नाशिकचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 26-27-28 मार्चला होऊ शकले नाही, परंतु त्याच तारखांना नाशिकहूनच एका आभासी साहित्य संमेलनाची सूत्रे हलवली गेली आणि ते तिन्ही दिवस एक झकास मराठी साहित्य संमेलन घडून आले ! ते योजले होते चंद्रपूरच्या ‘सृजन’ संस्थेने आणि त्याचे सूत्रसंचालन केले होते मृणाल पात्रीकर-धर्माधिकारी यांनी, नाशिकहूनच... चंद्रपूरच्या ‘सृजन’ या संस्थेला 2021 मध्ये बारा वर्षे पूर्ण झाली. ‘सृजन’ने एक महिना- एक कार्यक्रम हे व्रत तब्बल एक तप चालवले. ‘सृजन’ दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘एक महिना एक कार्यक्रम’ याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करत आले आहेत. 144 महिने आणि 144 कार्यक्रम! त्यांनी अभ्यासक, साहित्यिक, कलावंत, समाजसेवक एवढेच नव्हे तर सर्वसामान्य पण गुणी जनांच्या मुलाखती, चर्चासत्रे, साहित्य प्रकाशन, कविसंमेलने, संगीत मैफिली, नाट्य आणि कला सादरीकरणे यांतून चंद्रपूरचे सांस्कृतिक जग चैतन्यमय ठेवले.
‘सृजन’ साहित्य संमेलनाचे आयोजन तीन दिवस 26, 27 आणि 28 मार्च 2021 ला आभासी पद्धतीने केले गेले. त्यात पहिल्या दिवशी होळीच्या निमित्ताने कविता, दुसऱ्या दिवशी तबलावादक घनश्याम कुंभारे याची मुलाखत (कथ्थक नृत्यांगना मृणालिनी खाडिलकर यांनी घेतली) आणि तिसऱ्या दिवशी ‘विदर्भरत्न’ व्यंगचित्रकार, साहित्यिक जयवंत काकडे यांची मुलाखत (मधुसूदन पुराणिक आणि श्याम ठेंगडी यांनी घेतलेली) असा कार्यक्रम प्रसारित झाला.
सृजनच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांस उपस्थित आमटे कुटुंबीय |
सृजन’ ही काही मोठी संस्था नाही. तो आहे महाराष्ट्रातील अनेक संस्थांप्रमाणे एकखांबी तंबूच. ‘सृजन’चे आयोजक आशीष देव सांगतात त्याप्रमाणे तेथे कोणी अध्यक्ष नाही, कोणी सचिव नाही, कोणी कार्यकर्ता नाही. ज्यांना कार्यकर्ते म्हणता येतील असे लोक प्रासंगिक मदतीसाठी येत असतात. ते प्रेमाने जुळलेले रसिक श्रोतेच ! अशा स्वरूपाच्या रचनेला संस्था म्हणावे काय हा प्रश्नच आहे. पण तो मुळात या ठिकाणी दुय्यम आहे. ‘सृजन’चा सर्व खर्च आयोजक करतात. इतरांकडून पैसे काहीही स्वीकारले जात नाहीत. उलट, कोणाला आर्थिक रूपात काही दिलेही जात नाही. कोणाची सहृदयतेने मदत देण्याची इच्छा असली-नसली तरीही ती स्वीकारली जात नाही. येणाऱ्या अतिथी-कलावंतांना कोठल्याही प्रकारचे मानधन दिले जात नाही; जाण्यायेण्याचे भाडेही दिले जात नाही. तरीसुद्धा अनेक मान्यवरांनी स्वखर्चाने येऊन ‘सृजन’च्या मंचावर विनामूल्य सादरीकरण केले आहे. सगळा प्रेमाचा व्यवहार ! पाहुणे मंडळी रसिकांच्याही ओळखीतून काही वेळा आलेली असतात.
