रामा राघोबा राणे चौक काश्मिरात ! (Rama Raghoba Rane Square in Kashmir ! So Surprising)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

रामा राघोबा राणे चौक काश्मिरात ! (Rama Raghoba Rane Square in Kashmir ! So Surprising)

काश्मिरमधील प्रवासात मला अचानक रामा राघोबा राणे चौक व त्यास अनुरूप असा जयस्तंभ दिसला, त्याची ही गोष्ट. मी राजौरीत राहत होतो. राजौरी ते श्रीनगर हा अकबर बादशहाच्या काळातील मोगल मार्ग म्हणून परिचित आहे. मात्र तो अधिकृत मार्ग म्हणून प्रवासासाठी मोकळा नाही. तो मार्ग बर्फ आणि कोसळणाऱ्या दरडी यांमुळे वर्षातील चार-पाच महिने बंदच असतो. मात्र त्याच मार्गाने काश्मिरच्या अनवट निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येतो. राजौरीचा प्रदेशच निसर्गरम्य आहे. उंच डोंगरकडे आणि हिरवीगर्द वनराई !

राजौरी हे गाव नौशेरातावी नदीच्या काठी वसलेले आहे. त्याला ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. नौशेरा नदी हिमालयातून येणाऱ्या थंड पाण्याची आहे. ती पुढेसियालकोट जिल्ह्यातून पाकिस्तानमध्ये जाते. राजौरी गुलाबसरंग राजाने शीख सत्ताधीश रणजित सिंग यांच्याकडून 1813 साली जिंकली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने जो पहिला हल्ला चढवला तो राजौरीवर7 नोव्हेंबर 1947 रोजी. त्यात मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले आणि पाकिस्तानची फत्ते झाली. पाकिस्तानने राजौरी काबीज केली. मात्र भारतीय 19 इन्फंट्रीने पाकिस्तानचा पराभव 12 एप्रिल 1948 रोजी केला आणि राजौरी भारताला पुन्हा जिंकून दिली. ते युद्ध महाभयंकर होते. त्याचे वर्णन तावी नदी रक्तलांछित झाली. सारे शहरही उद्ध्वस्त झाले’ असे करतात.

स्वतंत्र भारतात राजौरी हा एक नवा जिल्हा स्थापन होत आकारास येत गेला. राजौरी आणि रेअसी असे दोन जिल्हे 1968 मध्ये करण्यात आले. पाकिस्तानने 1965 च्या युद्धातही स्थानिक मुजाहिदींच्या साथीने तेथे हल्ला केला होतात्यावेळी भारताने ऑपरेशन जिब्राल्टर’ मोहीम राबवत राजौरीला ‘कव्हर केले होते. सीमाभागात असणारा तो पट्टा संवेदनशील गणला जातो.

राजौरी शहरात हॉटेलांची नावे आशीर्वाददत्ता अशी आहेत. मात्र त्यांचे मालक अथवा चालक मुस्लिम आहेत. मी सलानी ब्रिज जवळच्या दत्ता हॉटेलात उतरलो होतोते छोटेसे लॉजिंग आणि बोर्डिंग स्वरूपाचे हॉटेल नदीच्या काठावर आहे. तेथील जेवण रुचकर होतेकिचनमध्ये शेफ नेपाळी होता. तोच काश्मिरी चिकन कबाब अप्रतिम बनवत होता. समोरचा उंच कडा असणारा डोंगर हे त्या गावाचे वैशिष्ट्य आहे. त्या डोंगरावर मिलिटरीचा कॅम्प आहे. उंचावर एक दर्गा आहे तर दुसऱ्या बाजूला बर्फानी बाबाचे मंदिर आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने तो भाग रिझर्व’ केला आहे. पाकिस्तान बॉर्डर त्या डोंगरावरून दिसते. तावी नदी आहे मात्र फारच गलिच्छ. शहरातील सारा कचरा त्या नदीत आणून टाकतात. त्यातील एक उपहास असा दिसलाकी तो सारा कचरा तर पाकिस्तानातच वाहून जाणार ना ही लोकभावना ! ती सुंदरहिरव्या-पांढऱ्या दगडगोट्यांचीसुंदरविस्तीर्ण नदी कचरा आणि प्लॅस्टिक यांनी फारच खराब झाली आहे. त्यामुळे त्या नदीकाठी जी हॉटेले उभी राहत आहेत ती त्या नदीच्या अभूतपूर्व सौदर्याचा आस्वाद घेऊ शकणार नाहीत.

