मुंबई येथे भरलेल्या तेविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. विज्ञाननिष्ठ, प्रखर बुद्धिवादी आणि तरीही कविहृदयाचे ते प्रचंड ताकदीचे लेखक. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केले. श्रेष्ठ दर्ज्याचा, मने पेटवून उठवणारा वक्ता आणि अग्निवर्षावासारखे लेखन करणारा साहित्यिक अशी त्यांची ख्याती. मात्र त्यांना अध्यक्षीय निवडणूक लढवून ते पद जिंकावे लागले. त्यांचे प्रतिस्पर्धी होते रियासतकार गो.स. सरदेसाई.
सावरकर यांचे मूळ घराणे गुहाघरचे. तेथून त्यांचे पूर्वज नासिकजवळच्या भगूर गावी स्थायिक झाले. तेथेच सावरकर यांचा जन्म झाला. सावरकर यांचे थोरले बंधू गणेश दामोदर हेसुद्धा ‘काळ्या पाण्या’वर गेले होते. त्यांचे धाकटे बंधू बाबाराव सावरकर हे स्वातंत्र्यवीरांबरोबर चळवळीत सामील झाले होते. ते तिन्ही बंधू भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले.
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. त्यांचे बी ए आणि लंडन येथे बार -अॅट -लॉ म्हणजेच बॅरिस्टर असे शिक्षण झाले. सावरकर यांचा विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासून वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ असा साहित्याचा समावेश होता. त्यांचा संस्कृत साहित्याचाही अभ्यास चांगला होता. त्यांना विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भान येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि त्यांनी लहान वयापासून उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते.
त्यांनी प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी ह्या हेतूने जानेवारी 1900 मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. ‘मित्रमेळ्याचे’ काम करत असताना सावरकर यांचे लेख, कविता असे साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि ते प्रभावीही ठरत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा कार्यक्रम पार पाडला होता. परिणामतः त्यांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. ते शिष्यवृत्ती घेऊन लंडनला शिकण्यास गेले. तेथेही ते क्रांतिकारकांच्या चळवळीत सामील झाले.
‘मित्रमेळ्या’मध्ये त्यांच्या भोवती जे अनेक निष्ठावंत तरुण जमले त्यांत कवी गोविंद ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमांना कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकर यांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे, 1904 मध्ये त्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून जोसेफ मॅझिनी ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याच प्रमाणे सावरकर यांना आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही आकर्षण होते. सावरकर यांना गनिमी काव्याचे धोरण, सैन्यात व पोलिसात गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे, रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे, इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे, शस्त्रास्त्रे साठवणे इत्यादी मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे असे मार्ग उचित वाटत होते.
सावरकर यांना अंदमानामधून हिंदुस्थानात 1921 मध्ये आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी - मराठी अनुवाद, 1925) आणि माझी जन्मठेप (1927) हे ग्रंथ लिहिले. अंदमानात असताना सावरकर यांनी ग्रंथालय उभे केले होते. रत्नागिरी येथेही त्यांनी सरकारकडे प्रयत्न करून ग्रंथालय उभारले. सावरकर यांची 1924 मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली : 1. रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्घ म्हणून राहतील, 2. पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत. सावरकर जवळपास साडेतेरा वर्षे रत्नागिरीत होते. त्यांनी त्या काळात अस्पृश्यतानिवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, भाषाशुद्घी आणि लिपीशुद्घी ह्या चळवळी केल्या.
त्यांनी मॅझिनीचे चरित्र, माझी जन्मठेप, कमला हे दीर्घकाव्य, गोमंतक, क्षकिरणे अशी काही पुस्तके लिहिली. त्यांना ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले (1934) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे.
सावरकर यांच्यासारखा जिवंत आणि ज्वलंत लेखन करणारा क्रांतिकारक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पुन्हा झाला नाही. ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की "सरस्वतीचा एक उपासक या नात्याने मी तुम्हास सांगतो की आपल्या तरुण पिढीने आता लेखणी मोडून टाकावी आणि बंदूक उचलावी. साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक."
ते 1943 मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी लिट् ही सन्माननीय पदवी देण्यात आली. त्यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी मुंबईत झाला. त्यांनी बावीस दिवसांच्या खडतर प्रायोपवेशनाने स्वेच्छेने मरणाला मिठी मारली.
- वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या