व्यंगचित्रकार मनोहर सप्रे |
‘सृजन’ कलागुणांची मेजवानी चंद्रपूरकर रसिकांना निस्वार्थपण देणे या एकमेव हेतूने कार्य करत आहे. स्वतः आयोजक कधीही त्याबाबतीत पुढे येत नाहीत किंवा त्यांचे नाव प्रसारमाध्यमांवर पुढे दामटत नाहीत. ते स्वत:ला त्यापासून कसे अलिप्त ठेवता येईल असे पाहत असतात. मात्र ते सोबतचे सहकारी, कलावंत, साहित्यिक, वक्ते, सूत्रसंचालक यांना योग्य रीत्या सांभाळत असतात/जपत असतात. ‘सृजन’च्या प्रत्येक आयोजनाचा हेतू उत्तम कार्यांची, गुणांची, चळवळींची, सेवेची दखल घेणे हा आहे; त्याबरोबर त्यांना पटते-रूचते ते उत्तमोत्तम नव्या पिढीपर्यंत पोचवणे हाही राहिलेला आहे. येणाऱ्या पिढीने त्यातून प्रेरणा घ्यावी. मुलाखती-व्याख्यानांच्या माध्यमातून व्यक्ती, कलावंत, समाज कसा घडतो हे जाणून घ्यावे यासाठी ‘सृजन’ व्यासपीठ पहिल्या कार्यक्रमापासून प्रयत्नशील आहे. ‘सृजन’ कार्यक्रमांतून अनेक नवोदितांना मंचसंचलनाची संधी लाभली आहे. त्यातून काही चेहरे स्थानिक आकाशवाणी आणि वृत्तवाहिन्या यांना मिळाले आहेत. ‘सृजन’ साहित्य संमेलनाचे निवेदन-संचालन करणाऱ्या मृणाल पात्रीकर-धर्माधिकारी या त्यांतील एक. त्या सध्या नाशिक आकाशवाणीशी निवेदक म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच, सुवर्णा धानोरकर या ‘झी-24 तास’च्या निवेदक ‘सृजन’च्या मित्रवर्तुळात आहेत. त्यांचाही तपपूर्ती कार्यक्रमात महत्त्वाचा सहभाग आहे. काही वक्तेही घडले आहेत.
प्रसिद्ध विचारवंत अभय बंग |
‘सृजन’च्या कार्यक्रमांसाठी कलावंत व मान्यवर कोण येऊन गेले आहेत? नुसती नावे बघावी - रंजन दारव्हेकर, संजय भाकरे, प्रकाश एदलाबादकर, सुरेश द्वादशीवार, लोकनाथ यशवंत, विकास आमटे, प्रकाश आमटे, अभय बंग, राणी बंग, भारती आमटे, पारोमिता गोस्वामी, प्रशांत गायकवाड, अशोक पवार, अनिकेत आमटे यांसारखे अनेक दिग्गज...शिवाय परिसरातील अभ्यासक, वक्ते, कवी-लेखक, समाजसेवी गट, प्रेरणादायी भाष्यकार, पत्रकार, फोटोग्राफर यांचेसुद्धा गुण प्रदर्शन करणारे कार्यक्रम झाले आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात. त्या गुणांची ओळख करून देणारा कार्यक्रम म्हणजे सृजन ! चंद्रपूर शहरात आणि परिसरात इतर संस्थांच्या होणाऱ्या कार्यक्रमांची दखल ‘सृजन’ घेत आलेले आहेत. दिवाळीसारख्या सणानिमित्त होणारे प्रासंगिक स्नेहमीलन म्हणजे जिवाभावाच्या गोतावळ्याने भारलेला सोहळा असतो !
