भावचिन्हे म्हणजे आधुनिक भाषेत ‘इमोजी’. म्हणजेच जगातील तमाम लोक मोबाईलवर दिवसरात्र फेकत असलेले अंगठे, हसरे-रडवे चेहरे, फुले, बदामी हृदये, फुलपाखरू, मोर आणि सूर्य, चंद्र, तारे... काय म्हणाल ते ! जिकडे पाहवे तिकडे ती चिन्हे सध्या जो जोरदार ‘भाव’ व्यक्त करत आहेत त्यामुळे त्यांचा आणि वापरणाऱ्यांचा ‘भाव’ भलताच वाढला आहे ! जसे लेखनात विरामचिन्हे असल्याशिवाय अर्थबोध होत नाही तसे संदेशामध्ये भावचिन्हे असल्याशिवाय ‘भावनाबोध’ होणार नाही अशी संदेश लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची धारणा आहे.
भावचिन्हांचा अर्थ हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यांची त्यांच्या त्यांच्या वर्तुळातील परिभाषा जमून गेली आहे. आनंदी-दु:खी चेहरे किंवा टाळ्या, अंगठा अशा काही चिरपरिचित चिन्हांशिवाय इतर अनेक चिन्हांचा अर्थ जो ते ज्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे लावून घेताना दिसतात. प्रतिक्रिया देण्यासाठी एखाद्याचा अंगठा सारखा पुढे येतो तर कोणीतरी नेहमी हसऱ्या चेहऱ्याने वावरत असते. कोणी सारख्या टाळ्या तर कोणी फुले. जर का चुकून कोणी ही चिन्हे तयार करणाऱ्यांनी कोणत्या अर्थाने ती तयार केली आहेत हे पाहिले तर अगदी हसून मुरकुंडी वळेल. उदाहरणार्थ, डोळे झाकलेले माकड हे लाजण्याचे चिन्ह नसून गांधीजींचे ‘बुरा मत देखो’वाले माकड आहे. डोक्यावर गोल वर्तुळ असलेला चेहरा चक्रावला किंवा आश्चर्यात बुडालेला नसून तो स्वत: निरागस देवदूत असल्याचे सांगतो. हसऱ्या चेहऱ्यांचे अर्थ नाना प्रकारचे आहेत.
एक चित्र हजार वाक्यांपेक्षा जास्त बोलके असते, म्हणतात. त्याचप्रमाणे ही भावचिन्हे संदेशामध्ये भावना मिसळून व्यक्तीच्या भावना जोरकसपणे इतरांपर्यंत पोचवत आहेत. नीरस होऊ शकणाऱ्या लेखी संवादामध्येही प्रत्यक्ष भेटीतील संवादाप्रमाणे चेहऱ्यावरील हावभाव, शब्दांमधील चढउतार दाखवून जिवंतपणा आणत आहेत. जे लांबलचक वाक्यांनी सांगता येणार नाही ते एखाद्याच समर्पक भावचिन्हाने कळवत आहेत. अगदी ‘शब्देविण संवादु’. त्याचवेळी, वेळप्रसंगी, साजेसे ‘खोटं’ भावचिन्ह धाडून खऱ्या भावना लपवायलाही मदत करत आहेत, पण जेथे चेहरेही मुखवटे घालतात तेथे भावचिन्हाने मुखवटा घालणे हे अगदीच क्षम्य !
इमोजी
किंवा भावचिन्हांचा उगम जपानमध्ये 1998 मध्ये झाला असला तरी त्यांचा वापर 2010
पासून वाढत गेला. ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘हसून डोळ्यांतून पाणी काढणाऱ्या’ भावचिन्हाला ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून 2015 मध्ये घोषित केले आणि
भावचिन्हांची ताकद जगासमोर आली. ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ती चिन्हे बदलता
काळ, संस्कृती, वर्णभेद, स्त्रीपुरुष-समानता, कुटुंबव्यवस्था
अशा अनेक मुद्यांची दखल घेत कालानुरूप पालटत आहेत. भविष्यात कदाचित ती स्वतंत्र
भावचिन्ह भाषेइतकीही परिपूर्ण होऊ शकतील ! तशी चिन्हे दिसत आहेत.
वैशाली कार्लेकर या पुण्याच्या नितीन प्रकाशन संस्थेत मुख्य संपादक आहेत. मराठी भाषा व व्याकरण हा त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यांचे शिक्षण एम ए दोनदा (मराठी व इतिहास विषय घेऊन) व बीसीजे ही पत्रकारितेतील पदवी असे झाले आहे. त्या ‘मराठी अभ्यास परिषदे’च्या कोषाध्यक्ष आहेत. त्यांच्या बालकथांच्या चौदा पुस्तिका प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांच्या व्याकरणविषयक चित्रफिती प्रसृत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
छान लेख.
उत्तर द्याहटवा