कल्याणचे
अविरत शेटे हे विद्यार्थ्यांचे लाडके ‘अवि सर’ आहेत. ते त्यांच्या जिवाची धन्यता युवापिढी व विद्यार्थी यांना प्रेरणा
देण्यात मानतात. ते साहसी आहेत आणि आव्हाने स्वीकारण्यास नावाप्रमाणेच सतत तयार
असतात. त्यांचे अनेक गुण म्हणजे लेखक, कवी, शिक्षक; आणि निसर्गप्रेमी म्हणून ट्रेकिंग, जंगल सफारी, भटकंती अशा गोष्टींत पारंगत.
त्यांचा जन्म 1979 मध्ये झाला. त्यांचे आई, वडील, दोघेही शिक्षक. आईने अविरतच्या अभ्यासाकडे लक्ष देता यावे, म्हणून नंतर शालेय नोकरी सोडली, परंतु त्या
अधूनमधून शाळेत जाऊन अध्यापनास मदत करत असत (बिनपगारी). वडिलांनी तेहतीस वर्षे
शिकवले. वडील कोचिंग क्लासेस चालवत असत. अविरत यांनी वडिलांचे काम हाती घेतले.
अविरत अभ्यासू होतेच; त्यांचा वक्तृत्व, नाटक अशा इतर गोष्टींत देखील सहभाग असे. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण
झाल्यानंतर वडिलांनी अविरत यांना “शिकायचे असेल आणि
पैसे (पॉकेटमनी) हवे असतील तर कमावावे लागतील” असे
सांगितले, म्हणून अविरत यांनी वडिलांच्याच कोचिंग
क्लासमध्ये नोकरी सुरू केली. सुरुवात कारकुनीपासून- झाडू मारण्यापासून झाली. अविरत
म्हणतात, की म्हणूनच “मला
माणसांची व प्रत्येकाच्या कामाची किंमत समजली.” त्यांनी
तेथेच नोकरी करून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले; शिक्षण
पूर्ण झाल्यानंतर स्वेच्छेने शिकवण्यास सुरुवात केली. ते वयाच्या विसाव्या
वर्षापासून बुक किपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकवत आहेत. ते स्वत: मुलांना
शिकवता शिकवता त्यांच्यांत रमून जातात; त्यांना
स्वतःच्या अनुभवांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात.
अविरत
मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांत लिखाण करतात.
त्यांनी इंग्रजी भाषेत लिखाण जास्त केले आहे. त्यांच्या लिखाणात विशेषतः
निसर्गप्रेम, जंगल सफारीचे अनुभव हे विषय दिसून येतात.
ते जंगल सफारीला अजित देशमुख या त्यांच्या मित्राला सोबत म्हणून मार्च 2006 मध्ये
प्रथम गेले. ती काझीरंगाची सफारी होती. अजित व्यवसायाने डॉक्टर. त्यांचा वन्यजीवन
विषयातील अनुभव अविरतपेक्षा दहा वर्षांनी जास्त. अविरत त्यांच्या पहिल्या जंगल
सफारीमध्ये आलेल्या एका अनुभवाचे वर्णन करतात, “पहिलीच ट्रिप
माझ्यासाठी खूप काही शिकवणारी व साहसी अनुभव देणारी ठरली. सफारी झाल्यानंतर
जंगलातून परत निघताना रस्त्यात एके ठिकाणी हत्तींचा कळप दिसला. तो आमच्या परतीच्या
रस्त्यात होता, म्हणून त्या हत्तींना बाजूला करणे
गरजेचे होते. दुसऱ्या वाटेने जावे तर आम्हाला उशीर झाला असता. परंतु जंगलात हॉर्न
वाजवता येत नाही. म्हणून आमच्या गाईडने जीपचे दार ठोकले, गाडीला रेस दिली, तरीही हत्ती बाजूला होत
नव्हते. बहुधा कोठेतरी वाघ किंवा बिबट्या असावा म्हणून ते त्यांच्या पिल्लांना
वाचवण्यासाठी कळपात उभे होते. खूप प्रयत्न केले, तरी
हत्ती बाजूला झाले नाहीत. उलट, ते आमच्या दिशेने येऊ
लागले. मी खूपच धास्तावलो होतो. अंगावर काटा येत होता. मला माहीत नव्हते, तो ‘मॉक चार्ज’ म्हणजे
हत्तींची हूल होती. माझी धडधड वाढली, मी माझा कॅमेरा
घेऊन स्तब्ध उभा होतो. मला मित्राने काढलेले फोटो पाहूनच समाधान मानावे लागले !”
पण
त्यांना तेथूनच जंगल सफारीचे वेड लागले. त्यांनी ट्रेकिंगला सुरुवात केली. ते
ट्रेकिंगला कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत जातात. त्यांनी 2018 मध्ये एव्हरेस्ट बेस
कॅम्प (5340 मी) सर केला आहे. ते विदेशातही भ्रमंती करत असतात.
अविरत
यांनी मित्रांकडून कॅमेरा सेटिंगपासून फोटोग्राफीबद्दलच्या मूळ गोष्टी शिकून
घेतल्या. त्यांचा हातखंडा विशेषतः निसर्गातील मनमोहक दृश्ये, पक्षी
व प्राणी यांचे निरीक्षण करता करता त्यांच्या हालचाली टिपण्यात आहे. त्यांचे ‘पेट’ वाक्य “विद्यार्थी
बनण्यास तयार असाल, शिकण्यास तयार असाल तर मार्गदर्शक
किंवा शिक्षक आपसूक सापडतो.” असे आहे. अविरत यांच्या
साहसी कामगिरींमुळे त्यांची कन्या - सिया हीदेखील लहान वयातच त्यांच्यासोबत
ट्रेकिंग व अन्य सर्व गोष्टींत सहभाग घेऊ लागली आहे. अविरत व सिया यांनी 2016
मध्ये ‘स्काय डायव्हिंग’ केले.
