अभिनेते रमेश भाटकर आणि ज्योती निसळ |
‘झाडीपट्टी रंगभूमी’ नावाची एक अनोखी रंगभूमी आहे असे ऐकले होते- वाचलेही होते. त्यामुळे उत्सुकता होती, की ती रंगभूमी कशी आहे ते बघावे. कारण प्रायोगिक रंगभूमी, हौशी रंगभूमी, समांतर रंगभूमी, बाल रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी हे प्रकार मला माहीत होते. व्यावसायिक रंगभूमीवर तर मी काम करत होते. पण ‘झाडीपट्टी रंगभूमी’चे वास्तव मुंबईत राहून कळणे अशक्य होते. ते तिकडे झाडेपट्टीत जाऊनच बघण्यास हवे होते. तसा योग आला, अगदी अचानक. मी ‘महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धे’साठी कोपरगावला परीक्षक असताना माझे सहपरीक्षक दीप चाहंदे यांनी ‘झाडीपट्टी रंगभूमी’वरील नाटकांविषयी मला बरेच काही सांगितले आणि म्हणाले, “मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष बघून जास्त चांगला अनुभव घेऊ शकाल. तुम्ही ‘वात्रट मेले’ नाटकाचे सोळाशे प्रयोग केलेत ना... मग या, आमचे झाडीपट्टीतील नाटक बघायला.” चाहंदे यांनीच तो विषय पुढे नेला. मी झाडीपट्टी रंगभूमीवर काम करण्यास सज्ज झाले. माझ्याबरोबर ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर होते. ही गोष्ट 2010 सालची.
झाडीपट्टी रंगभूमी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया येथे कार्यरत आहे. पूर्व विदर्भातील तो भाग घनदाट अशा निबिड अरण्याचा म्हणूनच ‘झाडीपट्टी’ हे नाव पडले. तेथे सादर होणारे नाटक म्हणजे ‘झाडीपट्टी नाटक’. वडसा नावाच्या छोट्याशा गावात चाळीसच्यावर नाट्यसंस्था आहेत. मी नाट्यव्यवसायातील एवढी मोठी उलाढाल पहिल्यांदाच बघितली. धान-कापणीच्या हंगामात मंड्यांच्या बाजारास सुरुवात होते. मंड्यांचा सीझन संक्रांत-होळीच्या आधी असतो आणि संक्रांतीनंतर शंकरपटाचे शर्यतीचे कार्यक्रम होतात. ज्या गावात मंडई असते त्या गावात बहुतेक सगळ्यांच्या घरी पाहुणे आलेले असतात. त्या गाठीभेटीतून लग्ने ठरतात आणि त्याच वेळी, पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी नाटकेही ठेवली जातात. बैलांच्या शर्यती जेव्हा गावात होतात तेव्हाही नाटकांचे आयोजन केले जाते. नाटकाचा दिवस हा सणाचा दिवस समजला जातो.
झाडीपट्टी नाट्यचळवळीचा सुवर्णकाळ 1930 ते 1962 हा होता. त्यावेळी मालगुजार; तसेच, सधन शेतकऱ्यांमार्फत नाटकांचे खास आयोजन केले जाई. झाडीपट्टीच्या शास्त्रोक्त नाटकांना उतरती कळा 1995 नंतर लागली, पण ‘झाडीपट्टी रंगभूमी’ नव्या दमाने, नव्या जोमाने 2002 नंतर फुलारून आली.
मी व रमेश भाटकर फ्लाईटने नागपूरला, तेथून कारने पुढे वडसा या गावी गेलो. ‘जय दुर्गा नाट्य रंगभूमी’चे मालक उ.मा. शेंडे हे आमचे यजमान होते. त्यांनी विमानाने येणे-जाणे प्रवास, ‘ब्रह्मपुरी’ला एका हॉटेलमध्ये राहण्याचा-खाण्यापिण्याचा खर्च केला. तेथे आम्हाला कुलदीप पवारही भेटले. कुलदीप पवार आमच्या नाटकात असणार नव्हते. ते दुसऱ्या नाट्यसंस्थेत काम करण्यासाठी आले होते. आम्ही दुपारनंतर शेंडेसरांच्या ‘जय दुर्गा नाट्यरंगभूमी’ ह्या प्रेसमध्ये गेलो. तेथील भाषेत ‘प्रेस’ म्हणजे नाट्यसंस्था आणि नाट्यसंस्थेचे ऑफिस म्हणजे दुकान.
शेंडे यांनी आमची ओळख तेथील कलाकारांशी करून दिली. त्यांचे भाबडे, निरागस चेहरे उत्सुक डोळ्यांनी आमच्याकडे पाहत होते. किर्ती नावाची एक मुलगी आम्हाला म्हणाली, “आमाले तर वाटलं तुमी आमच्यासी बोलनारच न्हाय.” माझा प्रतिप्रश्न तिला- “तुला असं का वाटलं?” ती लगेच म्हणाली, “बाप्पा! मुंबईचे कलाकार म्हंजी लय मोटे कलाकार... आन् मागच्या येडचे कलाकार तर आमच्यासी बलत बी नव्हते.” रमेश भाटकर यांनी त्यांना आश्वासन दिले- “तुम्ही-आम्ही सगळे कलाकार. आपण मिळून काम करू या.”
