रॉफिट सेंटर' असली पाहिजे
उत्तर द्याहटवाहे एक वाक्य आज उचलतो इथून !
Hatts off to baba ( Sanjay's father Mr Jayant kher)
उत्तर द्याहटवाAnd to aai ( mrs sanjavani kher)
Fantabulous adarsh JODI no.1
I am Sandeep joshi (Sanjay cha class met )and I am proud to be associated
उत्तर द्याहटवाWith this entire KHER family since almost 38 yrs now
In hurry I made a spelling mistake
उत्तर द्याहटवाPlease read it as classmate .
Extremely sorry.
खरोखरच अनुकरणीय आहे.वृद्धत्व त्या अनुषंगाने येणारे आजार यावर मात करून सकारत्मा कशी जपावी याचे आदर्श उदाहरण! सलाम !
उत्तर द्याहटवाअनुराधा म्हात्रे
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. जयंतजींना सलाम...!👍👍👍
उत्तर द्याहटवावा फारच छान! अनुकरणीय असे व्यंगत्वाला मात देवुन चित्रकारी।ग़ज़ब! माझे नमन खेर यांच्या वृत्तीला।
उत्तर द्याहटवा- अरुण डिके, सोलापूर
धन्यवाद हा शब्द खूप अपुरा आहे. आपण सर्वांनी आपुलकीने लिहिले याचे महत्व आम्हा दोघांना आहे. जयंत यांना अशा प्र शं सेने बळ मिळाले आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
संजीवनी खेर
अभ्यासू आणि सह्रदयी मित्र !
उत्तर द्याहटवा- अवधूत
जयंतराव खरोखरच ग्रेट आहेत. आणि संजीवनीही. जिथे असतात तिथे आनंद भरलेला असतो. -प्रकाश कुलकर्णी
उत्तर द्याहटवा