त्यावेळी ती बारा वर्षांची होती !
त्यांनी
लॉकडाउन काळात इंस्टाग्राम लाइव्ह सेशन्स घेतली. त्यांची सुमारे दोनशेवीस लाइव्ह
सेशन्स झाली. ते त्यांत वेगवेगळ्या विषयांवर तासभर गप्पा मारत. कधी स्वतः विविध
विषयांवर माहिती देत, तर कधी त्या-त्या विषयांची तज्ज्ञ मंडळी बोलावून त्यांच्याशी संवाद साधत.
त्यांनी स्वतः सोबत इतरांना व्यस्त ठेवण्याचे, तसेच
प्रेरित करण्याचे सकारात्मक काम केले. त्यांच्या लक्षात आले, की ते त्यांचे शिक्षणवर्ग व ऑनलाइन सत्रे यांच्या आधारे लोकांना प्रेरणा
देऊ शकतात. त्यांनी तोही अभ्यासविषय व छंद बनवला आहे. त्यांना विविध
शाळा-कॉलेजांमध्ये प्रेरक भाषणे करण्यासाठी आमंत्रित केले जाते. ते काही ठिकाणी
सेमिनार घेतात. त्यांचा वसा दहा लाख लोकांना 2025 पर्यंत प्रेरित करण्याचा आहे.
अविरत
यांनी गेल्या वीस वर्षांत शेकडो विद्यार्थी जवळून पाहिले. त्यांना त्यांच्यामध्ये
क्रांतिकारी बदल होत असलेला जाणवतो. त्यांची यु ट्युब, इंस्टाग्राम
वरील भाषणे मुलांना प्रेरक वाटतात, त्यांची ‘ए टु झी - डिस्कव्हर युवरसेल्फ’ ही
तरुण मुलांसाठी असेलली यु ट्युब भाषणमालिका खूप गाजली. ही मालिका म्हणजे
अंबेजोगाईच्या शाळेसाठी मार्गदर्शन शिबिर करताना सुचलेली कल्पना होती. त्याच
धर्तीवर त्यांनी ‘ए टु झी - ट्रॅव्हल’ ही मालिका योजली आहे. मात्र त्या भाषणमालिकांमधील बोधवचनांचा मुलांच्या
जीवनावर काही परिणाम होतो का याबद्दल निर्विवाद सांगणे अवघड आहे असे ते म्हणतात.
सर्वत्र ढोंगीपणा बोकाळलेला दिसतो, उक्ती व कृती
यांमध्ये खूपच फरक असतो आणि त्याचा त्रास फार होतो असे सांगून अविरत म्हणतात, की मला जी गोष्ट आचरता येत नाही त्याबद्दल मी बोलत नाही. मी ज्या दिवशी
ठाण्याला हिरानंदानी वसाहतीत राहण्यास गेलो, घरात एसी
बसवला त्या दिवसापासून पर्यावरणाबद्दल बोलणे टाळले. कारण जंगल नष्ट करून आम्ही
माणसे तेथे राहण्यास गेलो आहोत याची बोच मला लागते. मला मी पर्यावरणाबद्दल बोलणे
ही प्रतारणा वाटते. मात्र तरीदेखील निसर्ग, भ्रमंती हे
माझे आवडते विषय आहेत व मी त्याबद्दल बोलत असतो.
त्यांना
अन्नाची नासाडी मुळीच आवडत नाही. ते, त्यांचे धाकटे भाऊ व
कुटुंब जव्हार, मोखाडा येथील आदिवासी पाड्यांमध्ये
विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम करत असतात. त्यांनी परळच्या टाटा रुग्णालयास
साडेचार हजार युनिट रक्त गेल्या वीस वर्षांत मिळवून दिले आहे. त्यांची काही
जीवनसूत्रे आहेत -
1. माणसाने जगावे असे, की
लोकांना त्याच्याकडे बघून स्फूर्ती मिळेल. कोणताही खडतर प्रसंग आला तर न डगमगता
त्याला सामोरे जावे. जीवन संपवणे हा उपाय नसतो. घडलेला प्रसंग सगळ्यात वाईट होता
तर त्यापेक्षा वाईट काय असू शकेल असा विचार करत पुढे वाटचाल करावी.
2. फोटोग्राफी करणाऱ्या
तरुणांनी फोटो काढताना नैतिकतेने वागावे. कोणाही व्यक्तीचे न विचारता फोटो काढू
नयेत. फोटो काढताना फोटोग्राफरच्या मनात आधी एक चित्र ठरलेले असले पाहिजे, मगच
फोटो काढावा.
3. पुस्तकात शिकता येत नाही
तितके शिक्षण प्रवास माणसाला देतो. मनुष्याला प्रवास गरजेचा आहे. पर्यटन किंवा
भ्रमंती करताना तारांकित हॉटेलांमध्ये न राहता स्थानिक लोकांच्या घरांमध्ये
त्यांच्या परवानगीने राहवे, जेणेकरून त्यांच्या चालीरीती, परंपरा यांचा
अंदाज येतो. ज्ञानात भर पडते.
अविरत शेटे 9820284208 aviratshete@gmail.com
- लीना
शरद देशमुख 7218415451 leenadeshmukh08@gmail.com
लीना शरद देशमुख या कल्याणजवळील म्हारळ गावी राहतात. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली असून त्या पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्या 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून लेखन करतात. त्यांना लेखनाची व वाचनाची आवड आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
फार सुंदर माहिती👌
उत्तर द्याहटवा