सगळे कलाकार खुशीने तरारल्यासारखे वाटले. अश्विनी नावाच्या एका मुलीने माझ्याजवळ म्हणण्यापेक्षा अगदी कानाशी येऊन मला विचारले, “मॅडम, तुमी कुठं राह्यता?” मी म्हटले, “मुंबईला.” “न्हाय, इथं कुठं राह्यता?” मी म्हटले, “ब्रह्मपुरी हॉटेलमध्ये,” ते ऐकल्यावर तिच्यासकट सगळ्याच मुलींनी ‘आSSS बया’ करून मोठ्ठा ‘आ’च वासला. मी आश्चर्यचकित होऊन विचारले, “काय झालं?” अश्विनी म्हणाली, “मॅडम, आमच्याकडं होटेलमंदी राह्यनं चांगलं न्हाय समजत. वंगाळ समजत्यात. घरंदाज बायका होटेलमंदी न्हाय ऱ्हात.” “...असं होय!” मी संदिग्ध. तरीही त्या माझ्याभोवती घोटाळतच होत्या. मी म्हटले, “तुम्हाला अजून काही हवंय का?” दुसरी मुलगी हळूच मला म्हणाली, “मॅडम, आम्ही होटल भायरून बगितलं हाय. पन आतून कसं असते ते बगायचं हाय.” मी त्यांना लगेच सांगितले- “ठीक आहे, आपण बघू कसं जमतं ते.” तीच मुलगी परत म्हणाली, “पन मॅडम कुनाला म्हाईत नगं व्हायला.” मी म्हटले, “नाही माहीत होणार कोणाला.” आमचे संभाषण किंबहुना कुजबूज चालू असताना शेंडेसरांनी आवाज दिला, “चला, थोडं वाचू या का?” आणि आम्ही सगळ्यांनी संहिता वाचण्यास सुरुवात केली.
प्रत्यक्ष नाटकाच्या वेळी बघितले तर एखाद्या जत्रेचे वा मेळाव्याचे स्वरूप होते ! हजारो लोक - बायकापुरूष, लहान मुले, म्हातारे - सगळे नाटक बघण्यास आले होते. नाटकाच्या ठिकाणी लग्नासारखा मोठा मंडप होता. खुर्च्यांचे, गादीचे, दरीचे (सतरंजीचे)... वेगवेगळे तिकिट दर होते. आमदार, खासदार, कधी मंत्री, जिल्हापरिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, तहसीलदार, बी.डी.ओ., डेप्युटी कलेक्टर, प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक असे वेगवेगळे नामवंत लोक नाटकाच्या उद्घाटनाला येतात. त्यांचे स्वागत हारतुऱ्यांनी केले जाते. मग आभार प्रदर्शन होते. उद्घाटन सोहळ्यात सगळ्या पक्षांचे लोक व्यासपीठावर एकत्र बसलेले असतात. एकतेचे व समतेचे सुंदर दर्शन !
उद्घाटनानंतर रेकॉर्डिंग डान्स तर असतोच. ‘ज्याच्यापाशी गाडी बंगला’, ‘कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ ही तेथील प्रेक्षकांची खास आवडती गाणी. रेकॉर्डिंग डान्सनंतर नांदी व्हायची. ‘मोरेश्वर तू... गौरीवंदना... वंदन तुजला नटेश्वरा’ या नांदीने सगळे वातावरण पवित्र होऊन जाई आणि पावित्र्याच्या सुगंधाने भारलेल्या त्या वातावरणात नाटकाला सुरुवात होई. प्रत्येक अंकानंतर डान्स आणि गाणे होई. नाटक तीन अंकी असायचे. संगीत म्हणजे नाटकाचा प्राण. प्रत्यक्ष गायन आणि वादन ही नाटकाची खासियत. जवळजवळ साठ टक्के कलाकार गाणी म्हणतात. मला तर कधी कधी एवढे आश्चर्य वाटे- एवढं जागरण केल्यानंतर एवढ्या थंडीत त्यांचा आवाज लागतो तरी कसा! चांगले गाणे वा डान्स झाला, की प्रेक्षक खुश होऊन त्यांना पैसे देत. त्याची घोषणाही होत असे- ह्यांच्याकडून इतके, त्यांच्याकडून तितके वगैरे. नाटकांना नव्या काळात व्यावसायिक रूप आले आहे. म्हणून त्यात लावणी, कॉमेडी सीन्स व रेकॉर्ड डान्स यांचा समावेश करण्यात आला आहे. अर्थात, स्थित्यंतर वा बदल हे नवनवीन प्रयोगांतून नाटकाला गर्दी व्हावी म्हणून होत असतात. प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरूचीप्रमाणे नाटकांत ते बदल केले जाताना दिसतात. झाडीपट्टीच्या प्रत्येक नाटकात मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन पेरलेले असते आणि विषयही अनेकविध असतात. दारू, व्यसन, पैशांचा हव्यास, स्त्रीवरील अत्याचार, अन्याय, नातेसंबंध, प्रेम, माणुसकी, मैत्री, देशभक्ती, समाजाप्रती बांधिलकी, नागरिकांचे कर्तव्य, दहशतवाद वगैरे वगैरे. ल.कृ. आयरे, गणेश हिर्लेकर, कमलाकर बोरकर, आप्पासाहेब आचरेकर, के.डी. पाटील, हरिश्चंद्र बोरकर, रामू दोनाडकर, राजेंद्र बनसोड, सिद्धार्थ खोब्रागडे, बाबुराव मेश्राम या व अशा, अनेक जुन्यानव्या लेखकांनी झाडीपट्टी रंगभूमीसाठी लेखन केलेले आहे.