मला श्रीनगरला जायचे होते. राजौरीहून श्रीनगरला जाण्यासाठी एकमेव मार्ग होता तो पीर की गलीमात्र तो मार्ग सुरक्षित नाही आणि हवामान केव्हाही खराब होते. राजौरी येथे गुज्जर मंडी चौकात श्रीनगरला जाणाऱ्या जीप गाड्या असतात असे हॉटेल चालक म्हणाला. मात्र ते अंतर हॉटेलपासून दोन किलोमीटर होते. तेथील डमडम रिक्षा सकाळी 8 नंतर सुरू होतात. मी सकाळी लवकर परतीची गाडी पकडावी यासाठी सहा वाजता हॉटेलबाहेर पडलो. आल्हाददायक वातावरण होते. धुक्याचे ढग समोरच्या डोंगरकड्यावर ओथंबले होते. हवेत गारवाही जाणवत होता. रस्ते मात्र सुनसान होते. अखेर चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि तेवढ्यात गुज्जर मंडीकडे जाणारी एक रिक्षा दिसली.

गुज्जर मंडी चौक हे राजौरी जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ आहे. तो चौक 1948 च्या पाकिस्तान हल्यातील भारताच्या दैदिप्यमान विजयाचा साक्षीदार आहे. त्या भागाला राजौरी अवाम’ असेच संबोधले जाते. राजौरीच्या स्वातंत्र्याचा अभिमान म्हणून त्याचे तसे जतन केले जाते. रिक्षातून गुज्जर मंडी चौकात येताना माझे मन वेगवेगळ्या शंकाभीतीचे काहूर यांनी वेढले होते. ती धास्ती वेगळाअनभिज्ञ प्रांतअनोखे वातावरण यांमुळे वाटत असावी. सोबत कोणी नाहीना कोणी ओळखीचे- ना पाळखीचेएखादीच गाडी दिसत होती. काही तरुण होते. त्यांची भाषा ओळखीची वाटत होतीपण समजत नव्हती. उमटणाऱ्या एखाद्या इंग्रजी अथवा हिंदी शब्दाचा अर्थ मनात लागत होता. मी गाडी लवकर येणार नाहीम्हणून चौकाच्या मध्यभागी असणाऱ्या लाल मोठ्या चबुतऱ्याकडे गेलो. तेथे एक स्तंभ उभा होताअगदी रत्नागिरीतील जयस्तंभासारखाच ! ब्रिटिशांसाठी लढलेल्या आणि धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांसाठी असे स्तंभ उभारलेले असतात. त्या स्तंभाला पाहण्यासाठी पुढे गेलो आणि अचंबित झालो ! कारण स्तंभावर नाव होते परमवीर रामा राघोबा राणे यांचे. माझे हृदय उचंबळून आले. मी भारताच्या एका टोकाला, राजौरी जिल्ह्यातील पाकिस्तान सीमेवरील चौकात उभा होतो आणि त्या चौकातील भारतीय स्वातंत्र्याचा देदिप्यमान अभिमान बाळगणारा परमवीर चक्रधारक आदर्श हा माझ्या रत्नागिरीचा रामा राघोबा राणे होता. तो ध्वजस्तंभ मला त्यांचे स्मरण करून देत होता. त्या चौकाबद्दल मला विलक्षण आपलेपणाची भावना निर्माण झाली. मनात परकेपणाचीकाहीशी अनामिक भीतीची भावना असणारा मी जणू माझ्या रत्नागिरीच्या जयस्तंभावरच उभा होतो ! त्या चौकात तेथील मातीला स्पर्श करत असतानाच माझे हात नकळत कपाळाशी पोचत रामा राघोबा राणे यांना सलाम करते झाले.

जीप श्रीनगरच्या दिशेने निघाल्यावर आतील पॅसेंजरांच्या चर्चा सुरू झाल्यात्यांतील कोणी श्रीनगरमध्ये बँकेत कामावर जाणार होतातर एका जोडप्याला शॅपेनला जायचे होते. मी मात्र आपुलकीने सांगितलेकी या मंडी चौकात जो स्मृतिस्तंभ आहे त्या रामा राघोबा राणे यांच्या गावचा मी आहे. मला तिकडे जायचे आहे. माझे मन अभिमानाने आणि कोकणच्या लाल मातीच्या स्पर्शाने भरून आले होते.

- अभिजित हेगशेट्ये 9422052314 abhijit.shriram@gmail.com

अभिजित हेगशेट्ये यांनी रत्नागिरी येथे बावीस वर्षे पत्रकारिता केली आहे. त्यांची ‘टकराव, ‘रानवीचा माळआणि सेवाव्रती हळबे मावशी’ अशी तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ते रत्नागिरीच्या नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेतदेवरूख येथील मातृमंदिर या सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या