वेळेवर कार्यक्रम सुरू होणे हे ‘सृजन’चे वैशिष्ट्य आहे. एक मिनिटसुद्धा वेळेबाबत हयगय होत नाही. कधी कधी, त्या करता ऐन वेळी कार्यक्रमात बदल झालेले आहेत. ‘सृजन’चे सूत्रधार आशीष देव सांगतात, ’शो मस्ट गो ऑन’ या धोरणाला आमच्याकडे महत्त्व आहे. ‘सृजन’चा रसिकवर्ग नियमित आहे. त्यांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते वयाची ऐंशी गाठलेल्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. अनेक रसिकश्रोते अगदी पहिल्या आयोजनापासूनचे साक्षीदार आहेत. ते केवळ साक्षीदार राहिलेले नाहीत तर प्रत्येक कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावतात. न्यू इंडिया कॉन्व्हेंट सारख्या शैक्षणिक संस्थांनी ‘सृजन’च्या कार्यक्रमांकरता त्यांची दारे कायम उघडी केली आहेत. ‘सृजन’चे कार्यक्रम कोरोना संक्रमण टाळेबंदीच्या काळात आभासी पद्धतीने फेसबूकवर, यूट्यूबवर प्रसारित होत आहेत.
आशिष देव साहित्यिक आहेत. |
आशीष देव स्वतः प्रत्रकार, स्तंभलेखक, विडंबनकार, साहित्यिक आहेत. समाजातील घटनांचे अचूक टिपण करण्याची पारखी नजर त्यांच्याकडे आहे. त्यांची स्वत:ची ’बाबू आयटम’ नावाची प्रकाशन संस्थादेखील आहे. त्या प्रकाशन संस्थेत 2013 पासून पुस्तके प्रकाशित होत आहेत. आशीष देव शिकले सिव्हिल इंजिनीयरिंग, परंतु झाले लेखक-प्रकाशक-पत्रकार. ते म्हणाले, की “तो योगायोग होय. मी इंजिनीयरिंग शिकलो तेव्हा मंदी होती. माझ्या क्षेत्रात नोकरीधंदा शक्य नव्हता. मग दुकान चालवण्यापासून सगळ्या गोष्टी करून पाहिल्या आणि लेखक-पत्रकारितेत स्थिरावलो; त्याबरोबर विम्याचे कामही करतो. मी महाविदर्भ दैनिकासाठी काम केले आणि ठिकठिकाणच्या वर्तमानपत्रांत विविध कॉलम लिहिले. लेखक विठ्ठलराय भट यांनी माझे पहिले पुस्तक प्रकाशित केले, मग पुस्तक प्रकाशनाची चटक लागली. तेथे आता बस्तान बसले आहे. माझी स्वत:ची चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत, एक ऑडिओ बुक आहे. मी इतर लेखकांची पुस्तके प्रसिद्ध करत असतोच.”
कार्यक्रमास उपस्थित रसिक |
बाबू आयटम हे प्रकाशनाचे नाव वेगळे आहे ना? आशीष म्हणाले, की बा म्हणजे सह आणि बू म्हणजे वास. बदबू नको म्हणून बाबू ! आणि आयटेममध्ये वैशिष्ट्यपूर्णता, वेगळेपणा आहे की नाही? प्रत्येक व्यक्ती, वस्तू वेगळी असते. म्हणून आम्ही आमच्याकडे कशालाही आयटम म्हणतो. बाबू आयटम हा शब्दप्रयोग आता आमच्याकडे फजिती, आनंद, दु:ख, समाधान... कशासाठीही वापरतात.’बाबू आयटम’च्या बॅनरखालीदेखील कार्यक्रम होत असतात. मात्र ते साहित्यिक स्वरूपाचे असतात. बाबू आयटम प्रकाशनाचे कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या शनिवारी तर ‘सृजन’चे कार्यक्रम लगतच्या रविवारी असतात. ते दोन्ही कार्यक्रम म्हणजे चंद्रपूरकर साहित्यकलाप्रेमी दर्दी रसिकांसाठी पर्वणीच होय. तपपूर्तीचा 144 वा कार्यक्रम (25 एप्रिल 2021) आभासी माध्यमावर झाला. चंद्रपुरातील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना भाग्यलक्ष्मी देशकर आणि श्वेता शेलगावकर यांचा तो कार्यक्रम होता.
- गोपाल शिरपूरकर 79 7271 5904 gshirpurkar@gmail.com
गोपाल शिरपूरकर हे चंद्रपूरला राहतात. ते पेशाने शिक्षक आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा आणि कविता प्रसिध्द आहेत. ते विविध वर्तमानपत्रांतून लेखन करत असतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या