मातीचा रंगमंच, त्यावर दरी (सतरंजी) टाकलेली. क्वचित दोन माईक, पण बहुतेक वेळा एकच माईक. त्या माईकची गंमत तर मी पहिल्याच दिवशी अनुभवली. आमचे ‘पाझर’ नावाचे नाटक होते. मी आणि माझा (नाटकातील) नवरा असा दोघांचा एक सीन होता. मी संवाद म्हटले आणि माईक खाली खाली जाऊ लागला. मला वाटले, माईक पडतोय की काय? त्याचे कनेक्शन कोठेतरी सैल झाले असावे. मी माईक सावरण्याचा प्रयत्न करायच्या आत माईक खाली गेला आणि माझ्या ‘नवऱ्या’ने माईकसमोर बोलण्यास सुरुवात केली. माझा हात तेथेच ओठंगला. दुसऱ्याच क्षणी, तो माईक सरसर माझ्या तोंडासमोर आला आणि मी पुढील संवाद म्हणण्यास सुरुवात केली. माईक पात्रांच्या शरीरप्रकृतीनुसार दोलायमान होत असतो. ते अनुभवताना खूपच गंमत वाटली.
मी माईकची अजून एक गंमत अनुभवली. नाटकात जो कलाकार माईकसमोर असतो तो माईक सोडतच नाही आणि अगदी तोंडाजवळ माईक नेऊन बोलतो. त्यांना आम्ही सांगितले, “अरे, सगळ्यांचेच आवाज प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवेत, म्हणून तुमचं वाक्य झालं की किंचित बाजूला व्हायचं. म्हणजे दुसरा बोलेल, तेव्हा थोडंसं दुरूनही माईक आवाज पकडतो.” काहींना ते पटलं. पण एकजण तर माईक खूपच तोंडाजवळ घेऊन बोलायचा. मग एकदा रमेश भाटकर यांनी त्याला विचारले, “आज तू काही खाल्लं नाहीस का?” तो म्हणाला, “खाल्लं ना काकाजी! असं काऊन इचारता?” रमेश भाटकर यांना सगळे काकाजी म्हणायचे आणि मला मॅडम. रमेश भाटकर त्यावर उत्तरले, “नाही, मला वाटलं, आता तू माईक खाणार आहेस की काय?” त्यावर परत तो कलाकार निरागसपणे म्हणाला, “मले न्हाय कडलं,” त्यावर रमेश भाटकर म्हणाले, “अरे, माईकमध्ये किती तोंड घालून बोलतोस! म्हणून म्हटलं.” तो उत्तरला, “असं व्हंय!” बहुतेक कलाकारांना ते हळूहळू पटले.
एक मुलगी बोलताना सतत येरझाऱ्या घालायची. रमेश भाटकर यांनी तिला विचारले, “तुझ्या पायांना चाकं आहेत का?” तिचा चेहरा प्रश्नार्थक- “म्हंजी काय?” मग त्यांनी तिला सांगितले, “तू बोलताना सारख्या येरझाऱ्या मारतेस. म्हणजे सगळ्या कलाकारांना कव्हर करतेस.” तिचा चेहरा निर्विकार. परत ती म्हणाली, “म्हंजी?” रमेश भाटकर यांनी तिला समजावले, “अगं, तुझा चेहरा लोकांना दिसतो तसा बाकीच्यांचाही दिसायला हवा की नको?” ती म्हणाली, “व्हय.” भाटकर म्हणाले, “मग तू त्यांच्या समोरून अशी चकरा मारत राहिलीस की ते झाकले जातात ना! म्हणून स्वत:च्या जागेवरून वाक्यं म्हणायची. अगदी गरज असेल, तरच जागा सोडायची. कळलं का?” तेव्हा कोठे तिचे समाधान झाल्यासारखे दिसले आणि ती हसतच म्हणाली, “आत्ता मले कडलं.”
