कुंडलापूरचा ऐतिहासिक वारसा (Treasure of Historical information at Kundlapur-sangli)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

कुंडलापूरचा ऐतिहासिक वारसा (Treasure of Historical information at Kundlapur-sangli)

 


ग्वाल्हेर घराण्यातील सरदार शहाजी राणोजी शिंदे यांची समाधी सांगोला-सांगली मार्गावरील कुंडलापूर घाटातून दिसते. त्या रस्त्यावर कवठेमहांकाळ तालुक्‍यातील कुची गावाजवळ तिसंगीमार्गे पुढे गेले, की कुंडलापूर घाट लागतो. त्या घाटातूनच डाव्या हाताला मोकळ्या माळरानावर, पूर्वाभिमुख, गोलघुमटाधारी इमारत दिसते. तीच शहाजी शिंदे यांची समाधी. तेथे जाऊन पाहिल्यावर दक्षिणेकडून उत्तरेकडे एका ओळीत थोड्या थोड्या अंतरावर तीन समाधी दिसतात. त्यांतील पहिली शहाजी शिंदे यांची, दुसरी त्यांच्या सौभाग्यवतींची आणि तिसरी त्यांच्या घोड्याची ! तो घोडा प्रामाणिक आणि निष्ठावान होता. त्या तिन्ही वास्तू विनाशाकडे वाटचाल करत आहेत. शहाजी राणोजी शिंदे यांची समाधी दगडी चौथऱ्यावर एका घुमटाकार शिखराखाली उभी आहे. चौथरा 18.8' x 18.8' x 2.8' (उंची) या मापात आहे.

      

        

          इमारत पूर्ण काळ्या दगडात असून घुमटावरील प्लॅस्टर पूर्ण निघून गेले आहे. इमारतीच्या कमानी दाराची रूंदी 2.7 फूट आहे. आत तीन भिंतींवर कमान कोरलेली आहे. पश्‍चिम बाजूच्या भिंतीच्या तळाशी लागून समाधीचे बांधकाम आहे. तीच शहाजी शिंदे यांची समाधी. इमारत मोडकळीस आलेली दिसते. दुसरी समाधी 18'x18'x4' (उंची) अशा चौथऱ्यावर उभी आहे. चौथरा काळ्या दगडात आहे. चौथऱ्यावर कसलेही बांधकाम नसून फक्त मधोमध समाधी आहे. ती शहाजी शिंदे यांच्या सौभाग्यवतींची. त्यांचे नाव मात्र माहीत नाही. तिसरी समाधी त्यांच्या प्रामाणिक अश्‍वाची. ती 12'x12'x2' (उंची) अशा दगडी बांधकामात असलेल्या चौथऱ्यावर उभी आहे. तिन्ही समाधी त्यांचे अस्तित्व कालौघात हरवून चाललेल्या आहेत. सभोवती झाडेझुडपे वाढली असून त्या वास्तूकडे लक्ष असल्याचे दिसत नाही.

         


            कुंडलापूरचे ग्रामस्थ आणि अभ्यासक यांच्याकडून समजले, की शिंदे घराण्याकडे वाघोली, गर्जेवाडी, ढालगाव, तिसंगी आणि कुंडलापूर या पाच गावांची जहागिरी होती. त्यावेळी विजापूरच्या आदिलशहाची सत्ता या परिसरात होती. विजापूर-गुहागर मार्गावरील खानापूर येथे रसद ठेवण्याचा ठिय्या होता. आदिलशहाची रसद तोडण्यासाठी एके दिवशी बाहेर पडलेल्या शहाजी शिंदे यांचा त्यावेळी झालेल्या लढाईत मृत्यू झाला. त्यांना वीरमरण लाभले ! त्यानंतर त्यांच्या पत्नीने धाडस करून शहाजींचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यावर कुंडलापूर येथील समाधी-वास्तूच्या जागी अंत्यसंस्कार केले. त्याच वेळी त्या सतीही गेल्या. सैनिकांनी त्या जागेवर तीन समाधी उभारल्या. त्यांची नासधूस आदिलशहाच्या सैन्याने केली. त्या वास्तू उपेक्षित, दुर्लक्षित आहेत. कुंडलापूर (जि.सांगली) येथून जवळच असलेल्या तिसंगी येथे पोळ सरकारांच्या वाड्यात त्या काळी गुंडो रामचंद्र दिवाण नावाचे कारभारी होते. ते खाजगी दप्तर सांभाळणे, चिटणीस म्हणून काम करत असत. त्यांच्या वंशजांकडे काही मोडी कागदपत्रे असावीत. त्या आधारे शहाजी शिंदे यांचा इतिहास सांगताही येऊ शकेल, कदाचित.

 ('आडवाटेवरचा इतिहास' या पुस्तकावरून उद्धृत)

- प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com

डॉ. प्रल्हाद कुलकर्णी हे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कोल्हापूरच्या विवेकानंद संस्थेच्या कॉलेजमधून निवृत्त झाले. त्यांनी इंग्रजी लेखक विल्यम गोल्डिंग यांच्या कादंबऱ्या या विषयावर पीएच डी पदवी संपादली. त्यांची मराठीत आठ पुस्तके व इंग्रजीत चार पुस्तके प्रसिद्ध आहेत. निवृत्तीनंतर त्यांचा भटकंती आणि तत्संबंधी लेखन हा छंद बनला आहे. त्यांनी भारतविद्या, मोडीलिपी व पर्शियन भाषा या विषयांचाही अभ्यास केला आहे. त्यांनी 'साहित्याचे पश्चिम रंग' हे सदर तरुण भारतमध्ये पाच वर्षे लिहिले होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या