झाडीपट्टी नाटकांत संवाद म्हणण्याची पद्धत वेगळीच आहे. मुलगा ‘मी सांगते, करते, म्हनते’ असे म्हणतात तर मुली मात्र ‘सांगतो, करतो, म्हनतो’ असे म्हणतात. त्यांचे उच्चार ऐकून पहिल्या पहिल्यांदा कान बिचकायचे, गोंधळण्यास व्हायचे. पण हळू हळू सवय झाली- आमच्या कानांना आणि आम्हालाही. पण तरीही आम्ही शब्दांचे व्याकरण, बोलण्याच्या लिंगाचे गणित त्यांच्या माथी मारतच राहिलो. काहींना ‘कडलं’, काहींना ‘नाही कडलं’. ते ‘ळ’ला ‘ड’ म्हणायचे. त्यांची बोलीभाषा वेगळी होती. पण ती कानाला मात्र गोड वाटे. त्यांच्या भाषेतून एक अनामिक निर्मळपणा निथळत राही.
झाडीपट्टी नाटकाचा उल्लेख ‘पडद्याचं नाटक’ असाही काही जणांकडून केला जातो. बहुतेक नाटकांत सेट्स् पडद्याचे असतात. काही संस्थांच्या नाटकांत बॉक्स सेट्स् व जास्त माईक असतात आजकाल, असेही मी ऐकले आहे. मेकअप रूमसुद्धा पडद्याच्या असतात. प्रत्येक स्त्री कलाकारासाठी एकेक गादी व एकेक लाईट असतो. पुरूषांचा मेकअप करण्यास मेकअपमन असतो. पण स्त्री कलाकाराने स्वतःचा मेकअप स्वतः करायचा. त्यांना स्वतःलाच मेक-अपचे सामान आणावे लागते. कलाकारांना स्वतःला नाटकात वापरण्याचे कपडेही आणावे लागतात. काही विशिष्ट ड्रेस असेल तरच- म्हणजे डॉक्टर, नर्स, पोलिस, वकील, आतंकवादी... तर ते ड्रेस निर्माता पुरवतो. 1960 सालापर्यंत स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करत. तेव्हा नाट्यप्रयोगाला तिकिट नसे. प्रेक्षकच खुशीने पैसे देत. परंतु नाटकात स्त्रिया काम करू लागल्या आणि त्यांना मानधन द्यावे लागले. आणि नाटकाच्या इतर खर्चांचे बजेटही वाढू लागले. त्यामुळे नाटकांना तिकिट लावणे भाग पडले.
झाडीपट्टी नाटकांमध्ये हिरोपेक्षा व्हिलनला जास्त महत्त्व असते. नाटकातील व्हिलन हा तगडाच हवा अशी प्रेक्षकांची मानसिकता आहे. मीही ‘पाझर’ या नाटकात खलनायिकेची भूमिका केली. त्याचप्रमाणे नटनट्यांचा अभिनय आणि मेकअप, दोन्ही त्यांना भडकच हवेत. त्यांना त्याबद्दल विचारले, तर म्हणतात, “मग तुमच्यात आणि साध्या माणसांत फरक काय राहणार?” पहिल्यांदा तो भडक मेकअप करून आरशात बघितले की रंग फासल्यासारखे वाटे. लाऊड अभिनय करण्यास गेले, की खूप ऑड वाटे, पण हळूहळू प्रेक्षकांच्या प्रतिसादाने त्या गोष्टींची सवय झाली. तेथील कलाकारांचा अभिनय भडक; तसाच, मेकअपही भडक असतो. तेथील माहोल हा कडक थंडीचा असतो. तेथे बंदिस्त नाट्यगृहे नसतात. त्यामुळे त्या वातावरणातील प्रेक्षक, दिग्दर्शक, कलाकार यांची तशी भडकपणाची मुळी अपेक्षाच असते.
बऱ्याचदा दिग्दर्शन हे ढोबळ पद्धतीने केले जाते. आकृतिबंधापेक्षा संवादावर जास्त भर दिला गेलेला आढळतो. एखादा महत्त्वाचा सीन हायलाइट करायचा असेल तर त्याला लाऊड म्युझिक द्यायचे ही तेथील प्रथा आहे. तरीही काही नाटकांतून दिग्दर्शकाची परिपक्वता प्रत्ययाला येते. संपूर्ण नाटक प्रॉम्प्टिंगवर चालते. त्यामुळे वाक्याला ‘टचिंग’ हे हवेच, हा तेथील समज आहे आणि त्यामुळेच कोठलाही नट-नटी कोठल्याही क्षणी कोठल्याही भूमिकेसाठी कधीही उभे राहतात. म्हणजे अगदी आयत्या वेळीसुद्धा काम करतात- कितीही मोठ्या लांबीची भूमिका असली तरी. पण ते दक्षता मात्र कमालीची बाळगतात. प्रॉम्प्टर विंगमध्ये बाजूला उभा आहे की नाही हे बघतात आणि मगच रंगमंचावर एण्ट्री घेतात. कलाकाराला प्रॉम्प्टर संवादाच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात आधी करून देतो त्याला टचिंग म्हणतात. प्रॉम्प्टरचे वाक्य आधी प्रेक्षकांना ऐकण्यास येते व नंतर कलाकाराचे. प्रॉम्प्टर प्रेक्षकांना दिसणार नाही, पण कलाकाराला मात्र दिसेल अशा ठिकाणी उभा असतो. काही ठिकाणी नाटकाचा सेट छोटा असेल तर प्रॉम्प्टर कलाकारालाही दिसू शकत नाही. मात्र तो कलाकाराला ऐकू जाईल अशा ठिकाणी पडद्यामागे उभा राहतो. मी आणि रमेश भाटकर यांनी सांगितले, की आम्हाला व्यावसायिक नाटकात प्रॉम्प्टिंग घेण्याची सवय नाही. उलट, आम्ही प्रॉम्प्टिंगमुळे डिस्टर्ब होऊ. त्यांचा भाबडा प्रश्न- तुम्ही चुकलात तर? आमचा आत्मविश्वास... नाही चुकणार. पण प्रॉम्प्टरचा अविश्वास त्याच्या डोळ्यांतून पाझरत होता. मग आम्ही त्याच्या समाधानासाठी सांगितले, तुम्ही नाटक वाचत राहा- अर्थात मनात- आमच्या संवादानुरूप आणि आम्ही चुकलोच तर आम्हाला फक्त टचिंग द्या. मग त्याने समाधानाचा सुस्कारा सोडला.
रंगमंचावर जाण्यास पायऱ्या म्हणून मातीची पोती टाकलेली असायची; नाहीतर मातीचा उतार असायचा. आम्हाला म्हणावे लागे, “अरे बाबा, आम्हाला स्टेजवर चढण्यास हात द्या, नाहीतर त्यावर पाय घसरतील.” क्वचित कधीतरी लोखंडी शिडी नाहीतर लाकडी शिडी असे. तेथील कडाक्याच्या थंडीमुळे सगळेच कलाकार अंगात स्वेटर, अंगावर शाल वा ब्लँकेट पांघरलेले, हातमोजे-पायमोजे घातलेले, माकडटोपी वा कानटोपी परिधान केलेले असत. पण रंगमंचावर एण्ट्री करताना मात्र थंडीचा तो सगळा लवाजमा उतरवून ठेवत. बऱ्याचदा, थंडी असह्य झाली तर शेकोटी पेटवून त्याभोवती सगळे बसत. तो एक आगळावेगळा अनुभव होता! साधारण पहाटे साडेतीन-साडेचार वाजता दव पडे. तेही अल्प पावसाच्या रूपाने. बसण्यासही बऱ्याचदा जागा नसे. तेथील एक प्रसिद्ध गाणे, ‘ओला ओला झालो मी’ नकळत आमच्याही तोंडातून निघे.
नाटकाचे प्रयोग सुरू झाले. आम्ही तेथील सगळ्या अडचणींवर त्या सर्वांच्या सहाय्याने मात करत गेलो. नाटकाचे प्रयोगही उत्तरोत्तर रंगू लागले. मुलींची पण ‘आम्हाले होटल बगायचे’ ही भुणभुण कानाशी चालू होतीच. मी एकदा त्यांना म्हटले, “उद्या आपला प्रयोग नाही ना? मग या उद्या हॉटेलवर.” त्या लगेच म्हणाल्या, “पन तुमी कोनाले सांगनार न्हाय ना?” मी त्यांना तसे वचन दिले. त्या दुसऱ्या दिवशी, दुपारी दोन वाजता हॉटेलमध्ये आल्या. त्याही ‘वडसा’वरून ‘ब्रह्मपुरी’स बसने- स्वतःचे पैसे खर्च करून. मुलींना बघून हॉटेल मालकाला आश्चर्यच वाटले. तेथील मुली हॉटेलांमध्ये येत नाहीत, मग ह्या कशा काय आल्या? असा त्याचा भाव. हॉटेल मालकाने त्या मुलींना त्याबद्दल विचारले. त्या मुली माझे व रमेश भाटकर यांचे नाव साफ विसरल्या होत्या. त्यांनी ‘आमाले त्या नाटकवाल्या मॅडमले व काकाजीले भेटायचं हाय’ असे सांगितले. हॉटेल मालकाने हॉटेलमधील एका मुलाला सांगितले आणि त्या माझ्या रूममध्ये पोचल्या. बरोबर जेवणाचे दोन डबे होते. काकाजींसाठी चिकन-चपाती-भात आणि माझ्यासाठी वांगी-बटाट्याची रस्सेदार भाजी. मला तर भरूनच आले ! म्हटले, “कशाला एवढा त्रास घेतलात?” तर म्हणाल्या, “बाप्पा; पयल्यांदाच येतो न्हवं तुमच्या घरला!” थोड्याच वेळात रमेश भाटकरही तेथे आले. त्यांनाही ते आदरातिथ्य बघून गलबलून आले. मीही त्यांच्यासाठी बिर्याणी व समोसे मागवले. आमची अंगतपंगत छान झाली. जात-पात, धर्म, गरीब-श्रीमंत, मोठा कलाकार-छोटा कलाकार... सगळी बंधने गळून पडली होती.
थोड्या वेळाने एका मुलीने मला सांगितले, “मॅडम, मले ‘हागाले’ जायचंय.” दुसऱ्या मुलीने लगेच तिला चिमटा काढला. म्हणाली, “ए बैताड! असं वंगाळ बोलू नगं.” तिने लगेच चुकीची दुरूस्ती केली. म्हणाली, “मले दोन नंबरले जायाचं हाय.” मी तिला ‘वॉशरूम’ दाखवले. ती आत गेली, लगेच बाहेर आली. म्हणाली, “कुठं बसू? समदंच चकाचक हाय.” कारण कमोडवर बसण्याचीसुद्धा तिला भीती वाटत होती. मी तिला प्रॅक्टिकल करून दाखवले. खरे तर, तो प्रसंग कोणाला सांगण्यासारखा नाही. पण एकविसाव्या शतकातसुद्धा अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाहीत याचे कोठेतरी वाईट वाटते. ती मुलगी बाहेर आली आणि तिने कमोडची आख्खी कहाणी इत्थंभूत- म्हणजे अगदी शौच कमोडमध्ये पडताना कसा ‘डुबुक’ आवाज येतो येथपर्यंत वर्णन करून सगळ्यांना सांगितली. सगळ्या जणी फिदीफिदी हसू लागल्या, तेवढेच नव्हे तर सगळ्या जणी एकामागून एक वॉशरूममध्ये जाऊन आल्या. वॉशरूममध्ये ‘कमोड’ बघितल्यानंतर एक नवीन आविष्कार बघितल्याचा वा अनुभवल्याचा काय आनंद त्यांना झाला होता! वास्तविक, हे ब्रह्मपुरीतील हॉटेल साधेच होते, पण स्वच्छ व नीटनेटके. मात्र त्या मुलींना (त्यांनी कधी असे पाहिलेच नसल्यामुळे) ते भारीच स्वच्छ चकचकीत वाटले. एक जण मला म्हणाली, “मॅडम, लई मज्जा हाय तुमची... नुसतं खायचं, प्यायचं, झोपायचं आन् नाटक वाजवायले जायचं!” तोपर्यंत मला कळलं होतं, नाटक ‘वाजवायले’ म्हणजे नाटक करण्यास जायचे.
आमचा संबंध मुलांपेक्षा मुलींबरोबर जास्त येई. कारण आम्ही सगळ्याजणी, रमेश भाटकर आणि आमचा मॅनेजर देवा हे एकाच जीपमधून नाटकाला जात व येत असू. नाटकावरून परत येताना कधी रमेश भाटकर तर कधी मी त्यांना चणे-पोहे-भजी खाण्यास देत असू, चहा पाजत असू. त्यामुळे नंतर त्या मुलीच आवाज द्यायच्या, “अवो मॅडम, अवो काकाजी, गाव आलं तुमचं... भजी चारा नं किंवा चणे-पोहे चारा नं, च्या पाजा नं!” पहाटे पहाटे थंडीत कुडकुडत चणे-पोहे वा भजी आणि गरम वाफाळलेला चहा घेताना वेगळीच मजा येई.
रमेश भाटकर यांनी वाढदिवसासाठी सकाळीच केक मागवला होता.
एके दिवशी हॉटेलमधील मुलाने मला येऊन सांगितले, “मॅडम, थोड्या येडानं भाईर येजा.” बाहेर गेल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. हॉलमध्ये शेंडेसर, रमेश भाटकर, कुलदीप पवार, हॉटेल मालक, सगळी काम करणारी मुले हजर होती. रमेश भाटकर यांनी माझ्या वाढदिवसासाठी सकाळीच केक मागवला होता. संध्याकाळी दुसरा धक्का बसला. आम्ही जसे नाटकाच्या ठिकाणी पोचलो, तसा मुलींनी केक काढला. म्हणाल्या, “मॅडम, काकाजींनी सांगितलं व्हतं आमाले, तुमचा वाढदिस हाय म्हून.” त्या बिच्चाऱ्या सगळ्यांनी दहा-दहा रुपये जमवून माझ्यासाठी केक आणला होता. मला तर रडूच कोसळले. तिसरा धक्का बसला. जेथे नाटक होते तेथील आयोजकांनीही मध्यंतरात केक आणला होता. मी वाढदिवसाला एकाच दिवशी तीन केक आयुष्यात पहिल्यांदाच कापले असतील ! हळू हळू, आमची सर्वांची गट्टी जमली होती. मुले-मुली घरातील कोठलीही समस्या आम्हाला येऊन सांगत आणि आमचे जज्ज होते काकाजी- म्हणजे रमेश भाटकर. ते त्यांना त्या समस्येचे निवारण कसे करायचे ते सांगत व त्यावर एखादा तोडगा काढत.
आम्ही नाटकातील सर्व जण दोनतीनदा मॅनेजर देवा यांच्या शेतावर सहलीला गेलो. तेथे चुलीवर स्वयंपाक केला. तेथेच सूर्यास्त होऊन चंद्र-चांदण्या सोबतीला येईपर्यंत गाण्याच्या मैफली रंगवल्या. रमेश भाटकर तर चांगले गायचेच, पण बाकीची मुले-मुलीही सुंदर गात. मी मात्र गाण्याच्या वाटेला कधी गेले नाही. मी कविता म्हणायचे. आमच्या त्या सहलीमुळे सगळ्यांच्या वागण्यात एक मोकळेपणा आला होता. मन-बंध घट्ट घट्ट होत गेले.
झाडीपट्टी प्रदेशात गरिबी आहे. नाटकात काम करणारे जवळजवळ सर्व कलाकार दिवसभर छोटी छोटी कामे करतात. म्हणजे कोणी एखाद्या दुकानात काम करतो, कोणी कोणाच्या शेतावर काम करतो. आमच्या नाटकात काम करणाऱ्या दोघी तर पहाटे जंगलातून काटक्या गोळा करून, त्याची मोळी करून आणत आणि विकत. पण एकदा चेहऱ्यावर रंग चढला, की ते सारे त्यांच्या त्यांच्या भूमिकांमध्ये चपखल शिरत. त्या कष्टाची एकही सुरकुती त्यांच्या चेहऱ्यावर राहत नसे. ‘पोटासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा’ ह्या उक्तीचे ज्वलंत उदाहरण तेथे आमच्या प्रत्ययास आले. त्यांचा दांडगा उत्साह, त्यांची ऊर्जेने ओतप्रोत भरलेली व्यक्तिमत्त्वे... त्या प्रतिकूल परिस्थितीतही सगळे कलाकार जीव तोडून काम करतात. प्रेक्षकही त्या जीवघेण्या थंडीत शेवटपर्यंत बसलेले असतात आणि नाटकाचा मनसोक्त आस्वाद घेऊन दाद देतात. स्थानिक पुरुष कलाकारांना एक ते सात हजार व स्त्री कलाकारांना दोन ते दहा हजार रुपये मानधन मिळते. बाहेरून आलेल्या सिनेकलाकाराला त्याच्या प्रसिद्धीनुसार दहा ते पंचवीस हजार रुपये मानधन दिले जाते. माझ्या आधी कान्होपात्रा, मधुवंती दांडेकर, विमल कर्नाटकी, जयश्री शेजवलकर... अशा स्त्री कलाकारांनी झाडीपट्टी रंगभूमीवर कामे केलेली आहेत. मी आणि रमेश भाटकर, आम्ही उ.मा. शेंडे यांच्या ‘जय दुर्गा नाट्यरंगभूमी’ या 'प्रेस'साठी ‘पाझर’, ‘पैसा’, ‘आक्रोश भारतमातेचा’ अशा तीन नाटकांचे चार महिन्यांत एकावन्न प्रयोग केले. त्या नाटकांच्या सगळ्या प्रयोगांना प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आणि आम्ही अनुभवला एक आगळावेगळा रंगमंचीय अनुभव!
स्थानिक कलाकार घरी एका निवांतक्षणी
तेथे आमचे वास्तव्य चार महिने होते. त्या कालावधीत आम्ही तेथील वातावरणाशी समरस झालो होतो. तेथील लोक, तेथील कलाकार, तेथील बोलीभाषा आम्हाला आमची वाटू लागली होती. परतीच्या प्रवासाला पाय जड झाले होते. इकडे मी आले. मात्र मला मुंबईला काही काम नव्हतेच. मी तसे नियोजन आधीच केल्यामुळे तसा काही त्यावर परिणाम झाला नाही. झाडीपट्टीतील बोचऱ्या, गोठवणाऱ्या थंडीपेक्षा तेथील लोककलाकारांची पोटासाठीची, जगण्यासाठीची धडपड मनात सलते, बोचते. तेथील कलाकार ‘झाडीपट्टी रंगभूमी’ उमेदीने, जिद्दीने जगवत आहेत. भविष्यात आशेच्या किरणांची प्रतीक्षा करत आहेत. त्यातल्या त्यात स्त्री-कलाकार घर सांभाळून ‘कोरभर भाकरीचे- वीतभर कपड्यांचे’ स्वप्न मनात ठेवून ‘टीचभर पोटासाठी’ रंग लावून गावोगावी, रानोमाळी नाटक करत फिरत आहेत. त्या नाटकातून समाजप्रबोधनही होत आहे... हेच तेथील वास्तव!
मी परत आल्यावर मीडियावाल्यांनी माझ्या अनुभवांना प्रसिद्धी देऊन माझे कौतुक केले. त्या अनुषंगाने माझी मुलाखत टाइम्स ऑफ इंडियामध्ये शर्मिला भागवत यांनी घेतली, तर दूरदर्शनवर दोन भागांत माझी मुलाखत अनिता नाईक यांनी घेतली होती. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी तर माझे तेथील सगळे अनुभव विचारून घेतले व ते स्वत: तेथे काम करण्यास गेले.
झाडीपट्टी रंगभूमीची शहरी कामगार रंगभूमीशी तुलना करता येईल का? परंतु शहरांतील सगळ्या सोयीसुविधा म्हणजे तांत्रिक, लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयदृष्ट्या शहरी कामगार रंगभूमीला मिळाल्यामुळे ती झाडीपट्टी रंगभूमीपेक्षा सरस आहे हे निर्विवाद ! कामगार रंगभूमीवर विविध कंपन्यांतील कामगार काम करतात म्हणून ती कामगार रंगभूमी; अन्यथा ती व्यावसायिक नाटकांच्या तोडीची ठरते. आता तर कॉर्पोरेट जगतातील नामांकित कंपन्यांमुळे कामगार रंगभूमीचा स्तर अधिक वाढला आहे. कामगार रंगभूमीची आर्थिक उलाढाल नसते, तर झाडीपट्टी रंगभूमीची आर्थिक उलाढाल ही कोट्यवधी रुपयांची असते. झाडीपट्टी रंगभूमी रोजगाराभिमुख झाली आहे. तेथील एका नाटकामुळे चाळीस लोकांना रोजगार उपलब्ध होतो. ती हौस म्हणून राहिलेली नाही तर ती लोकव्यवहार रंगभूमी झाली आहे.
सविकल्प समाधी साधून केलेला दृकश्राव्य असा नाट्यमय रंगमंचीय आविष्कार म्हणजे नाटक असे मानले जाते. सविकल्प समाधी म्हणजे कलाकाराने त्या त्या भूमिकेत शिरून अभिनय करणे. त्या दृष्टीने झाडीपट्टीवरील नाटकांना नाटक म्हणणे योग्य होईल. तसेच नाटकाला आवश्यक असलेले मुलभूत घटक – संहिता, नेपथ्य, प्रकाश, संगीत, पात्रांचा संवादाभिनय हे सर्व झाडीपट्टीच्या नाटकांत दिसतात. त्यामुळे झाडीपट्टीच्या नाटकांना नाटक म्हणून संबोधणे उचित आहे; जरी त्याची सादरीकरणाची पद्धत व बोलीभाषा वेगळी असली तरी !
खरे सांगायचे तर मी तेथे इतका काळ व्यतीत करू शकेन असे वाटलेच नव्हते. कारण तेथील कडाक्याच्या गोठवणाऱ्या थंडीत, नक्षलवाद्यांच्या भीतीच्या छायेत काम करणे खूप कठीण होते. पण एक अद्भुत अनोखा नाट्यानुभव तेथे राहिल्यामुळेच मिळाला. मला मी कधीही न साकारलेली खलनायिकाही तेथेच साकारायला मिळाली. मला मुख्य म्हणजे जात-धर्म ह्यांच्या पल्याडचा एक माणुसकीचा परिपाठही तेथेच शिकायला मिळाला !
- ज्योती निसळ 9820387838
ज्योती निसळ या लेखिका आणि अभिनेत्री आहेत. त्यांनी व्यावसायिक आणि झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटके, दूरदर्शनवरील मालिका, मराठी व हिंदी चित्रपट यांत वैविध्यपूर्ण दर्जेदार भूमिका केल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी कबड्डी आणि खो-खो या खेळांत राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी नाट्यपरीक्षक म्हणून महाराष्ट्रभर विविध स्पर्धांना हजेरी लावली आहे. त्या मुक्त पत्रकार होत्या. त्यांनी महत्त्वाच्या दिवाळी अंकांत लेखन केले आहे. तसेच, त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. (C/o डॉ. भा.वि. निसळ, 536, कमलसागर सोसायटी, भांडुप (पूर्व) मुंबई 400042)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संबंधित लेख -
झाडीपट्टी रंगभूमी अजूनही चैतन्यमय (Vidharbha's Folk Theatre Still Lively)
अनिल नाकतोडे - झाडीवूडचा खलनायक (The Villain of the Jhadistage)
वडसा (देसाईगंज) - द झाडीवूड! (WADSA - The Jhadistage)
झाडीपट्टी रंगभूमीचा रंगमंच – प्रेक्षकांचे कुतूहल (Jhadipatti Drama stage: Unique development)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
6 टिप्पण्या
फार छान. अगदीं नविन माहिती. धन्यवाद
उत्तर द्याहटवासुंदर लेख
उत्तर द्याहटवाज्योतीजी, तुमचा अफाट सुंदर लेख वाचला. खूप सुंदर ह्यात काही वादच नाही. पण हा नुसता लेख नाही, तर "झाडी"रंगभूमी बद्दल जे तुम्ही लिहिलं आहे ते खूप भावते. तुमचा नाट्य, चित्रपट क्षेत्रातील जबरदस्त अनुभव तर आहेच. पण झाडी रंगभूमी, तिथलं वातावरण, कलाकार, त्यांचे विचार, तिथली संस्कृती, नाट्य प्रयोगाची अद्वितीय परंपरा, इतिहास, ते अनुभव, असा सर्वांगीण,सुंदर लेख वाचल्याचं समाधान मिळालं. मी स्वतः झाडीत नाटकातून कामं केली आहेत. त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
उत्तर द्याहटवा�� खूप thnx. आणि स्पेशल अभिनंदन. मजा आली.गोड लिहिलं तुम्ही.
ज्योती, तुझा 'झाडीपट्टी' वरचा लेख आज वाचनात आला.. छान लिहिले आहेस अनुभव!
उत्तर द्याहटवाहर्षवर्धन पवार
उत्तर द्याहटवाफार सुंदर लिहिलेत. ग्रेट झाडी रंगभूमी. हेच महाराष्ट्राचे वैभव आहे.
उत्तर द्याहटवा